मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ मे, २०२१

जीवनात ही घडी !



ह्या आठवड्यात आमच्या लग्नाला वीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मागं वळून पाहताना आजची ही पोस्ट ! 

आमचं जमवून आणलेलं लग्न! स्थापत्यशाखेची अभियांत्रिकी पदवी घेताना काही खास कामगिरी बजावता आली नव्हती. तरीही पदव्युत्तर शिक्षणाचा अट्टाहास आणि स्थापत्यशाखेत सात-आठ महिने नोकरी केल्यामुळं पुढील काही वर्षे नोकरीत स्थिरस्थावर होण्याची चिन्हं दिसत नव्हती. मग योगायोगानं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरकाव झाला. तिथंही सुरुवातीच्या काही महिन्यांच्या संघर्षास सामोरे जावे लागल्यानंतर मग मात्र देवाच्या कृपेनं जम बसला. दोन वर्षे अनुभव होत नाही तोवर इंग्लंडला जायची संधी मिळाली. साधारणतः ह्या काळातच घरी लग्न जमविण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु झाल्या होत्या. पण कुठे खास प्रगती होत नव्हती. अशा वेळी इंग्लंडला जाऊन आल्यावर पाहू ह्या बोलीवर घरच्यांनी इंग्लंडला पाठवलं. 

ह्याच काळात आमच्या नात्यातील गणेश पाटील ह्यांची प्राजक्तासोबत FDC ह्या कंपनीत भेट झाली. त्यांची पत्नी कविता ही आमच्या हरेश्वर मामांची मुलगी. बोलता बोलता प्राजक्ताला त्यांनी माझ्या स्थळाविषयी सुचवलं. कोणत्याही मुलीचं लग्न जमायचं असेल तर किमान सात आठ मुलं पाहावी लागतात ही प्राजक्ताची तात्कालीन समजूत ! त्यामुळं पहिल्या काही स्थळांविषयी फारसं गांभीर्यानं घेऊ नये ह्या मताची ती होती. त्यामुळं तिनं कोणतंही दडपण न घेता अगदी सहजपणे घरी आपल्या आईला ह्या स्थळाची माहिती दिली.  तिच्या आईनं आपल्या भावजयीच्या म्हणजेच प्रणिता हिच्या कानावर ही गोष्ट घातली. प्रणिताताई ही माझ्या वडिलांच्या मामेभावाची मुलगी ! ती सर्व गोष्टीत अत्यंत नियोजनबद्ध ! तिनं पुढील सुत्रं आपल्या हाती घेतली. हे सर्व मी इंग्लंडमध्ये असताना चाललं होतं. 

आमच्या घरी एकतर माझ्या लग्नाची खूपच उत्सुकता होती किंवा दडपण असावं. त्यामुळं माझ्या आईनं माझ्या वहिनीसोबत प्राजक्ताची एक भेट घेतली.  ह्या भेटीनंतर वहिनीने आईच्या सांगण्यानुसार प्राजक्ताच्या स्तुतीपर एक मोठं ई-मेल मला पाठविलं. ही तुमच्यासाठी योग्य मुलगी आहे वगैरे वगैरे ! तिथं इंग्लंडमध्ये कहाणीला वेगळं वळण मिळालं होतं. अमेरिकन एक्सप्रेसच्या ब्रायटन ऑफिसात तीन महिन्यासाठीची माझी नेमणूक आता दीर्घकालीन होण्याची चिन्हं दिसु लागली होती. माझं वर्क परमिट असल्यानं मी तिथं दोनतीन वर्षे तरी सहज राहू शकत होतो. पहिलाच परदेश दौरा आणि त्यात वास्तव्य दीर्घकाळ होण्याची शक्यता ह्यामुळं मी काहीसा भावुक बनलो होतो. अशावेळी वहिनीच्या ई - मेलचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. पुढे हिवाळा जसजसा वाढत गेला तसतसं मी माझ्या व्यवस्थापकांना भारतात परतु देण्याची विनंती केली. परंतु त्यांनी ती फारशी मनावर न घेतल्यानं मी स्वतः तिकिटं बुक करुन काही दिवसांच्या सुट्टीच्या बोलीवर भारतात परतलो ! इंग्लंडहून भारतात परतण्यासाठी विमानात बसल्यावर भारतात प्राजक्ता नावाची मुलगी आपली वाट पाहत आहे अशी स्वप्नं मी रंगवत होतो ! 

इथं आल्यानंतर पहिल्या आठवड्यात आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीला चर्चेला कोणत्या गोष्टी घ्याव्यात ह्याची मी एका कागदावर नोंद करुन ठेवली होती. त्यात प्रामुख्यानं गणिताविषयी कितपत आवड आहे ह्याविषयी खास प्रश्नार्थक उल्लेख होता. परंतु हा कागद प्रत्यक्ष भेटीत बाहेर काढण्याची संधी मला मिळाली नाही किंवा सुचलं नाही.    साधारणतः पंधराव्या मिनिटाला मी माझ्या परीनं होकार सांगून टाकला. आता हा होकार सांगण्याचा माझ्याकडं अधिकार आहे असं सोयीस्कर गृहितक मी बनवलं होतं. प्राजक्ताला जरी परदेशी शिक्षणाची इच्छा असली तरी वसईला राहायला आवडेल असा तिनं उल्लेख केला. प्रत्यक्ष होकार द्यायला तिला अजून एक भेट लागली. आता लग्न जमवून मी परत इंग्लंडला जातो आणि मे महिन्यात लग्नासाठी परत येतो ह्या माझ्या प्रस्तावाला तिनं चांगल्या शब्दांत धुडकावुन लावलं. त्याकाळी तिची इंग्लिशमध्ये संवाद साधण्याची वारंवारता जास्त असल्यानं तिनं "We need to know each other better before marriage" ह्यासारखं काही वाक्य बोलल्याचं मला आठवतंय. डिसेंबर ते मे ह्या कालावधीत बरोबर पन्नास वेळा भेटल्यानंतर ६ मे २००१ रोजी आम्ही विवाहबंधनात अडकलो ! 

मागं वळून पाहता आमचे स्वभाव म्हणजे पृथ्वीचे दोन ध्रुव ! लहानपणापासुन अगदी शिस्तीत वाढला गेलेलो मी ! बहुदा मस्ती करणे हे माझ्या स्वभावात लहानपणापासुन नव्हतंच ! त्यात शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रतिमा ! प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी व्हायला हवी हा काहीसा अट्टाहास ! क्रिकेटची खूप आवड ! घर आणि सभोवतालच्या परिसरातच जास्त रमणारा ! लग्नसमारंभ आणि बाकीचे सोशल इव्हेंट्स ह्यात सहभाग म्हणजे माझ्या दृष्टीनं सत्वपरीक्षेचा काळ ! चारचौघात गप्प असलो तरी जवळच्या लोकांत मात्र खुप बोलणारा ! चित्रपट आणि संगीताच्या बाबतीत हिंदी चित्रपटापलीकडं झेप नसणारा ! बोलताना समोरच्याचे मन दुखवू नये ह्यासाठी प्रयत्न करणारा ! हल्ली मात्र काही लोकांची मनं गैरसमजामुळं दुखावली गेली आहेत ! पुर्वी न रागावणारा म्हणून काही प्रमाणात मी ओळखला जायचो. हल्ली तेही बदलत चाललंय!  ऑफिसचे काम, क्रिकेट ह्यात डुंबवून घेणारा ! घरातील फ्युज उडाला तरी इलेक्टिशियनची गरज भासणारा ! कोणताही धोका पत्करण्याची तयारी नसणारा ! सकाळी पाच वाजता उठणं ही आयुष्यातील फार महत्वाची गोष्ट आहे ह्यावर ठाम विश्वास बाळगणारा ! 

प्राजक्ता काहीशी वेगळ्या धर्तीची ! सामाजिक समारंभात खूप रस घेणारी, समाजातील लोकांशी संपर्क ठेवणं आवडणारी, हाती घेतलेली गोष्ट निष्ठेनं पुरी करणारी मग त्यासाठी कितीही वेळ लागो. काहीशी स्पष्टवक्ती, जर का रागावली तर त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाणारी, नवनवीन गोष्टी शिकण्याची तीव्र इच्छा बाळगून असणारी, आयुष्य जगायचं तर जीवनातील योग्य गोष्टींचा पूर्णपणे आनंद लुटता यायला हवा ह्यावर ठाम विश्वास असणारी. इंग्लिश माध्यमात शिक्षण झालं असला तरीही आजोबांनी लावलेली मराठी वाचनाची आवड जोपासणारी, आता त्यात पेपर वाचनाचा अतिरेक होत आहे ही बाब वेगळी. घरात कोणतंही उपकरण बंद पडलं किंवा बिघडलं तर स्वतःहून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणारी. 

अमेरिका पहिली वारी २००२ फिनिक्स 

लग्नानंतर दोघांनीही काही महिने मुंबईत नोकरी केली.  वसईच्या घरी राहत असल्यानं घरच्यांनी सांभाळलं. प्राजक्ताने वसईतील मांसाहार प्राधान्य असलेल्या आहारपद्धतीचा स्वीकार केला. अचानक कंपनीनं मला अमेरिकेत पाठविण्याचा निर्णय घेतला. खरंतर ही कमी कालावधीसाठीची नेमणूक होती. परंतु मागच्या अनुभवामुळं कदाचित असेल पण प्राजक्तानं नोकरी सोडून माझ्यासोबत अमेरिकेला जावं असा आग्रह धरण्यात आला. तिनं ह्या निर्णयाला साथ दिली. अमेरिकेत पहिल्या भेटीत मला कार चालवता न आल्यानं तिची बऱ्यापैकी निराशा झाली. त्यात माझा अगदी काळजी करणारा स्वभाव. अमेरिकेत पहिल्या महिन्यातच फिनिक्समध्ये असताना लास वेगासला मित्रांसोबत जायची संधी होती. परंतु त्यानं कधी फिनिक्सच्या बाहेर गाडी चालवली नाही ह्या कारणामुळं मी त्यांच्यासोबत जायला नकार दिला.  सामान्यज्ञानाच्या बाबतीत माझ्याकडे आनंदी आनंद असल्यानं लास वेगासची महती मी जाणून नव्हतो. पुढे काही वर्षे अमेरिकेत राहून सुद्धा लास वेगास भेटीचा योग काही आला नाही. ही पहिल्या महिन्यात चुकलेली लास वेगास वारी लक्षात राहिली. 

तिथंही मी कामात स्वतःला अडकवून घेतलं. तरीही तिनं जमेल तसा माझ्या सहकाऱ्यांच्या पत्नींशी परिचय करुन स्नेहसंबंध प्रस्थापित केले. माझी वरण, भात, भाजी अशा भोजनाची आवड लक्षात घेऊन तिने ती पुरविण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. ह्या भेटीतच आम्ही ग्रँड केनयन, लॉस अँजेल्स डिस्नेलँड ह्यासारख्या सुप्रसिद्ध स्थळांना  भेटी दिल्या. अडीच महिन्यात दुसऱ्या प्रोजेक्टनिमित्त आम्हांला फिनिक्स सोडून फ्लोरिडाला स्थलांतर करावं लागलं. मी एकंदरीत अमेरिकन जीवनपद्धतीशी अनभिज्ञ असल्यानं तिनं ह्या पहिल्या भेटीत बऱ्याच गोष्टींत पुढाकार घेतला. फ्लोरिडाचे वातावरण फिनिक्सच्या मानानं खुपच आल्हाददायक होतं. त्यावेळी की वेस्टला दिलेली भेट संस्मरणीय ठरली. अमेरिकेच्या दक्षिण टोकाला असलेल्या ह्या बेटांच्या समूहांना जोडणारा रस्ता आपल्या मनात  समुद्राच्या मध्यातून प्रवास करण्याची भावना निर्माण करुन देतो. ह्या फ्लोरिडा भेटीत आम्हांला हॉटेलातच राहावे लागले. तिथं दिवसभर हॉटेलात एकटं राहण्याच्या कंटाळवाण्या प्रसंगांना तिनं तोंड दिलं. फ्लोरिडातील एक मोठा मॉल सॉग्रास मिल्स जवळ असल्यानं आमचे बहुतांश शनिवार रविवार तिथेच जात असत. तिचा विविध दुकानातील खरेदीचा उत्साह पाहून मी आश्चर्यचकित होत असे. ह्या उत्साहाशी बरोबरी करणे मला फारसं जमत नसे. 

ह्यावेळी मात्र कमी कालावधीसाठीची नेमणूक तितक्याच कालावधीसाठी ठरल्यानं आम्ही भारतात परतलो. त्यावेळी मी परदेशात स्थायिक व्हायला उत्सुक असल्यानं तिनं पुन्हा नोकरी शोधण्याचा तात्काळ प्रयत्न केला नव्हता. पण काही महिने वाट पाहून ती पुन्हा रुजू झाली आणि पुन्हा एकदा माझा परदेशगमनाचा योग आला! 

फ्लोरिडा २००३ 
ह्यावेळी कंपनीनं थोडी दीर्घमुदतीची ग्वाही दिल्यानं आम्ही पुन्हा द्विधा मनःस्थितीत सापडलो. शेवटी भारतीय मानसिकतेने विजय मिळविला; पुन्हा एकदा नोकरीचा राजीनामा देऊन ती माझ्यासोबत फ्लोरीडाला आली. इथला सुरुवातीचा काळ कठीण गेला. मला कामाचा खूप ताण होता आणि अपार्टमेंटमध्ये आम्ही शिफ्ट झालो त्यावेळी आर्थिक गणित सुद्धा चुकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तिने मोठ्या जिद्दीनं त्याला तोंड दिले.ह्या भेटीत मात्र तिने मला लवकरात लवकर ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यास भाग पाडले आणि स्वतःही लेखी परीक्षा दिली. इथं IBM आणि TCS ह्या कंपनीचे बरेच कर्मचारी होते. त्यांच्या पत्नींच्या कंपूत प्राजक्ताचा सहजरित्या प्रवेश झाला. महिन्यातून एका शनिवारी ह्या महिला आपल्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी नवरेमंडळींकडे सोपवून आपली पार्टी करत असत. नवरे मंडळी रविवारी आपापसात क्रिकेटचे सामने खेळत असत/ माझ्या कंपनीचा मी एकमेव कर्मचारी असल्यानं मला IBM ने आपल्या संघात घेतलं होतं. आयुष्यातील सर्वोकृष्ट फलंदाजी ह्या तीन चार महिन्यात मी केली. TCS च्या गोलंदाजांनी माझा काहीसा धसका घेतला होता (काहीशी अतिशयोक्ती). ह्या भेटीत सोहमची चाहूल लागली असताना ऑफिसातील परिस्थिती बदलली आणि आम्हांला भारतात परत यावं लागलं. सोहमचा जन्म अमेरिकेत व्हावा ही आमच्या दोघांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यावेळी त्या गोष्टीचं वाईट वाटलं असलं तरी आता मात्र काही खेद नाही. भारतात परतलो. सोहमचे आगमन झाले. दोन्ही कुटुंबीय आनंदात होते.

न्यू जर्सी २००५
मला फ्लोरिडातुन इच्छा नसताना परत यावं लागल्यानं मी कंपनी बदलण्याचा निर्णय घेतला. नव्या कंपनीनं तीन महिन्यातच परत अमेरिकेला पाठवलं. ते तीन महिन्याच्या बोलीवर ! सोहम अगदी लहान असल्यानं त्या दोघांना सोबत घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता. तिथं गेल्यावर इंग्लंडमधील अनुभवाची पुनरावृत्ती झाली. तीन महिन्यांची नेमणूक दीर्घकाळात परिवर्तित झाली. त्यामुळं  प्राजक्ता आणि सोहम ह्यांचा व्हिसा प्रोसेस करुन त्यांना अमेरिकत बोलाविण्याचा आम्ही निर्णय घेतला. ह्या सर्व प्रकरणात एकंदरीत पाच महिने मी एकट्यानं अमेरिकेत काढले. त्यावेळी सुद्धा प्राजक्ता भारतातुन "मला न्यूयॉर्क जवळ आहे तिथं फिरुन ये" वगैरे बजावत होती. मागच्या भेटीत शिकलेली पाककला आता उपयोगास येत होती. पाच महिन्यांनी ज्यावेळी ह्या दोघांचं अमेरिकेत आगमन झालं त्यावेळी मला सराईतपणे कार चालवताना पाहुन तिला खूप आनंद झाला होता. इथं मी स्थिरावल्यानंतर हे दोघे आल्यानं नक्कीच फरक पडला होता. त्यांना एक स्थिरावलेल्या घराचा अनुभव मिळाला. परंतु इथला हिवाळा मात्र ह्या दोघांसाठी खूप कंटाळवाणा ठरला. तरीही ख्रिसमसचे वातावरण उत्साह निर्माण करुन जात असे. 

त्यानंतरच्या उन्हाळ्यात मात्र आम्ही बऱ्यापैकी मौज केली. SUV चालवत एका दिवसात नायगारापर्यंत ३५० मैलांची मारलेली मी मजल प्राजक्ताला खूप प्रभावित करुन गेली. इथंही तिचा मोठा कंपू बनला होता. त्यांच्यासोबत ती संध्याकाळ व्यतित करत असे. प्राजक्ताला त्यावेळी खरेदीची खूप आवड होती. एखाद्या बॅगेत जास्तीत जास्त गृहोपयोगी वस्तू कशा सामावल्या जाऊ शकतात ह्याविषयी तिचे कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. पण त्या वजनदार बॅगा मला उचलायच्या असल्यानं मला ह्या कौशल्याची मनमोकळेपणानं कधी प्रशंसा करता आली नाही. सोहमला आणि आम्हांला भेटण्यासाठी आई भाई पुढील वर्षी आले. त्यांची ही भेट खरंतर सहा आठवड्यांचीच! सोहम पहिल्या दिवशी थोडा दूरदूर राहिला. पण त्यानंतर मात्र आई भाईंसोबत पूर्ण मनमोकळेपणानं खेळू लागला. इथं प्राजक्ताची विचारचक्रं फिरु लागली. भारतात आपले इतके नातेवाईक असताना आपण इथं भुतासारखं का राहावं असा प्रश्न तिनं मी एके दिवशी ऑफिसातून परतल्यावर केला. पुढील आठवडाभर मोठी चर्चा होऊन आई भाईंसोबत हे दोघेसुद्धा परततील असा निर्णय घेण्यात आला. मला एकटं सोडून जाताना ह्या सर्वांना मात्र खूप वाईट वाटत राहिलं. 

अमेरिका सोडली हा निर्णय योग्य की अयोग्य हा प्रश्न प्राजक्ताला केव्हाच पडला नाही ! मला मात्र अजूनही अमेरिका सोडण्याच्या निर्णयाच्या अचूकतेविषयी अधूनमधून शंका निर्माण होत राहतात. आता परत नोकरी सुरु न करता तिनं सोहमच्या संगोपनात स्वतःला वाहुन घेतलं.   पुन्हा एकदा पाच महिने एकट्यानं अमेरिकेत काढुन मी भारतात परतलो. वसईत राहायला मिळेल अशी तिची आशा होती. पण मला आता वसईहुन दररोज मुंबईला अपडाऊन करणे जमेनासे झाले होते आणि मग मी बोरिवलीला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. इथंही तिचा म्हटलं तर हिरमोडच झाला होता. पण माझ्या करिअरच्या दृष्टीनं योग्य होईल म्हणून तिनं ह्या निर्णयाला साथ दिली ! 

२००७ नंतर  

बोरिवलीला राहत असलो तरी बहुतेक शनिवार - रविवार आमच्या वसईला फेऱ्या होत राहिल्या. सोहमच्या शाळेच्या प्रत्येक सुट्टीच्या वेळी हे दोघे न चुकता वसईला यायचे. वसईच्या सर्व नातेवाईकांत तिनं एक उत्साही मुलगी म्हणुन आपली ओळख निर्माण केली. २०१० साली मी JPMC कंपनीत दाखल झालो. इथं मला जबाबदाऱ्या असल्या तरी वेळच्या वेळी सुट्टी घेण्याची संधी मिळत राहिली. खरंतर सुट्टीत घरी अराम करणे ह्यालाच माझी पहिली पसंद असायची. परंतु हळुहळू मला बदलविण्यात तिनं यश मिळविलं. कधी स्वतः तर कधी वीणा वर्ल्ड सारख्या कंपनीसोबत आम्ही भारताच्या विविध राज्यांत फिरु लागलो. प्रत्येक ठिकाणी आठवण म्हणून फोटो काढण्याचा छंद तिचाच ! सुरुवातीला ह्यावरुन मतभेद होत असले तरी हळूहळू मला त्याची ही सवय होऊ लागली. मी २०१० साली ब्लॉग लिहिण्यास आरंभ केला. बऱ्याच वेळा प्रूफरीडिंग साठी तिला मी पोस्ट वाचण्यासाठी देतो. ती जरी इंग्लिश माध्यमात शिकली असली तरी तिचं मराठी तिनं प्रयत्नपूर्वक जोपासलं आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा पोस्टमध्ये तिच्या अमुल्य सूचना असतात. तसंही इंग्लिश माध्यमातुन शिकली असल्यानं मी त्या भाषेसाठी तिचा सल्ला अधूनमधून घेत असतो. 

सोहम जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा अभ्यासाचा आवाका वाढत गेला. त्यामुळं एकाने त्याच्यासोबत घरी थांबणं क्रमप्राप्त होऊ लागलं.  त्यात मग माझ्या कार्यालयीन जबाबदाऱ्या सुद्धा वाढत गेल्या. माझ्या स्वभावानुसार मी आनंदानं ही घरी थांबण्याची जबाबदारी स्वीकारली. मधल्या काही वर्षांत मी सामाजिक समारंभ बऱ्यापैकी टाळले. सुरुवातीला ही गोष्ट स्वीकारायला तिला कठीण गेलं. पण मग माझा स्वभाव आणि सोहमचा अभ्यास हे पाहता तिनं ह्याचाही स्वीकार केला. मी एप्रिल महिन्यात आमच्या शाळेच्या NPL स्पर्धांच्या आयोजनात सहभागी होऊ लागलो. लोकांनी माझं कौतुक केलं. तिला ह्या गोष्टीचा मोठा अभिमान वाटला. काळानुसार तिनं आपल्या स्वभावात बदल घडवत आणले. सुरुवातीला फिनिक्स इथं असताना मला घरात विशेषतः बाथरुममध्ये मोठ्यानं गायची सवय होती.  तिनं त्यावेळी जवळपास माझ्यावर गायची बंदी घातली होती. कालांतरानं कदाचित माझ्या आवाजात सुधारणा झाली असावी किंवा तिच्या सहनशक्तीत वाढ ! त्यामुळं मी इथं आनंदानं आता नमूद करु इच्छितो की मला आता घरी गाण्याची परवानगी आहे. गेल्या वर्षी मी फेसबुकवर काही गाणी रेकॉर्ड करुन टाकली होती त्यात तिनं दिलेल्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा होता.  माझ्या व्यावसायिक जीवनाविषयी तिचा अव्यक्त पाठिंबा राहिला आहे. मी यशस्वी व्हायलाच हवं असा तिचा अट्टाहास नाही. उलट मागच्या बढतीच्या वेळी आता तु अजून व्यग्र होणार म्हणून ती काहीशी दुःखी झाली!  बस झालं आता, तू निवृत्त हो ! आपण जे आहे त्यात भागवु हा तिचा आवडता डायलॉग ! मला नसलं तरी सोहमला त्यामुळं उगागच तणाव येतो ! बिचारा ! 

माझा स्वभाव तसा सदैव टेन्शन घेण्याचा ! दुसऱ्या दिवशीसाठी घरात भाजी आहे की नाही पासून पुढील आठवड्यात एखादी महत्वाची बैठक आहे असली नानाविध कारणं मला घरातील वातावरण गंभीर करुन सोडण्यास पुरेशी ठरतात. शनिवार रविवारी सुद्धा संगणकासमोर ऑफिसचं काम करत किंवा बुद्धिबळ खेळत बसणं हा माझा छंद ! गेल्या काही वर्षांत ऑफिसात बढती मिळून जबाबदाऱ्या सुद्धा वाढत चालल्या आहेत. कदाचित एक माणुस म्हणून सुद्धा मी बदललो असेन. ऑफिसात जो काही थोडाफार एक सिनिअर व्यक्ती म्हणुन मान मिळतो त्याची घरी सुद्धा थोडीफार दखल घेतली जावी अशी अप्रत्यक्ष अपेक्षा कदाचित मी बाळगून असेन. नात्यात ह्या गोष्टीनं थोडाफार फरक पडत असावा. तिनं आता स्वतःला तबला, सतार आणि गायन अशा विविध छंदांत रमवून घेतलं आहे. मी तुला तुझी स्पेस देते, तू मला माझी स्पेस दे हे हल्ली हल्ली ऐकलेलं वाक्य ! माझ्या सदैव तणावाखाली राहण्याच्या स्वभावामुळं कधीकधी ती वैतागते ! 

बाकी नवराबायको म्हटले की दैनंदिन व्यवहारात दोन टोकं असल्याची उदाहरणं तर हवीतच ! आमच्या बाबतीत ती खूप आहेत ! घरात पंखा लावणं ही माझ्या दृष्टीनं अनावश्यक गोष्ट ! तर उगाचच चार - पाच वर पंखा लावून घरात इथं तिथं फिरणं हा तिचा आवडता छंद ! भर उन्हाळ्यात सुद्धा वाटीभर दही खाऊन सर्दी होण्याची भिती बाळगणारा मी तर उन्हाळ्यातील प्रत्येक दिवशी आईसक्रीम, दही, काकडी, कलिंगड  खाल्ल्याशिवाय झोप न येणारी ती ! आलं, लवंग असे मसाल्याचे पदार्थ आवडणारा मी तर ह्या उष्ण पदार्थांचा धसका घेतलेली ती ! लग्नाला जाताना पाच मिनिटांची तयारी पुरेशी असणारा मी आणि .... 

मागं वळून पाहता काही प्रमाणात आम्ही  एकमेकांना बदललं आहे ! मी काही प्रमाणात सामाजिक जीवनाची आवड निर्माण करुन घेतली.  मुळ आनंदी स्वभाव कायम ठेवला तरी ती काहीशी गंभीर बनली. तासंतास आता वाचन करु लागली. ती दैनिकातील सदरे खास करुन संपादकीय वगैरे प्रकार गंभीर स्वरुप धारण करु लागले आहेत ! तिच्या भाषेत आताशा मोठमोठाले क्लिष्ट शब्द येऊ लागले आहेत. सकाळी उठण्याच्या बाबतीत तिनं आपली मूळ वेळ कायम ठेवली असली तरी वसईच्या घरच्या वेळेनुसार लवकर झोपण्याची सवय तिनं लावून घेतली आहे. लग्नाआधी मुख्यत्वेकरुन पापलेट आणि चिकन हे प्रकार माहिती असणाऱ्या प्राजक्ताने आता मटण, विविध प्रकारचे मासे ह्या प्रकारात नैपुण्य संपादन केले आहे ! 

बाकी आमच्या काही सामायिक आवडी सुद्धा आहेत ! ताज्या भाज्या बाजारातुन आणुन काही वेळ त्यांची तारीफ करणे, हिरव्यागार वनराईने नटलेल्या ठिकाणी फिरायला जाणे,  गेल्या काही वर्षांपासुन शास्त्रीय संगीत ऐकणे वगैरे वगैरे ! गेल्या काही वर्षांत तिनं का कोणास ठाऊक पण शॉपिंग हा प्रकार सुद्धा अगदी कमी केला आहे. त्यामुळं आमच्यात एकमत आहे अशा गोष्टींच्या यादीमध्ये एक महत्वाची भर पडली आहे. मुंबईत फिरायचे असेल तर रिक्षा, बेस्ट आणि लोकल ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्तम वापर करावा ह्यावर आमचं ठाम एकमत आहे.  कार सारख्या गोष्टींवर फारसा पैसे खर्च करु नये, फक्त ड्रायव्हिंग करता यायला हवं.  संधी मिळाली तरी ओसाड जमिनीवर जंगल रुजवावं हे आमच्या दोघांचं स्वप्न आहे ! फक्त जंगलातील झाडांच्या यादीवर एकमत होत नाही ही एक छोटी बाब ! 

खरंतर ह्या विषयावर लिहणं ही मोठी जोखमीची गोष्ट ! पण आज सकाळच्या पोस्टनंतर काही मित्रांनी आज वीस वर्षांच्या सहप्रवासावर एक पोस्ट अपेक्षित होती अशी टिपण्णी केली आणि प्राजक्ताने त्याला दुजोरा दिला म्हणून हे धारिष्ट्य ! अर्थात ह्या पोस्टचे प्रूफ रीडिंग तर झालंच आहे.  एकंदरीत आढावा घ्यायचा झाला तर वेगळ्या स्वभावांमुळं दैनंदिन जीवनात मतभेदाचे प्रसंग उद्भवण्याची सदैव शक्यता असणारा  पण एकंदरीत जीवनाविषयी समान दृष्टिकोन असल्यानं सुखकारक असा हा गेल्या वीस वर्षांचा प्रवास ! धन्यवाद FDC ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...