सद्य:स्थितीवर अत्यंत समर्पक, संयत असं भाष्य करणारं हे नाटक! चाळ पाडून उभ्या राहिलेल्या फ्लॅट संस्कृतीत राहणारी इंदिरा आजी. तिच्या सोबतीला पेइंग गेस्ट म्हणून राहणारी कॉलेजयुवती निधी. निधीचं वयाला अनुसार असं बिनधास्त वागणं आजीला जरी वरवर खटकत असलं तरी तिच्या वागण्यातील सच्चेपणा आजीला भावलेला असतो. आजीचा मुलगा अमेरिकेत आणि मुलगी बदलापूरला. आजीनं ह्या परिस्थितीला स्वीकारुन निधीसोबत आपल्या आयुष्याची घडी बसवलेली असते. अचानक काही कारणांमुळं प्रथम नातवाला आणि मग मुलीला आपल्या नवऱ्यासोबत आपल्या आईच्या घरी रहायला यावं लागतं. ती येणार म्हणून निधीला त्या घरातून बाहेर पडावं लागतं. आजीला खरंतर मनापासून हा निर्णय पटलेला नसतो तरीही काहीशा नाईलाजानं ती तो स्वीकारते. कथानकात अजून दोन उपकथानकं आहेत ती म्हणजे आजीच्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या बहिणीची आणि निधीच्या आईबाबांची. पुढं कथानक वेगळं वळण घेतं. शेवटी आजीला एक तिच्या आतापर्यंतच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत अशी पण ठाम भुमिका घ्यावी लागते.
नाटक मनापासुन आवडलं. कथा अगदी घराघरांत घडणारी. आता जी ऎशींच्या आसपास पोहोचलेली पिढी आहे तिनं आपल्या आधीच्या पिढीचं आणि नवीन पिढीचं सारं काही अगदी मन लावुन केलं. पण त्यातील काही जणांच्या बाबतीत आपल्या अपत्यांसोबत राहण्याचं भाग्य आलं नाही. विविध कारणांस्तव नवीन पिढीतील काहीजणांना ह्या ऐंशीच्या घरात पोहोचलेल्या पिढीसोबत रहायला जमत नाही. आपल्या मुलांना आपल्यासोबत राहता येत नाही किंवा रहायचं नाही हे सत्य ज्यावेळी त्यांच्या समोर आलं त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला असणार, काहीशी कटुता आली असणार. त्यांच्यातील काहीजण बहुदा कायमचे निराश बनले असणार, पण काही जणांनी मात्र बदलणाऱ्या जगाचं हे वास्तव स्वीकारलं. "World around you is changing, embrace the change" काहीशा अशा अर्थाचं वाक्य निधी आजीला बोलते. आजीला ते मनापासुन पटतं. आजीच्या तोंडच्या म्हणी, त्यांतील जीवनाचं सार सांगणारा अर्थ निधीला भावत राहतो, तर निधीच्या बोलण्याचालण्यातुन आजीसमोर उघडणारं नवीन जगाचं दालन आजीला हवंहवंसं वाटणारं ! नातवंडं आणि आजी- आजोबांचं जमणारं Bonding हे गेले कित्येक पिढ्या चालत आलेलं एक गोड नातं नाटक सुरेखरित्या उलगडून दाखवतं. ह्या ऐंशीच्या पिढीनं एकदा का हे नवीन जगाचं वास्तव स्वीकारलं की मग त्यांना जाणीव होते ती आपल्या "स्पेस" ची! आपण आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टींचा गेले कित्येक वर्षे त्याग केला त्या गोष्टींना नव्यानं एकदा आपल्या आयुष्यात सामावुन घेण्याची हीच संधी आहे हे त्यांना जाणवतं. आजी म्हणते तसं मग कलकलाट नकोसा होतो, शांतता / एकांत प्रिय वाटू लागतो. महिनोंमहिने आपल्या मुलांपासून दूर राहिल्यावर मग त्या एकट्या काळात जी माणसं सोबतीला येतात त्यांच्यांशी ह्या आजीआजोबांचे ऋणानुबंध निर्माण होतात. रक्ताच्या नात्यापलीकडं असलेले हे बंध बऱ्याच वेळा खऱ्या नात्यापेक्षा गहिरे बनतात. खरा प्रश्न त्या वेळी निर्माण होतो ज्यावेळी मुलगा-मुलगी अचानक पुन्हा आपल्या आई-वडिलांच्या आयुष्यात प्रवेश करु इच्छितात. आयुष्यातील सर्वात मोठं गृहितक ज्यावेळी कोलमडताना पहावं लागतं त्यावेळी मुलांमुलींना मोठा धक्का बसू शकतो.
बदलत्या जगातील एक महत्वाचं सत्य नाटक कळत नकळत अधोरेखित करतं. पुर्वी माणसं भावनिकदृष्ट्या कणखर असल्यामुळं असेल कदाचित पण आयुष्यभर मोजक्याच लोकांशी भावबंध जोडून पूर्ण आयुष्य व्यतित करण्याची क्षमता बाळगून असत. हल्ली आयुष्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे मोकळ्या वेळात तुम्हांला खूप अस्थिर करणारं तुमचं मन. ह्या काहीशा कमकुवत क्षणी तुम्हांला जे कोणी साथ देतं, तुमच्यासाठी जे कोणी उपलब्ध असतं त्यांच्यासोबत तुम्ही जोडले जाता. आजी निधीशी ह्याच कारणामुळं जोडली जाते, तीही आपल्या मुलीपेक्षा घट्ट बंधाने !
चाळीस - पन्नाशीच्या आसपास पोहोचलेली पिढी म्हणायला गेलं तर स्वार्थी वाटु शकते. आपल्या गरजांसाठी आपल्या आईवडिलांचा वापर करुन घेणारी . नाटकात ह्या पिढीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला गेला नाही. म्हणजे ही काही उणीव आहे असं नाही तर नाटक आपल्या कथानकाशी प्रामाणिक राहतं. राहता राहिली ती नातवंडं. आपल्या आईवडिलांचं आयुष्य जवळून बघणारी आणि त्यावर आपली मतं मांडण्याची मुभा मिळालेली. त्यांचं हे आपल्या आईवडिलांच्या आयुष्यावर व्यक्त होणं बहुदा आईवडिलांना आवडत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा ते संवाद अचानक कमी करुन टाकतात, भरल्या घरात एकलकोंडे आयुष्य जगत राहतात.
नाटक अगदी सुरेख जमलेलं ! संवाद, जुन्या म्हणींचा समर्पक वापर, वंदना गुप्ते (आजी), निधी, प्रतीक्षा लोणकर, ईशान साऱ्यांचा अभिनय, नवीन पिढीच्या जीवनशैलीचे केलेलं अगदी हुबेहूब चित्रण ह्या साऱ्या नाटकाच्या समर्थ बाजु ! नाटकाच्या पुर्वार्धात काहीशी उत्साहानं आयुष्य जगणारी आजी मध्यंतरानंतर मात्र तिच्या आयुष्यातील घडामोडींनी हताश होते.हा हताशपणा वंदना गुप्ते ह्यांनी खूप सुरेखपणे साकारला आहे. ठिगळ, पत्ते ह्यांचे रुपकात्मक उल्लेख नाटकात अगदी चपखल बसतात. घरात वाजणाऱ्या फोनकडे चालत जाताना "हो आलो" वगैरे बोलण्याची पद्धत अगदी मस्तच! घरात दिवाणखान्यात असलेल्या गणपतीशी आजीचं असलेलं नातं, मुलीनं हा गणपती इथं शोभत नाही म्हटल्यानंतर होणारी तिची निराशा, वयानुसार गणपतीला गणोबा म्हणण्याइतपत त्याच्याशी झालेलं सख्य, सारं काही अप्रतिम !
हे नाटक नाटक रहात नाही. ते प्रेक्षकांना थेट प्रश्न विचारतं, त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेल्या भुमिकेविषयी विचार करायला भाग पाडतं. नाटकाच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणं तिन्ही पिढींनी मिळून बघण्यासारखं हे नाटक! खास करुन एकत्र कुटुंबपद्धतीच्या झपाट्यानं होत असलेल्या अस्ताच्या काळात नवीन पिढीला आपल्या पुढील दोन पिढींच्या विचारसरणीची झलक दाखवून देणारं सुद्धा !
नाटक हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सद्यपरिस्थितीत आधीच्या पिढ्यांनी आपल्याला दिलेल्या संस्कारी आयुष्याचा ठेवा आपण आपल्या पुढील पिढीला देऊ शकत नाही ह्या गोष्टीचं काहीसं अपराधीपण मी बाळगून असतो. पण असे ताकदीचे कलाकार, असं अर्थपूर्ण नाटक एक मोठा आशेचा किरण दाखवतं. पुढील पिढीला देखील आपल्याशी जोडण्याची क्षमता बाळगतं. घरात दहा वर्षाच्या वरील मुलं असतील तर त्यांच्यासोबत नक्की बघण्यासारखं हे अर्थपूर्ण नाटक!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा