मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

2019 World Cup, IPL



यंदाच्या वर्षी IPL काही महत्त्वाच्या गोष्टींचा सामना करणार आहे. भारतभर पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मैदानी हिरवीगार ठेवण्यासाठी हजारो लिटर पाणी खर्च करणे कितपत योग्य आहे, त्याच सोबत रात्रीच्या वेळी विद्युतझोतात सामने खेळवून दुर्मिळ विजेचा या कारणासाठी उपयोग करणे नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे या दोन मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याची शक्यता आहे.  

वरील मुद्द्यांवर मी नंतर केव्हातरी लिहीन; परंतु आजचा मुद्दा आहे २०१९ सालची विश्वचषक स्पर्धा अगदी तोंडावर आली असता भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये गुंग होऊन जाणे कितपत योग्य आहे? यामध्ये आक्षेप घेण्यासारख्या काही गोष्टी खालीप्रमाणे!

१) IPL मध्ये खेळाडूंना दुखापत होण्याची, त्यांची दमछाक होण्याची  शक्यता नेहमीच अधिक प्रमाणात असते! तुम्हांला मिळालेल्या कोट्यावधी रुपयांचे मोल चुकवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी करत असता, एक दिवसाआड भारतासारख्या खंडप्राय देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात विमानाने जाताना झोपेचे खोबरे करुन तुम्ही खेळत असता.  

२) IPL मध्ये रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्ट्यांचे सध्या स्टेटस काय आहे मला माहित नाही. परंतु त्यात तुम्ही सहभागी होत असाल तर तुमच्या शिस्तबद्ध दिनचर्येची हालत खराब होऊ शकते.  

३) IPL स्पर्धा मे महिन्यामध्ये बराच काळ चालेल. विश्वचषकाचे सराव सामने मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहेत.  भारतातील उन्हाळ्यातील सामने खेळुन जेव्हा खेळाडू इंग्लंडच्या थंड हवामानातील तेव्हा त्यांना तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. 

४) अजून एक मुद्दा IPL मध्ये तुम्ही परकीय खेळाडूंच्यासोबत एका संघातून आपल्या संघातील खेळाडूविरुद्ध खेळणार. अशावेळी सामन्याच्या ओघात तुम्ही तुमची काही संघातील गुपिते परकीय खेळाडूंना सांगणार नाहीत याची हमी कोण देणार? 

आता म्हणायला गेलं तर जसे हे मुद्दे भारतीय खेळाडूंना लागू होतात तसेच हे मुद्दे परदेशी खेळाडूंना सुद्धा लागू होतील. परंतु येथील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही देश येणारी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता आपल्या खेळाडूंना आयपीएलच्या उत्तरार्धामध्ये स्पर्धेतून बाहेर काढून घेतील.  परंतु आयपीएलची मार्केट व्हॅल्यू कायम ठेवण्यासाठी भारतीय खेळाडूंना मात्र या स्पर्धेच्या शेवटापर्यंत खेळावे लागण्याची शक्यता जास्त!! IPL मध्ये खेळण्याची संधी मिळत नसलेल्या पाकिस्तानला तर अजुनच जास्त बरं !!


आता ह्या पोस्टचा उत्तरार्ध. विश्वचषक सामन्यांमध्ये विविध संघाच्या संभाव्य कामगिरीविषयी माझं हे परीक्षण !! 
विश्वचषकासाठी फलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्ट्या बनवल्या जात असल्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट हंगामातील पूर्वाधात जरी ही स्पर्धा खेळली जाणार असली तरी गोलंदाजांना अति अनुकूल परिस्थिती मिळेल असे आपणास म्हणता येणार नाही. जर गोलंदाजीला अनुकूल मैदान बनवलं आणि सामना ३० - ४० षटकांमध्ये आटोपला तर जाहिरातदारांचं किती नुकसान होणार ह्याचा विचार करावाच लागतो ! त्याचप्रमाणे २००७ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या अनुभवानंतर भारतीय संघाचे आव्हान स्पर्धेच्या अधिकाधिक कालावधीपर्यंत टिकुन रहायला हवं ! म्हणुन तर यंदा प्राथमिक फेरीत सर्व संघ एकमेकांशी खेळणार आहेत !! 

स्पर्धेत भाग घेणारे संघ पुढीलप्रमाणे 

इंग्लंड 
भारत 
न्युझीलंड 
ऑस्ट्रेलिया 
दक्षिण आफ्रिका 
पाकिस्तान 
वेस्ट इंडीज 
श्रीलंका  
अफगाणिस्तान 
बांगलादेश 

इंग्लंड 
इंग्लंड एकदिवसीय सामन्यांमध्ये सध्या एक क्रमांकाचा मानला जातो.  स्वदेशी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये इंग्लंड संघाचे पारडे नक्कीच जड राहील. सध्या वेस्ट इंडीजमध्ये या संघाला नक्की काय झालं आहे याचा उलगडा मला होत नाही. ही केवळ एक तात्पुरती घटना आहे की शिखर स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या उतरणीला सुरुवात झाली आहे या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल!  ह्या संघाचा विश्वचषक स्पर्धेतील इतिहास पाहता हा संघ मोक्याच्या वेळी ढेपाळतो हा अनुभव आहे. असे असले तरी मॉर्गन, बटलर, बेयरस्टो, रूट, रॉय, स्ट्रोक, ब्रॉड, अँडरसन ही मंडळी ह्या संघाला नक्कीच बाद फेरीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. 

भारत 

भारतीय संघ फलंदाजीच्या बाबतीत दोन-तीन शक्यतांमध्ये आपली कामगिरी बजावतो. 

पहिली शक्यता म्हणजे आघाडीचे तीन फलंदाज यशस्वी होणे. ह्या शक्यतेमध्ये सध्या तरी जगातील प्रत्येक संघाच्या गोलंदाजीला खरपूस समाचार घेण्याची क्षमता या तिघांमध्ये आहे. त्यामुळं भारतीय संघ बहुतांशी वेळा दणदणीत विजय मिळवतो. 

दुसरी शक्यता म्हणजे हे तिघे अयशस्वी होणे. बऱ्याच वेळा हे तिघेही एकत्र  अयशस्वी होतात. अशावेळी मधल्याफळीतील फलंदाज कशा प्रकारे ह्या बिकट परिस्थितीचा सामना करतात, चिकाटीने खेळुन  काहीशी आव्हानात्मक संख्या उभारतात ह्यावर सामन्याचे भवितव्य अवलंबुन राहते. 

२ अ ) मधल्या फळीने झुंज देत आव्हानात्मक धावसंख्या उभारली तर सामने बऱ्यापैकी चुरशीचे होतात. 

२ ब ) ही शक्यता शक्यता म्हणजे आघाडीच्या फलंदाजीसोबत मधल्या फळीतील फलंदाज सुद्धा हाराकिरी पत्करतात; भारतीय संघाचा दारुण पराभव होतो. 

विश्वचषक स्पर्धेचे यंदाचे स्वरूप लक्षात घेता सर्व सहभागी संघ एकमेकांशी साखळी स्पर्धेत खेळणार आहेत, त्यानंतर त्यातील आघाडीचे संघ उपांत्य फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत.  कोणताही संघ विश्वचषक स्पर्धेच्या आधी फॉर्ममध्ये असेल तर त्याचा अर्थ तो संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल असा होत नाही.  पहिल्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये असलेला विंडीजचा संघ आणि १९९९ ते २००७ सालापर्यंतचा ऑस्ट्रेलियाचा संघ या दोन संघानी तत्कालीन इतर संघांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. 

परंतु सध्या मात्र तशी स्थिती दिसत नाही. भारतीय संघ जरी आघाडीचा संघ मानला जात असला तरी चार-पाच सामन्यानंतर अचानक त्यांना Bad Day in Office मुकाबला करावा लागतो.  अशावेळी मागच्या सामन्यात सहज जिंकलेला हाच तो संघ का असा प्रश्न सर्वांना पडतो! जर भारतीय संघाला विश्वचषक जिंकायचा असेल तर असे Bad Day in Office साखळी स्पर्धेत आलेले आपल्याला परवडतील!  

सध्या या संघाला प्रॉब्लेम ऑफ प्लेण्टी ही समस्या सुद्धा भेडसावत आहे.  म्हणजेच एका स्थानासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. समजा मी क्रिकेट हे क्षेत्र निवडलं असतं तर १९९० च्या दशकात माझ्यात, द्रविड, सौरभ, लक्ष्मण आणि सचिनमध्ये कशी मधल्या फळीतील स्थानांसाठी चुरस झाली असती त्यालाच Problem of Plenty असं म्हणतात. फक्त ही संज्ञा समजाविण्यासाठी हे उदाहरण दिलं !! बाकी कोणताही हेतु नाही !!

उपांत्य फेरीपासून आपल्याला आघाडीच्या तीन फलंदाजांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहावे लागेल.  बुमराह, शमी, भुवनेश कुमार, चाहल आणि  कुलदीप यांची गोलंदाजी कितीही भरभक्कम वाटत असली तरी फलंदाजांनी किमान धावसंख्या उभारणे आवश्यक आहे.  IPL नंतर आपली मंडळी कोणत्या मनःस्थितीत विश्वचषक खेळण्यास उतरतात हा एक महत्त्वाचा घटक आहे! तरी सुद्धा सध्याच्या फॉर्मनुसार आपण उपांत्य फेरीपर्यंत पोहचु शकतो असं मला वाटतं. 

न्युझीलंड 
न्युझीलंड हा संघ जरी भारताकडून आता घरच्या मैदानावर ४-१ असा पराभूत झाला असला तरी विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांना कमी लेखण्याची चूक कोणी करु नये. या संघाकडे खोलवर फलंदाजी करणारे खेळाडू आहेत.   त्याचप्रमाणे बोल्ट, साऊथीसारखे अत्यंत घातक  वेगवान गोलंदाजसुद्धा आहेत. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे क्रिकेट सेन्स ज्याला उत्तम लाभला आहे असा त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन हा त्यांच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत सहज घेऊन जाऊ शकतो!!


ऑस्ट्रेलिया 
ऑस्ट्रेलिया या संघाचे विश्वचषकातील भवितव्य बऱ्याच प्रमाणावर स्मिथ आणि वॉर्नर या दोघांवर अवलंबून आहे. या दोघांवरील बंदी मार्च महिन्यात उठल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी प्राप्त होईल.  एक वर्षाच्या बंदीमुळे त्यांच्या खेळावर किती विपरीत परिणाम झाला आहे आणि या बंदीमधुन मानसिकदृष्ट्या ते किती झटपट बाहेर निघू शकतात हा ऑस्ट्रेलियन संघासाठी कळीचा मुद्दा बनू शकतो! हॅझलवूड आणि स्टार्क या दोघांवर ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजीचे भवितव्य अवलंबून राहील. स्मिथ आणि  हॅझलवूड दुखापतीतून कसे लवकर बाहेर पडतात हा महत्त्वाचा मुद्दा राहील. परंतु एकंदरीत सद्यस्थिती पाहता विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचणे सर्वात आशादायक कामगिरी असू शकते.  

दक्षिण आफ्रिका 
गेल्या काही विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिका नेहमीच एक आघाडीचा संघ म्हणून उतरला होता. परंतु प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत त्यांनी मोक्याच्या वेळी हाय खाल्ल्यामुळे त्यांना विजेतेपदाला गवसणी घालण्यात अपयश आले होते. यंदाच्या वेळी त्यांच्याकडे रबडा, निगडी, स्टेन असे चांगले गोलंदाज जरी असले तरी त्यांची फलंदाजी आतापर्यंतच्या विश्‍वचषक स्पर्धेत भाग घेतलेल्या बाकीच्या दक्षिण आफ्रिका संघांपेक्षा बरीच कमकुवत वाटते. डुप्लेसीवर बरंच काही अवलंबुन असेल. मानसिक कणखरता हे दक्षिण आफ्रिकेचे बलस्थान केव्हाच नव्हते.  यावेळी तर त्यांना ह्यावर खुप मेहनत घ्यावी लागणार आहे. डेव्हिलर्सची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवेल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाप्रमाणेच हा संघ सुद्धा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणं ही सर्वोत्तम आशा धरू शकतो. परंतु उपांत्य फेरीमध्ये त्यांच्या मानसिक कणखरतेची सर्वात कठीण परीक्षा घेतली जाईल.   

पाकिस्तान 
पाकिस्तान हा संघ दक्षिण आफ्रिकेत सध्या पराभूत होत असला तरी त्या संघाने आपल्या कामगिरीमध्ये खूपच सुधारणा केल्याची जाणवून येते. या संघाकडे वलयांकित नसलेले असे बरेच गुणवान खेळाडू आहेत. समजा इंग्लंडच्या पूर्वार्धातील हवामानाने त्यांच्या गोलंदाजांना साथ दिली तर हा संघ त्यांच्या दिवशी भल्या भल्या संघांच्या तोंडचे पाणी पळवु शकतो. फक्त या संघाची केव्हाही कोसळू शकणारी फलंदाजी या संघाचा घात करू शकते. आणि ह्याच कारणास्तव ह्या संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यतांना सुरुंग लागु शकतो. 

वेस्ट इंडीज 
जे कोणी क्रिकेटरसिक सध्या वेस्ट इंडिज संघाची इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील कामगिरी पाहत आहेत, त्यांना आश्चर्याचा खूपच सुखद धक्का बसला असेल. ज्याप्रकारे वेस्ट इंडिजच्या संघाने जेसन होल्डर च्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला दोन्ही कसोटी सामन्यात नमवले आहे ते पाहून दर्दी क्रिकेट रसिकांना खूपच बरे वाटले असेल. Shimron Hetmyer  आणि शाई होप हे भविष्यातील महान खेळाडु या संघाकडे मधल्या फळीत आहेत. या संघाची भारतीय दौऱ्यावरील गेल्या वर्षातील एकदिवसीय मालिकेतील कामगिरी आठवून पहा! हा संघ जुनमध्ये भरात आला तर होल्डर याच्या नेतृत्वाखाली उपांत्य फेरीपर्यंत धडक देऊ शकतो असे मला वाटते. 

श्रीलंका  
श्रीलंका हा संघ संगकारा, महेला जयवर्धने या दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीनंतर अजूनही पूर्णपणे सावरला नाही.  या संघाची सध्याची कामगिरी पाहता या संघाकडून विश्वचषक स्पर्धेमध्ये फारशा अपेक्षा करता येणार नाहीत. ह्या संघाचे बांगलादेश, अफगाणिस्तान सोबतचे सामने चुरशीचे होऊ शकतात. 

अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ दोन तीन आघाडीच्या संघांना धक्के देऊ शकतात. परंतु उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणे त्यांना कठीण आहे ! 



शेवटी सारांश असा की सध्याची कामगिरी लक्षात घेता भारत, इंग्लंड, आणि न्युझीलंड या संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची सर्वाधिक संधी आहे.  ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चौथ्या स्थानासाठी चुरशीची स्पर्धा होऊ शकते. विंडीज आणि पाकिस्तान हे दोन संघ बेभरवशाचे आहेत.  त्यांच्याकडे उपांत्यफेरीत प्रवेश करण्याची क्षमता असली तरी ते आपल्या सातत्याच्या अभावामुळं बहुदा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत!!  

हा ब्लॉग आता वाचून विसरून जा!! विश्वचषक स्पर्धेत वेगळेच निकाल लागल्यानंतर या ब्लॉगची लिंक मला पाठवून खजील करु नकात !!

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...