शहरात वास्तव्य करत असल्यानं बऱ्याच वेळा एकंदरीत आयुष्याविषयी आपण उगाचच क्लिष्ट चित्र मनात निर्माण करतो. आपलं आयुष्य, आपल्या जीवनातील डेटा पॉईंट्स ह्या चित्राला उगाचच पुष्टी देत राहतात. पण अचानक काही कार्यक्रम, काही पुस्तकं, काही लेख आपल्याला ह्या पलीकडं सुद्धा जग अस्तित्वात आहे ह्याची सुखद जाणीव करुन देतात.
हे वाचुन आपल्यापैकी बऱ्याच जणांना पुर्वी गावात उन्हाळ्यात येणाऱ्या फिरत्या सिनेमाच्या तंबुंची आठवण आली असेल. सरकारने ही सुविधा उपलब्ध करुन दिली खरी पण ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणीतरी पुढं यायला हवं ना? इथं पुढं झालाय तो हा ह्या कार्यक्रमाचा नायक ! खरंतर त्याला शहरात चांगली नोकरी मिळु शकली असती परंतु हा नायक जाणीवपुर्वक ह्या व्यवसायाची निवड करतो. त्याच्या वडिलांनी सुद्धा हाच पेशा स्वीकारला होता. कदाचित त्यामुळं सुद्धा त्यानं हा निर्णय घेतला असावा.
ह्या पेशातून त्याला खास उत्पन्न मिळत नाही. प्रत्येक कार्यक्रमामागे मिळणारे अमेरिकन १५ डॉलर्स चीनच्या ग्रामीण भागात सुद्धा अपुरेच ठरतात. त्यावर ह्या प्रोजेक्टरचा खर्च सांभाळणं वगैरे बाबी आल्याच! परंतु असा पेशा निवडणारी माणसं जरा हटके असतात. त्यांनी पुर्ण विचार करुन हा निर्णय घेतलेला असतो. नायक म्हणतोही की संगणकासमोर बसुन मी ही खूप पैसे कमावु शकलो असतो पण लोकांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांच्या जीवनात आनंद फुलविणं माझ्यासाठी महत्वाचं आहे ! त्याचे वडील अजुनही त्याच्यासोबत जमेल तसे गावात फिरुन त्याला प्रोजेक्टरची मांडणी करण्यात मदत करतात.
आजची ह्या दोघांची भेट आहे ती क्युयांग गावाला ! दोन तासाच्या मोटारीच्या प्रवासानंतर हे गाव येतं. हल्ली रस्ता झाला म्हणुन मोटारीनं दोन तासात जाऊ शकतात. नाहीतर पुर्वी सायकलवर सर्व सामान टाकुन दोन - दोन दिवस प्रवास करुन ही मंडळी जात असत. काही तास लवकर पोहोचुन ही मंडळी सायंकाळी सात वाजता क्युयांग गावाच्या मुख्य सेंटरवर चित्रपट दाखवला जाईल अशी घोषणा करतात. ह्यात त्यांच्या मोटारीजवळ येऊन मला इतक्या लांब येता येणार नसल्यानं माझ्या घरासमोरच चित्रपट दाखवाल का अशी विनंती करणारी वृद्ध स्त्री लक्षात राहते!
नायक शेतात काम करणाऱ्या गावकऱ्यांना सुद्धा जाऊन भेटतो आणि चित्रपटाला येण्याची विनंती करतो. चित्रपट युद्धावरचा आहे की प्रणयाधारित आहे असा प्रश्न एक वयस्क स्त्री खट्याळपणे विचारते ! मोजकं उत्पन्न असल्यानं मनोरंजनासाठी खर्च करणं गावकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळं गावात बहुधा सामाजिक कार्यक्रमांची वानवाच असावी. त्यात नोकरीधंद्यांसाठी शहरात जाऊन राहणाऱ्या तरुण मंडळींची समस्या ह्या ही गावाला भेडसावणारी ! त्यामुळं ह्या नायकाशी बोलण्यास उत्सुक अनेक वृद्ध मंडळी दिसतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यक्रमांचा अभाव असल्यानं गावातील स्त्रियांना सुद्धा एकत्र येण्यास फार कमी संधी मिळत असाव्यात. त्यामुळं सिनेमाचा असा शो असला की त्याआधी काही वेळ हजर होऊन स्त्रिया एकत्रितपणे नाचसुद्धा करतात!
पुर्ण वेळ चित्रपट पाहत थांबणे काही वृद्ध मंडळींना शक्य होत नाही. ही मंडळी मग घरी निघुन जातात. काही वेळानं चित्रपट संपतो. नायक आपल्या वडिलांना घेऊन सामानासकट दोन तासाच्या प्रवासानंतर घरी परततो. एकत्र जेवण केलं जातं. नायक, त्याची पत्नी आणि आई वडील एकत्र भोजन करुन अंगणात आपल्यासाठी पुन्हा एकदा प्रोजेक्टर उभारुन सिनेमाचा आनंद लुटतात. हिवाळ्याआधी हा शेवटचा शो असल्यानं आता पुन्हा एकदा तात्पुरत्या नोकरीच्या शोधात शहरात जाणं क्रमप्राप्त आहे !
एका दीर्घ दिवसानंतर रात्रीचं जेवण आटपुन अंगणात बसलेला नायक आपल्या आईवडिलांकडे पाहत बोलतो. कदाचित माझ्या आईवडिलांना मी
जीवनातील मोठाली सुखं देऊ शकत नसीन. पण मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना मी गरम पाण्याचा प्याला देऊ शकतो ह्यातच ते समाधानी आहेत आणि मी ही !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा