मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

भविष्यवेध


आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याविषयी सध्या बरंच काही बोललं लिहिलं जातं. यामध्ये खरोखर खोलवर संशोधन करणारी मंडळी थोडी आहेत आणि त्यांना या विषयात बरंच काही माहित आहे. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ह्या दोन गोष्टींचा मानवी जीवनावर नक्की कसा परिणाम होईल याविषयी छातीठोकपणे कोणीही  सांगू शकणार नाही. परंतु ज्या काही उपलब्ध शक्यता आहेत त्याविषयी मात्र आपण अंदाज वर्तवु शकतो. 

गेल्या रविवारी माझ्या अभियांत्रिकी विद्यालयातील मित्रांचा एक छोटा गट पार्ल्यात भेटला. त्यावेळी अभियांत्रिकीला जाऊ इच्छिणाऱ्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यानं IT शाखा निवडावी की पारंपरिक अभियांत्रिकी शाखांचा स्वीकार करावा इथुन सुरु झालेली चर्चा भविष्यातील नोकरीचं बदलतं आणि काहीसं अशाश्वत स्वरुप ह्या विषयापाशी येऊन थांबली. दुसऱ्याच दिवशी नारायणने यासंबंधीचा एक माहितीजालावरील लेख आमच्या सर्वांसोबत शेअर केला. 


एकंदरीत लेखाचा रोख विकसित तंत्रज्ञानामुळे मानवी स्वभावाचं आणि वर्तवणुकीचे मोठ्या खोलवर विश्लेषण करण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे.  त्यामुळे काही महत्वाचे बदल आपणास दिसुन येतील. पहिला म्हणजे नोकरींचं पारंपरिक स्वरुप आमुलाग्र बदलुन जाणार आणि  एखादी विशिष्ट व्यक्ती एका विशिष्ट प्रसंगात कोणत्या प्रकारे वागू शकते याचा अचूक आराखडा हे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणार आहे.  हे तंत्रज्ञान ज्यांच्याकडे उपलब्ध आहे ते कशा प्रकारे ह्या तंत्रज्ञानाचा वापर करतील ह्यावर भविष्यातील नैतिक - अनैतिकतेच्या कल्पना अवलंबुन राहतील.  

हल्ली उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचा वापर हा बऱ्याच वेळा अयोग्य कारणांसाठी केला जातो असे आढळुन येतं. त्याचप्रमाणे जर माणसाच्या संभाव्य वागण्याचा अंदाज बांधू शकणारी प्रणाली चुकीच्या शक्तीच्या हाती सापडली तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यताच जास्त आहे. आणि त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांना त्यांच्या उगमापाशी (म्हणजेच मेंदुपाशी) रोखुन ते तपासुन पाहण्याची क्षमता यंत्रांकडे येऊ शकते असाही तर्क बांधण्यात येऊ लागला आहे.  त्याहुन पुढील बाब म्हणजे मनुष्याच्या मनात उगम पावणारा विचार त्यावर नियंत्रण करणाऱ्या शक्तीला पसंत पडला नाही तर ही शक्ती तो विचार मनापर्यंत पोहोचु देणार नाही. आणि त्याऐवजी आपल्याला सोयीस्कर विचार मनुष्याच्या यंत्रणेत घुसवून टाकणार! म्हणजे असा विचार करा की आपल्या मनात आलेला विचार हा आपला स्वतःचा आहे की आपल्यावर कोणीतरी तो लादलेला आहे अशी शंकासुद्धा निर्माण होण्यासाठी सारखी परिस्थिती भविष्यात आपल्यासमोर उद्भवू शकते. ही शंका निर्माण करण्याची क्षमता आपण बाळगुन असलो तरी मोठं स्वातंत्र्य आपणापाशी आहे असं आपण समजु शकतो. 

लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे ही केवळ एक शक्यता झाली आहे आणि हे असंच होईल असं कोणीसुद्धा  छातीठोकपणे सांगु शकणार नाही. परंतु समजा ही शक्यता खरोखर प्रत्यक्षात अवतरली तर मग मात्र यंत्र / यंत्रावर नियंत्रण असणारी शक्ती आणि माणुस यांच्यात एका वेगळ्या पातळीवर संघर्ष उद्भवणार आहे. यंत्र माणसाला नियंत्रित करणार की माणूस यंत्राला नियंत्रित करणार हा संघर्ष सुरू होईल. 

पुढं एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यावेळी यंत्र वेगळ्या प्रकारे विचार करू शकणाऱ्या माणसांना आपलं लक्ष्य बनवतील.  म्हणजे बहुतांशी माणसे आणि त्यांचे विचार आपल्या नियंत्रणात आणणे यंत्रांना सहजशक्य होईल. परंतु काही माणसे आणि त्यांचे मेंदु आटोक्यात आणणे मात्र यंत्रांना सहजासहजी शक्य होणार नाही. अशावेळी मग सुरू होईल तो एक प्रचंड भयावह शक्यतांचा खेळ!! यात अशा नियंत्रणाबाहेरील मानवांना  विविध कठीण परिस्थितीतून जाण्यास भाग पाडणे किंवा त्यांच्यावर जीवावर बेतणारी परिस्थिती निर्माण करणे असेही प्रसंग उद्भवू शकतात.  अशावेळी यंत्रांपासून बचाव करण्यासाठी परग्रहावर पळ काढण्याची सुद्धा वेळ ह्या मानवांवर येऊ शकते. परग्रहावर पळ काढलेली माणसं आपल्याशी मैत्री बाळगणाऱ्या बुद्धिमान यंत्रांची निर्मिती करतील आणि परत पृथ्वीवर येऊन लढा सुरु करतील!

ह्या प्रकारच्या सर्व लेखांतील एक उणीव म्हणजे हे सर्व लेख सद्यपरिस्थितीचा विचार करता अतिरंजित आणि कल्पनेचे मनोरे वाटतात. ही पोस्टसुद्धा तुम्हांला बहुदा अशीच वाटणार! तसं असलं तरी तुमच्या इंटरनेट सर्फिंगचे थोडं विश्लेषण करा आणि तुम्ही काय शोधण्यासाठी / करण्यासाठी इंटरनेटवर शिरला होतात आणि सुचविल्या गेलेल्या पर्यायांमुळे तुम्ही कुठं जाऊन पोहोचलात ह्याचा आढावा घ्या! लक्षात ठेवा ही केवळ सुरुवात आहे!

भविष्यातील स्वातंत्र्यलढा असाच काहीसा असु शकतो ! स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...