मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २७ जानेवारी, २०१९

मेट्रो बांधकाम, रिक्षावाले आणि कार ड्रायव्हिंग !!


प्रत्येकाच्या आयुष्यात काही संधी एकदाच येत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या समोर आलेली परिस्थिती ही एक उत्तम संधी आहे हे उमजायला वेळ लागतो. सध्या मुंबईकरांच्या कुंडलीत असाच योग आला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या योगाचे महत्त्व उमजायला वेळ लागत आहे. आजच्या ह्या पोस्टद्वारे ही समजुत झटपट होईल अशी आशा मी बाळगतो. 

आजच्या पोस्टमध्ये आपण वाहतुकीच्या तीन स्थिती पाहुयात. 

१) रुंद रस्त्याच्या उजव्या बाजुला उभारले गेलेले बॅरिकेड्स 



स्थिती एक मध्ये कारवाले एकमेकांना समांतर दिशेने आपापल्या मार्गिकेमधून सारथ्य करीत आहेत. अचानक उजव्या बाजुने मेट्रोच्या स्थानकाना  / खांबाना वाहतुकीपासुन वेगळं करण्यासाठी टाकण्यात आलेल्या बॅरिकेड्सचा भाग येतो. अशा वेळी कारच्या दोन समांतर प्रवाहातील चालकांनी समंजसपणा दाखवुन alternate sequence मध्ये पुढील अरुंद मार्गात प्रवेश करणे अपेक्षित असते. आणि फक्त कारवाले असतील तर हल्ली हा समंजसपणा दाखवला जातो !!

सद्यकालीन शिकवणुक - अशा बॅरिकेड्समुळे अचानक अरुंद होणाऱ्या ठिकाणी प्रवेश करताना तुम्हांला एकजरी रिक्षावाला अवतीभोवती आढळला तर प्रचंड सावध व्हा !! समंजसपणा, दोन वाहनांमधील समांतर अंतर वगैरे संकल्पना रिक्षावाल्यांच्या शब्दकोशात नसतात ह्याची जाणीव असु द्यात ! अरुंद मार्गात प्रवेश करण्यासाठी रिक्षावाल्याच्या मुक संमतीची प्रतीक्षा करा !!



२) रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभारले गेलेले बॅरिकेड्स 



इथं बॅरिकेड्स रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभारण्यात आले आहेत. त्यामुळं रस्त्याच्या अरुंद भागात एका वेळी फक्त एक कार जाऊ शकते. कारवाल्यांनी scratch दुरुस्तीचा खर्च अनुभवला असल्यानं ते एकामागोमाग रांग लावून अशा मार्गातुन पुढे जातात. 

सद्यकालीन शिकवणुक - अशा बॅरिकेड्समुळे दोन्ही बाजुंनी अरुंद होणाऱ्या ठिकाणी  केवळ एकच वाहन जाऊ शकते अशा निष्कर्षापर्यंत आपण आले असता. त्यामुळं एकदा ह्या क्षेत्रात तुम्ही प्रवेश केलात की तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकुन पुढे वाहन चालवु लागता .अशा वेळी तुमच्या साईड मिरर मध्ये तुमची अचानक नजर गेली आणि तुमच्या बाजुला तुमच्या कारपासून  vernier caliper ने  मोजण्याइतपत अंतरावर वेगानं  दौडणारा रिक्षावाला दिसला तर हृदयाच्या अचानक वाढणाऱ्या ठोक्याकडं आणि  मुखाद्वारे बाहेर पडु पाहणाऱ्या  शब्दांकडं लक्ष द्या ! तुमचं चालककौशल्य सुधारण्याची संधी हे बॅरिकेड्स आणि रिक्षावाले तुम्हांला देत आहेत ह्याची जाणीव असु द्यात !!


३) गुळगुळीत रस्त्यानंतर अचानक येणारे manhole cover / paver blocks


मुंबईत मोकळा आणि गुळगुळीत रस्ता हा मणिकांचन योग लिंक रोडवर क्वचितच येतो. अशा वेळी चाळीसच्या अतिवेगानं कार हाकण्याचा मोह तुम्हांला होऊ शकतो. 

सद्यकालीन  शिकवणुक  - जीवनातील ज्ञान मिळण्याच्या संभाव्य ठिकाणांमध्ये मुंबईच्या  रस्त्यांचा , रिक्षावाल्यांचा , बाइकवाल्यांचा वरचा क्रमांक लागतो . मोकळ्या आणि गुळगुळीत रस्त्याच्या  महत्तम ५० मीटर अंतरानंतर ज्याच कुतूहल अनावर झालं आहे असं manhole coverबाहेर  आलं असल्याची दाट शक्यता आहे . त्यावर वेगात येणारी कार दणक्यात आपटल्यानंतर फारसं दुःखी न होता पुढं येणाऱ्या पेव्हर ब्लॉकच्या  भागाकडे लक्ष असु द्यात ! मुंबईच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक्स केव्हा , का बदलले  जातात हा एक प्रबंधाचा विषय आहे !


थोडं गंभीरपणं बोलायचं झालं तर बहुसंख्य रिक्षेवाल्यांकडे सुजाणतेचा अभाव आहे. रिक्षांचे हँडल किती अंशातून वळु शकते ह्यावर बंधनं आणायला हवीत. कारवाल्यांना आपल्या कारभोवती २० सेंटिमीटर रुंदीचे सुरक्षाकवच बसविण्यास परवानगी देण्यात यावी !! आणि जर तुम्ही लिंक रोडवर नियमित वाहन चालवत असाल तर मेट्रो सुरु होईस्तोवर नवीन कार घेण्याचा अथवा असलेले स्क्रॅच दुरुस्त करायचा विचारसुद्धा करु नकात !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...