
२१ जून २०२४
मागील रविवारी स्विस पर्यटनात डॉ. आशुतोष जावडेकर ह्यांना आलेल्या वर्णद्वेषी अनुभवाविषयी त्यांनी लोकरंग सदरात झाकून गेलेलं.. हा एक परखड लेख लिहिला आहे. अनुपने त्याची लिंक पाठवल्यानंतर तो लेख वाचला. हॉटेल सोडताना रूम्सची तपासणी करणं वगैरे प्रकार बहुतेक केवळ आपण भारतीय लोकांबाबतीतच होत असतील असं मानायला वाव आहे. त्यांनी लेखात म्हटल्याप्रमाणं ग्रुप सहलीपेक्षा एकट्या दुकट्या प्रवास करणाऱ्या भारतीयांना हे अनुभव जास्त प्रमाणात येत असावेत.
इटलीत आगमन होताच उष्ण हवामानाचा मुकाबला करावा लागणार हे ओघानं आलंच. ब्रायटनच्या वास्तव्यात Dominic D'orsaneo नावाचा इंग्लिश मित्र कार्यालयात होता. माझी पहिलीच परदेशवारी असल्यानं मला त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असे. इंग्लिश फुटबॉलविषयी मी Development Center मधील प्रत्येक इंग्लिश सहकाऱ्याशी उगाचच चर्चा करण्यासाठी जात असे. ते ही मला बरीच माहिती देत. एकदा डॉमिनिकने मला इंग्लिश आणि इटालियन फुटबॉल खेळाडूंच्या शैलीतील फरक समजावून सांगितला, इंग्लिश खेळाडू बहुतांशी थंड हवामानात खेळत असल्यानं घामामुळं त्यांची दमछाक होत नाही. त्यामुळं छोटे छोटे पास देत ते नव्वद मिनिटं धावत असतात. ह्यात खास ब्रिटिश उपरोधात्मक विनोद शैलीचा वापर करून ते नुसते धावत असतात, गोल मात्र करत नाहीत हे सांगायला तो विसरला नाही. ह्या उलट उष्ण हवामानात खेळत असल्यानं आपली दमछाक होऊ नये ह्यासाठी इटालियन खेळाडूंचा हवेतून लांबवर अचूक पास देण्याकडं भर असतो असं तो म्हणाला. मी भक्तिभावे त्याचं हे विश्लेषण ऐकत असताना त्याच्या चेहऱ्यावरील काहीसे मिश्किल भाव मला जाणवले. खरं खोटं देव आणि डॉमिनिक जाणे!
तीन डोंगरांमधील हॉटेलात झोपण्याचा आजचा पहिलाच प्रसंग. झोप तशी व्यवस्थित लागली. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्यानं काहीजणांनी सकाळी खाली सामायिक कक्षात मोजक्या योगमुद्रा करून ह्या दिनाचं औचित्य साधलं. आम्ही मात्र डोंगरांच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रं काढण्याची संधी साधली. छायाचित्र घेताना मागील पार्श्वभूमीनुसार कशा प्रकारे उभं राहावं ह्याचं प्रशिक्षण पुढील सहलीआधी घेण्याचा गंभीरपणे विचार करावा लागेल असं आता वाटतंय. काहीजण प्रत्येक दिवशी भेट द्यायच्या स्थळानुसार आपल्या वेशभूषेची निवड करतात हे ही ह्या सहलीत ऐकण्यात आलं. ते मात्र बहुदा पुढील जन्मीच शक्य होईल!
आज आम्ही प्रथम इटलीच्या पूर्व भागातील व्हेनिस शहराला भेट देणार होतो. निसर्ग हळूहळू आपलं रूप बदलू लागला होता. स्वित्झर्लंड, ऑस्ट्रियाने अनुभवायला दिलेली हिरव्यागार निसर्गाची मनाला शांत करणारी साथ आता संपणार होती. ह्याची जाणीव असल्यानंच बहुदा सर्वजण खिडकीतून दिसणारं हे निसर्गरूप आपल्या डोळ्यांत, मनात साठवून घेण्यात मग्न होते.


थोड्याच वेळात आम्ही युरोपा ह्या लांबलचक पुलावरून मार्गक्रमण केलं. ह्या पुलाचे माहितीमायाजालावरून घेतलेलं छायाचित्र. आल्प्स पर्वतरांगांमधून जाणारा हा पूल ऑस्टियाच्या पश्चिम भागाला इटलीला जोडणाऱ्या महामार्गावर आहे.
सुरुवातीच्या जवळपास तासभर एका नदीने (बहुदा इन् नदी) आमची साथ दिली. गळ टाकून इथं दिवसभर बसावं अशी इच्छा आपसूकच मनात निर्माण झाली. अर्थात गळ टाकून मासेमारी कशी करतात ह्याविषयी प्राथमिक ज्ञान सुद्धा नसल्यानं असा विचार केवळ ह्या पोस्टमध्ये लिहिण्यापुरता ठीक आहे. जसजसा निसर्ग आपलं हिरवं रूप झटकून देत होता तसतसं माझ्या लिहिण्यात सुद्धा वास्तवाची जाण येऊ लागली आहे.

पुन्हा एकदा इतक्या सगळ्या गोमातांना एकत्र पाहून त्यांचं छायाचित्र घेण्याचा मोह आवरला नाही.



काही वेळानंतर आम्ही इटलीमध्ये प्रवेश केला. जेव्हा जेव्हा देश बदलला जात असे तेव्हा तेव्हा जॅक मनोभावे बस बाजूला थांबवून टॅकोमीटरमध्ये नवीन देशाची नोंद करत असे. इटलीत प्रवेश केल्यानंतर द्राक्षांच्या बागा सातत्यानं दिसू लागल्या. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या दिवशी Holiday in the Vineyards हा एक सुंदर चित्रपट पाहताना पुन्हा एकदा ह्या द्राक्षांच्या बागांची आठवण झाली. काही बागांना कुंपणं घालण्यात आली होती, ज्यांत महामार्गावरील आवाजाचा पलीकडील असलेल्या वस्तीला होऊ शकणारा त्रास मर्यादित व्हावा असं तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं.
द्राक्षांच्या बागांसोबत हिरव्या सफरचंदाच्या बागासुद्धा दिसू लागल्या. लाल सफरचंदाला लाल रंग प्राप्त होण्याआधी ते हिरवं असू शकतं, पण हिरवं सफरचंद मात्र सदैव हिरवंच असतं - ही झाली माझी समजूत. म्हणजेच जर का तुम्हांला हिरवं सफरचंद दिसलं तर त्याच्या भविष्यातील रंगाविषयी दोन शक्यता असू शकतात हे ध्यानात घ्या. परंतु सत्तरीतही चौकसबुद्धी शाबूत असलेल्या आमच्या एका सहप्रवाशांनी ह्या विषयावरून संदीपभाईंचे डोके खाल्लं. मुलांना ज्या काही शंका असतील त्या लहानपणीच विचारू द्याव्यात नाहीतर मग असा काहीतरी उगाचच दुसऱ्यांना त्रास होतो.



दुपारच्या भोजनासाठी आम्ही पडोवा ह्या शहरात पोहोचलो. अनेक वेळा मार्गात ट्रॅफिक सर्कल किंवा Roundabout येत असे. इथं असताना जॅकने बऱ्याच वेळा आम्हांला गोल गोल फिरविले. गंतव्य मार्ग समोर दिसत असताना देखील जॅक आम्हांला लांबवर फिरवून परत त्या ठिकाणी आणून मगच इच्छित मार्गानं प्रस्थान करत असे. हे नक्की का होत आहे ह्याचं कोडं आम्हांला शेवटपर्यंत उलगडलं नाही.
इथं घराभोवती संत्र्याची झाडं होती. पण ही खाण्यायोग्य नाहीत असं आम्हांला अतुलने सांगितलं. हवामान उष्ण असल्यानं आपल्या देशातील फळाफुलांशी साधर्म्य दिसणारी फळफुलं दिसू लागली होती. बहुदा सहल संपत आल्यानं भारतात परतण्यासाठी आमची मानसिक तयारी वीणा वर्ल्ड करत होतं. झुरिचमध्ये असताना आम्हांला केसरीचा एक समूह भेटला होता. त्यांनी इटलीपासून प्रारंभ करत फ्रान्समध्ये सहलीचा शेवट करणारी सहल निवडली होती.



रंगोली ह्या उपहारगृहातील जेवण रुचकर होते. अर्थात एव्हाना ह्या जेवणांमध्ये तोचतोचपणा येऊ लागला होता. हल्ली बहुतांश वेळा भारतीय उपहारगृहांमध्ये ग्रेव्ही (रस्सा) हा एका धाटणीचा असतो. मुख्य डिशला नांव काहीही असो त्या एकाच प्रकारच्या ग्रेव्हीमुळे म्हणतात तो व्वा (Wow) घटक अभावानंच जाणवतो. जडावलेल्या देहांनी आम्ही परत बसमध्ये स्थानापन्न झालो. आता वाटचाल व्हेनिसच्या दिशेनं सुरु झाली. व्हेनिस हे एड्रियाटिक समुद्रातील शंभराहून अधिक बेटांच्या समूहावर वसविलेले शहर आहे. इथं बहुतांशी कालव्याच्या माध्यमातूनच वाहतूक होते, रस्ते जवळजवळ नाहीतच. आगमनानंतर आम्ही प्रथम व्हॅपोरेत्तो (Vaporetto) ह्या वॉटरबसद्वारे मुख्य व्हेनिस बेटावर पोहोचलो. ह्या प्रवासात आजूबाजूने जाणाऱ्या इतर मोठ्या बोटी सुद्धा दिसत होत्या. इथं हळूहळू पाण्याला अप्रिय गंध येण्यास सुरुवात झाली होती.
बहुदा आमच्याच बोटीनं उडवलेले जलतुषार !

आता वेळ होती ती व्हेनिस बेटावरील पदयात्रेची! आम्हांला इथं आमची स्थानिक इटालियन मार्गदर्शक भेटली. सर्व देशांत स्थानिक मार्गदर्शक घेणं बंधनकारक आहे. ह्यातील काही खरोखरंच आपल्या देशाच्या इतिहासातील जाणकार होते तर काही नुसतेच हसत वरवरची माहिती देत वेळ मारून नेत होते. ह्या भागात खास करून ब्रिज ऑफ साय (Bridge Of Sighs) च्या परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट असतो, त्यामुळं आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असं तिनं आणि अतुलने आम्हांला बजावून सांगितलं. Bridge Of Sigh हा Baroque स्थापत्यपद्धतीनं चुनखडीपासून बनविलेला पूल असून तो रिओ द पलाझो (Rio di Palazzo) ह्या नदीसदृश्य पाण्याच्या प्रवाहावरून जातो. हा पूल डोजेच्या राजवाड्यातील (Doge's Palace) चौकशीकक्ष आणि नवीन तुरुंग ह्यांना जोडतो. डोजेचा राजवाडा हा वेनेटियन गॉथिक पद्धतीनं बांधला गेलेला असून व्हेनिसच्या डोजेचे हे निवासस्थान होते. ह्यातील काही माहिती इटालियन मार्गदर्शिकेने दिलेली तर काही माहिती मायाजालावरील. ही माहिती देण्यामागं मला ह्या इतिहासाची आवड वगैरे आहे असा काही प्रकार नसून अशी अगम्य माहिती देऊन वाचकांना थोडाफार त्रास देणे हा छुपा हेतू आहे.

.jpg)
संत मार्क चौक ज्याला पियाझ्झा सॅन मार्को (Piazza San Marco) ह्या नावानं सुद्धा ओळखलं जातं हा व्हेनिसमधील सुप्रसिद्ध असा सार्वजनिक चौक आहे. ह्या चौकाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. इटालियन - बायझंटिन (Byzantine) स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून हा चौक ओळखला जातो. ह्या चौकात, पदयात्रेत घेतलेली काही छायाचित्रं !
व्हेनिस शहरात येण्यासाठी जे मुख्य कारण होते त्या गोंडोला फेरीची आता वेळ झाली होती. संत मार्क चौकात काही वेळ छायाचित्रण केल्यानंतर आम्ही गोंडोला फेरीसाठी निघालो. तिथं मर्यादित अशी रांग असली तरी ती अगदी कूर्मगतीने पुढं सरकत होती. लांबवरूनच ह्या कालव्याच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. ह्या शहरातील सांडपाणी थेट ह्या कालव्यात सोडलं जातं. समुद्राच्या भरती-ओहोटीच्या चक्राचा वापर करून अधूनमधून हे पाणी समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्या प्रयत्नात काही राम नाही हे नक्कीच जाणवत होतं. खरोखरच ह्या गोंडोला बोटफेरीत बसावं की नाही असा विचार मनात येण्याइतक्या तीव्रतेची ही दुर्गंधी होती. हा विचार प्रत्यक्ष कृतीत येण्याआधी आमचा क्रमांक आला.

गोंडोला ह्या सपाट तळाच्या पारंपरिक वेनेटियन (व्हेनिस शहरातील) बोटी आहेत. त्यांच्या नाखव्याला गोंडोलियर असे संबोधिले जाते. गोंडोला बोटी अकराव्या शतकापासून व्हेनिस शहरात वाहतुकीसाठी वापरल्या जातात. सतराव्या , अठराव्या शतकाच्या आसपास ह्या शहरात आठ ते दहा हजार गोंडोला होत्या असं माहितीमायाजाल सांगतं. त्यावर विश्वास ठेवायला जरा कठीणच जात होतं. आता मात्र फक्त चारशेच्या आसपास गोंडोला बोटी आहेत. "मुलगा काय करतो?" ह्या संभाव्य वधुपित्याच्या प्रश्नाला "दोन दोन गोंडोला बोटी आहेत!" हे उत्तर व्हेनिसमध्ये फारसं लोकप्रिय नसावं. पूर्वी व्हेनिस शहरातील वाहतुकीचा मुख्य भार वाहणाऱ्या ह्या बोटी हल्ली प्रामुख्यानं एक पर्यटन आकर्षण म्हणूनच अस्तित्वात आहेत. इथं अर्थातच आम्ही "दो लब्ज़ों की हैं दिल की कहानी " ह्या गाण्यासोबत व्हिडीओ चित्रीकरण केलं. परंतु ह्या चित्रीकरणात माझा अभिनय म्हणावा तितका ठीक न झाल्यानं हा व्हिडिओ इथं वाचकांसमोर सादर करण्यात येणार नाही.
गोंडोला फेरीतून व्हेनिस शहराचा इतिहास जाणून घेण्याची उत्तम संधी मिळते असं म्हणतात. परंतु आमचं लक्ष काही प्रमाणात विचलित झाल्यानं आम्ही त्या बाबतीत फारसा रस दाखवला नाही. एकदाची ही फेरी आटोपली. परत उतरल्यावर पुन्हा चार ते पाच पूल पार पाडून आम्ही व्हॅपोरेत्तो बोटीच्या धक्क्यांजवळ पोहोचलो. इथं तर आम्हांला आईस्क्रीम देण्यात आलं नसतं तर आम्ही तक्रार नोंदवली असती. आम्ही Gilatose आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. आमच्या व्हॅपोरेत्तो बोटीला यायला बराच वेळ असल्यानं सहप्रवासी बॅगांच्या खरेदीत गुंतले. इथं घासाघासीला पूर्ण वाव होता. पंधरा ते वीस युरोच्या माफक (?) दरात काही जणांनी बॅग्स घेतल्या. मला बॅग्समधील काही कळत नाही हे एक दोन अनुभवांवरून समजून चुकल्यानं मी त्या फंदात पडत नाही. एकदाची आमची व्हॅपोरेत्तो बोट आली. परत मुख्य भूभागावर आलो.







सायंकाळचे साडेसहा वाजले होते. सॅन मॅरिनोला पोहोचण्यासाठी तीन साडेतीन तासांचा प्रवास बाकी होता. त्यामुळं आम्ही जरा घाईतच जेवण आटोपलं. जॅकने आधीच बारा तास ड्युटी केल्यानं त्याला बदली म्हणून नवीन चालक आला होता. जॅकने जर बस चालविण्याचा प्रयत्न केला असता तर टॅकोमीटरने बस सुरु होऊ दिली नसती. आम्ही सर्व थकलेले जीव बसमध्ये बसून सॅन मॅरिनोच्या दिशेनं निघालो. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असल्यानं दिनकर आमची किमान नऊ - साडेनऊ पर्यंत साथ देणार होता. संधीप्रकाशात पिवळ्या रंगांच्या छटेचा अधिक प्रभाव असलेल्या शेतांचे बसमधून दिसणारे दर्शन मनोहारी होते. मोठाल्या शेताचं ठिबक सिंचन करण्यासाठी लांबवर उडणारे पाण्याचे तुषार ह्या संधीप्रकाशात खुलून दिसत होते. युरोपचे हे एक वेगळं रूप होतं. रात्री दहाच्या सुमारास आम्ही सॅन मॅरिनो शहराच्या हद्दीत प्रवेश केला. एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर रात्री काहीसं गोव्याची आठवण करून देत होतं. (जणू काही मी गोव्यात रात्री फिरलो आहे !)
हॉटेल ऍडमिरल हे शहराच्या मुख्य भागात वसलेलं आधुनिक सोयींनी युक्त असे हॉटेल आहे.
इथं केवळ दोनच उद्वाहक (ते ही मंदगतीने जाणारे असल्याने) प्रत्यक्ष रूममध्ये प्रवेश करून स्थिरस्थावर होईस्तोवर साडेअकरा होऊन गेले. रूमच्या मागेच थोड्या अंतरावर समुद्रकिनारा होता. बाथरूममध्ये bidets नावाचा काहीसा विचित्र प्रकार आढळला. इटलीमधील वास्तव्यात हा आमची साथ देणार होता.
एकवीस जूनला साजेसा असा आज खूप मोठा दिवस झाला. व्हेनिस शहरातील गोंडोला फेरीसाठी हे खरोखरीच करायची गरज होती का हा विचार मनात आला. मर्यादित वेळ आणि अनाठायी खर्च टाळण्याचा हेतू मनात बाळगून जर तुम्ही युरोपला भेट देण्याचा विचार करत असाल तर व्हेनिस शहर तुम्ही नक्कीच वगळू शकता. बॉलीवूड गाण्यांवर छायाचित्रण करण्याची तुमच्या मनातील खुमखुमी तुम्ही नक्कीच टिटलिसच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर रस्त्यांवर दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे मधील गाण्याच्या साथीनं पूर्ण करू शकता!
ऋणनिर्देश
श्री संदीप पाटील - सहलनोंदी
श्री मनोहर राय - सहलनोंदी
विकिपीडिया / माहितीमायाजाल
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना.
(क्रमशः )
सुंदर माहिती फोटो पण सुंदर
उत्तर द्याहटवा