मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

मुंबईचे, मुंबईकराचे खरे नाही!



मुंबईचे, मुंबईकराचे काही खरे नाही असे पत्नीला, मला  आणि समविचारी मित्रांना वाटत राहतं . समविचारी मित्रांची संख्या कमी असल्यानं एकंदरीत अशी विचारधारा असलेली लोक अल्पगटात मोडतात. बाकी वार्षिक सुट्टी सुरु असल्यानं माझ्या मनात असे असंबद्ध  विचार येऊ शकतात हे सत्य मी स्वीकारलं आहे. 

मुंबईचे, मुंबईकराचे खरं नाही असं मला का वाटतं? 
१.  पूर्वीच्या चार ते सात मजली इमारती पुनर्बांधणी कार्यक्रमाद्वारे तीस मजल्यापलीकडे परिवर्तित झाल्या / होत आहेत.  भोवतालच्या परिसरातील ओळखीची माणसं, शांतता गायब होत चालली आहे. लहान मुलांना अगदी सुरक्षितपणे इमारतीखाली जाऊन खेळता यायचं तो आज बऱ्याच वेळा मोठा इव्हेंट बनू लागला आहे ज्यात पालकांना तयार होऊन मुलांसोबत खाली उतरावं लागतं. आपल्या परिसरात आल्यावर माणसांना जे एक घरपण वाटत असे ती भावना ह्या गगनचुंबी इमारतीमुळं नाहीशी होत आहे. रहदारी अचानक वाढल्यामुळं वृद्ध माणसांना आपल्या शेजारच्या परिसरात चक्कर मारण्यासाठी जाणं सुद्धा तणावपूर्व वाटू लागलं आहे. दिवसातील अठरा ते वीस तास रस्त्यावरील वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी बहुतांश घरात शिरकाव करत असल्यानं घरातील शांतता सुद्धा भंग पावत आहे. 
२. मुंबईकरांच्या आहाराविषयीच्या सवयी बहुतांश प्रमाणात बिघडल्या आहेत. गेल्या दहा पंधरा वर्षात एका प्रातिनिधिक मुंबईकराचे बाहेरील खाणे खूप वाढले आहे. त्याला / तिला जगभरातील विविध खाद्यसंस्कृतीची खूप माहिती झाली आहे. हातात खुळखुळणाऱ्या पैश्यामुळं हे सर्व मुंबईकरांना परवडू शकत आहे. स्टार्टर, मुख्य जेवण आणि डेझर्ट अशा क्रमाक्रमाने येणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेताना आपल्या शरीराला नक्की किती अन्नाची गरज आहे हे आपण विसरत चाललो आहोत. त्याचप्रमाणे झोमॅटो, स्वीगी मुळे आपण वारंवार घरी जेवण मागवू लागलो आहोत. 
३. वाढत्या आहाराला पचविण्यासाठी बरेच मुंबईकर आजकाल व्यायामशाळेत जातात. दररोज आवश्यक असलेला प्रोटीनचा कोटा पूर्ण करण्यासाठी काही जण अंडी, चिकन ह्यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करतात.  जड अन्न पचविणे, त्यासाठी व्यायाम करणे हे कुठंतरी शरीराला तणावदायक बनू लागले आहे
४. मुंबईकरांची  वैद्यकीय माहिती पातळी खूपच उंचावली आहे. नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढली आहे. परंतु एकदा का सगळ्या चाचण्यांचे निकाल सामान्य आले की आपण हवं ते खायला मोकळे असा समज काही जणांत पसरू लागला आहे. 
५. वरील दोन, तीन आणि चार मुद्द्यांमुळं आपण शरीराला सदैव सक्रिय ठेऊ लागलो आहोत. पाश्चात्य देशांतील लोकांचे अनुकरण करताना आपण दोन मुद्दे काही प्रमाणात विसरत आहोत. पहिला म्हणजे तेथील थंड हवामान ज्यामुळं कितीही जड आहार पचण्यासाठी तुलनेनं सोपा जातो. दुसरा मुद्दा म्हणजे अगदी न्यूयॉर्क वगैरे वगळलं तरी बाकी शहरांत इमारतींच्या अवतीभोवती गुण्यागोविंदानं नांदणारा निसर्ग ! तसं म्हटलं तर न्यूयॉर्कमध्ये सुद्धा सेंट्रल पार्क आहेच! 

हे मान्य की वर वर्णन केलेला वर्ग संपूर्ण मुंबईचे प्रतिनिधित्व करत नाही. पण त्यांचे प्रमाण नक्कीच वाढत आहे. माझी मुख्य चिंता हा वर्ग जेव्हा वयाची पंचावन्न / साठ वर्षे पूर्ण करेल तेव्हा बहुदा मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात राहणे त्यांच्यासाठी आनंददायी अनुभव नसेल ह्याविषयी आहे ! मुंबईबाहेर जाऊन राहणे तिथल्या अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळं ह्या वर्गाला जमणार नाही! 

थोडक्यात मुंबईचे,  मुंबईकराचे खरे नाही!

तळटीप - मुंबई इंडियन्सचा कप्तान बदलण्याच्या घटनेचा आणि ह्या पोस्टचा तिळमात्र संबंध नाही!! 

1 टिप्पणी:

  1. अतिशय योग्य मुद्दा आहे. गेल्या २ वेळेस मी जेव्हा भारतात येऊन गेलो तेव्हा ह्या गोष्टीची जाणीव येत होती.सात्विक जेवणाऐवजी चमचमीत अन्न खाण्याचा ट्रेंड आला आहे मुंबईत असे वाटते. काही माणसे स्वतःचा स्टेटस पण दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.

    उत्तर द्याहटवा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...