नेहमीच्या धोपटमार्गातील वाचनापासुन फारकत घ्यावी ह्या हेतूनं प्राचीकडून भाऊबीज भेट म्हणुन The Remains of the Day ह्या नोबल पारितोषिक विजेत्या पुस्तकाची मागणी केली. त्या पुस्तकाचं परीक्षण येत्या काही भागात! नक्की भाग किती असं विचाराल तर सध्या ठाऊक नाही. पुस्तक परीक्षण कसं करावं ह्याविषयी काही मार्गदर्शक तत्वे आहेत का हे मला ठाऊक नाही. माझा हा प्रयत्न मात्र कथेचा आढावा, काही मुख्य व्यक्तिमत्वांचं चित्रण, १९३० च्या सुमारातील बटलर ह्या पेशाचे इंग्लंडमधील जीवनाचं ह्या पुस्तकातुन घडणारं दर्शन, आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर उलगडत जाणारी आणि कधी वास्तवात न उतरलेली प्रेमकथा ह्या बाबींशी संबंधित राहील.
कथा ही फ्लॅशबॅक स्वरूपातील! १९५० च्या सुमारास डार्लिंग्टन हॉलचे नवीन अमेरिकन मालक फॅरॅडे आणि त्यांचा सेवक मिस्टर स्टीवन्स ह्यांच्याभोवती ही कथा सुरु होते. आपण अमेरिकेला सुट्टीवर जात असल्यानं स्टीवन्स ह्यानं आपली फोर्ड गाडी घेऊन इंग्लंडच्या ग्रामीण भागाचा फेरफटका मारुन यावा असं फॅरॅडे सुचवितात. त्याच सुमारास डार्लिंग्टन हॉलमध्ये १९३० च्या कालावधीत स्टीवन्स ह्यांच्या सोबत इथं कर्मचारी म्हणुन काम केलेल्या मिसेस बेन (पूर्वाश्रमीच्या मिस केंटन ) ह्यांचं पत्र स्टिव्हन्स ह्यांना आलं असतं. एकंदरीत पत्राचा सूर पाहता मिसेस बेन ह्यांच्या जीवनात काहीशी अस्थिरता आली असुन त्या डार्लिंग्टन हॉलमध्ये पुन्हा कामासाठी येण्यास तयार असतील असा समज स्टिव्हन्स करुन घेतात.
फोर्ड गाडी घेऊन एकट्यानं प्रवास करत इंग्लंडच्या नयनरम्य ग्रामीण भागाचं दर्शन घेत असताना स्टिव्हन्स ह्यांचं मन भुतकाळाच्या आठवणीत ओढलं जातं. लॉर्ड डार्लिंग्टन आणि त्यांच्या कुटुंबियांकडे ह्या भव्य वास्तुची मालकी जवळपास दोन शतकं असते. अशा गौरवास्पद इतिहासाचं भुषण अभिमानानं मिरवणाऱ्या वास्तुची देखभाल ठेवायची असेल तर तिथला कर्मचारीवर्ग सुद्धा कसा अगदी तत्पर आणि कुशल असायला हवा. आदर्श बटलर कसा असायला हवा ह्याविषयावर बरीच पानं काझुओ ह्यांनी खर्च केली आहेत. आदर्श बटलरचे गुण कुठं लिखित स्वरुपात तुम्हांला आढळणार नाहीत पण स्टीवन्सला मात्र हेज सोसायटीने (Hayes Society) आचरणात आणलेले बटलर निवडीचे मापदंड काहीसे मदत करु शकतात असे वाटत असते. इंग्लंडच्या परंपरावादी संस्कृतीच्या विचारसरणीचं प्रतीक इथं आपणास दिसतं. नवश्रीमंत उद्योगपती लोकांच्या आधुनिक घरात काम करणाऱ्या बटलरला आदर्श बटलरच्या संभाव्य यादीत समाविष्ट करण्यास सुद्धा हेज सोसायटी तयार नसते. आणि हो असा कुणी खरोखर चांगला बटलर समजा चुकुन अशा उद्योगपतीच्या घरात कामास गेला तर परंपरावादी घराणी त्याला खेचुन आपल्या जुन्या प्रशस्त वास्तुत आणतील असा विश्वासही हेज सोसायटीला वाटत असावा असं स्टीवन्स म्हणतात.
ह्या विषयावर स्टीवन्स आणि त्यांचे मित्र ग्रॅहम ह्यांच्या वारंवार चर्चा झडत असाव्यात. अत्यंत कार्यक्षम बटलर आणि महान बटलर ह्यांच्यात फरक कोणता असेल तर 'Dignity' (आब ) ह्या गुणाचा ह्यावर ह्या दोघांचं एकमत होत असलं तरी Dignity ची व्याख्या कशी करायची ह्यावर मात्र ह्या दोघांचं एकमत होणं कठीण होतं. ह्या दोघांच्या चर्चेतील Dignity च्या उद्धृत केलेल्या काही व्याख्या इथं मुळ इंग्लिशमध्ये!
Dignity is something like a woman's beauty and it was pointless to attempt to analyze it.
Dignity was something one possessed or did not by a fluke of nature; and if one did not self-evidently have it, to strive after it would be futile.
Dignity has to do crucially with a butler's ability not to abandon the professional being he inhabits.
असो मग स्टीवन्स ह्यांच्या आठवणींचा ओघ मग त्यांच्या वडिलांच्या जीवनाकडे वळतो. त्यांच्या मालकांच्या मद्यपान करुन आपले होशहवाल गमावुन बसलेल्या मान्यवर पाहुण्यांना त्यांनी एकही शब्द न बोलता केवळ आपल्या वागणुकीने वठणीवर आणलं ह्याची कहाणी स्टीवन्स सांगतात. इंग्लंडचा प्रमाणाबाहेरचा अभिमान अधुनमधून डोकावतो. जातिवंत बटलर केवळ इंग्लंडमध्येच अस्तित्वात आहेत इतरत्र आहेत ते केवळ पुरुषसेवक!
वडिलांच्या आठवणीनंतर मग ओघ वळतो तो मिसेस बेन ह्यांच्याकडे. स्टीवन्स मात्र त्यांना मिस केंटन म्हणुन संबोधणेच पसंत करतात. मिस केंटन आणि स्टीवन्स ह्यांचे वडील जवळपास एकाच वेळी लॉर्ड डार्लिंग्टन ह्यांच्याकडे कामास रुजु होतात. स्टीवन्स ह्यांच्या वडिलांचं त्यावेळी वय झालेलं असते परंतु परिस्थितीमुळे त्यांना हे काम करणं भाग पडलेलं असतं. सुरुवातीला काही कारणास्तव मिस केंटन स्टीवन्स ह्यांच्या वडिलांच्या विरोधात असतात आणि त्यांच्या कामात खोट काढण्याचा प्रयत्न करत असतात.
स्टीवन्स हे मुख्य बटलर असल्यानं एकंदरीत कर्मचारीवर्गाची संख्या ठरविणे, कामाच्या दर्जावर बारीक लक्ष ठेवणं अशा सर्व जबाबदाऱ्या पार पडत असतात. पाहुणे भोजनासाठी बसले असताना त्यांच्या बोलण्यातील प्रायव्हसीचा भंग न होऊ देता त्यांना वेळोवेळी सर्व्ह करत राहणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे असं स्टीवन्स म्हणतात.
पुढं आठवणींचा ओघ डार्लिंग्टन हॉलमध्ये येणाऱ्या जर्मनीच्या पाहुण्यांच्या भेटींकडे वळतो. पहिल्या महायुद्धात पराभुत झालेल्या जर्मनीतले पाहुणे लॉर्ड डार्लिंग्टनकडे सतत येत राहतात. आणि मग राजकीय चर्चा अगदी गरमागरम स्वरुप धारण करतात. एक बटलर म्हणून ह्या सर्व घटनांचे साक्षीदार होण्याची संधी स्टीवन्स ह्यांना मिळते.
(क्रमशः )
(तळटीप : नोबेल पारितोषिक मिळविणारे पुस्तक असतं तरी कसं ह्या कुतुहलापायी हे पुस्तक वाचन सुरु केलं. पुस्तकातील वाक्यांची धाटणी, जुन्या इंग्लंडचे वातावरण शब्दमाध्यमातुन अगदी हुबेहूब वाचकांसमोर ठेवणं ह्या काही बाबी आतापर्यंतच्या वाचनातुन जाणवल्या. आणि हो बटलर ह्या पेशाविषयी आणि त्यांच्या १९३० - ५० च्या कालावधीतील आयुष्याविषयी अगदी विस्तृत माहिती हे पुस्तक देते. ब्लॉगचा पुढील भाग लगेचच येईल ह्याविषयी खात्री नाही )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा