मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

Yen Can Cook -चिकन झंझावाती



बऱ्याच कालावधीनंतर आलेली आपल्या पाककलाकौशल्याचा पुरावा सादर करण्याची संधी न गमाविण्याचा निर्णय मी आज घेतला. म्हणजे तसा झोमॅटोचा पर्याय सदैव उपलब्ध असतो. पण भ्रमणध्वनीसमोरील वेळ कमी करायचा असेल तर घरकामात मदत करावी आणि जर प्रत्यक्ष स्वयंपाक करण्याची संधी आली तर ती सोडू नये असे कोणीतरी महान संत सांगून गेले आहेत. 

आज आपल्यासमोर सादर करत आहोत चिकन झंझावाती. कोणता जिन्नस किती प्रमाणात ह्याचा विचार न करता प्रचंड वेगात केलेली पाककृती म्हणून हिच्या नावात झंझावाती! 

१. सर्वप्रथम Licious वरून मागविलेलं चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. हे बऱ्यापैकी स्वच्छ असल्यानं जास्त धुवावं लागत नाही. 
२. तीन किंवा चार कांदे घ्यावेत. ते स्वच्छ धुवून अगदी बारीक कापून घ्यावेत. 
३. दोन किंवा तीन लसणाच्या पाकळ्या सोलून घेऊन त्या धुवून ठेवाव्यात. स्वादानुसार आलं घ्यावं. स्वादानुसार म्हणण्यापेक्षा आल्याचा गरमपणा ज्याला जितका झेपतो तितकं आलं घ्यावं. 
४. हे सर्व ओट्यावर जमेल तितकं व्यवस्थित मांडून ब्लॉगपोस्टसाठी फोटो घ्यावा. जे पुरुष स्वयंपाकघरात मदत करतात त्या पुरुषांना सतत सांगितलं जातं की ते स्वयंपाकघर अस्ताव्यस्त करून टाकतात. हा गैरसमज दूर होण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करावा. 

५. आलं लसूण मिक्सरच्या छोट्या भांड्यात दळून घ्यावं. गरज नसताना मोठं भांडं वापरल्यास ओरडा बसू शकतो. 
६. त्यानंतर चिकनला हळद, मसाला क्रमांक १, मसाला क्रमांक २, आलं लसणाचे वाटण लावावं. त्याचाही फोटो घ्यावा. किचनमध्ये भ्रमणध्वनी घेऊन वावरण्याची सवय नसल्यास हे उद्योग करू नयेत. 
७. आता सर्वप्रथम कांदा तेलावर टाकावा. चिकन बनविण्याच्या पाककृतीतील हा भाग आपल्या संयमाची सर्वात जास्त परीक्षा पाहणारा आहे. कांद्याला किंचितसा तांबूस येईपर्यंत योग्य प्रमाणात भाजल्यास तो चिकनला एक मस्त गोडुस अशी चव देऊ शकतो. त्याला योग्य प्रमाणात भाजण्याची तसदी न घेता घाईघाईनं पुढील कृती सुरु  केल्यास तो चिकनमध्ये चांगला मुरत नाही. 

इथं आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की चिकनला मॅरीनेट करायला ठेवून मगच कांदा तेलावर टाकावा. जितका वेळ मंद आचेवर कांदा भाजला जातो तोवर मसाला, वाटणासोबत चिकनला मुरायला वेळ मिळतो. तज्ञच केवळ हे करू जाणे! 

८. आता इतका वेळ काय करणार असा प्रश्न पडल्यानं आणि टोमॅटोचे भाव उतरल्याने आणि मिक्सरचे छोटे भांडे आधीच वापरल्यानं त्यात दोन तीन टोमॅटो टाकून त्यांचा टोमॅटो puree सदृश्य प्रकार बनविण्याचा प्रयत्न करावा किंवा बनलेल्या प्रकाराला  टोमॅटो puree म्हणावं. पाककृती स्वादिष्ट होवो वा न होवो त्याची ही पोस्ट मात्र थोडीफार भारदस्त होते. 
९. चिकनमध्ये बटाटे टाकावेत की नाहीत आणि टाकल्यास किती प्रमाणात टाकावेत ह्याविषयी अनेक मते आहेत. चिकनच्या रश्श्यात मुरलेलं बटाटे खाण्याचा आनंद वेगळाच ! खरंतर मटणाच्या रश्श्यातील बटाटा म्हणजे सुख पण इथं गोष्ट चिकनची चालली असल्यानं त्याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. 
१०. एकदा की कांद्याने तांबूस छटा धारण केली की मग त्यात मसाला वाटणात घोळलेलं चिकन टाकून द्यावं. स्वादानुसार मीठ टाकावं. चिकनला शिजण्यासाठी अतिरिक्त पाणी अंदाजानं भांड्यात टाकावं.   भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ओतावं.  आता एकंदरीत चिकनमध्ये तुम्ही किती पाणी टाकलं आहे ह्याचा तुम्हांला अंदाज हवा, नाहीतर भांड्यावरील झाकणावर ओतलेलं हे पाणी गोंधळ घालू शकतं. 



११. साधारणतः चिकन पाऊण ते एक तास शिजत ठेवावं. आता इतका वेळ काय करणार म्हणून ब्लॉगपोस्ट लिहायला घ्यावी. पण हा नसता उद्योग करताना दर दहा बारा मिनिटांनी चिकनला उगाचच ढवळा मारून यावं. नक्की किती मिनिटांनी ढवळा मारावा ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही. आज मुक्त स्वातंत्र्य असल्यानं ह्यामुळं ओरडा पडत नाही. 

१२. हे छायाचित्र शिजविलेल्या चिकनचे ! खरंतर हे अधिक चांगलं दिसावं ह्यासाठी ह्यावर कोथिंबीर पेरू शकतो. पण एव्हाना कंटाळा आला आहे. आता ह्याची चव आणि भारताची आजच्या सामन्यातील कामगिरी ठरवतील की दिवसाचा उत्तरार्ध कसा जाणार ते! ह्याची चव फसल्यास नंबर एकचा संशयित असणार ती तथाकथित टोमॅटो puree!


1 टिप्पणी:

  1. खूप मजा आली तुझी ब्लॉग वाटची recepi व प्रत्यक्ष कुकिंगची मजा घेताना त्यात फोटोमुळे वेexpert comments ने तुझ्या blogची लज्जत आधिकच वाढली आहे😅👌👌

    उत्तर द्याहटवा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...