मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ८ - माउंट टिटलिस, लुसर्न (Lucerne) तलाव




युरोपची सहल कशी करावी ह्याविषयी सहल सुरु असताना मनात जे विचार येत असत, त्याला मिळतीजुळती चर्चा  ह्या शृंखलेच्या प्रसिद्धीनंतर मित्र, नातेवाईकांसोबत होत आहे. मोजक्या दिवसांत इतकं सारं काही पाहायचं म्हणजे अभ्यासू वृत्तीनं पाहणं शक्य होत नाही ही अशा प्रकारच्या सहलींची नक्कीच एक नकारात्मक बाब झाली. दुसऱ्या बाजूनं विचार करायला गेला तर संपूर्ण युरोप चोखंदळपणे पाहण्यासाठी आवश्यक असणारा पैसा, वेळ हा किती जणांकडे आहे हा मुख्य मुद्दा!  सध्यातरी माझं मत असं की प्रथम अशी वेगवेगळ्या ठिकाणांना भोज्या करून पुढे जाणारी सहल करावी, आपल्याला जे काही खरोखर आवडलं आहे तिथं मग सवडीनं जाऊन त्याचा आनंद लुटावा. सर्वच चांगलं आहे मग नक्की काय निवडावं असा प्रश्न पडत असेल तर मग केवळ विचारच करत बसाल ! अजून एक दुसरा मार्ग म्हणजे आपल्याला आवडलेल्या स्थळांची यादी बनवा, दर शनिवार - रविवारी त्या स्थळांचे सर्वोत्तम यु ट्यूब व्हिडिओ स्क्रीन मिररिंग करून मोठ्या टीव्हीवर पहा ! माझ्या मनात दक्षिण अमेरिकेची सहल करायचा विचार आहे पण तिथं जाण्याआधी पिवळा ताप वगैरे आजारांच्या प्रतिबंधक लसी घ्याव्या लागतात, हवामान, प्रदेश अगदी प्रतिकूल आहेत हे कळल्यावर ही लेखन शृंखला संपली की दक्षिण अमेरिकेची यु ट्यूब सहल करावी ह्या निष्कर्षाप्रती मी येऊन पोहोचलो आहे.  त्यावरही कदाचित शृंखला लिहिण्याचं धारिष्टय करीन मी !

स्वित्झर्लंड देशाची अर्थव्यवस्था बाकीच्या युरोपातील देशांच्या तुलनेनं अधिक मजबूत.  ह्या देशातील पर्यटन आणि इथल्या बँकांत पैसे ठेवताना तुम्हांला मिळू शकणारी गोपनीयता ही अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी मुख्य कारणं ! ह्या देशाच्या पर्यटनाला दक्षिण आशियात प्रसिद्धी देण्यास यश चोप्रा ह्यांचे अनेक चित्रपट कारणीभूत ठरले. हिरव्यागार शेतांत, बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल्या त्यांच्या चित्रपटातील नायक - नायिकांमध्ये लाखो भारतीय तरुण - तरुणींनी स्वतःला पाहिलं. महाबळेश्वर, मनाली, काश्मीर ह्यांच्यासोबत स्वित्झर्लंडसुद्धा भारतीय तरुणांच्या यादीत हळुहळू समाविष्ट होऊ लागलं. स्वित्झर्लंडमधील पर्यटनाला लोकप्रिय करणाऱ्या  यश चोप्राजींच्या कामगिरीची दखल तेथील सरकार, हॉटेल्स ह्यांनी योग्य प्रकारे घेतली आहे. सुप्रसिद्ध Victoria-Jungfrau Grand Hotel & Spa मध्ये त्यांच्या नावानं एक आलिशान, सिनेमाची थीम असणारा suite बनविण्यात आला आहे. त्यांचा पुतळा देखील ह्या देशात उभारण्यात आला आहे. 

१९ जून २०२४ - आज माउंट टिटलिसच्या भेटीचा दिवस! गेल्या काही दिवसातील प्रवासातील हिरव्या रंगाच्या सोबतीनं चित्तवृत्ती प्रफ्फुलीत झाल्या होत्या. आजच्या प्रवासाची सुरुवात देखील अशीच झाली. लांबवर पसरलेल्या हिरव्यागार शेतात चरणाऱ्या गाई हे आतापर्यंत अगदी अभावानंच दिसलेलं चित्र आता सातत्यानं दिसू लागलं. आपल्या हद्दीतच चरणाऱ्या ह्या शिस्तबद्ध गाई पाहून कुठंतरी मनाला खटकलं. कुंपणाच्या हद्दीवरुन होणाऱ्या वादावादीची मजा युरोपिअन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळं मिळणारच नाही.  ह्या गाईंच्या कानाला लावण्यात येणाऱ्या घंट्यानी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. Cow Ear Tag असा माहिती मायाजालावर शोध घेतला असता ह्याद्वारे गाईंच्या शरीराच्या तापमानाची, आरोग्याची, वैद्यकीय इतिहासाची माहिती त्यांच्या मालकांना उपलब्ध होऊ शकते असं वाचनात आलं. 




जसजसा माउंट टिटलिस जवळ येऊ लागला तसतशी पायथ्याजवळ छोटी, टुमदार घरं दिसू लागली. ह्यातील काही घरांत होम स्टे हा पर्याय उपलब्ध असतो.  अशाच एका घरातील मालकाशी तिथं राहून इतकी मैत्री करायची की त्यानं म्हटलं पाहिजे, "आदित्य, आपलंच घर समज! जेव्हा वाटेल तेव्हा हक्कानं इथं येऊन रहा !" काश ऐसा होता! ह्या सहलीत मला न आवडणाऱ्या शाहरुखचा  "कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो... तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है"  हा संवाद दोन तीनदा ऐकायला मिळाला. त्या काल्पनिक घरातील मालकाच्या मैत्रीसाठी हा संवाद मी दोन तीन वेळा बोलून पाहीन !








वृक्षतोड केवळ भारतातच होत नाही तर स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा होते हे पाहून वास्तवाची जाणीव झाली.  असं असलं तरीही निसर्गासोबत सहजीवन कसं असावं ह्याचा पाठ इथं आपल्याला मिळतो. अजून काश्मीर पाहण्याचा योग आला नाही, परंतु कुलू, मनाली, सिमला पाहिलं. नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत आपली ही स्थळं युरोपियन पर्यटनस्थळांपेक्षा टीचभरसुद्धा कमी नाहीत. किंबहुना काकणभर सरसच आहेत. फक्त कुठंतरी आपण निसर्गाला ओरबाडत आहोत असं वाटत रहातं. 



टिटलिस पर्वत हा उरी आल्प्स पर्वतरांगांचा भाग आहे. समुद्रसपाटीपासून ह्या पर्वताचे शिखर १०६०० फूट उंचावर आहे. इथली केबल कार सुरुवातीच्या कालावधीत ३२६८ फूट उंचीवरील Engelberg ह्या ठिकाणाला Klein Titlis ह्या ९९३४ फूट उंचावरील ठिकाणाशी तीन टप्प्यातील केबल कारने जोडत असे. आता ही केबल कार केवळ दोन टप्प्यातच आहे. 

केबलकार जिथं सुरु होते त्या माउंट टिटलिसच्या पायथ्याच्या भागातील काही चित्रं  ! ह्या पायथ्याच्या भागात सूर्यप्रकाशयुक्त, अत्यंत चैतन्यपूर्ण, काहीसं थंड असं वातावरण होतं.  आमच्या सुदैवानं आज पाऊस नव्हता. जसजसं आम्ही माउंट टिटलिसवर वरती गेलो तसतसं हवामान अजूनच थंड होत गेलं. जर पाऊस सुरु झाला असता तर नक्कीच आमची त्रेधातिरपीट उडाली असती. 







छायाचित्रण सत्र आटोपल्यानंतर आमची केबलकार मध्ये बसण्याची वेळ झाली. प्रत्येकाला एक तिकीट देण्यात आलं होतं. प्रत्येक ठिकाणी टर्नस्टाईलचा अडथळा ओलांडण्यासाठी आवश्यक असणारं हे तिकीट परत खाली येईपर्यंत जपून ठेवणं आवश्यक होतं. 


पहिल्या टप्प्यातील केबलमध्ये प्रत्येक कुपिकेत सहा जणांसाठी आसने होती.  उंचीवर जाताना भोवतालच्या प्रदेशाचा मनोहर नजराणा पहावयास मिळत होता. 

केबलकार हा उंचीवरील ठिकाणांकडे पोहोचण्यासाठी अत्यंत सोयीस्कर असा मार्ग आहे.  परंतु त्यात बसल्यावर जसजसं उंचावर जाऊ तसतसं कुठंतरी भयाची छोटीशी लहर मनात उमटून जाते. शेवटी यंत्रच ते ! त्यासोबत निसर्गाच्या इतक्या निर्मळ रुपाला  खरं तर अबाधित ठेवायला नको का असा प्रश्नसुद्धा मनात येतो.   




हळूहळू हिरव्या रंगाचं प्राबल्य कमी होऊन निळ्या पांढऱ्या रंगांनी त्याची जागा घेतली होती.  जून महिना असल्यानं कमी उंचीवरील बर्फ बहुतांशी वितळला होता. असा करड्या जमिनीने व्यापलेला बर्फ मला काहीसा केविलवाणा वाटतो. बर्फानं कसं एक तर हवेत भुरभुरते असावं किंवा जमिनीला पूर्णपणे व्यापून टाकणारं असावं. 




पहिल्या टप्प्याची केबल कार संपल्यावर आम्ही मोठ्या गोलाकार केबलमध्ये प्रवेश केला. ह्या केबलकारची क्षमता खूपच जास्त म्हणजे पन्नासपेक्षा जास्त लोकांना सामावून घेणारी होती. आमच्या बसमधील सर्व सहप्रवाशांनी त्यात प्रवेश केला. आता आम्ही  खरोखरच उंचावर जाऊ लागलो होतो. बर्फानं कसं असावं ह्याच्या माझ्या मनातील चित्रानुसार असणारा बर्फ सभोवताली दिसू लागला होता. थोड्याच वेळात आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो.  वीणा वर्ल्डतर्फे इथं आम्हांला एक छान आईस्क्रीम देण्यात आलं. इतक्या थंडीत आईस्क्रीम खाणं हे माझ्या तत्वात न बसणारं किंवा खरं सांगायचं झालं तर तब्येतीला न झेपणारं ! पण आईस्क्रीम मनात खूपच प्रलोभन निर्माण करणारं असल्यानं मी ते हळूहळू खाल्लं. गरम चहा थोडा वेळ निवत ठेवला की आपण प्राशन करू शकतो, अगदी थंड आईस्क्रीम सुद्धा काही वेळ बाहेर ठेवलं की ते द्रवरूपात  येतं.  इथं काही सहप्रवाशी लोहा लोहे को काटता हैं ह्या उक्तीची आठवण करून देत थंड आईस्क्रीम पोटात जातात त्याला प्रतिबंधक उष्णता शरीरात निर्माण होऊन बाहेरील थंड हवामानास प्रतिकार करण्यासाठी आपण सज्ज होतो वगैरे सिद्धांत मांडत होते. हल्ली जिथं आपलं पटत नाही तिथं जमेल तितकं गप्प राहायचं ह्या तत्त्वाचा अवलंब करण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यानुसार मी आईस्क्रीम द्रवरूपात येईपर्यंत वाट पाहत राहिलो. 


इथून बाहेर पडल्यानंतर समोर बर्फाच्छादित पर्वतांनी आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं . इतक्या उंचीवर का कोणास ठाऊक पण मन काहीसं भाविक होतं. कदाचित आपल्या हिंदू धर्माच्या शिकवणुकीचा, कैलास पर्वतावरील शंकराच्या वास्तव्याचा कुठंतरी संदर्भ जोडला जातो. आपण हिमालयावर नसून माउंट टिटलिसवर आहोत ह्याच्याशी ह्या भावुकतेला काही देणंघेणं नसतं. 


केबलकार मध्ये बसून इतक्या उंचावर आलो म्हणजे आजच्या दिवसातील धाडसाचा अर्धा भाग पूर्ण झाला अशी मी समजूत करून घेतली होती. उर्वरित अर्धा भाग म्हणजे केबलकारचा परतीचा प्रवास हे ज्यांना वरील विधानातील खोच समजली नाही त्यांच्यासाठी ! 



परंतु बर्फातून पुढं चालत जाताना Ice Fly नावाचा अजून अतिधाडशी प्रकार आपली वाट पाहत आहे ह्याची जाणीव झाली. तिकिटावर ice fly समाविष्ट असं सुस्पष्ट इंग्लिश भाषेत लिहिलं होतं.  ice fly च्या आरंभीच्या भागाचं छायाचित्र. इथं सहा - सहा जणांनी एका बाकड्यावर बसायचं. आपल्याजवळील बॅग्स घट्ट पकडून ठेवायच्या मग वरून येणाऱ्या एका आडव्या दांड्याच्या आणि मारुतीस्तोत्राच्या भरवशावर पुढील प्रवास करायचा असला प्रकार होता. इथं पूर्णपणे हवेत अधांतरी एका बाकड्यावर बसून प्रवास करत असतो. 


ह्या ice fly सहलीची एका जोरदार झटक्यानं सुरुवात झाली. पुढं थोड्या अंतरावर जाऊन हे बाकडं  हवेत थांबलं. त्यानं असं मध्येच इतक्या उंचावर थांबणं खरोखरच आवश्यक आहे का असा प्रश्न साहजिकच आमच्या मनात आला. 
 
ह्या प्रवासातील ही आता बघायला मस्त वाटणारी अशी छायाचित्रं ! ही छायाचित्रं बाकीच्या छायाचित्रांइतकी सुस्पष्ट का नाहीत असा प्रश्न चिकित्सक लोकांच्या मनात निर्माण होणार हे जाणून मी इथं स्पष्ट करू इच्छितो की ह्या तुटपुंज्या आडव्या दांड्याच्या भरवशावर आम्ही iPhone बाहेर काढून तो गमाविण्याचा नको तितका धोका घेऊ नये असे सोहमने आम्हांला सुचविलं. ह्यात आर्थिक नुकसानीसोबत त्यातील फोटोंचा बॅकअप न घेतल्यानं आपण ते सुद्धा गमावून बसू ह्याची जाणीव त्यानं करून दिली. ह्यामुळं भविष्यातील ब्लॉग शृंखलेला धोका निर्माण होण्याची शक्यता ध्यानात घेऊन साध्या फोनने पुढील काही फोटो घेण्यात आले आहेत. 


समोरून आलेल्या रिकाम्या बाकड्याचं छायाचित्र. 






ही हवेतील दांडा भरोसे बाकड्यावरील सहल एका फेरीत आटोपेल अशी मी आशा बाळगून होतो. परंतु ह्या लोकांना कामधंदे कमी असावेत.  तिथं त्यांनी हौशी पर्यटकांना छायाचित्रणासाठी एक थांबा बनवला होता. हो ना करता आम्ही तिथं उतरलो. परंतु मला इथली दृश्यं, इथं व्यतित केलेला वेळ सारं काही मनापासून आवडलं. बर्फाच्छादित शिखरांमध्ये निळ्या आकाशाच्या सोबतीनं आपण ज्यावेळी काही क्षण निवांत घालवतो त्यावेळी त्या सर्वशक्तिमान देवांच्या अस्तित्वाची अस्पष्टशी जाणीव कुठंतरी मनाला स्पर्शून जाते. त्यापुढं नतमस्तक व्हावं असं वाटतं. भविष्यात त्यात विलीन होण्याचा क्षण ज्यावेळी येईल त्यावेळी असंच छान वाटावं ! 











इथं व्यवस्थित वेळ घालविल्यानंतर क्रमानं आलेल्या पुढील बाकड्यावर बसून आम्ही परत त्या स्थानकावर उतरलो. इथं अजून एक धाडस आमची वाट पाहत होतं. दोरांच्या जाळीवरून चालत जाऊन दुसऱ्या टोकाला पोहचायचं होतं.  ऑफिसातील टीम बिल्डिंग इव्हेंटमध्ये नाईलाज म्हणून असले प्रकार करण्याची सवय असल्यानं मी ह्या जाळीवर काही वेळ घालवला. 

हे आम्ही काढलेलं छायाचित्र. 


हे माहितीमायाजालावरून घेतलेलं चित्र ! आम्हांला असं निर्मनुष्य दोरखंड मार्गाचं चित्र काढण्याची संधीच मिळाली नाही. तिथं पर्यटक जमिनीवर बसून, दोरखंडाला टेकून चित्र काढत होते. काही अतिउत्साही पर्यटक वेगानं चालत येऊन व्हिडिओ काढत होते. धड चालायला मिळत नव्हतं. ही सर्व कारणं माझ्या सद्सदविवेक बुद्धीला सादर करत ह्या दोरखंड मार्गावरून परतण्याची तिच्याकडून परवानगी मी मिळवली. 






परतीचा केबलकार प्रवास आम्ही लेव्हल १ वर थांबवून तेथील भारतीय उपहारगृहात आम्ही प्रवेश केला. तिथंही वरील उल्लेखलेले तिकीट वापरूनच आत प्रवेश मिळत होता. जेवण खूपच स्वादिष्ट होते. सर्वांची झुंबड टोमॅटो सूपच्या पात्राजवळ झाली होती. मेन कोर्सच्या टेबलजवळ कोणीही नव्हते. मी मुख्य थाळीतील सर्व पदार्थ घेऊन त्यांचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली. टोमॅटो सूपजवळील गर्दी ओसरताच मग मी तिथं गेलो. ही घटना नमूद करण्याचं कारण असं की माझा स्वभाव मनुष्यांच्या एका विशिष्ट प्रकारात मोडतो. मी कार्यालयीन कामातील वक्तशीरपणा, अचूकता वगळता जीवनातील बाकी गोष्टींविषयी फारसा चोखंदळपणा दाखवत नाही. प्रचंड लोकसंख्या, बहुतेक माणसांची अत्यंत स्वाभिमानी वृत्ती, काहीसा दुराग्रह  ह्यामुळं सार्वजनिक आयुष्य अधिकाधिक क्लिष्ट होत चाललं आहे. त्यामुळं आपण जमेल तितका लवचिकपणा आपल्या दृष्टीनं खास महत्त्व नसलेल्या गोष्टींच्या बाबतीत दाखवावा असं माझं पूर्णपणे वैयक्तिक मत ! बाकी हे जेवण खूपच स्वादिष्ट होतं.  वेगवेगळ्या क्रमानं पोटात गेलेले टोमॅटो सूप, गाजर हलवा, पावभाजी हे पदार्थ मला तरी चविष्ट वाटले. पोटात त्यांच्यात आगमनाच्या क्रमावरून काही मानापमान झालं असेल तर मला ठाऊक नाही. 

Inclusion ह्या महत्त्वाच्या तत्त्वानुसार ह्या लेव्हलवर सुद्धा छायाचित्रं घेणं उचित ठरणार होतं.  लेव्हल १ वरील छायाचित्रण सत्र आटोपून पुन्हा केबलकारने आम्ही पायथ्याशी आलो.   वर दिसणाऱ्या माउंट टिटलिसला मनोभावे वंदन केलं. आयुष्यभर संस्मरणीय अशा आठवणीबद्दल त्याचं आभार मानून आम्ही लुसर्न शहरातील Lion Monument च्या दिशेनं प्रस्थान केलं. 

हे सिंहाचं स्मारक पाषाणात कोरलेलं एक सुरेखसे शिल्प आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्विस रक्षकांचा निर्घृणपणे नरसंहार करण्यात आला. ह्या रक्षकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेलं हे स्मारक आहे. स्वित्झर्लंडमधील सर्वात सुप्रसिद्ध स्मारक म्हणून गणलं जाणाऱ्या ह्या स्मारकाला दरवर्षी साधारणतः १४ - १५ लाख पर्यटक भेट देतात असा अंदाज आहे. 


त्यानंतर आम्ही प्रसिद्ध अशा लुसर्न तलावासमोर आलो. आमची फेरी साडेचार वाजता होती. त्याआधी आम्ही इथल्या अत्यंत महागडया घड्याळांची विक्री करणाऱ्या दुकानांना भेट दिली. बहुदा Bucherer हे ते दुकान होते. कोट्यवधी रुपये किंमती असणारी ही घड्याळं बघण्यासाठी अत्यंत सुरेख होती. बरीच श्रीमंत माणसं अशा प्रचंड महागड्या घड्याळांची खरेदी एक गुंतवणूक म्हणून करतात. धन्य ती माणसं, धन्य ती घड्याळं ! जिथं आपण काही खरेदी करण्याची सुतराम शक्यता नाही तिथं छायाचित्र घेणं टाळावं हे उत्तम पर्यटकांचे १३६ वे लक्षण आहे असं म्हटलं जातं.  त्यानंतर आम्ही आम्हांला परवडणाऱ्या किंमती असणाऱ्या दुकानांमध्ये स्मृतिचित्रं, चॉकोलेट्सची खरेदी करण्यासाठी गेलो.  स्वित्झर्लंडच्या दुकानात त्यांचं फ्रॅंक हे चलन आणि युरो चलन अशी दोन्ही चलने स्वीकारली जातात, परंतु नाणी मात्र केवळ फ्रॅंकमध्येच दिली जातात. आज स्वित्झर्लंडमधील ह्या प्रवासातील शेवटचा दिवस असल्यानं सर्व फ्रॅंक नाणी संपविण्याकडं आमचा कल होता. उरली तर उरली, त्या निमित्तानं नाणीसंग्रहाच्या छंदाला प्रारंभ करूयात असा सकारात्मक विचार मी केला. 

मी शारीरिकदृष्टया थोडासा पण त्याहून जास्त मानसिकदृष्टया थकलो होतो. त्या दुकानांतील गर्दी पाहून आणि समोर दिसणाऱ्या लुसर्न तलावाचं मनोहर दृश्य पाहून मी एकट्यानं त्या तलावासमोर जाऊन बसण्याचा प्रस्ताव मांडला. मोठ्या मनानं प्राजक्तानं तो मान्य केला. पुढील एक तास मी लुसर्न तलावाचं, भोवताली येणाऱ्या माणसांचं, तलावातील बदकांचं निरीक्षण करत होतो. एका वेगळ्याच शहरात असा अनुभव घेणं हे एक खास होतं. लोक निवांतपणे चालत होती. आईबाबांसोबत चालणारी लहान मुलं अधूनमधुन मला स्मितहास्य देत होती. चिमण्या येऊन दाणे शोधून निघून गेल्या. माझा मानसिक थकवा तरी गायब झाला होता. 




आता वेळ होती लुसर्न तलावातील अविस्मरणीय फेरीची ! हा तलाव एकंदरीत ११४ चौरस किमी क्षेत्रफळ इतक्या विस्तृत परिसरात पसरलेला आहे. ह्या तलावाची सर्वात महत्तम खोली २१४ मीटर इतकी आहे. काही ठिकाणी तलावाच्या काठाला अत्यंत तीव्र चढ असणारे पर्वत १५०० मीटर इतक्या उंचीपर्यंत पोहोचलेले आहेत. अर्थात निळ्याशार पाण्याच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य अत्यंत विहंगम बनतं.  



माहिती मायाजालावरून घेतलेलं लुसर्न तलावाचं एक स्वर्गीय छायाचित्र ! 



बोटीत स्थानिक स्विस कलाकारांनी त्यांच्या पारंपरिक लाकडी वाद्यांनी सादर केलेल्या सुश्राव्य संगीतानं आमचं मनोरंजन केलं. हा एक अविस्मरणीय  अनुभव होता. 


वीणा वर्ल्डतर्फे पर्यटकांना कोक,  बीअर  किंवा रेड वाईन असे पर्याय देण्यात आले. वातावरण अगदी स्वीस किंवा युरोपिअन म्हणतात ना तसे झालं होतं. रेड वाईन ज्यांनी घेतली त्यांना तर प्रत्यक्ष स्वर्गात असल्याचा भास झाला असावा. 



ह्या संपूर्ण फेरीत तलावाच्या भोवताली अत्यंत अप्रतिम अशा वास्तूंचं, पर्वताचं दर्शन होत राहिलं. तलावातील पाणी निर्मळतेची परिसीमा गाठत होतं. 










मन अत्यंत सुखावलं असताना वरच्या डेकवर जाऊन हिंदी गाण्यावर नृत्य करण्याचा नियोजित कार्यक्रम पार पडला. माझ्यासाठी तरी मग साऱ्या वातावरणाच्या रंगाचा बेरंग झाला.  असो आपण भारतीय ह्याच दिशेनं चाललो आहोत. सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. 

बसने हॉटेलवर परतलो.  पुन्हा एकदा भारतीय उपहारगृहातून स्वादिष्ट भोजन मागविण्यात आलं होतं. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर एक फेरफटका मारला. हे हॉटेल सोडण्याआधी इथल्या खोल्यांची तपासणी होणार होती. त्यामुळं प्राजक्तानं दिलेल्या सूचनांचं पालन करत खोलीला चांगल्या स्वरूपात आणण्यासाठी आम्ही धडपडत होतो. 
एका अविस्मरणीय दिवसाचा शेवट झाला होता. 



ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया / माहितीमायाजाल 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 
(क्रमशः )

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...