नव्या वर्षात काही नवीन गोष्टी ठरवून तर काही अचानक होतात. खरं तर 'खो गये हम कहाँ' हा माझ्या पठडीत बसणारा चित्रपट नव्हे पण थोडा वेळ हा काय वेडेपणा आहे हे पाहू असा विचार करत पहायला सुरुवात केलेल्या ह्या चित्रपटानं काहीसं मला धरून ठेवलं. दोन तीन दिवसात हा चित्रपट जवळपास पूर्ण पाहिला. कर्मठ पद्धतीचा चष्मा घालून पाहिलं असता ह्यातील तिन्ही पात्रांची वागणूक मूर्खपणाची वाटते. पण काही वेळानं ह्या वेडेपणात एक सुसंगती आढळून येते. नव्या पिढीच्या जीवनात स्थिर होण्याच्या संघर्षाला, त्यांना सामोरे जावं लागणाऱ्या नात्यांमधील क्षणभंगुरतेला हा चित्रपट व्यवस्थित आपल्यासमोर सादर करतो.
प्रत्येकानं यशस्वी व्हायलाच हवं असा सुप्त संदेश सर्वत्र पसरविणारं आजचं जग. पण प्रत्येकजण जगाच्या व्याख्येनुसार यशस्वी होऊ शकणार नाहीत हे कटू सत्य. त्यामुळं आपण जगाच्या दृष्टीनं जरी यशस्वितेच्या सर्वोच्च पातळ्या गाठू शकलो नसलो तरी आपल्या क्षमतेनुसार सिद्ध करून दाखविण्याची ह्या वर्गाची धडपड हा चित्रपट सुरेखरित्या सादर करतो. स्वतःची जिम उभारण्याची जिद्द बाळगून असलेला नायक. पर्सनल ट्रेनर म्हणून सन्मानाचे मोजके पण अपमानाचे अनेक क्षण झेलणारा! त्याची कुतरओढ कुठेतरी मनाला खिन्न करते.
हल्लीच्या युगातील तरुण पिढीच्या नातेसंबंधातील संभ्रम सुरेखरित्या इथं सादर करण्यात आला आहे. दोन प्रेमिकांना केवळ प्रेम हा घटक सदैव एकत्र ठेवू शकत नाही. प्रेमाच्या अनेक छटा असतात, बऱ्याच वेळा लग्नबंधनाशिवाय एकत्र आलेल्या जोडप्यात एकासाठी शारीरिक आकर्षण हा महत्वाचा मुद्दा असू शकतो, तर दुसऱ्यासाठी आर्थिक स्थैर्य! पण केवळ हेच घटक असतील तर ज्याच्या / जिच्याविषयी अधिक आकर्षण वाटू शकते किंवा जो / जी अधिक आर्थिक स्थैर्य देऊ शकते अशी व्यक्ती आयुष्यात आल्यास आधीचं नातं सहजासहजी तुटू शकतं. असं घडल्यास आपण केवळ वापरले गेलो आहोत, आपलं आयुष्यातील अयशस्वीपण आपल्या नातेसंबंधावर परिणाम करू शकतात असले अनेक विचार ह्या व्यक्तींच्या मनात येऊ शकतात. आत्मसन्मानाला मोठी ठेच लागू शकते.
निर्माता / दिग्दर्शकाला खरोखर वरील संदेश द्यायचा होता की नाही हे माहिती नाही. पण मला हा संदेश मिळाला. केवळ एका विशिष्ट विचारसरणीने विचार करणाऱ्या मला ह्या चित्रपटाने मला काहीशी चपराक दिली. नवीन पिढीची मानसिकता समजून घेण्यासाठी जमल्यास हा चित्रपट बघा. अनन्या पांडेचा उल्लेख ह्यापुढील पोस्टमध्ये टाळला जाईल किंवा केल्यास आदरानं केला जाईल हा निर्धार सुद्धा मी केला आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा