मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

२०३० सालातील चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याची व्याख्या !



गेल्या काही दिवसातील घटनांमुळे खरा क्रिकेट रसिक हा भारतीय क्रिकेटपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे असे विधान मी फेसबुकवर केले.  मला सडेतोड प्रतिक्रिया देणाऱ्या एका मित्रानं तुला ही जाणीव होण्यासाठी इतका वेळ लागला याविषयी आश्चर्य प्रकट करत हे सारं गेल्या १८-२० वर्षापासून चालू आहे असे विधान केले. आज सकाळी एका निर्भीड मित्रांने  भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना चालना देण्यासाठी निर्माण झालेल्या आयपीएल ने त्यांच्यावर लक्ष न देता परदेशी खेळाडूंवर वीस ते चोवीस कोटी रुपयांची गंगाजळी खर्च करणाऱ्या आयपीएल मालकांविषयी मत व्यक्त करा अशी मागणी केली.  त्यामुळे लिहिण्यात आलेली आजची ही पोस्ट!
 
आयपीएल ही भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना चालना देण्यासाठी निर्माण झालेली  क्रीडास्पर्धा या विधानाशी मी सहमत नाही.  हा एक बाजार आहे हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते.  बदलत्या काळात मनोरंजनाच्या अनेक साधनांपैकी एक साधन म्हणून क्रिकेटकडे बघणारा जो बहुसंख्य क्रिकेट रसिक वर्ग भारतात निर्माण झाला आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून आयपीएल हे निर्माण करण्यात आले.  या रसिक वर्गाच्या क्रयशक्तीवर आधारित एक मोठी बाजारपेठ आयपीएल निमित्ताने निर्माण करण्यात आली. स्टेडियममध्ये चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या कोक, बर्गर इत्यादींपासून ते आयपीएल सामन्यात दरम्यान ३० सेकंदाच्या जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये मोजण्यासाठी तयार असलेल्या तंबाखूच्या उत्पादकांपर्यंत या बाजारपेठेचे जाळे पसरले आहे.  त्यात भर पडावी  म्हणून प्रत्येक फ्रेंचाईसीने आपले टी-शर्ट आणि तत्सम वस्तूंची निर्मिती केली आहे. 

आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे! गेल्या ४०-५० वर्षांपर्यंत चांगलं आणि सुसंस्कृत वागणं याविषयी प्रत्येक राज्यातील मध्यमवर्गाने आपापल्या विशिष्ट प्रतिमा उभ्या केल्या होत्या. ही चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याविषयीची प्रतिमा त्यांनी स्वतः काही निर्माण केली नव्हती तर ती त्यांना त्यांच्या पूर्वजांपासून मिळाली होती.  त्या प्रतिमेनुसार आपल्या मुलांनी वागत रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या पूर्वजांना एक अनुकूल मुद्दा होता. पूर्वजांच्या बाबतीत अवतीभोवतीच्या वातावरणातील बदलांचा वेग नगण्य होता. त्यामुळे या प्रतिमेत काळानुसार बदल घडवून आणण्यास प्रत्येक पिढीला वेळ मिळत असे. परंतु गेल्या वीस-तीस वर्षांत ज्या वेगाने बदल झाले त्या वेगाला अनुसरून चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याच्या प्रतिमेत / संकल्पनेत बदलत्या कालानुरूप टिकू शकणारं रूप देण्यात भारतीय मध्यमवर्गीय समाज अपयशी ठरला.  या काळात अजून एक घटना घडली ती म्हणजे पुढील पिढीने आर्थिकदृष्ट्या मागच्या पिढीच्या उत्पन्नाइतकीच किंबहुना त्याहून जास्त मजल लहान वयातच गाठली. त्यामुळे मागील पिढी काहीशी अचंबित झाली. त्यांनी आपला पुढील पिढीला उपदेश देण्याचा अधिकार बजावण्याचा आत्मविश्वास काहीसा गमावला. 

मी सद्य समाजातील स्वघोषित सुजाण नागरिक आहे. एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यात दोन पिढ्यांमधील संस्कारांचे यशस्वी हस्तांतरण ह्याविषयी माझी मते नोंदवून ठेवणे ह्याचा समावेश होतो असा माझा समज आहे. संस्कारांचे यशस्वी हस्तांतरणासाठी सद्य परिस्थितीत दोन गोष्टी व्हाव्या लागतील.  
१) दोन पिढ्यांमधील संवाद हा सुसंवाद बनायला हवा. हल्ली हा संवाद मोजक्या काही मिनिटांत संपतो. ह्या संवादाची मुख्य जबाबदारी जुन्या पिढीकडे आहे. त्यामुळं कदाचित नवीन पिढीशी संवाद कसा साधावा ह्यासाठी ह्या पिढीला एका  प्रशिक्षण वर्गाची गरज आहे. ह्या प्रशिक्षण वर्गातील अभ्यासक्रमाची योग्य पद्धतीने आखणी समाजातील तज्ञांनी करावी. 
२) पुढील वीस वर्षांसाठी चांगलं आणि सुसंस्कृत ह्यांची कालानुरूप अशी व्याख्या तज्ञांनी बनवून त्यांचं सोशल मीडियावर अधिकाधिक प्रसारण करावं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...