या विषयावरील मागील आठवड्यात व्हॉट्सऍपवर आलेली पोस्ट वाचली. कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी आपली अनुपलब्धता घोषित करण्याचा हक्क आहे ह्याविषयीचं जे बिल मंजुरीसाठी पाठविण्यात आलं आहे त्याविषयी माहिती देणारी ही पोस्ट होती.
व्यवस्थापक तरुण मुलांना कार्यालयीन वेळेच्या पलीकडे सुद्धा ई-मेल अथवा फोन कॉल करुन कामात गुंतवून ठेवतात. त्यामुळे या तरुणांच्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हा त्यात अजून एक मुद्दा होता. नक्कीच हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्याविषयींची जागरुकता कर्मचारी वर्गांमध्ये आणि खास करुन व्यवस्थापनामध्ये असावी यासाठी हा लेख महत्त्वाचा होता!
आज मी इथे काही मुद्दे मांडणार आहे ते दुसरी बाजू लक्षात घेण्यासाठी !!माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काही भूमिका या अत्यंत महत्त्वाच्या असतात. वित्तीय कंपन्यांच्या मोठाल्या आर्थिक कारभाराची उलाढाल ही मंडळी सांभाळत असतात. ज्यावेळी प्रॉडक्शन विभागामध्ये काही त्रुटी निर्माण होतात, त्यावेळी प्रत्येक मिनिट हे लाखमोलाचं असतं. या त्रुटींमुळे प्रत्येक मिनिटाला त्या वित्तीय संस्थेचा हजारो डॉलर्स / पौंडांचा / रुपयाचा तोटा होत असतो. अशावेळी तुम्ही योग्य माणसाला या त्रुटीनिवारणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करुन घेणे अनिवार्य असते.
त्यामुळे अशा भूमिकेत जर आपण असाल तर रात्री-बेरात्री सुद्धा फोन कॉल येणे हे तुमच्या जॉब प्रोफाईलचा भाग असतो. त्यामुळे मी रात्री केव्हाच उपलब्ध असणार नाही हे योग्य विधान ठरू शकत नाही. सरसकट प्रत्येक वेळी मी रात्री उपलब्ध नसेन परंतु जेव्हा अटीतटीचा प्रसंग असेल त्यावेळी मात्र तुम्ही मला संपर्क करू शकता ही अधिक सामंजस्याची भूमिका घेणे इष्ट ठरते.
प्रॉडक्शन त्रुटीव्यतिरिक्त एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट डिलीवरीची अंतिम तारीख पाळता यावी यासाठी त्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना कधीतरी रात्रभर थांबावे लागते परंतु नॉन प्रोडक्शन त्रुटींमध्ये हे प्रमाण अत्यल्प असायला हवे हे मात्र खरे!!
तुम्ही ग्राहकाच्या दृष्टीकोनातुन या विशिष्ट परिस्थितीचा विचार केले असता त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अडचणीतुन बाहेर काढणारा कोणी एक मसीहा आवश्यक असतो. आता या मसीहाला झोपेतून उठवावे की नाही हा निर्णय व्यवस्थापकाला घ्यावा लागतो. हा निर्वाणीचा प्रसंग एकदा का निभावून गेला की एका विशिष्ट व्यक्तीवर इतकी अवलंबिता असावी का असावी, आपणाकडे अनेक मसिहा का नसावेत या मुद्द्यांचा ऊहापोह उत्तम संघटना नक्कीच करतात.
इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी मांडू इच्छितो. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र हे पूर्वीइतके आकर्षक आणि सोपे राहिले नाही. इथे स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. एका जागेसाठी बाहेर असंख्य उमेदवार उपलब्ध असतात. त्यामुळे तुमची गुणवत्ता हाच एकमेव निकर्ष लावला जात नाही तर तुमची कामाच्या बाबतीतील बाह्यघटकांशी , सर्वांशी सामावून घेण्याची लवचिकता हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक बनतो. जर तुमची गुणवत्ता ही अत्यंत उच्च असेल तर तुम्ही लवचिकता वगैरे गुणधर्म बाजूला ठेवू शकता. तुम्ही कसेही वागलात तरी तुमचे डिपार्टमेंट तुम्हाला सामावून घेईल ! पण जर तुम्ही सर्वसामान्यां पैकी एक असाल तर मग मात्र उगाचच मोडेन पण वाकणार नाही असा बाणा दाखवण्यात काही अर्थ नाही .
जसं जसे तुम्ही सीनियर बनत जातात तसतसं एखाद्या जॉब मध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक मेहनत घ्यावी लागलेली असते. त्यामुळे केवळ एखाद्या क्षणिक संतापामुळे, छोट्या मतभेदापायी ही खूप मेहनतीने मिळवलेली पोझिशन सोडून पुन्हा एकदा बाह्य जगतातील लाखो लोकांपैकी एक बनून पुन्हा जॉब शोधण्याचा प्रक्रियेचा भाग बनणे हा काही योग्य पर्याय असू शकत नाही.
प्रत्येक जॉबची एक अडचणीची बाजू असते. डॉक्टरांनासुद्धा मध्यरात्री बोलावणे येऊ शकतं! क्रिकेटर, वैमानिकांना महिनोन् महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागु शकते ! ट्रॅफिक पोलिसाला उन्हापावसात रस्त्यांवर उभं राहुन वाहतुक नियंत्रण करावं लागतं ! त्याचप्रमाणे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना सुद्धा रात्री उशिरापर्यंत कार्यालयात त्यांच्या जॉब प्रोफाईलचा भाग असु शकतो ! ह्या परिस्थितीत बदल घडावा म्हणुन IT क्षेत्र योग्य प्रयत्न करत आहे! हे बदल पुर्ण अंमलात येईपर्यंत कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात हे लक्षात घ्यावे यासाठी ही पोस्ट!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा