हार्दिक पंड्या आणि राहुल यांची कारकीर्द एका कॉफीसोबत दिलेल्या मुलाखतीने सध्यातरी धोक्यात आली आहे. या घटनेवरुन काही मुद्दे लक्षात येतात. तुम्ही जेव्हा बऱ्याच लोकांना लक्षात येण्यासारख्या व्यावसायिक भूमिकेमध्ये असता त्यावेळी सोशल मीडियावरील तुमचे वागणं हे अत्यंत काळजीपूर्वक असायला हवे, तुम्ही रोल मॉडेल असायला हवं !!
केवळ पाच मिनिटं जरी तुमचं भान हरपलं, तुम्ही एखादी चुकीची कृती अथवा वक्तव्य करुन बसलात तर तुमच्या कारकिर्दीवर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ह्यांनी सुद्धा हेच अनुभवलं आहे. यामध्ये केवळ एक वर्षाची बंदी हा महत्वाचा घटक नाही. या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी बदललेल्या असू शकतात. तुम्ही ज्या परिस्थितीमधून संघातून बाहेर गेलात तीच परिस्थिती तुम्हाला परत येताना अनुभवायला मिळेल याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. असे कठोर निर्णय घेऊन युवा पिढीसमोर योग्य आदर्श ठेवणाऱ्या ऑस्ट्रेलियन आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे मनःपूर्वक अभिनंदन!! Zero Tolerance वगैरे जो प्रकार म्हणतात तो हाच !!
या सर्व प्रकरणामध्ये करण जोहरची सुद्धा जबाबदारी आहे आणि त्याच्यावरसुद्धा काही कारवाई झाली पाहिजे ही माझी मनापासूनची इच्छा !! केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या शोमध्ये गॉसिपिंगच्या नावाखाली बरेच प्रकार चर्चिले जातात. बाकीच्या क्षेत्रांमध्ये ते खपवून सुद्धा घेतले जात असतील!! करण जोहरच्या कार्यक्रमावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा अस्तित्वात असावी ही माझी मनःपूर्वक इच्छा!!
आता वळूयात ते एका दुसऱ्या मुद्द्याकडे!! हल्ली कसोटी सामन्यात एखाद्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर किंवा एकदिवसीय सामना संपल्यानंतर त्या सामन्याचा सामनावीर यांना मीडियासमोर बोलण्याची संधी दिली जाते. हल्ली भारतीय खेळाडूंची संवादकला खूपच प्रमाणात विकसित झाली आहे. निवृत्तीनंतर समालोचनाचे पर्यायी क्षेत्र उपलब्ध असल्यामुळे नक्कीच हे खेळाडू संवादकलेवर लक्ष केंद्रित करत असावेत. यामध्ये चुकीचं वाटण्यासारखं तसं काहीच नाही. बॉईज प्लेड वेल या नेहमीच्या ठेवणीतल्या वाक्याशिवाय पुढे काही न बोलता येऊ शकणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा ही स्थिती नक्कीच चांगली आहे.
पण माझा मुद्दा एक वेगळा आहे. जे काही निर्णय कप्तानाने अथवा व्यवस्थापकांने घ्यायला हवेत त्याची चर्चासुद्धा इतर खेळाडू मीडियासमोर करताना आपल्याला आढळून येतं! यामध्ये दोन शक्यता उद्भवू शकतात!पहिली म्हणजे हा खेळाडू मीडियासमोर जे काही बोलत आहे ते कप्तानाच्या संमतीने बोलत आहे; दुसरी शक्यता म्हणजे तो आपल्या मनाप्रमाणे मुक्ताफळे उधळीत आहे. ज्याप्रकारे हल्ली दुनियेचा कारभार चालतो ते लक्षात घेता दुसऱ्या शक्यतेचे प्रमाण मला कमी वाटते. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर भारताने ऑस्ट्रेलियाशी पहिला एकदिवसीय सामना हरल्यानंतर रोहित शर्मा मीडियासमोर म्हणाला , "धोनीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी येणे योग्य राहील!" आजच्या पेपरमध्ये निवड समितीचे चेअरमन पद भूषवित असलेल्या एम. एस. के. प्रसाद याने ऋषभ पंत हा विश्वचषक स्पर्धेच्या योजनेमध्ये अजूनही आहे हे विधान केलं आहे. रोहितचे कालचे विधान आणि प्रसादचे आजचे विधान लक्षात घेता हा धोनीवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असू शकतो हे कळण्यासाठी बुद्धिमान माणसाची गरज नसावी असं मला वाटतं!! म्हणा धोनीसुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाही त्यामुळे तोसुद्धा अशा दबावतंत्राला बळी पडेल याची शक्यता मात्र कमीच!! परंतु माझा मुद्दा केवळ एकच की असे संघव्यवस्थापनापुरता मर्यादित असायला हवे असणारे विषय मीडियासमोर खरोखर यायला हवेत का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा