काल निरर्थकपणे टीव्हीवर वाहिन्यांवर सर्फिंग करत असताना मी एका हॉलीवुड चित्रपटावर स्थिरावलो. काही वेळानं तिथं एका कुटुंबाच्या सहभोजनाचा आनंददायी प्रसंग पहावयास मिळाला. एक आनंदी कुटुंब समोर ठेवलेल्या नानाविध चविष्ट पदार्थांनी युक्त अशा मेजवानीचा आस्वाद घेत होतं. वातावरण अत्यंत खेळीमेळीचं होतं. आजोबा, आजी, त्यांची मुलं, नातवंडं अशी विविध वयोगटातील आनंदी माणसं एकत्रपणे त्या सणाच्या दिवशी मेजवानीचा आनंद लुटत होती. पारंपरिक अमेरिकन कुटुंबात असा प्रसंग थँक्स गिविंग्जच्या दिवशी अनुभवायला मिळतो.
हॉलिवूड चित्रपटात इटालियन, मेक्सिकन कुटुंबातसुद्धा अशा मेजवानीचा आनंद एकत्रपणे लुटणाऱ्या कुटुंबांचे चित्रीकरण आपल्याला आढळते. आपल्याकडे सुद्धा अशा आनंदी प्रसंगाचं चित्रपटात केलेलं चित्रण आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळाला आहे. "हम साथ साथ है", "हम आपके है कौन!" अशा सुरज बडजात्या निर्मित लांबलचक वाक्यभर शीर्षक असलेल्या चित्रपटात असे प्रसंग हमखास असु शकतात. ह्या कुटुंबासोबत त्यांना त्यांच्या ताटात आग्रहाने विविध स्वादिष्ट पदार्थ वाढणारे त्यांचे वर्षानुवर्षे असणारे सेवकसुद्धा आपल्याला आढळतात. परंतु या व्यक्तींना नोकर म्हणून अजिबात संबोधले जात नाही, कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच त्यांना प्रेमाची वागणूक दिली जाते. मराठी चित्रपटात, बकेटलिस्टमध्ये सुद्धा फारशा मोठ्या नव्हे परंतु एकत्र जेवणाऱ्या कुटुंबाचे चित्रण आढळते. इथं फरक असा की माधुरी एकच भाजी मसाले आणि विविध जिन्नसांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमधुन बनवताना आपल्याला आढळते. इथं नोकरवर्गाची उपस्थिती आपल्याला जाणवत नाही.
चित्रपटातील कुटुंबाची एकत्रित जेवण घेण्याचे हे प्रसंग आपलं लक्ष मराठी कुटुंबातील एकत्र जेवणाच्या कालपरत्वे दुर्मिळ होत चाललेल्या परंपरेकडे वेधून घेतात. पुर्वी ज्याकाळी लोकांचे शिक्षण, व्यवसाय हे आवाक्यात होते, त्यावेळी सायंकाळच्या जेवणास लोक सर्व कुटुंबातील सदस्य घरी उपस्थित असत व एकत्रपणे जेवण घेणे हे काहीसे बंधनकारक असायचे. तिथं बहुदा कुटुंबप्रमुख अत्यंत गंभीर चेहरा करून बसत असावा. आपल्याकडून कोणत्याही पदार्थांमध्ये त्रुटी तर राहिली नाही या शंकेने आणि त्याप्रती निर्माण झालेल्या भयाने वावरणारी गृहिणीसुद्धा असायची. कुटुंबातील बालकवर्ग आपण दिवसातील केलेल्या अनेक प्रमादांपैकी कोणता प्रमाद आपल्याला इथं बोलणी खायला लावु शकेल ह्याची भिती बाळगुन असावा. एकंदरीत काहीसे भयप्रद वातावरण या जेवणाच्या टेबलावर असावे असा मला संशय आहे.
कालांतराने लोकांच्या शाळा-कॉलेजांच्या आणि नोकरीच्या वेळा बदलल्या. त्यामुळे दैनंदिन जीवनात एकत्र जेवणाला बसण्याची वेळ क्वचितच येऊ लागली. सुसंवादाची एक हुकलेली संधी या एका चांगल्या परंपरेला हळूहळू तिलांजली देण्यास कारणीभूत ठरू लागली. एकत्र जेवण घेण्याची सवय दैनंदिन जीवनात सुटल्याने सुट्टीच्या दिवशीसुद्धा शक्य असुनसुद्धा संपुर्ण कुटुंब एकत्रितपणे जेवणाचा आनंद घेताना दिसत नाही.
यामागे नक्की कारणे काय असावीत? सद्यकालीन जगाच्या बहुतेक समस्यांमागे मोबाईलचा अतिवापर हे कारण असावे असं विधान सरसकटपणे केलं जातं. या धर्तीवर या परिस्थितीला म्हणजेच एकत्रितपणे कुटुंबाने जेवण न घेण्याच्या समस्येला मोबाईलचा अतिवापर काही प्रमाणात कारणीभूत आहे असे ढोबळमानाने विधान आपण करू शकतो. परंतु या समस्येकडे काहीसे खोलवर जाऊन बघण्याची गरज आहे. एखाद्या प्रसंगात, समारंभात व्यक्ती का सहभागी होते ह्याचं मुख्य कारण म्हणजे या सहभागामुळे काहीतरी एक आनंदी अनुभव मिळण्याची शक्यता त्या व्यक्तीला जाणवत असते! आता एकत्रित जेवण घेताना आनंदाचा कोणता अनुभव आपण सर्व व्यक्तींना मिळवून देत असतो हा प्रश्न सर्वांनी आपल्याला विचारणे आवश्यक आहे.
कुटुंबप्रमुखाच्या दृष्टिकोनातून आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण घेत आहेत ही बाब आनंद देऊ शकते. गृहिणीच्या दृष्टिने आपण मनापासून केलेल्या जेवणाचा आनंद आपल्या सर्व प्रिय व्यक्ती एकत्रितपणे बसुन घेत आहेत ही एक आनंददायी भावना या अनुभवातून मिळू शकते. जेवणातील एखादा पदार्थाची भट्टी जराशी सुद्धा चुकली तरी जितक्या तत्परतेने सदस्य आपली प्रतिक्रिया नोंदवितात त्याच तत्परतेने भट्टी जमुन आलेल्या पदार्थाचं कौतुक सुद्धा करणं गृहिणीला मोठी स्फुर्ती देऊ शकतं ! कुटुंबातील मुलांच्या दृष्टीनं मात्र हा प्रसंग ह्या काळातसुद्धा बऱ्याच घरांत धोक्याची नांदी देणारा असतो. आईवडील याप्रसंगी आपण केलेल्या चुकांचा पाढा आपल्यासमोर वाचून दाखवणार ही सुप्त भिती त्यांच्या मनात असू शकते. भोजनप्रसंगी टीव्ही चालू ठेवून भोजन करण्याची पद्धत असेल तर संवादाच्या शक्यतेला अजून एक अडथळा निर्माण होतो. या सर्व घटकांमध्ये माझ्यामते तरी कुटुंब प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी आहे. कुटूंबप्रमुख म्हणजे पुरुष असे मी गृहीत धरले आहे. आता या गृहीतकामुळे माझा निषेध होण्याची शक्यता आहे! गृहिणीने जेवणाआधीचे दोन ते तीन तास जेवण बनवण्यात घालविले असल्याने जेवण होईस्तोवर ती हुश्श म्हणून सुटकेचा निश्वास टाकत असते! त्यामुळे एकत्रितपणे जेवण घेताना संवाद सुरू ठेवण्याची तिच्याकडून अपेक्षा करणे हे काहीसे चुकीचे ठरते. तिचं लक्ष बऱ्याच प्रमाणात आपण बनविलेल्या पदार्थांना सर्वांचा प्रतिसाद कसा मिळत आहे याकडं लागण्याची शक्यता आहे! कुटुंबातील मुलं ही नवीन पिढीची प्रतिनिधी आहेत. संवादाचा आरंभ आपणसुद्धा करू शकतो या संकल्पनेची नवीन पिढीला जाणीव नाही. त्यांच्या मते आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे ही इतकी संवादाची त्यांच्याकडून कुटुंबातील बाकीच्या सदस्यांची अपेक्षा असावी. त्यामुळे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन ही मंडळी आपले लक्ष गॅझेटकडे वळवितात. अशावेळी त्यांना आणि गृहिणीला संवादात सहभागी करून घेण्यासाठी कुटुंब प्रमुखाने काहीतरी मनोरंजक विषय चर्चेसाठी घेणे आवश्यक आहे. चर्चेमध्ये हे बाकीच्या सदस्यांना त्यांची मते विचारणे, ते मते मांडत असताना त्यांच्याकडे लक्ष देणे अशा वर्तवणुकीची कुटुंबप्रमुखाकडून अपेक्षा आहे. कालांतरानं बाकीची मंडळी सुद्धा ह्यात पुढाकार घेतील. कुटुंबातील सदस्यांमधील बंध अतूट ठेवण्यासाठी एकत्रितपणे भोजन करणे हा एक सहज उपलब्ध असणारा मार्ग आहे, ती आपली परंपरा आहे. तिचं पालन जमेल तितकं आपण करुयात हेच सांगणं !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा