मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २६ मे, २०२२

विरार लोकल - १९९५ ते २०२२


 (प्रत्यक्ष जीवनातील प्रसंग आणि काल्पनिक प्रसंग ह्यांचं मिश्रण !)

प्रसंग १ - मे १९९५ वेळ सायंकाळ साडेपाच 

चर्चगेट स्थानकावर चार क्रमांकांच्या फलाटावरील इंडिकेटर पाच अडतीसची विरार ट्रेन दाखवत होता.  अनेक चाकरमान्या प्रवाशांसोबत वसईचा विकास बॅग सांभाळत बॉम्बे सेंट्रल स्थानकावरुन थेट चर्चगेटला येणाऱ्या लोकलची वाट पाहत उभा होता. समोरच्या फलाटावर उभं राहून त्याच लोकलची वाट पाहणाऱ्या राऊतांनी विकासकडं पाहून स्मित हास्य केलं. राऊत हे विकासच्या आजीच्या मामाकडील कुटुंबातील होळीवर राहणारे! त्यांची पाच अडतीसची गाडी नित्यनेमानं ठरलेली ! चेहऱ्यानं ओळख असली तरी मान डोलावून "बरे आहेत ना" ह्या संवादापलीकडं काही चर्चा होत नसे !

लोकल आली! चपळाईने वाऱ्याच्या दिशेची खिडकी पकडून विकास स्थिरावला. तीस ते पंचेचाळीस सेकंदात सर्व सीट्सवर प्रवासी स्थानापन्न झाले होते. थोड्याच वेळात बाजूच्या कक्षातील आक्टनच्या डिसोजाने विकासला आवाज दिला. "ओ पाटील, बरे ना ! चार पाच दिवस कुठे होतात?  शनिवारी आर. पी. शाळेत आमच्या टेनिसच्या मॅचेस आहेत, बघायला या !" हा डिसोजा विकासच्या धाकटया भावाचा मित्र. "यंदा तरी पहिला राउंड जिंका!" विकासने त्याला टोला हाणला. डिसोजाने मनमुराद  हसत त्याला दाद दिली. लोकल सुटायची वेळ होत आली होती. इतक्यात सर्व डब्याला विस्कळत तर्खडचे ठाकूर डिसोजाच्या ग्रुपच्या दिशेनं येऊ लागले. लोकांनीही त्यांना कटकट न करता येऊ दिलं. गाडी गच्च भरली होती, मुंगीलाही पाय टाकायला जागा नव्हती. मरीन लाईन्स गेले, आणि ठाकुरांनी भली मोठी पिशवी काढली. त्यात वर्तमानपत्रात गुंडाळलेले वडापाव होते. पूर्ण डब्याभर वडापावचा खमंग वास पसरला. "ओ, पाटील! घ्या हा वडापाव ! शनिवारी आम्ही टूर्नामेंट मारली ना की मग पूर्ण टीमला तुम्ही अनलिमिटेड वडापाव द्यायचे !" डिसोजाने विकासला टोला हाणला! खिडकीच्या गजाला धरलेल्या हातानं विकासने लगेचच तो वडापाव घेतला आणि खाल्ला देखील! सॅनिटायझरचे पृथ्वीवर आगमन होण्यासाठी अजून अनेक वर्षांचा कालावधी बाकी होता. डिसोजाने अर्ध्या डब्याला वडापाव वाटले. डिसोजा आणि ग्रुपचा मेंढीकोटचा डाव रंगात आला होता.  मुंगीलाही पाय ठेवायला जागा नसलेल्या डब्यात सुद्धा दादर, बांद्रा, अंधेरी, बोरिवली इथं लोक चढत होते. ठाकुरांप्रमाणे डब्याला घुसळून टाकत डिसोजांच्या ग्रुपच्या दिशेनं येत होते. विकास मिड-डे मधील शब्दकोडे सोडविण्यात गर्क झाला होता. कांदिवलीची कार शेड गेली आणि विकासने उभ्या असलेल्या माणसाला जागा दिली. "ओ, पाटील वडिलांना सांगा, पुढच्या महिन्यात वऱ्हाडाला यायचं! घरी पत्रिका द्यायला येईनच!" उभ्या राहिलेल्या विकासला पाहून लांबवर उभ्या असलेल्या परेरांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं. भाईंदरला गाडी रिकामी होत आली. वसईला होळी एस. टी. बसमध्ये विकासला मागची सीट मिळाली. वरती निळा दिवा असलेला पाहून विकास खुश झाला. लांबूनच राऊतांनी विकासला त्याचे तिकीट काढल्याची खूण केली आणि कंडक्टरला सुद्धा सांगितलं! माणिकपूर नंतर लाईट गेली होती. भर उन्हाळयात देखील भागोळ्याला बसने वळण घेतल्यावर थंड वाऱ्याची झुळूक विकासला सुखावून गेली! 

प्रसंग २ - मे २०२२ वेळ सायंकाळ पाच 

विकासला बऱ्याच वर्षांनी चर्चगेटला काम निघालं होतं. चर्चगेट स्थानकावरील गर्दी पाहत त्यानं एक स्लो लोकल पकडली आणि तो मुंबई सेंट्रल स्थानकावर आला. तिथून त्यानं चर्चगेटला जाणारी आणि तिथं विरार लोकलमध्ये बदलणारी गाडी पकडली. त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांना बाजूच्या माणसाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला. विकासला लूक देत त्या माणसानं "मोस्ट लाइकली " असे विम्याचे सुरक्षाकवच असलेलं उत्तर दिलं! गाडी भरधाव वेगात चर्चगेट स्थानकात शिरली. लोकांनी आतासुद्धा डब्यात वेगानं उड्या मारल्या, पण आपल्यापेक्षा ह्यांची चपळाई खूपच कमी झाली आहे असे विकासला वाटून गेलं. आताही पंचेचाळीस सेकंदात सर्व सीट्स भरल्या होत्या. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विकासने मुद्दामच सेकंड कलासचा तोच डब्बा आणि तीच सीट पकडली होता.  बहुदा एखाद्या ग्रुपची मोक्याची जागा पटकावल्याबद्दल आपल्याला त्यांची नाराजी पत्करावी लागेल असे विकासला वाटले होते. परंतु तसे काही झाले नाही. मिनिटाभरातच सर्व जण खाली माना घालत आपल्या भ्रमणध्वनीत मग्न झाले होते.  विकासने डिसोजाच्या ग्रुपच्या दिशेनं नजर टाकली, तिथं ओळखीचा एकही माणुस दिसला नाही. लांबवर एक चेहरा परिचयाचा वाटला, विकासची आणि त्याची नजरानजर झाली. परंतु दोघांनाही खात्री नसल्यानं दोघांनीही नजर फिरवली. दादर, बांद्रा, अंधेरी, बोरिवली इथं दरवाजाजवळ अजूनही झटापट होत होती, पण कोणीही आत येऊ शकत नव्हते. विकासच्या बाजूच्या माणसानं तासाभरात चार वेळा सॅनिटायझरने हात निर्जंतुक करत बिसलेरी पाण्याचं प्राशन केलं होतं.  विकास मीरारोडला उभा राहिला. नायगावला दरवाज्याच्या दिशेनं कूच करुन देखील त्याला वसईला उतरण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले.  रिक्षा स्टॅन्डची रचना पूर्णपणे बदलली होती. विकास ह्या प्रवासानं पुर्णपणे दमला होता. शारीरिक दमछाकेपेक्षा त्याची मानसिक दमवणूक जास्तच झाली होती. स्पेशल रिक्षा करुन विकास स्थिरावला. त्याच वेळी त्याला लक्षात आले की डब्यात दिसलेला परिचित चेहरा फेसबुकवर त्याच्या पोस्टना लाईक करणारा त्याचा फेसबुक फ्रेंड होता !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...