दोन वर्षांपूर्वी योगायोगानं सोशल मीडियावरून अमित गद्रे ह्यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या शेतीविषयक पोस्ट्स वाचणं हा एक आनंदाचा ठेवा असतो. ह्यावेळी त्यांनी मला अग्रोवन दिवाळी अंक खास पाठवून दिला आहे. मुंबईसारख्या शहरात बरंचसं वास्तव्य करत असताना प्रामुख्यानं महाराष्ट्रातील कृषीक्षेत्राविषयी आपण किती अज्ञान बाळगून आहोत ह्याविषयी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा दिवाळी अंक !
ह्या अंकाविषयी मला आवडलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृषीक्षेत्रातील केवळ यशस्वी शेतकऱ्यांच्या कथांवर लक्ष केंद्रित न करता समाधानी शेतकऱ्यांच्या कथा प्रसिद्ध करण्यावर इथं प्राधान्य दिलेलं दिसतंय. एका दिवाळी अंकात प्रेरणादायी असे किती लेख असू शकतात हे पाहून मी थक्क झालो आहो. हे सर्व लेख सविस्तर तर वाचीनच परंतु ह्या पोस्टद्वारे ह्या अंकातली काही मला भावलेली वाक्यं किंवा व्यक्तिमत्वं अगदी संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर आणण्याचा माझा हा प्रयत्न !
'जीवन त्यांना कळलं हो!', 'सुखाचा शोध', 'हौशी शेतकरी', गवसली वाट समाधानाची' अशा समर्पक शीर्षकांमध्ये ह्या अंकातील लेखांची विभागणी केली गेली आहे.
लौकिकार्थानं यशस्वी असं जीवन जगणारी माणसं प्रत्यक्षात कशी मनातून असमाधानी असू शकतात आणि काळ्या आईची अंतर्मनाला सदैव ऐकू येणारी साद एका क्षणी त्यांना कसा शहरी जीवनाचा त्याग करून निसर्गाच्या कायमच्या सानिध्यात घेऊन येते हे महारुद्र मंगनाळे ह्यांच्या प्रदीर्घ कहाणीतून दिसून येतं. ह्या मुलाखतीमधील सच्चेपणा मनाला भावतो. एखाद्या वर्षाचा अपवाद सोडला तर दरवर्षी शेतीत जी गुंतवणूक करतो तितके पैसे निघत नाहीत हे उघड सत्य त्यांनी सांगितलं आहे. पण त्याच वेळी शेती पूरक, निसर्गपूरक जीवनशैलीमुळं माझी तब्येत ठणठणीत आहे, औषधाचा खर्च नगण्य आहे हे मात्र ते आग्रहानं नमूद करतात. रासायनिक खतांचा वापर न करता पिकवलेली बारमाही फळे, घरच्या गाई - म्हशीचं ताजं दूध, भाजीपाला, रानभाज्या हे पैशापलीकडील सुख आपण अनुभवतो हे ते सांगतात. झाडं, पाखरं, सूर्य, चंद्र, चांदण्याच्या सोबतीनं मी जगतो असे ते म्हणतात. ह्या लेखाचा सारांश त्यांच्याच शब्दात सांगायचा झाला तर आनंददायी शेती करण्यासाठी आपलं पोट शेतीवर अवलंबून असायला नको!
मिलिंद पाटील ह्यांचा लेख सुद्धा काहीसा ह्याच पठडीतला ! शेती माणसाला नेहमी बजावत असते की तुमच्या अमर्याद वखवखीला पुरेल एवढा प्रचंड पैसा तुम्हांला माझ्याकडून कधीच मिळणार नाही. पण त्याच्या बदल्यात मी तुमच्याकरता इतर काही गोष्टीतले अनमोल आनंद ठेवले आहेत, जे तुम्हांला पैसे मोजूनही कुठे मिळणार नाहीत. त्या आनंदाचं मेन्यूकार्ड शेती तुम्हांला दाखवत नाही, ती सुखं तुमची तुम्ही ओळखायची असतात. पावसाळ्यात, वादळवाऱ्यात विस्कळीत झालेलं जीवन, निष्प्राण झालेले हँडसेट पूर्ववत होण्यासाठी आठवडा जाऊ शकतो. पण घरी मागविलेलं पार्सल दहा मिनिटं जरी उशिरा आलं तर येणारा वैताग इथं ह्या आठवड्याभराच्या प्रतीक्षेत होत नाही. कारण जे आहे ते स्वीकारून सबुरीने घेण्याची कार्यशाळा इथं नेहमीच सुरु असते. अशी अनेक वाक्यं आपल्याला ह्या निसर्गाच्या सानिध्यातील जीवनाची समृद्धता जाणवून देत राहतात.
पुढे कहाणी येते ती आयबी एम मधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन डहाणूला स्थायिक होऊन शेती करणाऱ्या अय्यर ह्यांची, मायक्रोसॉफ्ट मधून निवृत्ती घेऊन तरुण वयात शेतीकडं परतणाऱ्या विनोद यादव ह्यांची आणि अशाच अजून दोघा-तिघांची ! ह्या लेखाच्या शेवटी लक्षवेधक असं एक वाक्य. गणितातील समीकरणाची उकल करणारा एक्स त्या समीकरणाचा तोल राखतो. अगदी तसंच शेती, माती, आभाळ, पाणी ह्यांच्याशी मैत्रभावना जपताना आधी इमानेइतबारे विश्वासाचा एक्स मानावा लागतो. नंतर निष्ठेच्या पायऱ्या पार करता करता ह्या विश्वासाचं मोल बिनचूक मिळून येतं. ह्या वाक्याची उकल करण्याचा प्रयत्न मी करणार नाही. प्रत्येकानं आपापली उकल करावी!
वानगीदाखल पहिल्या दोन लेखांविषयी थोडंसं लिहिलं. पूर्ण अंक असा प्रेरणादायी! निसर्ग, परिसंस्थेसोबत कसं जोडून घ्यावं, बहुस्तरीय, बहुपीक रचना कशी स्वीकारावी ह्याविषयी मार्गदर्शन करणारा, शेतीत रमलेल्या डॉक्टरची गोष्ट सांगणारा ! प्रवरा खोऱ्यातील शेती संस्कृती बहुविध संकटांना तोंड देत आजही कशी टिकून आहे, त्यात निसर्गाचं आणि शेतकरी, पशुपालकांचं जैवसांस्कृतिक नातं कसा मोलाचा हातभार लावतं ह्याचा उलगडा करणारा! शेतकरी महिला आणि पुरुष मानस समजावून सांगणारा! शेतीतील जोखीम कमी करणाऱ्या शाश्वत शेतीचं माहात्म्य सोप्या भाषेत विशद करणारा! निसर्गाचं पूजन आणि वंदन ह्या तत्वांवर आधारित आदिवासांच्या निसर्गपूरक शेतीची कहाणी सांगणारा !
पुढे कहाण्या येतात त्या शेतीच्या माध्यमातून उन्नती साधणाऱ्या महिला आणि पुरुष शेतकऱ्यांच्या ! इथं काही महत्वाचे मुद्दे जाणवतात. कुटुंबातील सर्व सदस्यांचा एकोपा आणि शेतात एकत्र राबता, रासायनिक अवशेषमुक्त शेती, आरोग्यदायी अन्नाचा ध्यास, शेतीमालाची थेट विक्री, नेटके व्यवस्थापन, पीक विविधतेचे गणित, पशुपालनातून मिळणारे भांडवल, शिस्त आणि कष्ट ह्यातील सातत्य! शेतीचा समाधानकारक ताळेबंद ! काही आश्चर्यकारक सत्यं पुढे येतात जसे की आपल्या जनावरांना हिरवा चारा अधिकाधिक काळ मिळावा ह्या साठी डोंगरातील गुहेत वास्तव्य करणारं कुटुंब! पुढे कृषी क्षेत्रात पदवी घेतलेल्या आणि यशस्वीरीत्या शेती करणाऱ्या दोन तरुण महिला शेतकऱ्यांच्या अगदी प्रेरणादायी कथा वाचायला मिळतात.
संपूर्ण अंकाचा आढावा घेणं वेळेअभावी शक्य नाही! पण बऱ्याच काळानंतर काहीसं प्रेरणादायी असं वाचायला मिळालं ! असंही हल्ली चाळीस - पन्नाशीनंतर नोकरी टिकविताना अत्यंत तणावाला सामोरे जावं लागतं. अशा वेळी आपल्यातील सर्वांनी नाही पण तीस - चाळीस टक्के तरुणाईनं कृषी क्षेत्राची कास का धरू नये? ह्यासाठी आर्थिक, मानसिक तयारी कशी करावी? कितपत आर्थिक यशाची अपेक्षा धरावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा हा अंक! आपल्याभोवती आपल्याच राज्यात इतकं काही चांगलं घडतंय हे जाणवून देणारा हा अंक ! शक्य असेल तितक्या सर्वांनी विकत घेऊन वाचायलाच हवा ! अगदी ह्या क्षणी तुम्ही नोकरी सोडून शेतीकडं वळणार नसलात तरी ह्या विचारांचं बीज म्हणा अथवा खूळ म्हणा तुमच्या मनात रुजवण्याची नक्कीच ताकद असणारा हा अंक !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा