दिनांक १६ मे २०२१ सायंकाळ
तौक्ते वादळ कोकणापर्यंत येऊन थडकल्याच्या बातम्या येत होत्या. वसईत मात्र एकंदरीत अजुनही शांत वातावरण होते. सायंकाळी बावखलात उतरुन काही छायाचित्रे काढली. बावखल मनाला एक प्रकारची शांतता प्रदान करते. मध्यंतरी बावखल काहीसं खोल केल्यामुळं आणि हल्ली पाऊस उशिरापर्यंत रेंगाळत असल्यानं मे महिन्यात देखील बावखल पुर्ण सुकत नाही. नाहीतर पुर्वी सुक्या बावखलात क्रिकेट खेळता यायचं.
दिनांक १७ मे २०२१ सकाळ
रात्री पावसाच्या जोरदार सरी येऊन गेल्या होत्या. वृक्ष छाटणीसाठी आज सकाळी साडेनऊपासुन विद्युत पुरवठा खंडित केला जाईल ही पुर्वसुचना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं आधीच दिली होती. त्यामुळं रविवारी रात्री झोपताना आणि सोमवारी सकाळी उठल्यानंतर पाण्याची टाकी भरुन ठेवली. पण सकाळी हळूहळू वाऱ्यानं जोर पकडल्यानंतर पावणेआठच्या सुमारासच विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. बहुतेक घरात वसईकरांनी इन्व्हर्टर बसवुन घेतल्यानं साधारणतः एक दिवसभर मर्यादित वीजग्रहण करणारी उपकरणे त्यावर चालतात. कार्यालयीन झुम कॉल सकाळी अकरा वाजेपासून सुरु झाले. त्याच सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती.
दिनांक १७ मे २०२१ दुपार
सायंकाळपर्यंत ऑफिसच्या नेटवर्कशी संपर्क साधण्याची धडपड करत राहिलो. मध्येच VI ची ध्वनीसेवा सुरु झाल्यानंतर टीममधील एकाला सर्वजणांना माझ्या अनुपलब्धतेविषयी कळविण्यास सांगितलं. सायंकाळी अचानक वडिलांच्या हॉटस्पॉटवरून दहा - पंधरा मिनिटं ऑफिसच्या नेटवर्कला जोडण्यात आणि झूम कॉलवर जाण्यात यश मिळालं. पण अशा अनिश्चिततेच्या वातावरणात महत्वाच्या कॉलवर गेल्यानं आणि मग पुन्हा बाहेर पडल्यास उगाच सर्वांचाच वेळ वाया जातो हे जाणवलं. त्यानंतर मात्र मी दिवस संपला असेच घोषित केले. बाहेर सोसाट्याचा वारा, पाऊस, घरात इन्व्हर्टरच्या विजेचा काटकसरीने वापर करायचं ठरविल्यानं अंधाराचे साम्राज्य आणि कोणाशीही फोन संपर्क नसल्यानं अगदी शंभर वर्षांपूर्वी वातावरण कसे असेल ह्याची कल्पना करण्याची संधी प्राप्त झाली होती. टाकीतील पाणी आठजणांना जितका वेळ पुरेल तो वेळ भरत आल्यानं आम्ही अधिक दडपणाखाली आलो होतो. आणीबाणीच्या परिस्थितीत मराठी घरात शिजविल्या जाणाऱ्या गरमागरम खिचडीचा आस्वाद घेऊन आम्ही वरच्या मजल्यावर काकांकडे गप्पा मारण्यासाठी गेलो. तिथे सर्वजण हॉलच्या कानाकोपऱ्यात हातात मोबाईल घेऊन कुठे रेंज येते का याचा सातत्यानं प्रयत्न करत होते. शेवटी दहाच मिनिटं VI नेटवर्क मिळालं आणि त्यात आम्ही सर्वांना हॉटस्पॉट वगैरे देऊन व्हाट्सअँप मेसेज आणि कॉल करुन घेतले. रात्री झोपण्याच्या वेळी नळाचं पाणी संपल्याची एक भयप्रद जाणीव झाली. वसईत मुसळधार पाऊस वगैरे झाला की दोन - तीन दिवस वीजपुरवठा खंडित होतो. बऱ्याच वेळी पाऊसवाऱ्यामुळं ओव्हरहेड विजेच्या तारांवर कोसळलेली झाडे हे त्याचे मुख्य कारण असते.
दिनांक १८ मे २०२१ सकाळ
रात्रभर धुवांधार पाऊस कोसळत राहिला. मे महिन्यातील हा शतकातील सर्वाधिक पाऊस असेल ह्याविषयी कोणतीही शंका नव्हती. रात्रभर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं वाडीतील झाडांची स्थिती कशी झाली असेल ह्याची कल्पना सुद्धा करवत नव्हते. सकाळी उठल्यावरसुद्धा मुसळधार पावसाच्या सरी कोसळतच होत्या. आता कसरत होती ती घरातील सर्व माणसांसाठी स्वयंपाक, आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची! आम्ही सुदैवी अशासाठी की घराजवळच विहीर आणि कालच्या मुसळधार पावसामुळं अचानक विहिरीचे पाणी तीन - चार पायऱ्या वर आले होते. त्यामुळं पाणी उपसणे तुलनेनं सोपे झाले.
विहिरीतुन पाणी काढण्याची शर्यत सुरु असताना नेटवर्क चुकून सुरु झाले आहे का हे तपासुन पाहणे महत्वाचं होते. त्यासाठी खालील आज्ञावली घरातील प्रत्येक नेटवर्कच्या फोनवर आलटून पालटुन चालवावी. ही आज्ञावली manually चालविणे त्यातील निराशेचा सुस्कारा ह्या ओळीमुळं खूपच निराशाजनक असु शकते. ह्यावरुन माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात AUTOMATION ला अनन्यसाधारण महत्व का प्राप्त झालं आहे ह्याची थोडीफार कल्पना येते !
For I = 1 to 10000
Select Setting Option
Select Connections
Select Mobile Networks
Select Network Operators
First Select Manually
Then Select Automatically
एक निराशेचा सुस्कारा !
Next I
दिनांक १८ मे २०२१ दुपार
अर्धवट पिकलेल्या आंब्याचा खच पडला होता.
संपुर्ण वसईभर हीच स्थिती होती. आम्ही पूर्णपणे शेतीवर अवलंबुन नसल्यानं आमच्या घरातील ज्येष्ठांची पडलेल्या नारळ, केळीविषयी संयत प्रतिक्रिया होती. प्रेमानं वाढविलेल्या झाडाची आपल्या डोळ्यादेखत क्षणार्धात अशी हालत होणे हे केव्हाही क्लेशदायीच असते! पण ज्यावेळी त्या झाडांसोबत आपली मेहनत, गुंतवणूक आणि भविष्यातील आशा मातीमोल होतात त्यावेळी ते दुःख मनाला खूपच क्लेश देतं, वसईतील सर्व शेतकऱ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत !
महाराष्ट्र राज्य विद्युतमंडळाचे कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले होते. जिथं जिथं विजेच्या तारांवर झाडं पडली होती तिथं तिथं हे कर्मचारी जाऊन जिवावर उदार होऊन ही झाडे कापुन विद्युतपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात होते. दुर्दैवानं त्यातील एका कर्मचाऱ्याचा ह्यात मृत्यू झाला असे ऐकण्यात आले. आपल्याला घरात बसुन आपल्या समस्या मोठ्या भासत राहतात परंतु ही मंडळी मात्र जीवावर उदार होऊन समाजासाठी दिवसरात्र झटत होती.
सायंकाळी पाच वाजता आमच्या घरातील विद्युतपुरवठा सुरळीत झाला. ३३ तासानंतर विद्युतपुरवठा सुरळीत होणे ही फारच दिलासादायक बाब असते. आपल्या जीवनातील सदैव उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचे अस्तित्व गृहीत धरण्याची आणि झगमगाटी दुनियेतील गोष्टीचा मोह बाळगण्याची आपल्याला सवयच लागून राहिलेली असते. पण ह्याच मूलभूत गोष्टी ज्यावेळी काही कारणास्तव आपल्यापासुन दुरावतात त्यावेळी त्यांचं महत्व आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. ह्या गोष्टीच कशा आवश्यक आहेत आणि केवळ त्या असल्या तरी आपण आयुष्य जगू शकतो ही जाणीव आपल्याला होते.
आमच्या भागातील विद्युतपुरवठा सुरळीत झाला तरी वसईतील काही भाग अजूनही (म्हणजे जवळपास पाच दिवसांनंतरही विजेपासून वंचित आहेत! त्यांचा विद्युतपुरवठा सुरळीत होवो ही प्रार्थना !
दुपारी एका टाऊनहॉल मध्ये मला पाच दहा मिनिट बोलायचं होतं. तिथं मी येऊ शकत नाही हे सुद्धा मी माझ्या व्यवस्थापकांना आणि सहकाऱ्यांना कळवू शकलो नाही! विद्युतपुरवठा सुरळीत झाला तरीही सर्व नेटवर्क आणि वायफाय सुरु झाले नव्हते. मध्येच अर्धा तास एक नेटवर्क सुरु झाले आणि एक महत्वाचा कॉल घेता आला. पण त्यानंतरच्या अमेरिकन व्यवस्थापकासोबतच्या महत्वाच्या बैठकीला मात्र मी हजर राहू शकलो नाही !
दिनांक १९ मे २०२१ रोजी सकाळी केव्हातरी वायफाय सुरु झाले आणि जिवात जीव आला. गेले दोन तीन दिवस अधूनमधून हे वायफाय गोंधळतच आहे. शुक्रवारी बहुतांश नेटवर्क सुद्धा सुरळीत झाली आणि बॅकअप अस्तित्वात आलं. ह्या सर्व काळात कंपनीतील सहकाऱ्यांनी, टीमनं आणि व्यवस्थापकांनी माझ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. तू सुरक्षित राहा, ते महत्वाचं असा सल्ला दिला ! खूप बरं वाटलं ! व्यावसायिक जगातील माणुसकीचं हे दर्शन नेहमीच सुखावून जातं !
वसई हे अगदी निसर्गरम्य गाव ! पावसाळा सोडला तर बाकीच्या ऋतूत इथलं जीवनमान खूप छान ! पण पावसाळ्यात मात्र अनियमित विद्युतपुरवठा, तुंबून राहणारे पाणी ह्यामुळं बऱ्याच भागात जगणं संघर्षमय होऊन जातं. इथलं प्रशासन ह्याबाबतीत योग्य पावलं उचलेल हा आशावाद ! फक्त अजून नवीन बांधकामांना परवानगी देताना पाण्याचा निचरा कसा होणार, इथं नव्यानं येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा देता येतील की नाही ह्याचा सर्वप्रथम विचार करायला हवा !
माझ्या सततच्या शिंपण्यानं अवेळी उगवलेला तेरडा ह्या मुसळधार पावसानं सुखावला ! आता खरा मान्सुन येईस्तोवर त्याला आनंदात ठेवण्याची जबाबदारी माझी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा