काही माणसं जन्मतः समजुतदार असं म्हटलं जातं. समजुतदार म्हणजे काय ह्याचा थोडा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न !
सामाजिक जीवन सुरळीत चालण्यासाठी मनुष्यजातीने शेकडो वर्षांच्या अनुभवांच्या आणि सामुहिक बुद्धिमत्तेच्या जोरावर कायदे बनविले आहे. या कायद्यांच्या जोरावर सामाजिक जीवन सुरळीतपणे चालवण्याची मनिषा शासनकर्ते बाळगुन असतात. जर समाज सुशिक्षित आणि सुविचारी असेल तर शासनकर्त्यांची हे मनिषा बऱ्यापैकी पूर्ण होते. परंतु मनुष्यांच्या एखाद्या छोट्या समुहाच्या दैनंदिन कामकाजात सुरळीतपणा हवा असेल तर तिथं कायदे लागू करता येणं शक्य नसते.
प्रत्येक कुटुंबाचे, एखाद्या मित्रमंडळींच्या गटाचे आणि सामाजिक संस्थांचे काही अलिखित असे नियमअसतात. हे अलिखित नियम त्या गटांत वावरण्यासाठी सदस्यांना एक चौकट घालुन देतात. ही चौकट काहीशी ऐच्छिक असते. त्यामुळं अलिखित नियम, बंधनांचा अभाव हे सर्व घटक अस्तित्वात असतानादेखील जी व्यक्ती प्रसंगी स्वतःकडे पडती बाजु घेत सामुहिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी पुढाकार घेते तिला समजूतदार व्यक्ती असे आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल.
आता प्रत्येक व्यक्तीचा समजुतदारपणा कुठून येतो याकडे आपण वळूयात! व्यक्तीला जन्मतः समजूतदारपणाची पुंजी मिळालेले असते. ही मूळ पुंजी बहुतांशी वेळा त्या व्यक्तीच्या वयानुसार अनुरुप असे रुप घेत त्या व्यक्तीचा समजूतदारपणा आयुष्यभर कायम ठेवण्यास मदत करते. समजूतदारपणाचे लहानपणीचे उदाहरण म्हणजे सर्व मुलं एकत्र खेळत असताना आपला चेंडू असूनही सदैव पहिल्या फलंदाजीचा आग्रह न धरणे हे असू शकते! मोठं झाल्यावर समजूतदारपणाला बहुआयामी बनावं लागतं! आपल्याशी कठोर वागणाऱ्या लोकांशी आपणसुद्धा तसंच वागायला हवं हा अट्टाहास न धरणे हा समजूतदारपणा असू शकतो!!
आपल्याला समजूतदारपणाची जी पुंजी लहानपणी मिळालेली असते ती तशीच्या तशी आयुष्यभर पुरणे किंबहुना तिच्यावरील विश्वास अढळ रहाणे तसे कठीणच! समजूतदारपणा हा काही फुकटात येत नाही. समजुतदारपणा दाखवणाऱ्या व्यक्तीला त्याची काही प्रमाणात किंमत मोजावी लागते! काहीजणांना त्यासाठी त्याग करावा लागतो तर कधी होणारा मानसिक संताप आतल्याआत दडून ठेवावा लागतो.
ही शक्ती त्या व्यक्तीला नक्की देतं कोण? प्रत्येक समजूतदार व्यक्तीचा समजुतदारपणावर विश्वास ठाम राहण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्यातरी एका आश्वासक स्त्रोताचा पाठिंबा लागतो. हा स्त्रोत "तू समजूतदार आहेस" आणि "जगाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, त्यामुळे तू सदैव समजूतदारच राहा" असे आणि तत्सम संदेश त्या व्यक्तीला सदैव देत राहतो !!
आता पोस्टच्या उत्तरार्धाकडे वळुयात ! कोरोनामुळं मनुष्यजातीचा सरासरी समजुतदारपणा आधीच खालावला गेला आहे. बरीच लोक आपल्या नेहमीच्या वर्तवणुकीच्यापेक्षा काहीशा वेगळ्या वर्तवणुकीचे प्रदर्शन करु लागले आहेत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी ! सामाजिक जीवनातील काही घटक बऱ्याचजणांना आपलं मनःस्वास्थ्य टिकवुन ठेवायला मदत करतात. ह्या स्वास्थ्यकारी स्त्रोतांशी संपर्क तुटल्यानं आणि हा संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्याचा नक्की कालावधी माहित नसल्यानं माणसं बैचैन झाली आहेत.
अशा वेळी समाजातील समजूतदार व्यक्तींची जबाबदारी अधिकच वाढली आहे. आपल्या भोवताली वावरणाऱ्या व्यक्तींपैकी कोणाचं मनःस्वास्थ्य हे Breaking Point च्या आसपास पोहचत तर नाही ना ह्यावर ह्या मंडळींनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणं आवश्यक आहे.
आता प्रश्न असा येतो की सामान्य परिस्थितीतील समजुतदार / समजंस माणुस कोरोना काळातील सुद्धा समजंस माणुस असेलच का? त्यांचे स्वास्थ्य टिकवणारे स्रोत त्यांना उपलब्ध राहतील का? समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा ह्या प्रश्नांची उत्तरच येत्या काळातील एखाद्या विशिष्ट समाजाच्या वाटचालीत महत्वाचा भाग घेतील ! एक वेळ करोनानंतर आर्थिक नुकसानीतुन बाहेर पडणे सोपं असु शकेल पण तुटलेल्या भावबंधांना जोडणं हे मात्र कठीण ठरु शकतं !
आदित्य पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा