काही काळापुर्वी समाजानं संभाषणकलेचे महत्व जाणून घेतलं. त्यामुळे संभाषणकला सुधारणेला अनन्यसाधारण महत्व मध्यमवर्गीयांच्या कुटुंबात प्रस्थापित झालं. व्यावसायिक क्षेत्रात उत्तम संभाषण कला असणे ह्याला निर्विवाद महत्त्व आहे. तुमच्याकडं कोणत्याही क्षेत्रातील उत्तम ज्ञान असेल पण ह्या ज्ञानाला तुम्ही उत्तम संभाषण कलेची जोड देऊ शकत नसाल तर तुमच्या यशाला काहीशा मर्यादा येतात. व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केलेल्या मध्यमवर्गीयांनी ही बाब जाणून घेतली. त्याचे महत्व, आपला अनुभव त्यांनी आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत पोहोचविला.
मौखिक आणि लिखित स्वरूपातील उत्तम संभाषण कला झपाट्याने मध्यमवर्गीयांमध्ये पसरली. इथं एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तुमच्याकडं एखाद्या विषयातील मुळ ज्ञान असणं आवश्यक आहे. या ज्ञानाला संभाषणकलेची जोड देऊन तुम्हाला यशाची शिखरे गाठता येतील. परंतु जर तुमच्याकडे मूळ ज्ञानाचा अभाव असेल तर तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येत नाही.
सध्या युगामध्ये हल्ली एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. जुजबी ज्ञानाला उत्तम संभाषणकलेची जोड देऊन जनमानसात भ्रम निर्माण करणाऱ्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. जे काही चकाकतं ते सर्व सोनं नसतं या उक्तीचं सतत आपणास स्मरण करावं लागतं. आपण जे काही वाचतो, ऐकतो त्यामध्ये हे जे काही उत्तम संभाषणकलेने चकचकीतपणाचे एक आवरण निर्माण केलेले असतं ते भेदून आत मुळ गाभा किती अर्थपूर्ण आहे याचा शोध घेणारी नजर आणि कुवत तुमच्याकडे असायला हवी. काही दिवसांनी ह्या मुळ गाभ्याचा शोध घेणाऱ्या माणसांची गरज मानव जातीला प्रचंड प्रमाणात लागणार आहे.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. बऱ्याच यशस्वी वित्तीय संस्थांमध्ये अशी चकचकीतपणाचे आवरण भेटणारी माणसे सर्वत्र आढळतात. त्यामुळे अशा ठिकाणी मूळ मुद्द्याला अजूनही महत्व असल्याचे आढळून येते. जागतिक पातळीवर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाची उपासना करण्याशिवाय दुसरा कोणता शॉर्टकट नसतो हे अशा वेळी जाणवतं आणि एक जुन्या पद्धतीने विचार करणार मन सुखावतं!
उत्तम संभाषणकलेचा, व्यक्तिमत्त्वाचा ध्यास नवीन पिढीने धरणं आवश्यकच आहे. परंतु या ध्यासाच्या मागे लागताना ज्ञानउपासनेच्या मूळ लक्ष्याकडं दुर्लक्ष होऊ देता कामा नये! हाच मुद्दा लक्षात घेतल्यास केवळ आपल्या स्वार्थासाठी लहान मुलांना ज्ञानउपासनेच्या मार्गातुन विचलित करुन रिऍलिटी शो मध्ये आणणाऱ्या वाहिन्यांना माझा तात्विक विरोध आहे !
जाता जाता व्यावसायिक क्षेत्रात यशाची शिखरं खालील आलेखाद्वारे दर्शविता येतात. जसजसं वर जावं तसतसं व्यक्तींची संख्या कमी होत जाते असं ढोबळमानाने हा आलेख दर्शवितो.
प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञान आणि संभाषणकला / व्यक्तिमत्व ह्यांचं एक unique combination असतं. समजा ह्या combination च्या खालील शक्यता ध्यानात घेता ती व्यक्ती ह्या pyramid मध्ये कुठं बसेल ह्याचा अंदाज तुम्ही बांधुन पहा. आजच्या पोस्टचा हा गृहपाठ समजा !
ज्ञान संभाषणकला
१) सामान्य सामान्य
२) सामान्य उत्तम
३) सामान्य अतिउत्तम
४) उत्तम सामान्य
५) उत्तम उत्तम
६) उत्तम अतिउत्तम
७) अतिउत्तम सामान्य
८) अतिउत्तम उत्तम
९) अतिउत्तम अतिउत्तम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा