मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

हिकीकोमोरी


पुन्हा एकदा एक परदेशी वृत्तवाहिनी आणि एक विचारप्रवृत्त करणारा कार्यक्रम ! ह्यावेळी जपानमधील हिकीकोमोरी अर्थात सामाजिक जीवनापासुन पुर्णपणे अलिप्त झालेल्या तरुणवर्गाविषयी एक कार्यक्रम पाहण्यात आला. ही युवामंडळी स्वतःला आपल्या घरात खरंतर खोलीत कोंडुन घेतात आणि वर्षोनुवर्षे समाजापासुन अगदी अलिप्त जीवन जगतात. 

ह्या मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण एकदा हिकीकोमोरी बनलेली मंडळी आयुष्यभर तशीच बनलेली राहतात आणि दरवर्षी नव्यानं त्यात मंडळी सामील होत राहतात. ह्यातील बहुतांशी मंडळी ही आपल्या आईवडिलांवर उपजीविकेसाठी अवलंबुन असतात. जोवर आईवडील सक्रिय असतात तोवर ह्या वाढलेल्या मुलांना सांभाळतात. पण ज्यावेळी आईवडील म्हातारे होतात त्यावेळी मात्र बिकट परिस्थिती निर्माण होते. आपल्या पश्चात ह्या मुलांचे हाल होऊ नयेत म्हणुन पालकांनीच त्यांना मारुन टाकल्याची उदाहरणं आहेत. 

हे नक्की का होत असावं? सामाजिक जीवनात वावरण्याचे बरेच नियम अत्यंत कठोर असावेत; बहुदा सर्वांनाच ते झेपत नसावेत. त्यामुळं आपल्याला न झेपणाऱ्या सामाजिक नियमांपासुन पळवाट म्हणुन मंडळी कदाचित हा मार्ग पत्करत असावीत. ह्यातील काही मंडळी ऑनलाईन राहुन काही कामं करतात, पैसा कमावतात. परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. मी पाहिलेल्या कार्यक्रमात चित्रित केलेला तरुण अगदी हलाखीच्या परिस्थितीत एकटा राहत होता. सामाजिक कार्य करणारा एक वृद्ध त्याच्या घरी जाऊन त्याला भेटला. त्याला आपल्यासोबत घेऊन भोजनासाठी उपहारगृहात घेऊन गेला. 

प्रत्येक समाजाचे स्वतःचे असे विशिष्ट प्रश्न असतात. आपल्या भारतीय समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. सामाजिक जीवनात, क्रीडा क्षेत्रात झपाट्यानं लोप पावणाऱ्या सुसंस्कृततेचा अभाव आणि त्यासोबत आलेली विनाकारण आक्रमकता हा एक नव्यानं क्षितिजावर आलेला प्रश्न आहे. कपिलदेव परवाच म्हणाला, "क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे असं म्हणु नका! आम्ही ज्यावेळी खेळलो त्यावेळी तो होता, आता नाही !" युवा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जो प्रकार घडला तो ही ह्याचेच उदाहरण आहे. आपली संस्कृती लक्षात घेता  आपल्याकडं हा प्रकार घडणं नक्कीच दुर्दैवी आहे. परंतु एक समाज म्हणुन आपण आपले जे काही प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत त्यात सुसंस्कृत वागणं हा नक्कीच वरच्या स्थानावर नाही. अतिआत्मविश्वास बाळगुन असलेल्या आक्रमक युवा पिढीचं नक्की काय करावं ही कदाचित नजीकच्या भविष्यकाळात आपली समस्या बनु शकते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...