मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

धोरणात्मक दिशा


व्यावसायिक जीवनात एका विशिष्ट पदानंतर आपल्याला धोरणात्मक दिशा ठरवणे आणि दैनंदिन कामात लक्ष देणे या दोन्ही गोष्टींमध्ये समन्वय साधावा लागतो. बऱ्याच वेळा दैनंदिन काम कौशल्यानं हाताळण्याची तुमची खुबी तुम्हांला उच्चस्थ पदापर्यंत घेऊन आलेली असते. त्यामुळं दैनंदिन काम चोखपणे पार पाडण्याची सवय तुमच्यामध्ये भिनलेली असते. खरंतर दैनंदिन कामाकडुन लक्ष हळुवारपणे काढुन घेऊन धोरणात्मक दिशा ठरविण्याचा क्षण एकमेव नसतो. हे स्थित्यंतर काही काळ सुरु असतं. परंतु तुम्हांला हे स्वतःला उमजुन घ्यावं लागतं. आणि तुमची कंपनी तुम्हांला हे स्थित्यंतर यशस्वी व्हावं म्हणुन अनेक मदतीची साधनं सुद्धा उपलब्ध करुन देत असते.  

दैनंदिन कामात लक्ष घातले नाही तर त्याचे परिणाम तात्काळ दिसून येतात त्यामुळे आपली नैसर्गिक वृत्तीसुद्धा दैनंदिन कामांकडे लक्ष देण्याची असते. दैनंदिन कामे बऱ्याच वेळा छोट्या छोट्या स्वरुपाची असतात. त्यामुळं ती पुर्ण करुन मिळणाऱ्या instant accomplishment च्या भावनेचा मोह तुम्हांला पडु शकतो. परंतु त्यामुळे होतं काय की तुमचं धोरणात्मक बाबींकडे दुर्लक्ष होतं. धोरणात्मक निर्णयांचा अजुन एक गुणधर्म म्हणजे त्याचे परिणाम दूरगामी असतात आणि त्यांची अचुकता समजायला बराच वेळ द्यावा लागतो. 

कुशलतेने धोरणात्मक निर्णय घेणारे व्यवस्थापक मोठ्या संख्येनं निर्माण करण्यात आपल्याला म्हणावं तसं यश अजुनही आलं नाही. आणि यामागं बहुदा ह्यामागं आपली पारंपरिक मानसिकता आड येत असावी. नवीन शिक्षणपद्धती नक्कीच ही उणीव दुर करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु शालेय पातळीवरील कुशल शिक्षकांचा अभाव हा मुलभूत संकल्पना दृढ असलेली पिढी निर्माण करण्याच्या आड येत असावा. त्यामुळं पुढील काळातील भारतीय व्यवस्थापकांची धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता भारतीय औद्योगिक क्षेत्राच्या पुढील वाटचालीत महत्वाचा घटक ठरु शकते. 

यात अजून समाविष्ट करण्यासारखा मुद्दा म्हणजे कोणत्याही संघटनेमध्ये मध्ये दोन प्रकारचे व्यवस्थापक असतात. पहिला प्रकार म्हणजे संघटनेच्या कनिष्ठ पदावरून उन्नती करत व्यवस्थापक बनलेले आणि दुसरा प्रकार म्हणजे कंपनीने व्यवस्थापकीय पदासाठी बाहेरून नेमणूक केलेले. ह्या पोस्टमध्ये पहिल्या प्रकारचे वर्णन अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे हा वर्ग धोरणात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीत काहीसा बचावात्मक पवित्रा घेताना दिसून येतो. याउलट बाहेरून आलेला आणि थेट व्यवस्थापक बनलेला वर्ग हा धोरणात्मक निर्णय घेण्यावर आपली शक्ती आणि लक्ष केंद्रित करीत असतो. संघटनेच्या दृष्टीने पाहिलं असता त्यांना या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापकांचे योग्य मिश्रण आवश्यक असतं.

बऱ्याच वेळा असं आढळुन येतं की दुसऱ्या प्रकारातील व्यवस्थापक मंडळी ही एका कंपनीत दीर्घकाळ राहताना आढळत नाहीत. त्यांना पदोन्नतीच्या शिड्या झटपट चढायच्या असतात. त्यामुळे एखाद्या कंपनीतील धोरणात्मक निर्णय घेऊन जाण्याची संधी संपली की मग ते दुसऱ्या संघटनेच्या दिशेने किंवा त्याच संघटनेतील दुसऱ्या विभागात आपला मोर्चा वळवतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...