मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

आदिम वसाहत!



पृथ्वीवरील काही ठराविक मानवांना बाह्य जगतातील घटनांपासून आणि विकासापासून पुर्णपणे विभक्त केलं तर त्यांच्या आयुष्यातील घटनांचा क्रम कसा आहे असेल हा विचार माझ्या मनात सध्या घोळत आहे. हा विचार येण्याचे कारण काय तर तंत्रज्ञान मनुष्याला आपल्या मुळ स्वरुपापासून खुप दूर नेत आहे. त्यामुळे आपल्या मुळ स्वरुपात असलेली आपली काही विशिष्ट वैशिष्टयं आपण गमावुन बसत आहोत. समजा मनुष्यजातीवर बाह्य शक्तीने आक्रमण केलं तर अशा गुणधर्मांची आपल्याला कमतरता भासू शकते. अशा वेळी जर आपणाकडे काही माणसं अशी असतील ज्यांनी आपले मनुष्यजातीचे मूळ गुणधर्म कायम ठेवले आहेत तर अशी माणसे आपल्याला परशक्तींच्या आक्रमणाच्या वेळी वापरता येऊ शकतील.  आता हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! त्याचे उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे. हे संपुर्ण काल्पनिक प्रकरण असुन ह्यात मानवी हक्काचं उल्लंघन होत आहे. परंतु काल्पनिक प्रकरणामुळं माझ्यावर त्याची जबाबदारी नाही. 

एक असा असा विस्तृत निर्मनुष्य प्रदेश ज्याचं क्षेत्रफळ लाखो चौरस मैल असेल तो या प्रकल्पासाठी ताब्यात घ्यायचा. ह्या प्रदेशाभोवती अजुन काही भाग बफर म्हणुन घोषित करायचा. अशाप्रकारे ह्या भागाभोवती दुपदरी कुंपण असणार आणि त्याची सुरक्षितता मानवाला शक्य असेल तितकी कडेकोट असणार. ह्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी जगभरातुन अंदाजे दीडहजार माणसे निवडली जाणार. आयुष्यभरात परत बाकीच्या माणसांशी संपर्क न साधण्याची अट त्यांच्याकडुन मान्य करुन घेतली जाणार. ह्या माणसांची निवड करताना त्यांचं मनोबल अत्यंत कणखर असणार ह्याची खात्री करुन घेतली जाणार. ह्या समुहात जगातील बहुतांशी देशांना, सर्व पेशांच्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं जाणार.  ह्या  लोकांनी आपले धर्म बाजूला ठेवावेत ही अट घातली जाणार. उर्वरित पृथ्वीवरील लोक ह्या लोकांशी संपर्क साधण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाहीत आणि ह्यातील कोणाही मानवानं बाह्यजगताशी संपर्क साधु नये ह्याचं कडेकोट पालन केलं जाईल. ह्या प्रदेशात ना दूरचित्रवाणीचे, मोबाईलचे  सिग्नल पोहोचू दिले जाणार ना ही वसाहत मानवी उपग्रहांच्या नजरेखाली असणार !

ह्या प्रदेशात जागोजागी पाण्याची तळी बनवुन दिलेली असणार. वन्य प्राण्यांना एका केंद्रीय जागी सुरुवातीला बंदिस्त केलं असणार. ज्यावेळी तुम्ही सज्ज व्हाल त्यावेळी ह्या प्राण्यांना मुक्त करा असा आदेश ह्या मानवांना वसाहतीत प्रवेश करतेवेळी दिला जाणार! ह्या लोकांसोबत विविध अन्नधान्यांची, फळझाडाची बियाणी दिली जाणार. त्यांच्यासोबत दुधासाठी गाई सुद्धा द्यायच्या. सुरुवातीच्या वीस वर्षात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करणार नाही हे कायद्यानं ह्या वसाहतीमध्ये शिरणाऱ्या प्रत्येकाला मान्य करावं लागणार!

ह्या दीड हजार लोकांचा ह्या आदिम वसाहतीत प्रवेश करण्याचा दिवस फारच भावनाविवश करणारा असणार. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक ह्या आदिम वसाहतीच्या प्रवेशद्वाराशी गर्दी करणार. प्रवेश करताना फक्त कपड्यांच्या दोन जोड्यांसहित ह्या सर्वांना आत शिरावं लागणार. बाकीचे सर्व भावबंध सोडुन द्यावे लागणार. काही जण आपल्यासोबत आपल्या चिमुरड्या लेकरांना सुद्धा घेऊन येणार! त्या लेकरांचे आजी आजोबा आपल्या आसवांनी भुमातेला ओलेचिंब करणार !

मानसिकदृष्ट्या कितीही कणखर असले तरी सुरुवातीचा काही काळ हे लोक गोंधळून जातील. त्यांना बाह्य जगताची खुप खुप आठवण येईल इंटरनेटच्या माध्यमातून सर्व जगाशी संपर्क साधण्याची साधने तुटल्यामुळे ते एकदम उदासीनसुद्धा होऊ शकतात.  पण आपल्या कणखर मानसिकतेच्या आधारे ही लोकं फार काळ उदास राहणार नाहीत हे मी गृहीत धरीत आहे. हा सुरुवातीचा संभ्रमाचा काळ संपला की मग हे लोक आपला एक नवीन विश्व बसवायला सुरुवात करतील. तळ्याभोवती हळूहळू हिरव्या वृक्षांची झाडी निर्माण होण्यास सुरुवात होईल. या गटांमधील असणारे अभियंते उपलब्ध नैसर्गिक पद्धतीच्या साधनाने आपली घरकुलं बनवण्याचा प्रयत्न सुरु करतील. हा संपुर्ण प्रभाग हा मानवी उपग्रहांच्या कक्षेपासून वेगळा तोडला गेला असल्यानं इथं काय होत आहे हे कोणालाही बाहेरुन पाहता येणार नाही. जसजसा हिरवागार प्रदेश वाढत जाईल तसतसे तिथे वनस्पतींची विविधता वाढत जाईल. आणि एका क्षणी वन्य प्राणी मुक्त केले जातील. 

साधारणतः पन्नास-साठ वर्षे अशीच निघुन जातील. ह्या गटातील कोण ह्या समुहाचा ताबा घेईल ह्यावर शक्य असलेल्या अनेक शक्यतांपैकी कोणती निवडली जाते हे अवलंबुन राहील. तिथं जन्मलेल्या नवीन पिढीला बाह्य जगताशी काहीच माहिती नसेल. एखादा प्रसंग मग असाही येईल, घनदाट जंगलातून सूर्याची किरणे कसाबसा आपला मार्ग काढत जमिनीपर्यंत पोहोचली असतील. तिथं खडकाळ प्रदेशातून वाहणाऱ्या पाण्यावर एखादा हिंस्त्र पशु आपली तहान भागवण्यासाठी आला असेल आणि त्याच्या आसपास असलेल्या घरातून एखादा विशी - तिशीतला युवक त्याच्याकडे कुतूहलाने पाहत असेल. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे एकदा का अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा मानवाच्या या समूहाने भागवल्या की मग त्यांचा मेंदू कार्यरत होईल. मानवजातीने जो उत्क्रांतीचा टप्पा गेल्या सहस्त्र वर्षात पार पडला तो वेगाने पार पाडण्याचा प्रयत्न हे सर्व सुरू करतील. परंतु त्यांना बाह्य जगतापासून पूर्णपणे तोडल्यामुळे त्यांच्या प्रगतीवर अनेक बंधने येतील. 

मग ते उपलब्ध एका शक्यतेनुसार हे सर्वजण निसर्गाच्या सानिध्यात आनंदाचा परमोच्च क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करतील. हवेचे शुद्धतेचे प्रमाण कमाल असेल. रात्रीच्या आकाशातील चांदण्यांचे सौंदर्य त्या लोकांना अगदी मनसोक्त लुटता येईल. 

मी माझी कल्पनाशक्ती इथंच आवरती घेतोय! जाता जाता एक प्रश्न तुम्हांला! खरोखरच अशी वसाहत उभारायचं ठरवलं आणि त्यात तुमची तुमच्या कुटुंबियांसोबत निवड झाली तर व्हाल तयार आत जायला?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...