मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

रस्सीखेच



जवळपास दोन महिन्यानंतर आजची ही पोस्ट ! डिसेंबराच्या पहिल्या सोमवार - मंगळवारी एक वरिष्ठ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. अमेरिकेहुन उच्च अधिकारी आले होते. आपला देश का व्यवस्थित चालतो हे जाणुन घ्यायला अशा बैठकी उपयोगी पडतात. दोन दिवसाच्या ह्या बैठकींमध्ये एकेका मिनिटाचा हिशोब ठेवून सादरीकरण केलं गेलं. पुढील वर्षाच्या नियोजनासाठी ही बैठक असल्यानं उपस्थित मंडळी अगदी तन्मयतेनं सर्व सादरीकरणात सहभागी होत होती. व्यावसायिक पातळीवरील जोशात येऊन प्रश्नोत्तरे होत होती. 

ह्यातील एका गटाच्या सादरीकरणात माझाही सहभाग होता. तयारी अगदी बऱ्याच दिवसांपासुन सुरु होती. कोणती स्लाईड कोणी सादर करायची, तिथं नेमकं काय बोलावं ह्याची सखोल तयारी करण्यात आली होती. प्रेसेंटेशन्सना व्यावसायिक रुप देण्यासाठी एका वेगळ्या गटाची मदत घेण्यात आली. सादरीकरण बऱ्यापैकी चांगलं पार पडल्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  

बऱ्याच कंपन्यांमध्ये ह्या प्रकारातील व्यावसायिक बैठका होत असतात. इथं प्रत्येक  शब्दाचा, प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यायचा असतो. त्यामुळं प्रत्येक स्लाईड, स्लाईडवरील प्रत्येक वाक्य / शब्द खरोखर आवश्यक आहे का? त्यांची क्रमवारी योग्य आहे का ह्याचा सर्वागीण विचार केला जातो. हा झाला आपला प्रगतशील भारत! इथं तुमच्या कर्तृत्वावर आपलं भाग्य घडविण्याची तुम्हांला पुरेपूर संधी दिली जाते. 

ह्या भारताकडुन भोवतीच्या दुसऱ्या भारताकडं वळल्यानंतर मात्र बरीच निराशा होते. ह्या भारतात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेलच ह्याची खात्री नसते कारण इथं प्रस्थापितांचे राज्य असतं. गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सारासार विचार करण्याच्या वृत्तीपासून आपण अधिकाधिक दुर जात चाललो आहोत असं दिसतं. 

ब्लॉग लिहुन कोणताही प्रश्न सुटेल ह्याच्यावरील माझा विश्वास बऱ्याच आधी उडाला आहे. त्यामुळं हल्ली पूर्वीइतक्या जोमानं ब्लॉग लिहणं मी खुपच कमी केलं आहे. हल्ली सर्वसामान्य लोकांमध्येसुद्धा वडीलधारी / जाणकार माणसांचे ऐकुन घेण्याची तयारी राहिली नाही. 

व्यावसायिक जगात प्रत्येकाला एक विशिष्ट अधिकाराची जागा दिली गेली असते. कोणी अधिकाराच्या पोस्टवर किती काळ राहावं ह्याचा निर्णय योग्य मंडळी घेत असतात. एकदा का एक व्यक्ती अधिकाराच्या जागी नियुक्त झाली की तिचे निर्णय ऐकून घेणं हे त्या व्यक्तीच्या संघातील सर्वांना बंधनकारक असते. त्यामुळं त्या संघातील निर्णयांत, कृतीत एकवाक्यता येते. संघाच्या यशस्वी होण्याच्या शक्यतेचे प्रमाण वाढीस लागते. 

आपल्या सार्वजनिक जीवनात सुद्धा कुठंतरी व्यावसायिक जीवनातील ह्या तत्वाची अंमलबजावणी व्हायला हवी. नाहीतर एकीकडं व्यावसायिक क्षेत्र आपल्या देशाला पुढे नेत राहणार परंतु बाकी क्षेत्रात योग्य व्यक्ती अधिकाराच्या जागी नसल्यानं आपल्या देशाच्या प्रगतीवर प्रचंड मर्यादा निर्माण होत राहणार ! ही रस्सीखेच थांबायला हवी ! 

1 टिप्पणी:

  1. सार्वजनिक जीवनात नेत्याच उद्दीष्ट उच्च आणि सर्व समावेशक असावे. ववागणूक निस्पृह आणी निर्णय लोकाभिमूक असावेत. चांगल्या लोकांना निवडून त्यांच्यावर विश्वास ठेवून जबाबदारया द्याव्यात. नेता म्हणून शिवरायांचे उदाहरण घ्यावे. छत्रपतींनी प्रत्येक मोहीमेत नवीन मावळे निवडले. आणि स्वराज्याचे शिलेदार घडवले. आजकाल tv वर फक्त दोनच डोकी दिसतात आहेत. Corporate is run in military style commander/corporal. This system is ok for typical buisness eco system. We can not compare leadership for corporate and country.

    उत्तर द्याहटवा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...