मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

गहरा पानी


स्वस्वीकृत मानसिकता 

९ वर्षांपुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी मी एक आदर्शवादी मनोधारणा बाळगुन होतो. ब्लॉग लिहुन कुठंतरी समाजात चांगलं परिवर्तन होईल अशी ही मनोधारणा होती. कदाचित त्यावेळी माझा समाजात वावर कमी होता. तसा तो आताही कमीच आहे. परंतु जो काही वाढला त्यावरुन एक गोष्ट उमजुन आली. लोकांची मानसिकता बदलणं ब्लॉगद्वारे साध्य होणं शक्य नाही. ही मानसिकता कशानं बदलु शकते हे ज्याला कोणाला समजलं तो धन्य ! अर्थात मानसिकता बदलायची गरज आहे तरी काय हाही एक मोठा प्रश्न आहे. पुर्वी संस्कृती टिकविण्यासाठी  धडपड करण्याची जी मानसिकता होती तिचं प्रथम आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या मानसिकतेत परिवर्तन झालं. आर्थिक स्थैर्य हा काहीसा दुय्यम मुद्दा झाल्यावर सध्या काहीशी स्वस्वीकृत मानसिकता झाली आहे. मला समाजाकडुन ठराविक वेळानं काहीतरी acceptance मिळायला हवं अशी ही स्वस्वीकृत मानसिकता ! ह्या स्वस्वीकृत मानसिकतेच्या पल्याड अनेक मंडळी आहेत, ज्यांना अशा वारंवारच्या स्वीकृतीची गरज भासत नाही. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा?

उच्चवर्गात समाविष्ट होण्याची मानसिकता  

आपल्या देशात आपण घराबाहेर पडलो की आपल्याला प्रचंड गर्दीचा मुकाबला करावा लागतो. ह्या गर्दीमुळं आपल्या मनात अदृश्य तणाव निर्माण होतो. आपण ऑफिसात, शाळाकॉलेजात वेळेवर पोहोचु की नाही हा निर्माण होणारा तणाव एका पातळीवरचा! परंतु ह्या गर्दीमुळं निर्माण होणारा दुसरा तणाव म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला ह्या सर्वांशी मुकाबला करावा लागणार ही काहीशी छुपी भावना आपल्या मनात निर्माण होते. ह्या सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं आपण स्वतः आणि आपल्या कुटूंबियांनी येनकेनप्रकारे जावं अशी जिद्द आपण नकळत मनात बाळगु लागतो.
ह्यातही बराच वर्ग असा असतो जो गर्दीपासुन वेगळा राहण्यासाठी म्हणुन शांत गावांची निवड करतो, एक अनुभवसमृद्ध जीवन जगतो. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा? 

आता सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं जाण्याचे काही मार्ग म्हणजे राजकारणी , उद्योगपती बनणे, अभ्यासाद्वारे प्रगती करणे वगैरे वगैरे. ह्यातील पहिल्या दोन मार्गांशी माझा बादरायण संबंध नाही. तिसऱ्याशी काही प्रमाणात असावा. परत एकदा आपल्याला भोवताली दिसणाऱ्या गर्दीचा आणि अभ्यासाद्वारे पुढे जाऊ पाहणाऱ्या आपल्या मानसिकतेचा काही संबंध आहे का हे आपण पाहुयात! 
हल्ली शिक्षणक्षेत्रात competition खुप वाढली आहे हे मराठी माणसाच्या आवडीच्या आघाडीच्या वाक्यांपैकी एक असावं. आजच्या पोस्टला गाभा वगैरे नाही. ही मिसळपाव पोस्ट आहे. तरीही जर काही गाभा असला तो हा इथं पुढच्या परिच्छेदात आहे.
काही दिवसांपुर्वी मी बारावीचे Integrated क्लास घेणाऱ्या एका आघाडीच्या संस्थेच्या शाखाप्रमुखाला भेटलो. त्यानं काही महत्वाची वाक्यं मला सांगितली. 

१) खोलवर पाण्यात जाऊन कोणी बुडत नाही, उथळ पाण्यातच बहुतेक जण बुडतात. IIT Advanced परीक्षेचे विश्लेषण करणारी जी संस्था आहे तिच्या विश्लेषणानुसार त्या परीक्षेतील ५० -६० % टक्के भाग तुम्हांला वर्षभराच्या नियमित सरावाच्या आधारे सहजरित्या सोडविता यायला हवा. असं असलं तरी मोजक्या विद्यार्थ्यांनाच ह्या परीक्षेत ५० -६० % आणि त्यावर टक्के मिळविता येतात. तो म्हणाला कारण सोपं आहे, बहुतांशी मुलं सोप्या प्रश्नांच्या उत्तरातच चुका करतात

२) आता इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे सोपा आणि कठीण प्रश्न कोणता हे आपल्याला ओळखता यायला हवं ! कठीण प्रश्न ओळखुन अशा परीक्षांमध्ये त्या प्रश्नांपासुन दूर राहता यायला हवं हे आम्ही मुलांना शिकवतो असे तो म्हणाला! 

३) मुलांनी परीक्षेत भावनाविरहित स्थितीत राहणं शिकावं असं तो म्हणाला. सोपा प्रश्न दिसला आणि आपण अगदी उत्साहित झालो की चुका होण्याची शक्यता वाढीस लागते त्यामुळं भावनाविरहित स्थिती महत्त्वाची !
आता गर्दीच्या / Competition च्या  मुद्द्याशी आणि वरील ३ मुद्द्यांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करुयात. वरील ३ मुद्दे हे हल्ली काही प्रमाणात दुर्मिळ होत चाललेल्या स्थिर मानसिकतेशी निगडीत आहेत. तुमची Competition बाहेरील वाढलेल्या लोकसंख्येशी अजिबात नाही, ती आहे तुमचं मन स्थिर ठेवण्याच्या तुमच्या क्षमतेला अबाधित ठेवण्याशी !
हा मुद्दा मला केवळ शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रमाणात जाणवतो. तुमच्या व्यावसायिक कौशल्यांच्या इतकीच तुमची नियमितता, स्मरणशक्ती, लोकांशी व्यवस्थित बोलण्याची कला, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन देण्याची संधी उपलब्ध करुन देणं ह्या सर्व घटकांवर तुमचं यश अवलंबुन असतं. हे सर्व घटक तुम्हांला कुठून मिळतात, तर लहानपणी तुमच्यावर झालेल्या संस्कारांतुन ! तर मुलांना योग्य बोर्डातून, कॉलेजातुन शिक्षण देण्यासोबत संस्कार द्यायला विसरु नका !



बऱ्याच वेळा होतं त्याप्रमाणं पोस्टचा आणि फोटोचा संबंध नाही !!


२ टिप्पण्या:

  1. लेखकाने ग्यानबाची मेख बरोबर ओळखली आहे. सर्व सिद्धींचे कारण स्थिर मनोवृत्ती. ही घडवणे पण एक व्रत आहे. लेखकाने सांगितल्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देताना घडलेल्या घरातील,शाळा काँलेजातील संस्कारातून. कदाचित ह्यात सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीप्रमाणे कमी अधिक परीणाम होतील. पण चांगली भाषा, चांगली वागणूक, चांगली सामाजिक कृती आणि चांगले विचार आत्मसाात करून कसोशिने पाळली तर स्थितप्रज्ञताकङे वाटचाल होते. Where man is faithful with himself, responsible for his promises. निष्काम कर्मयोग अवस्था. पण मनुष्य स्वभाव पामर मी तव उणे भासितो, देण्याची वृत्ती नाही, घेण्याची लालसा आहे, कुठून येयील समाधान, कुठून येयील स्थिर वृत्ती.

    उत्तर द्याहटवा
  2. लेखकाने ग्यानबाची मेख बरोबर ओळखली आहे. सर्व सिद्धींचे कारण स्थिर मनोवृत्ती. ही घडवणे पण एक व्रत आहे. लेखकाने सांगितल्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देताना घडलेल्या घरातील,शाळा काँलेजातील संस्कारातून. कदाचित ह्यात सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीप्रमाणे कमी अधिक परीणाम होतील. पण चांगली भाषा, चांगली वागणूक, चांगली सामाजिक कृती आणि चांगले विचार आत्मसाात करून कसोशिने पाळली तर स्थितप्रज्ञताकङे वाटचाल होते. Where man is faithful with himself, responsible for his promises. निष्काम कर्मयोग अवस्था. पण मनुष्य स्वभाव पामर मी तव उणे भासितो, देण्याची वृत्ती नाही, घेण्याची लालसा आहे, कुठून येयील समाधान, कुठून येयील स्थिर वृत्ती.

    उत्तर द्याहटवा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...