संवादाचे मूळ स्त्रोत व्यक्तीच्या मनात येणाऱ्या विचारांमध्ये असतं. कोणत्याही संवादांमध्ये एखादी व्यक्ती दोन प्रकारच्या भूमिका निभावत असते. पहिल्या प्रकारात ही व्यक्ती संवाद पुढे चालवण्यासाठी काही विशिष्ट विधान करत असते आणि दुस-या प्रकारांमध्ये ही व्यक्ती समोरील व्यक्तीने केलेल्या विधानाला उत्तर देते.
आपल्या मनात येणारा विचार आणि त्याला आपण दिलेले शब्दरुप यामधील रुपांतरणाची प्रक्रिया कशी होत असावी हे पाहणे काहीसं मनोरंजक असावं. प्रत्येक व्यक्तीची कालावधीनुसार स्वतःची अशी संवाद कला विकसित झालेली असते. यामध्ये त्या व्यक्तीच्या मनात येणारे विचार एका विशिष्ट प्रकारे शब्दात परिवर्तित होत असतात. या परिवर्तित होण्याच्या पद्धतीनुसार आपण त्या व्यक्तीचे वर्गीकरण करीत असतो. जसे की ती व्यक्ती फटकळ आहे, ती व्यक्ती एकदम शब्दाला मध लावून बोलते वगैरे वगैरे!!
काही व्यक्तींना कालानुरूप विकसित झालेली आपली संवाद शैली बदलता येणं शक्य होत नाही. परंतु काही व्यक्तींना ते वावरत असलेल्या सामाजिक स्थितीनुसार हा बदल घडवून आणणे आवश्यक असते. संवादशैली मध्ये तुम्ही बोलत असणारे शब्द हा केवळ एकमेव घटक नसून तुमची शब्दफेक, तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शब्दांचा तुम्ही लावलेला क्रम हे महत्त्वाचे घटक असतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या नैसर्गिक संवादशैलीशी ज्यावेळी फारकत घेत असतो त्यावेळी काही वेळा आपल्या मनामध्ये एक विशिष्ट हेतू साध्य करणे हा एक विचार असतो परंतु काही वेळा एखाद्या प्रसंगाच्या भरात आपणही फारकत घेत असतो.
जाणूनबुजून घेतलेली फारकत आणि अजाणतेपणी झालेली फारकत यांमध्ये महत्त्वाचा फरक असतो. या दोन्ही प्रकारात समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून जे शब्द अपेक्षित असतात त्याला तुम्ही तडा देत असता आणि त्या व्यक्तीला त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसत असतो. ज्यावेळी तुम्ही ही फारकत जाणूनबुजून घेत असता त्यावेळी तुम्ही समोरील व्यक्तीला एक विशिष्ट संदेश देऊ इच्छित असता.
परंतु ज्या वेळी ही फारकत अजाणतेपणे होत असते त्यावेळी समोरील व्यक्ती होणारी प्रतिक्रिया हे काही प्रमाणात तुम्हाला अनपेक्षित असू शकते
दैनंदिन जीवनात लाखो व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत असतात. वरील मुद्द्यांमध्ये अजून एक घटक आपण समाविष्ट करू शकतो. संवादातील शब्द, शब्दफेक, शब्दक्रम आणि चेहऱ्यावरील हावभाव हे सर्व कायम असताना तुम्ही किती आणि कोणत्या लोकांसमोर हा संवाद साधत आहात त्यानुसार तुमच्यासमोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया बदलु शकते.
सारांश म्हणजे काय जेव्हा केव्हा तुम्हाला शांत वेळ मिळेल त्यावेळी आपल्या स्वतःच्या संवाद शैलीचा अभ्यास करुन पहा आणि खालील मुद्दे विचारात घ्या !
१) जर तुम्ही फटकळ म्हणुन ओळखले जात असाल तर त्याचा तुम्हांला मिळणाऱ्या संधीवर, तुमच्या नातेसंबंधांवर कुठंतरी परिणाम होत असतो. तुमच्या एकंदरीत परिस्थितीवरुन तुम्हांला कदाचित हे परवडू सुद्धा शकते.
२) तुम्ही जर सोशिक / समजंस असाल तर तुम्हांला तडजोड करावी लागत असते. ही तडजोड करणं कितपत योग्य (worth) आहे ह्याची जाणीव तुम्हांला असली तर बरं !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा