मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

मत्स्यबाजार

वेताळ - "विक्रमा तुझ्या जिद्दीची मला दाद द्यायलाच हवी. हाती घेतलेलं काम कसं नेटानं पुर्णत्वाला न्यायचा प्रयत्न करावा हे लोकांनी शिकावं तर ते तुझ्याकडून !"

विक्रम - केवळ मान डोलावतो 

वेताळ - "का रे विक्रमा आज तुझं माझ्या बोलण्याकडं लक्ष नाही असं वाटतंय !"

विक्रम - "तसं नाही वेताळ ! ह्या आठवड्यात पृथ्वीतलावर माझं लक्ष वेधुन घेईल अशी घटना घडली आणि त्यामुळं अजुनही मी त्याच विचारात गढुन गेलो आहे" 

वेताळ - "अशी ही कोणती घटना घडली त्याच्यामुळं तुझ्यासारख्या स्थिरबुद्धीच्या माणसाचं सुद्धा लक्ष काही दिवस त्यात राहिलं?"

विक्रम - "ह्या पृथ्वीवर 19.3919 उत्तर अक्षांश आणि  72.8397°पुर्व रेखांश ह्या बिंदूंवर एक निसर्गरम्य गाव वसलं आहे" 

वेताळ - "विक्रमा, ह्या गावाचं नाव न सांगुन तु माझी उत्कंठता ताणुन धरत आहेस"

विक्रम - "आपल्या भौगोलिक ज्ञानाच्या आधारे आपण हे गाव सहजासहजी ओळखाल अशी माझी अपेक्षा होती. पण असो ! हे निसर्गरम्य गाव आहे वसई !"

वेताळ - "My Bad! वसई सारख्या गावाचे अक्षांश आणि रेखांश माझ्या ध्यानात राहिले नाहीत हे माझ्या भूगोलाच्या शिक्षकांना समजलं तर त्यांना काय वाटेल? ते असो , पण वसईत घडलं तरी काय? तिथं हल्ली अधूनमधून मराठी ब्लॉग प्रसिद्ध होतात हे ऐकून आहे मी !"

विक्रम - "(चेहऱ्यावर निराशेचे भाव उमटत!) छे छे ! आपल्या निसर्गसौदंर्यासोबत जसं वसईगाव ताज्या भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे ह्याचबरोबर इथं अगदी ताजे मासे सुद्धा उपलब्ध होतात"

वेताळ - "विक्रमा तुझ्या सामान्यज्ञानाच्या विस्तारित कक्षेनं मी प्रभावित झालो आहे. तेव्हा तुझ्या कहाणीचा पुढील भाग ऐकण्यास मी अगदी उत्सुक झालो आहे"

विक्रम - "ह्या वसईगावात चावडीवर चर्चा करणारे विविध गट आहेत. ह्या गटांत वयाचं बंधन न बाळगता सर्वजण सहभागी होतात. तर अशाच एका सुप्रसिद्ध गटात महर्षी आहेत. हे महर्षी गेले कित्येक वर्षे वसई गावात ज्ञानप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या ज्ञानप्रबोधनाचं क्षेत्र ग्रंथातील ज्ञानापलीकडं नेऊन ठेवलं आहे. त्यांच्याजवळील ह्या अगाध ज्ञानाने वसई गावातील बालकवर्ग सुद्धा खूप प्रभावित झाला आहे"

वेताळ - "प्रस्तावना किती करावी ह्याविषयी काही मार्गदर्शक तत्व आखुन दिली असतात, त्याविषयी तु एकदा अधिक माहिती करुन घ्यावीस" 

विक्रम - "(दुर्लक्ष करीत!) ह्या वसई गावातील लोक पक्के खवय्ये आहेत. श्रावणमास, नवरात्र असा काळ त्यांच्यासाठी फार कठीण असतो. ह्या खवय्ये लोकांची आवड लक्षात घेता त्यांच्यासाठी नायगाव, पाचूबंदर अशा ठिकाणी घाऊक प्रमाणात मासेविक्रीचा बाजार भरवला जातो. इथं अगदी ताजी मासळी रास्त दरात उपलब्ध होते" 

वेताळ - चेहऱ्यावरील नाराजीचे भाव कायम ठेवून केवळ मान हलवितो!

विक्रम - "तर अशा ह्या घाऊक बाजारात नक्की कशा प्रकारे खरेदी विक्री होते ह्याविषयी वसईगावातील एका बालकास फार उत्सुकता होती. ह्या बालकाच्या घरी जरी मत्स्याहार केला जात नसला तरी बालक औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या विक्रीविभागात असल्यानं आजुबाजूच्या गावात भटकत असे. तिथं बालकाचा दिवसेंदिवस मुक्काम असल्यानं तिथं बालक नक्की काय भक्षण करतंय ह्यावर फारसा निर्बंध नसे"

वेताळ - "ही बालकाची कहाणी आहे काय?"

विक्रम - "तसं नाही पण बालकाचा मुख्य सहभाग आहे ! तर गेल्या आठवड्यात एका रात्री नायगावात असा बाजार भरणार आहे ही बातमी घेऊन एक दूत महर्षींकडे आला. दुताने आणलेली ही बातमी ऐकुन महर्षींचे डोळे चकाकले. पुढील आठवडाभर पानात वाढल्या जाणाऱ्या ताज्या माशांची दृश्ये नजरेसमोर येणे हे जसं त्याला कारण होतं तसंच बालकाची ज्ञानतृष्णा पुर्ण करण्याची संधी आल्याने झालेला आनंद हा सुद्धा डोळ्यातील चकाकीला कारणीभुत होता. बालकाच्या घरी ज्यावेळी ही बातमी पोहोचली त्यावेळी बालक डाळ भात आणि वाटाण्याच्या भाजीचा आनंद घेत होते. दुताने सांकेतिक भाषेत संदेश देताच बालकाने घाईघाईत आपले जेवण संपविले आणि महर्षींच्या रथात बसुन दोघेही नायगावच्या दिशेनं कूच करु लागले. महर्षींच्या सारथ्यकौशल्यानं प्रभावित झालेल्या बालकाने महर्षींना एक प्रश्न केला - "महर्षी, आपण किती सुवर्णमुद्रा सोबत घेऊन निघाला आहात !" महर्षीना हा प्रश्न बहुदा आवडला नसावा. घोड्याचा लगाम कचकन खेचून ते म्हणाले, "तू आयकर विभागाचा हस्तक तर नव्हे ना ?"

विक्रम क्षणभर थांबला. 

वेताळ - "विक्रमा का थांबलास बरे? ह्या कथेने माझ्या मनात प्रचंड औत्सुक्य निर्माण केलं आहे"

विक्रम - "मागच्या संवादानंतर नायगावपर्यंत दोघेही शांतच होते. शेवटी एकदाचं नायगाव आलं. आपला कॅमेरा घेऊन बालक आणि त्याच्यासोबत महर्षी रथातुन उतरले. काही क्षणांतच नानाविध प्रकारच्या ताज्या माशांनी भरलेलं विक्रीकेंद्र ह्या दोघांच्या नजरेस पडलं. "हा मासा कोणता? ह्या माशाला काय म्हणतात ?" चौकस बुद्धीच्या बालकाने आपल्या प्रश्नानं महर्षींना भंडावून सोडलं.  शेवटी एकदा महर्षींना ८५ क्रमांकांच्या आश्रमातील आपला गुरुबंधू भेटला आणि महर्षींनी बालकाला त्याच्यावर सोपवुन सुटकेचा निःश्वास टाकला. सरंगाविक्री करणाऱ्या मत्स्यविक्रेतीकडे महर्षींनी आपला मोर्चा वळविला. तिच्याकडं सरंग्यांचे आणि सुरमईचे वाटे विक्रीस ठेवले होते. "ह्यांचा विक्रीभाव कसा?" महर्षींनी प्रश्न केला. "५०००० सुवर्णमुद्रा" मत्स्यविक्रेती म्हणाली. स्थितप्रज्ञ मास्तरांच्या चेहऱ्यावरील भावांमुळं बालकास नक्की कळलं नाही की हा भाव गगनभेदी की खिशाला परवडणारा ! शेवटी महर्षी आणि मत्स्यविक्रेती ह्यांच्यात बरीच चर्चा झाली. महर्षी विक्रीकेंद्राची फेरीसुद्धा मारुन आले. पण शेवटी १५००० सुवर्णमुद्रेवर सौदा पक्का झाला"

परतताना महर्षी अगदी खुशीत होते आणि बालकही ! "हे मासे आश्रम क्रमांक ८५ च्या सर्व गुरुबंधुंना अगदी आठवडाभर पुरतील !" घोड्यांना भरधाव वेगात सोडुन महर्षी म्हणाले. "हा माश्यांचा ताजा वास सुद्धा आठवडाभर माझ्या लक्षात राहील! " बालक सुद्धा जोशात येऊन म्हणालं!

वेताळ - "मी धन्य झालो विक्रम ! मला ह्या मासेबाजाराची काही चित्रं पाहायला मिळतील का?"

विक्रम - "का नाही? बालकाने काढलेली ही पहा चित्रे !"
















सुवर्णमुद्रेची घासाघीस करताना महर्षी !


वेताळ - "गोष्ट इथंच संपली का?"

विक्रम - "म्हटली तर संपली म्हटली तर नाही ! दुसऱ्या दिवशी चावडीवर बालकाने बऱ्याच उत्साहानं सर्वांना आपल्या रात्रीच्या साहसाची माहिती पुरविली ! मौशी त्याच्यापासून पन्नास पावलं दुर जाऊन बसली. पंडितांनी महर्षी आणि बालकांवर मत्स्यांच्या भ्रूणहत्त्येचा आळ घेतला. बाकी सदस्यांनी राजा महर्षींना गरजेहून जास्त सुवर्णमुद्रा देत असल्यानं त्यांना इतकी खर्चिक खरेदी करणे परवडते असा अभिप्राय नोंदवला ! राजाच्या हवाईदलाचे प्रमुख असलेल्या संतसुर्य भाऊंनी तर अशा अनेक खरेदी केल्या होत्या पण आपल्याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणुन त्यांनी गप्प बसणे पसंत केलं. अजुनही बालक घराबाहेर पडलं अशी बातमी आली की मौशी आपल्या आश्रमात जाऊन दरवाजा बंद करुन बसते !"

वेताळ - "विक्रमा आज तु माझी छान करमणुक केली. पण तु आपले मौनव्रत मोडलेस. हा मी निघालो ! पण हो एकदा आपण वसईगावाला नक्की जाऊयात !"

विक्रम विक्रम विक्रम वेताळ वेताळ वेताळ 

(हातझटकणी - ह्या कथेतील पात्रांचा, घटनेचा आणि छायाचित्रांचा वास्तवातील कोणत्याच व्यक्तीशी, घटनेशी अथवा स्थळाशी संबंध नाही ! तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा !)

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...