नाटक पहावं ते कशासाठी ? चांगलं नाटक पहावं ते सद्ययुगात जुन्या संकल्पनांवर आधारित आयुष्य जगण्याच्या आपल्या श्रद्धेला दुजोरा देण्यासाठी. आपल्याभोवताली उथळ गोष्टींचे पेव फुटले आहे. अशा उथळ गोष्टींना प्रसिद्धी मिळवून देणारी यंत्रणा सुद्धा अस्तित्वात आहे. बॉम्बे टाइम्समध्ये कोणाही ऐऱ्यागैऱ्याचा फोटो येतो; आपण यशस्वी कसे बनलो, तुम्ही यशस्वी कसं बनू शकता याविषयी ज्ञान पाजळणाऱ्या चार गोष्टी सांगणाऱ्या या तथाकथित सेलेब्रिटी लोकांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात. आपल्याला अशी प्रसिद्ध व्यक्ती का माहिती नाही याविषयी काहीसं अपराधित्व मनात दाटून येतं. कालच्या नाटकात इरा ज्यावेळी अंगद दळवीला मला अनन्या पांडे माहिती असणे अपेक्षित आहे का असा प्रश्न विचारते त्यावेळी आपण तिच्याशी रिलेट होतो; तिच्या भावना समजून घेऊ शकतो. अजूनही सखोल गोष्टींचा विचार करणारी माणसं जगात आहेत ह्या जाणिवेनं मन सुखावतं.
नाटकात एक वाक्य आहे. यशस्वी लेखक होणे आणि चांगला लेखक होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हल्ली या दोन्हींचा प्रवास अगदी विरुद्ध दिशेने चालू आहे. हल्लीच्या जगातील ह्या कटू सत्यावर ही अगदी मार्मिक टिपण्णी आहे.
नाटक पहावं ते कशासाठी ? चांगलं नाटक पहावं ते त्यातील कलावंतांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी! पूर्वीच्या काळातील तपश्चर्या करणारे ऋषीमुनी प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नाही. नाट्य कलाकारांची तपस्यासुद्धा थक्क करण्यासारखी असते. जवळपास अडीच तीन तास चालणाऱ्या या नाटकातील संवाद त्यातील छोट्या मोठ्या जागा पकडत प्रत्येक प्रयोगात त्याच खुबीनं सादर करणाऱ्या कलावंतांना मला सलाम करावासा वाटतो. कलावंतांचा अभिनय, डोळ्यातील भाव, संवादफेक, रंगमंचावरील जागेचा त्यांनी केलेला योग्य वापर सारं काही पाहण्यासारखं असतं. अर्ध्या मिनिटात दुसरा पेहराव परिधान करत दुसऱ्या प्रसंगात अगदी अलगदपणे सामावून जाणं हे केवळ असे कलाकारच करू जाणे. चांगली मराठी नाटक मला थक्क करतात.
नाटक पहावं ते कशासाठी ? चांगलं नाटक पहावं ते सखोल अनुभूती देणाऱ्या आनंदानुभवाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी, सखोल संवादांसाठी! त्यातील काही वाक्यं सदैव स्मरणात ठेवून देण्यासारखी असतात; जीवनातील मूल्यांविषयी आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित करणारी असतात. गौतमीच्या डोळ्यात एकाचवेळी मांजरीचं धुर्तपणा आणि हरिणांचे बावरेपण दिसतं असं विराजस म्हणतो. त्या हरिणांचे बावरेपण मी कायम हृदयात बाळगून असते असं गौतमी म्हणते तो प्रसंग लक्षात राहणारा !
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते त्यातील कलाकारांतील केमिस्ट्रीसाठी! गौतमी आणि विराजसची केमिस्ट्री "माझा होशील ना "पासून खूप जुळणारी. रंगमंचावर त्यांची ही केमिस्ट्री पाहणं, तिचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे खूपच भावून जाणारं!
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते त्यातील कलाकार ज्या पद्धतीनं भूमिकेशी एकरूप होतात हे अनुभवण्यासाठी! नाटकातील आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीने ते व्यक्तिरेखेशी एकरूप होतात आणि प्रत्यक्ष आयुष्यात ज्या गोष्टी ते कदाचित करू शकणार नाहीत त्या गोष्टी रंगमंचावर इतक्या सहजतेने करतात ते पाहून थक्क व्हायला होतं. गौतमी ज्या पद्धतीने अत्यंत सहजतेने शिव्यांचा वापर करते ते पाहून काहीसा धक्का बसतो पण त्याच वेळी तिच्यातील कलाकाराला सलाम करावासा वाटतो. मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या अत्यंत गुणी कलाकार भगिनी! काल तर गौतमीमध्ये मृण्मयीचाच जास्त भास होत होता. त्या दोघींच्या डोळ्यांत, हावभावांत एक प्रकारचा खट्याळपणा दडलेला आहे असं मला सतत वाटत राहतं. ज्या मिश्कीलपणे तो खट्याळपणा त्या आपल्यासमोर आणतात त्याला तोड नाही. गौतमीने ज्या पद्धतीने हृद्य, भावनिक प्रसंगांचं सादरीकरण केलं ते केवळ अप्रतिम! उच्चारातील सुस्पष्टता हा ह्या दोन्ही भगिनींचा प्लस पॉईंट. एका प्रथितयश साहित्यिकाच्या मुलीची भूमिका बजावताना गौतमीने दर्जेदार मराठी, संस्कृत भाषेतील संवादफेकीची बहार उडवून दिली आहे. गौतमीने ज्या पद्धतीने जुन्या काळातील विविध श्लोक, संस्कृतरचना अस्खलितपणे स्पष्ट उच्चारासहित सादर केल्या आहेत त्याला तोड नाही.
विराजस हा अत्यंत गुणी, नो नॉन्सेन्स कलाकार आहे. मला तो खूप आवडतो. गौतमीच्या खट्याळपणाला त्याचा गंभीरपणा अगदी खुलून दिसतो. त्याच्या अभिनयात एक प्रकारचा संयतपणा आणि उगाचच ओढूनताणून आणलेल्या आक्रस्ताळेपणाचा पूर्णपणे अभाव या चांगल्या गोष्टी आढळतात. अभ्यास, कष्ट करून आपल्या आणि कुटुंबियांच्या जीवनात स्थैर्य, सुख आणून देण्यासाठी धडपडत असणाऱ्या मराठी मुलांचे प्रतिनिधित्व करणारा असा तो मला वाटतो. मुल्यांची जाण असणे वेगळं पण व्यवहाराशी जमवून घेण्यासाठी एका मर्यादेपर्यंत या मूल्याशी तडजोड करण्याची तयारी असणारं असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्यानं साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिकेत हे हा एक समान धागा आहे असं मला वाटत राहतं.
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते कोणत्याही गॅजेटच्या माध्यमाच्या मदतीशिवाय एखादा कलाकार आपल्या रसिकांसमोर, चाहत्यांसमोर आपली कलाकृती सादर करतो, त्यावेळच्या एका समृद्ध अनुभवाचे साक्षीदार होण्यासाठी!
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते जीवनातील जुन्या मूल्यांची उजळी करून घेण्यासाठी. भोवताली दोन वेगळ्या पद्धतीच्या विचारपद्धती अस्तित्वात आहेत. तथाकथित यशाच्या सामाजिक प्रतिष्ठेच्यापाठी लागून सदैव धडपड करीत राहणं योग्य आहे हे मानणारी एक विचार पद्धती तर जीवन आपल्या वेगाने मर्जीने, संथगतीने पण सखोल जीवनानुभव घेत जगण्यावर विश्वास असणारी! रेवा पहिल्या प्रकारात मोडणारी तर इरा ही दुसऱ्या! नाटक कोणत्याही एका विचारसरणीच्या बाजूनं न झुकता दोन्ही बाजू आपल्यासमोर उलगडत जातं.
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते त्यातल्या दडून बसलेल्या प्रतिकात्मक संदेशांसाठी! प्रत्येक रसिकाने आपापल्या परीने, आपल्या बुद्धीने आपल्याला आवडेल तसं त्याचं रसग्रहण करावे. स्टेजवरील कारंजे बहुदा मानव किर्लोस्कर यांच्या प्रतिभेच्या जिवंतपणाचे प्रतीक आहे. ज्यावेळी मानव किर्लोस्कर आपल्या लेखणीने साहित्यक्षेत्रात बहार उडवून देत असतात त्यावेळी हे कारंजे हवेत उडणाऱ्या आपल्या थुईथुई तुषारांनी वातावरणात प्रसन्नता आणत असतात. परंतु ज्यावेळी मानव किर्लोस्कर आपले मानसिक स्वास्थ गमावून बसतात त्यावेळी या कारंजाचे तुषार आपोआपच लुप्त होतात. या नाटकात मुंबई आणि पुणे या शहराची अदृश्य तुलना जाणवते. मुंबई हे शहर व्यावहारीक लोकांसाठी योग्य; जिथे पैसा कमावण्यासाठी लोकांनी जावं आणि यशस्वी बनावं. कदाचित आपल्या मूल्यांची तडजोड करीत! परंतु पुणे हे शहर मात्र कलेशी एकनिष्ठ राहणाऱ्या लोकांचं! हे झालं माझं निष्कर्ष काढणं
पूर्वीचा समाज वेगळा होता. बुद्धिमान लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नसत. त्यांना आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची गरज भासत नसे. आजच्या काळात सर्वसाधारण समाजातील ऐरागैरा माणूससुद्धा आपल्याला विद्वान समजू लागल्यामुळे दैनंदिन जीवनात बुद्धिमान लोकांना सहजासहजी प्रतिष्ठा मिळत नाही. त्यासाठी त्यांना बुद्धिमान लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेची जिथं कदर केली जाते अशा शिक्षणसंस्था किंवा कंपन्यांमध्ये जावं लागतं. पण तिथं त्यांना आपल्या काही मूल्यांना, तत्त्वांना आणि असल्यास एककल्लीपणाला काही प्रमाणात मुरड घालावी लागते. पण जर का ही तडजोड करण्याची अशा बुद्धिमान माणसांची तयारी नसेल तर मग ते समाजात आपल्या बुद्धिमत्तेचे ओझे बाळगत काहीसे एकटे पडत जातात. आपल्या बुद्धिमत्तेला समाज दाद देत नाहीत याची खंत बाळगत जीवन जगत राहतात. इराची गोष्ट काहीशी अशीच! नाटक हाच मुद्दा अजून एका वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करते. इराने आपली १८ ते २५ ही उमेदीची वर्ष वडिलांच्या सेवेत घालवली. प्रेक्षकांना तिच्या त्यागाविषयी आदर आणि ह्या काळात त्या दोघांकडे क्वचितच येणाऱ्या तिच्या बहिणीविषयी प्रथम संताप निर्माण होतो. परंतु ज्यावेळी इरा हा त्याग करत असते त्यावेळी त्यांची आर्थिक बाजू मात्र तिची मोठी बहिणच सांभाळत असते; तेही मुंबईत जगण्याची कसरत करीत! हा मुद्दा ज्यावेळी ती मांडते त्यावेळी आपल्याला आपण करून घेतलेल्या पूर्वग्रहाविषयी पुनर्विचार करावासा वाटतो.
कलाकार बऱ्याच वेळा कलेसाठी आपला आयुष्य खर्ची घालतात. असं करत असताना त्यांना आर्थिक गणिताची बाजू सांभाळता येत नाही. त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या संसाराची होणारी कुतरओढ याचा मुद्दा हे नाटक अधोरेखित करतं. बाहेरच्या दुनियेसाठी आकाशाला भिडणारी अशी ज्यांची प्रतिमा असते अशा वडिलांचे त्यांना न जमलेल्या आर्थिक गणितामुळे ज्या प्रकारचे वास्तववादी चिरफाड रेवा करते त्यावेळी कलाकारांच्या जीवनाची ही दुखरी नस हे नाटक आपल्यासमोर आणतं.
या नाटकात रेवा, इरा या सिगारेट, टकीला वगैरे गोष्टींचा वापर करताना आढळतात. जमल्यास हा भाग टाळावा ही निर्माता आणि दिग्दर्शकांना विनंती. विश्वचषक अंतिम सामन्याच्या दिवशी या नाटकाला उपस्थिती लावणाऱ्या प्रेक्षकांचे गौतमी, विराजस आणि सहकाराकारांनी नाटक संपल्यावर खास आभार मानलं हे खूप चांगलं वाटलं. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्याची इच्छा होती. पण त्यांच्याशी नक्की काय बोलावं याचा विचार न करता आल्यानं हा विचार टाळला.
सद्यकाळातील अभिनयाची उंच पातळी गाठून देणारे हे मराठी भाषेतील दोन पट्टीचे तरुण कलाकार! चांगलं नाटक आणि यशस्वी मराठी नाटक या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत हे जर आपल्याला सिद्ध करून द्यावसं वाटत असेल तर नक्कीच हे नाटक आपण बघावं ही माझी कळकळीची विनंती! मराठी नाटक हा मराठी संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपण आपल्या परीनं तो टिकवण्याचा प्रयत्न करावा. इतके अथक प्रयत्न करून एक नितांतसुंदर कलाकृती सादर करणाऱ्या कलाकारांसमोर रिकाम्या नाट्यगृहासमोर ही कलाकृती सादर करण्याची वेळ पुन्हा येऊ नये अशी माझी मनोमन इच्छा!
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ खेळत असताना मी हे नाटक पहायला जाणं ही माझ्यासाठी मोठी बाब असेल असं मला वाटत होतं. पण का कोणास ठाऊक हा योग्य निर्णय असेल असंच मला वाटत राहिलं. त्यांच्यावरील हा विश्वास सार्थ ठरविणाऱ्या गौतमी आणि विराजसचे मनःपूर्वक आभार. असे कलाकार एकंदरीत मराठी नाट्यभूमीला पुढील काही काळासाठी एक नवचैतन्य देत राहतील !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा