ह्या आठवड्यात कंपनीत व्यवस्थापकांसाठी एक चांगली चर्चा झाली. सध्या करोनामुळं बहुतेक सर्वजणांना विविध पातळ्यांवरील तणावाला तोंड द्यावं लागत आहे. तुम्ही तणावाला कसं तोंड देता ह्याविषयी ह्या चर्चेत विविध व्यवस्थापकांना बोलतं केलं गेलं. त्या परिसंवादात एक महत्वाचा मुद्धा होता, की तुम्ही तुमच्या सर्वोत्तम मनःस्थितीत असणं इष्ट आहे आणि त्यासाठी आवश्यक गोष्टी तुम्ही ओळखायला हव्यात ! चित्रकला, गायन वगैरे मार्गांसोबत एक महत्वाचा मार्ग सामोरा आला तो म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत दूरध्वनीवरुन बोलणे.
प्रत्येक व्यक्तीसाठी काही माणसं अशी असतात की त्यांच्याशी भेटून, बोलून त्या व्यक्तीला बरं वाटतं, जीवनाविषयीचा आशावाद पुन्हा जागा होतो. हे कितीही खरं असलं तरी ह्याचा वापर फारसा होताना दिसत नाही. ह्याची कारणे काय असावीत? तुझ्याशी बोलुन मला बरं वाटतं हे आपण स्पष्टपणे किती जणांना सांगतो? माझ्यासाठी वेळ राखुन ठेवशील का ? हा विनंतीवजा प्रश्न सद्यकाळात योग्य समजला जाईल. जसं आपल्याला त्या व्यक्तीशी बोलून बरं वाटतं त्याचप्रमाणं कदाचित त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याशी बोलुन बरं वाटत असेल.
सध्या नक्की काय होतंय ज्यामुळं लोक निराशेच्या दिशेनं झुकू लागली आहेत? आपल्या उत्साहप्रिय समाजाला समारंभांपासुन, लोकसंपर्कापासून बराच प्रदीर्घ काळ वंचित राहावं लागलं आहे. आपल्या मनातील साठून ठेवलेल्या असंख्य विचारांचं ओझं आपण त्यासाठी मुक्त द्वार न सापडल्यानं बाळगतो आहोत. त्यात आपण प्रत्येकानं आपले जवळचे काही मित्र, नातेवाईक ह्या काळात गमावले आहेत. आपल्या घरातील माणसांशी बोलुन तणावमुक्ती पूर्णपणे होत नाही कारण ते सुद्धा त्याच परिस्थितीतून जात असल्यानं त्यांचा एकंदरीत दृष्टिकोन आपल्यासारखाच असतो.
आपल्याला काही व्यक्तींशीच बोलून बरं का वाटतं? कारण ह्या व्यक्ती पटकन आपल्या भूमिकेत शिरतात. आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी भेडसावत असतील ह्याची त्यांना जाणीव असते किंवा ती खुबी त्यांनी आत्मसात केलेली असते. आपल्याशी बोलताना परखड सत्य मांडणं हा त्यांचा हेतू नसून आपल्याला रुचेल अशा पद्धतीनं सत्य सांगण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली असते. कदाचित हेही शक्य आहे की ते आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात गांजलेले असतील पण आपल्याशी बोलताना त्या गोष्टींचा उल्लेख ते क्वचितच करतात. जगात, अवतीभोवती ज्या काही सकारात्मक घटना घडत आहेत त्यांचा उल्लेख सहजरित्या ह्या संवादात ते आणतात. त्यांची विनोदबुद्धी अजूनही त्यांनी शाबूत ठेवली असते. ह्या सर्वाचा परिणाम असा होतो की सध्या आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत ती परिस्थिती तात्पुरती आहे आणि पूर्वीचा काळ परत येणार आहे ह्यावर आपला विश्वास बसतो. आणि सध्याच्या काळात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे!
अजून एक मुद्दा ! मनातील विचार ज्यावेळी सैरावैरा फिरत राहतात त्यावेळी ते क्लेशनिर्मिती करतात, आपल्याला गोंधळवून टाकतात. आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही ह्याचा आपल्याला खूप संताप येतो. पण ज्यावेळी आपण अशा व्यक्तींशी बोलतो त्यावेळी ह्या व्यक्ती आपल्याला विचारांची व्यवस्थित आखणी करायला मदत करतात. आपण नक्की कशानं त्रस्त आहोत ह्या दिशेनं ते आपल्यला घेऊन जातात आणि तेही आपल्यातील दोषांवर बोट न ठेवता !
माझी एक सर्वांना विनंती आहे. तुम्हांला ज्यांच्याशी बोलून बरं वाटतं त्यांना ते वैयक्तिकरित्या कळवा आणि त्यांच्याशी जमेल तसे बोलत रहा. त्याचप्रमाणं तुमच्या ज्या मित्रांना तुमच्याशी बोलून बरं वाटत असेल त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तुम्ही उपलब्ध आहात हे जाहीरपणे कळवा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा