मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ११- सॅन मॅरिनो

२२ जून २०२४ 

एक आटपाट नगरी होती.  ही नगरी काहीशी डोंगराळ भागात वसली होती.ह्या देशावर राजाराणी राज्य करत होते. सर्व प्रजा सुखानं नांदत होती.  ह्या देशाला सर्व बाजुंनी एका मोठ्या देशानं वेढले होते. ह्या धाटणीची गोष्ट आपण बालपणी वाचली असेलच. गोष्टीचा प्रवास पुढे व्हायचा असेल तर ह्या दोन देशांमध्ये काहीतरी वैमनस्य असायला हवंच.  छोट्या देशाच्या राजाला सैन्य वगैरे घेऊन मोठ्या देशात जंगलातून प्रवेश करायला हवा. थकला भागला राजा घनदाट जंगलातील निळ्याशार पाण्याच्या तळ्याकाठी विश्रांती घेत असताना त्याला एखाद्या सिंहाच्या तावडीत सापडलेल्या मोठ्या राज्याच्या राजकन्येची किंकाळी ऐकू येते.... ही कथा पुढे कधीतरी!

ह्या गोष्टीला साजेशी अशी सॅन मॅरिनो आणि इटलीची गोष्ट!  मरिनो म्हणा, कोणी मारिनो म्हणा किंवा कोणी मॅरिनो म्हणा! आश्चर्याची गोष्ट म्हणजे इटलीने सॅन मॅरिनोला पूर्णपणे वेढलं  असून सुद्धा ह्या दोन्ही देशांचं अगदी व्यवस्थित चाललं आहे. दोन्ही देशातील नागरिक अगदी हसतखेळत एकमेकांच्या देशात प्रवेश करतात,  काही दिवस वास्तव्य करून  पुन्हा आपल्या देशात परत येतात. 

हॉटेल ऍडमिरल मधील स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घेऊन आमची बस आता सॅन मॅरिनोच्या दिशेनं निघणार होती. जॅकला पुन्हा चालकत्व मिळाल्यानं तो खुशीत होता. आपली जबाबदारी संपल्यानं खुशीत असलेल्या एडिन (कालच्या संध्याकाळचा बदली चालक) आणि अतुलचं छायाचित्र !


तुम्हांला एखाद्या काहीशा वेगळ्या धाटणीच्या देशाविषयी माहिती करून घ्यायची असेल तर सॅन मरिनो हे एक उत्तम उदाहरण आहे. हा जगातील फक्त तीन अशा देशांपैकी एक आहे, ज्यांना पूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढले आहे.  (दुसरा देश व्हॅटिकन सिटी ज्याला सुद्धा इटलीने वेढलेले आहे.  लेसोथो हा तिसरा देश ज्याला दक्षिण आफ्रिकेने वेढलेले आहे). व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको नंतर हा युरोपमधील तिसरा सर्वात लहान देश आहे आणि जगातील पाचवा सर्वात लहान देश आहे.  व्हॅटिकन सिटी - इटली, सॅन मॅरिनो - इटली ह्या देशांतील संबंध सौहार्दपूर्ण आहेत, लेसोथो - दक्षिण आफ्रिका संबंधामध्ये दक्षिण आफ्रिका थोडीफार दादागिरी करत असावा असं मानण्यास वाव आहे.   

सॅन मॅरिनोच्या संविधानातील तरतुदीनुसार लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कायदेमंडळ, ग्रँड आणि जनरल कौन्सिल दर सहा महिन्यांनी 'कॅप्टन रीजेंट' म्हणून ओळखले जाणारे दोन राज्यप्रमुख निवडतात. ते एकाच वेळी आणि समान अधिकारांसह सेवा करतात. इथं एकंदरीत सर्व काही सौहार्दपूर्ण कारभार दिसतोय. सॅन मॅरिनो हा भूपरिवेष्टित देश आहे; तथापि, त्याचे ईशान्य टोक एड्रियाटिक किनाऱ्यावरील इटालियन शहर रिमिनीच्या दहा किलोमीटर (सहा मैल) आत आहे. देशाचे राजधानीचे शहर, सॅन मारिनो मॉन्टे टिटानोच्या वर स्थित आहे, तर त्याची सर्वात मोठी वस्ती डोगाना सेर्रावले नगरपालिकेत आहे. सॅन मारिनोची अधिकृत भाषा इटालियन आहे.

सध्याच्या क्रोएशियामधील रब या तत्कालीन रोमन बेटावरील सेंट मारिनस ह्या पाथरवटाच्या (पाथरवट हा व्यवसाय आहे!!) नावावरून या देशाचे नाव पडले आहे. पौराणिक अहवालांनुसार, त्याचा जन्म इसवीसन २७५ साली झाला होता.  लिबर्नियन समुद्री चाच्यांनी रिमीनी शहर बेचिराख  केल्यानंतर ह्या शहराच्या पुनर्बांधणीत सेंट मारिनस ह्यांनी मोलाची भूमिका बजावली. नंतर इसवीसन ३०१ मध्ये मॉन्टे टिटानोवर स्वतंत्र मठ समुदायाची स्थापना केली होती.  अशा प्रकारे, सॅन मारिनो सर्वात जुने विद्यमान सार्वभौम राज्य, तसेच सर्वात जुने घटनात्मक प्रजासत्ताक असल्याचा दावा करते. 

१७९७ साली नेपोलियनच्या सैन्याच्या आगेकुचीमुळे सॅन मारिनोच्या स्वातंत्र्याला एक छोटासा धोका निर्माण झाला.  परंतु देशातील एक रीजंट अँटोनियो ओनोफ्रीने नेपोलियनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि देशाचे स्वातंत्र्य गमावण्याचा धोका टाळला. ओनोफ्रीच्या हस्तक्षेपामुळे, नेपोलियनने, शास्त्रज्ञ आणि फ्रान्स सरकारचे विज्ञान आणि कलेचे कमिशनरी गॅस्पर्ड मोंगे यांना पत्र लिहून, प्रजासत्ताकच्या स्वातंत्र्याची हमी आणि संरक्षण देण्याचे वचन दिले, त्याच्या गरजेनुसार ह्या देशाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव सुद्धा दिला. इतर राज्यांच्या पुनर्वसनवाद्यांकडून भविष्यात सूड उगवला जाईल या भीतीने रीजंट्सनी हा प्रस्ताव फेटाळला. 

एकोणिसाव्या शतकात इटालियन एकीकरण प्रक्रियेतील  नंतरच्या टप्प्यात, सॅन मारिनोने एकीकरणाला पाठिंबा दिल्याने रोष पत्करलेल्या ज्युसेप्पे गॅरिबाल्डी आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यासह  अनेक लोकांना आश्रय दिला. कालांतरानं गॅरिबाल्डीने सॅन मारिनोला स्वतंत्र राहण्याची परवानगी दिली. सॅन मॅरिनो आणि इटलीने १८६२ मध्ये मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली.

मराठी माध्यमातील नववी, दहावी इयत्तेतील इतिहासाच्या पुस्तकातील एखादा पाठ वाचतो आहोत असं तुम्हांला वाटल्यास नवल नाही. सॅन मॅरिनो इटलीमध्ये कसा काय गुण्यागोविंदानं नांदू शकतो असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्यानं थोडीफार माहिती विकिपीडियावर मिळविली त्याचा हा परिणाम !

हॉटेल ऍडमिरल ते सॅन मॅरिनो ह्या प्रवासात सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या इटलीचे दर्शन होत होते. 








सॅन मॅरिनो देशाला वीणा वर्ल्डच्या युरोप सहलीच्या वेळापत्रकात अगदी नुकतंच समाविष्ट करण्यात आलं आहे. आपल्या सहलीत  बारा - तेरा दिवसांत इतके देश समाविष्ट करतो अशी जाहिरात करण्यासाठी सहल कंपनीला सॅन मॅरिनोसारखे इवलेसे देश हातभार लावतात. पर्यटकांच्या दृष्टीनं सुद्धा सॅन मॅरिनोला भेट देणं हा नक्कीच एक वेगळा अनुभव आहे.

इथं आम्ही बराच वेळ चढणीच्या रस्त्यानं चालणार होतो. वृक्षांची छाया सदैव उपलब्ध असेल ह्याची शाश्वती देता येणार नव्हती. त्यामुळं ज्यांना हा तास - दीड तासाचा फेरफटका झेपणार नाही असं वाटत होतं त्यांना बसून राहण्यासाठी  एका कॅफेच्या बाह्यभागात अतुलने सोय करून ठेवली होती. आमची स्थानिक मार्गदर्शक पॅट्रिशिया आमच्या सोबतीला होती. नेहमीप्रमाणं तिनं दिलेल्या माहितीकडं लक्ष देण्याचा माझा कसोशीचा प्रयत्न आरंभीच्या काही मिनिटांतच फोल ठरला. 

ही चढणीची वाटचाल मनोरंजक होती. अनेक चिंचोळ्या मार्गांचे दर्शन होत होते. 


विविध आकर्षक वस्तूंची दुकानं होती. त्यांची छायाचित्रं घेण्याचा मोह आवरला नाही. अचानक एक खऱ्याखुऱ्या बंदुकी, काडतुसांचं दुकान सुद्धा सामोरे आले. त्याचं छायाचित्र घेण्याचं टाळलं असलं तरी एका भयाण वास्तवाची जाणीव मनाला स्पर्शून गेली. 



अगदी काही मिनिटांतच क्रॉसबोमनच्या खाणीचं मनोहारी दर्शन झालं. 


आरंभीच्या काळात खाण म्हणून वापरली गेलेली ही जागा १९६० पासून इटालियन पद्धतीच्या क्रोसबो ह्या आयुधांच्या खेळासाठी वापरली जात आहे.  


दरवर्षी ३ सप्टेंबर रोजी इथं Palio dei Balestrieri हा सण आणि स्पर्धा आयोजित केली जाते.  पुढील वाटचालीत वैविध्यपूर्ण शिल्पं, नजराणे दिसत राहिले. 







थोड्याच वेळात आमचं आगमन Piazza della Libertà ह्या सॅन मॅरिनोच्या मुख्य चौकात झालं. छायाचित्रणासाठी ही एक उत्तम संधी होती. परंतु उन्हात बराच वेळ चालल्यानं चेहऱ्यावरील टवटवीतपणा काही प्रमाणात लोप पावला होता.  इथल्या मुख्य वास्तूला Palazzo Pubblico ह्या नावानं संबोधिले जाते. इटालियन भाषेतून इंग्लिश भाषेत भाषांतर करण्यासाठी हा एक सोपा शब्द आहे. इथं सार्वजनिक समारंभ आयोजिले जातात; त्याचसोबत अधिकृत शासकीय समारंभाचं सुद्धा आयोजन करण्यात येतं. 




बराच वेळ फेरफटका मारून झाल्यावर आम्ही खाली कॅफेमध्ये थांबलेल्या आमच्या सहप्रवाशांना भेटलो. त्याच कॅफेमध्ये आम्ही इटालियन जेवणाचा आस्वाद घेणार होतो. युरोपियन देशांत सुद्धा भारतीय जेवणांचाच सतत आस्वाद (?) घ्यावा लागल्यानंतर आता इटालियन पद्धतीचं जेवण दिलं जाणार ह्या बातमीनं निर्माण झालेली हास्यमुद्रा ! 


इथं थ्री कोर्स जेवण होतं. प्रथम आला तो tortellini पास्ता ! हा बंदिस्त पास्ता असतो. सहसा ह्यात मांसाहारी पदार्थ भरले असले तरी आमच्यासाठी खास शाकाहारी आवृत्ती बनविण्यात आली होती. 


त्यानंतर आलं ते वांगं ! आता हे असं आपल्याला वसई - बोरिवलीत आणून दिलं असतं तर आपण ह्याकडं ढूंकूनसुद्धा पाहिलं नसतं. पण सॅन मॅरिनोमध्ये एक खास इटालियन नव्हे सॅन मॅरियन शेफ आपल्याला हे आणून देतोय ह्या विचारानेच आनंदी होऊन आम्ही हे वांगं खुशीने ग्रहण केलं.  त्यानंतर अमर्यादित पिझ्झा आणून देण्यात आला. परंतु बहुदा तीन स्लाइस नंतर त्यांचा पिझ्झा संपला. पण एकंदरीत एक वेगळा अनुभव !




मुख्य आचारी अगदी हसऱ्या मुद्रेचा होता. सोहमला "त्याच्यासोबत फोटो घे!" अशी मी केलेली विनंती सोहमने थोड्याच वेळात मान्य केली. १९९० सालच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दरम्यान  मी इटालियन फुटबॉल संघाचा आणि खास करून रॉबेर्तो बाजिओचा चाहता होतो. हा शेफ त्याच्यासारखा दिसतोय अशी मनाची समजूत करून मी हे छायाचित्र संग्रही ठेवणार आहे. 


बाकी काही म्हणा ह्या वांगीं समाविष्ट इटालियन जेवणाने पोट काही फारसं भरलं नाही. त्यानंतर बराच वेळ आम्ही इथं दुकानांत खरेदीसाठी भटकलो. माझ्यासारख्या माणसानं सुद्धा इथं थोडीफार खरेदी केली. ह्यावरून इथल्या काही दुकानातील वस्तुंचा भाव खरोखर माफक असावा ! 


आता आम्ही बसमध्ये बसून रोमच्या दिशेनं प्रस्थान केलं. हा साधारणतः  साडेतीनशे किलोमीटर अंतराचा पल्ला होता. ह्या प्रवासात आरंभीच्या काळात ऍंड्रियाटिक समुद्राने आमची साथ दिली. ह्या समुद्राचं पाणी अगदी निळंशार, नितळ होतं. कधी पाण्याच्या दोन तर कधी तीन छटा बसमधून सुद्धा स्पष्ट दिसत होत्या. कोकणात आरे वारे इथं समुद्राच्या अशा छटा दिसल्या होत्या असं प्राजक्ता म्हणाली. मला कोकणातील जेवणाव्यतिरिक्त फारसं काही आठवत नसल्यानं मी मान डोलावली. 



ह्या प्रवासातील दोन व्हिडीओ आणि काही चित्रं !







ऍंड्रियाटिक समुद्र







इटालियन शेती ! 
युरोपातील  थंड भागांना अन्नधान्याचा पुरवठा करायचा म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना मेहनत तर करावी लागणारच !



कापणी केलेल्या शेतांमध्ये शिस्तीनं उभे राहिलेले बाल वृक्ष ! त्यांनाही दररोज न्हाऊ घालून, त्यांचे केस वगैरे विंचरून त्यांच्या मातांनी इथं उभं केलं आहे की काय असा संशय यावा इतकं त्यांचं नीटनेटकं रूप !


रोमच्या जवळ आल्यानंतर दिसलेली काही सुंदर फुलं !



आमचं रोममधील हॉटेल शहराच्या बाह्य भागात होतं. रोम शहराच्या ह्या बाह्य भागाचं  प्रथम दर्शन तरी काही फारसं आकर्षक नव्हतं. 



हॉटेल आणि सायंकाळचे भारतीय हॉटेलमधून मागविलेलं जेवणसुद्धा साधारण दर्जाचं होतं. जेवणानंतर आम्ही फेरफटक्यासाठी बाहेर पडलो. परिसर निसर्गसौंदर्यानं नटलेला नसला तरी सायंकाळच्या वेळची जाणवणारी एक हुरहूर इथंही जाणवत होती. ऐतिहासिक रोम शहरात प्रवेश केल्याचा आनंद एकीकडं मनाला सुखावत होता, त्याचवेळी आता ह्या एका संस्मरणीय सहलीचे केवळ दोनच दिवस बाकी राहिल्याची भावना कुठंतरी चुटपुट निर्माण करत होती. 


ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया / माहितीमायाजाल 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 

(क्रमशः )
 

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग १० - व्हेनिस


२१ जून २०२४ 

मागील रविवारी  स्विस पर्यटनात डॉ. आशुतोष जावडेकर ह्यांना आलेल्या वर्णद्वेषी अनुभवाविषयी त्यांनी लोकरंग सदरात झाकून गेलेलं.. हा एक परखड लेख लिहिला आहे. अनुपने त्याची लिंक पाठवल्यानंतर तो लेख वाचला.  हॉटेल सोडताना रूम्सची तपासणी करणं वगैरे प्रकार बहुतेक केवळ आपण भारतीय लोकांबाबतीतच होत असतील असं मानायला वाव आहे. त्यांनी लेखात म्हटल्याप्रमाणं ग्रुप सहलीपेक्षा एकट्या दुकट्या प्रवास करणाऱ्या भारतीयांना हे अनुभव जास्त प्रमाणात येत असावेत. 

इटलीत आगमन होताच उष्ण हवामानाचा मुकाबला करावा लागणार हे ओघानं आलंच.  ब्रायटनच्या वास्तव्यात Dominic D'orsaneo नावाचा इंग्लिश मित्र कार्यालयात होता. माझी पहिलीच परदेशवारी असल्यानं मला त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं  कुतूहल असे. इंग्लिश फुटबॉलविषयी मी Development Center मधील प्रत्येक इंग्लिश सहकाऱ्याशी उगाचच चर्चा करण्यासाठी जात असे. ते ही मला बरीच माहिती देत. एकदा डॉमिनिकने मला इंग्लिश आणि इटालियन फुटबॉल खेळाडूंच्या शैलीतील फरक समजावून सांगितला, इंग्लिश खेळाडू बहुतांशी थंड हवामानात खेळत असल्यानं घामामुळं त्यांची दमछाक होत नाही. त्यामुळं छोटे छोटे पास देत ते नव्वद मिनिटं धावत असतात. ह्यात खास ब्रिटिश उपरोधात्मक विनोद शैलीचा वापर करून ते नुसते धावत असतात, गोल मात्र करत नाहीत हे सांगायला तो विसरला नाही. ह्या उलट उष्ण हवामानात खेळत असल्यानं आपली दमछाक होऊ नये ह्यासाठी इटालियन खेळाडूंचा हवेतून लांबवर अचूक पास देण्याकडं भर असतो असं तो म्हणाला. मी भक्तिभावे त्याचं हे विश्लेषण ऐकत असताना त्याच्या चेहऱ्यावरील काहीसे मिश्किल भाव मला जाणवले. खरं खोटं देव आणि डॉमिनिक जाणे!


तीन डोंगरांमधील हॉटेलात झोपण्याचा आजचा पहिलाच प्रसंग. झोप तशी व्यवस्थित लागली. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्यानं काहीजणांनी सकाळी खाली सामायिक कक्षात मोजक्या योगमुद्रा करून ह्या दिनाचं औचित्य साधलं. आम्ही मात्र डोंगरांच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रं काढण्याची संधी साधली.  छायाचित्र घेताना मागील पार्श्वभूमीनुसार कशा प्रकारे उभं राहावं ह्याचं प्रशिक्षण पुढील सहलीआधी घेण्याचा गंभीरपणे विचार करावा लागेल असं आता वाटतंय. काहीजण प्रत्येक दिवशी भेट द्यायच्या स्थळानुसार आपल्या वेशभूषेची निवड करतात हे ही ह्या सहलीत ऐकण्यात आलं. ते मात्र बहुदा पुढील जन्मीच शक्य होईल!


आज आम्ही प्रथम इटलीच्या पूर्व भागातील व्हेनिस शहराला भेट देणार होतो. निसर्ग हळूहळू आपलं रूप बदलू लागला होता. स्वित्झर्लंड, ऑस्ट्रियाने अनुभवायला दिलेली  हिरव्यागार निसर्गाची मनाला शांत करणारी साथ आता संपणार होती. ह्याची जाणीव असल्यानंच बहुदा सर्वजण खिडकीतून दिसणारं हे निसर्गरूप आपल्या डोळ्यांत, मनात साठवून घेण्यात मग्न होते. 


थोड्याच वेळात आम्ही युरोपा ह्या लांबलचक पुलावरून मार्गक्रमण केलं. ह्या पुलाचे माहितीमायाजालावरून घेतलेलं छायाचित्र. आल्प्स पर्वतरांगांमधून जाणारा हा पूल ऑस्टियाच्या पश्चिम भागाला इटलीला जोडणाऱ्या महामार्गावर आहे. 



सुरुवातीच्या जवळपास तासभर एका नदीने (बहुदा इन् नदी) आमची साथ दिली. गळ टाकून इथं दिवसभर बसावं अशी इच्छा आपसूकच मनात निर्माण झाली. अर्थात गळ टाकून मासेमारी कशी करतात ह्याविषयी प्राथमिक ज्ञान सुद्धा नसल्यानं असा विचार केवळ ह्या पोस्टमध्ये लिहिण्यापुरता ठीक आहे. जसजसा निसर्ग आपलं हिरवं रूप झटकून देत होता तसतसं माझ्या लिहिण्यात सुद्धा वास्तवाची जाण येऊ लागली आहे. 


पुन्हा एकदा इतक्या सगळ्या गोमातांना एकत्र पाहून त्यांचं छायाचित्र घेण्याचा मोह आवरला नाही. 


काही वेळानंतर आम्ही इटलीमध्ये प्रवेश केला. जेव्हा जेव्हा देश बदलला जात असे तेव्हा तेव्हा जॅक मनोभावे बस बाजूला थांबवून टॅकोमीटरमध्ये नवीन देशाची नोंद करत असे. इटलीत प्रवेश केल्यानंतर द्राक्षांच्या बागा सातत्यानं दिसू लागल्या. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या दिवशी  Holiday in the Vineyards हा एक सुंदर चित्रपट पाहताना पुन्हा एकदा ह्या द्राक्षांच्या बागांची आठवण झाली.  काही बागांना कुंपणं घालण्यात आली होती, ज्यांत महामार्गावरील आवाजाचा पलीकडील असलेल्या वस्तीला होऊ शकणारा त्रास मर्यादित व्हावा असं तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं. 

द्राक्षांच्या बागांसोबत हिरव्या सफरचंदाच्या बागासुद्धा दिसू लागल्या. लाल सफरचंदाला लाल रंग प्राप्त होण्याआधी ते हिरवं असू शकतं, पण हिरवं सफरचंद मात्र सदैव हिरवंच असतं - ही झाली माझी समजूत. म्हणजेच जर का तुम्हांला हिरवं सफरचंद दिसलं तर त्याच्या भविष्यातील रंगाविषयी दोन शक्यता असू शकतात हे ध्यानात घ्या. परंतु सत्तरीतही चौकसबुद्धी शाबूत असलेल्या आमच्या एका सहप्रवाशांनी ह्या विषयावरून संदीपभाईंचे डोके खाल्लं.  मुलांना ज्या काही शंका असतील त्या लहानपणीच विचारू द्याव्यात नाहीतर मग असा काहीतरी उगाचच दुसऱ्यांना त्रास होतो. 






दुपारच्या भोजनासाठी आम्ही पडोवा ह्या शहरात पोहोचलो. अनेक वेळा मार्गात ट्रॅफिक सर्कल किंवा Roundabout येत असे. इथं असताना जॅकने बऱ्याच वेळा आम्हांला गोल गोल फिरविले.  गंतव्य मार्ग समोर दिसत असताना देखील जॅक आम्हांला लांबवर फिरवून परत त्या ठिकाणी आणून मगच इच्छित मार्गानं प्रस्थान करत असे. हे नक्की का होत आहे ह्याचं कोडं आम्हांला शेवटपर्यंत उलगडलं नाही. 



इथं घराभोवती संत्र्याची झाडं होती. पण ही खाण्यायोग्य नाहीत असं आम्हांला अतुलने सांगितलं. हवामान उष्ण असल्यानं आपल्या देशातील फळाफुलांशी साधर्म्य दिसणारी फळफुलं दिसू लागली होती. बहुदा सहल संपत आल्यानं भारतात परतण्यासाठी आमची मानसिक तयारी वीणा वर्ल्ड करत होतं. झुरिचमध्ये असताना आम्हांला केसरीचा एक समूह भेटला होता. त्यांनी इटलीपासून प्रारंभ करत फ्रान्समध्ये सहलीचा शेवट करणारी सहल निवडली होती.  




रंगोली ह्या उपहारगृहातील जेवण रुचकर होते. अर्थात एव्हाना ह्या जेवणांमध्ये तोचतोचपणा येऊ लागला होता. हल्ली बहुतांश वेळा भारतीय उपहारगृहांमध्ये ग्रेव्ही (रस्सा) हा एका धाटणीचा असतो. मुख्य डिशला नांव काहीही असो त्या एकाच प्रकारच्या ग्रेव्हीमुळे म्हणतात तो व्वा (Wow) घटक अभावानंच जाणवतो. जडावलेल्या देहांनी आम्ही परत बसमध्ये स्थानापन्न झालो. आता वाटचाल व्हेनिसच्या दिशेनं सुरु झाली.  व्हेनिस हे एड्रियाटिक समुद्रातील शंभराहून अधिक बेटांच्या समूहावर वसविलेले शहर आहे. इथं बहुतांशी कालव्याच्या माध्यमातूनच वाहतूक होते, रस्ते जवळजवळ नाहीतच. आगमनानंतर आम्ही प्रथम व्हॅपोरेत्तो  (Vaporetto) ह्या वॉटरबसद्वारे मुख्य व्हेनिस बेटावर पोहोचलो. ह्या प्रवासात आजूबाजूने जाणाऱ्या इतर मोठ्या बोटी सुद्धा दिसत होत्या. इथं हळूहळू पाण्याला अप्रिय गंध येण्यास सुरुवात झाली होती. 






बहुदा आमच्याच बोटीनं उडवलेले जलतुषार !



आता वेळ होती ती व्हेनिस बेटावरील पदयात्रेची! आम्हांला इथं आमची स्थानिक इटालियन मार्गदर्शक भेटली. सर्व देशांत स्थानिक मार्गदर्शक घेणं बंधनकारक आहे. ह्यातील काही खरोखरंच आपल्या देशाच्या इतिहासातील जाणकार होते तर काही नुसतेच हसत वरवरची माहिती देत वेळ मारून नेत होते. ह्या भागात खास करून ब्रिज ऑफ साय (Bridge Of Sighs) च्या परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट असतो, त्यामुळं आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असं तिनं आणि अतुलने आम्हांला बजावून सांगितलं.  Bridge Of Sigh हा Baroque स्थापत्यपद्धतीनं चुनखडीपासून बनविलेला पूल असून तो रिओ द पलाझो (Rio di Palazzo) ह्या नदीसदृश्य पाण्याच्या प्रवाहावरून जातो. हा पूल डोजेच्या राजवाड्यातील (Doge's Palace) चौकशीकक्ष आणि नवीन तुरुंग ह्यांना जोडतो. डोजेचा राजवाडा हा वेनेटियन गॉथिक पद्धतीनं बांधला गेलेला असून व्हेनिसच्या डोजेचे हे निवासस्थान होते. ह्यातील काही माहिती इटालियन मार्गदर्शिकेने दिलेली तर काही माहिती मायाजालावरील. ही माहिती देण्यामागं मला ह्या इतिहासाची आवड वगैरे आहे असा काही प्रकार नसून अशी अगम्य माहिती देऊन वाचकांना थोडाफार त्रास देणे हा छुपा हेतू आहे.  




संत मार्क चौक ज्याला पियाझ्झा सॅन मार्को (Piazza San Marco) ह्या नावानं सुद्धा ओळखलं जातं हा व्हेनिसमधील सुप्रसिद्ध असा सार्वजनिक चौक आहे. ह्या चौकाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. इटालियन - बायझंटिन (Byzantine) स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून हा चौक ओळखला जातो.  ह्या चौकात, पदयात्रेत घेतलेली काही छायाचित्रं !










व्हेनिस शहरात येण्यासाठी जे मुख्य कारण होते त्या गोंडोला फेरीची आता वेळ झाली होती. संत मार्क चौकात काही वेळ छायाचित्रण केल्यानंतर आम्ही गोंडोला फेरीसाठी निघालो. तिथं मर्यादित अशी रांग असली तरी ती अगदी कूर्मगतीने पुढं सरकत होती. लांबवरूनच ह्या कालव्याच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. ह्या शहरातील सांडपाणी थेट ह्या कालव्यात सोडलं जातं. समुद्राच्या भरती-ओहोटीच्या चक्राचा वापर करून अधूनमधून हे पाणी समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्या प्रयत्नात काही राम नाही हे नक्कीच जाणवत होतं. खरोखरच ह्या गोंडोला बोटफेरीत बसावं की नाही असा विचार मनात येण्याइतक्या तीव्रतेची ही  दुर्गंधी होती. हा विचार प्रत्यक्ष कृतीत येण्याआधी आमचा क्रमांक आला. 


गोंडोला ह्या सपाट तळाच्या पारंपरिक वेनेटियन (व्हेनिस शहरातील) बोटी आहेत. त्यांच्या नाखव्याला गोंडोलियर असे संबोधिले जाते. गोंडोला बोटी अकराव्या शतकापासून व्हेनिस शहरात वाहतुकीसाठी वापरल्या जातात. सतराव्या , अठराव्या शतकाच्या आसपास ह्या शहरात आठ ते दहा हजार गोंडोला होत्या असं माहितीमायाजाल सांगतं. त्यावर विश्वास ठेवायला जरा कठीणच जात होतं. आता मात्र फक्त चारशेच्या आसपास गोंडोला बोटी आहेत. "मुलगा काय करतो?" ह्या संभाव्य वधुपित्याच्या  प्रश्नाला "दोन दोन गोंडोला बोटी आहेत!" हे उत्तर व्हेनिसमध्ये फारसं लोकप्रिय नसावं. पूर्वी व्हेनिस शहरातील वाहतुकीचा मुख्य भार वाहणाऱ्या ह्या बोटी हल्ली प्रामुख्यानं एक पर्यटन आकर्षण म्हणूनच अस्तित्वात आहेत. इथं अर्थातच आम्ही "दो लब्ज़ों की हैं दिल की कहानी " ह्या गाण्यासोबत व्हिडीओ चित्रीकरण केलं. परंतु ह्या चित्रीकरणात माझा अभिनय म्हणावा तितका ठीक न झाल्यानं हा व्हिडिओ इथं वाचकांसमोर सादर करण्यात येणार नाही.

गोंडोला फेरीतून व्हेनिस शहराचा इतिहास जाणून घेण्याची उत्तम संधी मिळते असं म्हणतात. परंतु आमचं लक्ष काही प्रमाणात विचलित झाल्यानं आम्ही त्या बाबतीत फारसा रस दाखवला नाही. एकदाची ही फेरी आटोपली. परत उतरल्यावर पुन्हा चार ते पाच पूल पार पाडून आम्ही व्हॅपोरेत्तो बोटीच्या धक्क्यांजवळ पोहोचलो. इथं तर आम्हांला आईस्क्रीम देण्यात आलं नसतं तर आम्ही तक्रार नोंदवली असती. आम्ही Gilatose आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. आमच्या व्हॅपोरेत्तो बोटीला यायला बराच वेळ असल्यानं सहप्रवासी बॅगांच्या खरेदीत गुंतले. इथं घासाघासीला पूर्ण वाव होता. पंधरा ते वीस युरोच्या माफक (?) दरात काही जणांनी बॅग्स घेतल्या. मला बॅग्समधील काही कळत नाही हे एक दोन अनुभवांवरून समजून चुकल्यानं मी त्या फंदात पडत नाही. एकदाची आमची व्हॅपोरेत्तो बोट आली. परत मुख्य भूभागावर आलो. 













सायंकाळचे साडेसहा वाजले होते.  सॅन मॅरिनोला पोहोचण्यासाठी तीन साडेतीन तासांचा प्रवास बाकी होता. त्यामुळं आम्ही जरा घाईतच जेवण आटोपलं. जॅकने आधीच बारा तास ड्युटी केल्यानं त्याला बदली म्हणून नवीन चालक आला होता. जॅकने जर बस चालविण्याचा प्रयत्न केला असता तर टॅकोमीटरने बस सुरु होऊ दिली नसती. आम्ही सर्व थकलेले जीव बसमध्ये बसून सॅन मॅरिनोच्या दिशेनं निघालो. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असल्यानं दिनकर आमची किमान नऊ - साडेनऊ पर्यंत साथ देणार होता. संधीप्रकाशात पिवळ्या रंगांच्या छटेचा अधिक प्रभाव असलेल्या शेतांचे बसमधून दिसणारे दर्शन मनोहारी होते. मोठाल्या शेताचं ठिबक सिंचन करण्यासाठी लांबवर उडणारे पाण्याचे तुषार ह्या संधीप्रकाशात खुलून दिसत होते. युरोपचे हे एक वेगळं रूप होतं. रात्री दहाच्या सुमारास आम्ही सॅन मॅरिनो शहराच्या हद्दीत प्रवेश केला. एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर रात्री काहीसं गोव्याची आठवण करून देत होतं. (जणू काही मी गोव्यात रात्री फिरलो आहे !)

हॉटेल ऍडमिरल हे शहराच्या मुख्य भागात वसलेलं आधुनिक सोयींनी युक्त असे हॉटेल आहे. 



इथं केवळ दोनच उद्वाहक (ते ही मंदगतीने जाणारे असल्याने) प्रत्यक्ष रूममध्ये प्रवेश करून स्थिरस्थावर होईस्तोवर साडेअकरा होऊन गेले. रूमच्या मागेच थोड्या अंतरावर समुद्रकिनारा होता. बाथरूममध्ये bidets नावाचा काहीसा विचित्र प्रकार आढळला. इटलीमधील वास्तव्यात हा आमची साथ देणार होता. 

एकवीस जूनला साजेसा असा आज खूप मोठा दिवस झाला. व्हेनिस शहरातील गोंडोला फेरीसाठी हे खरोखरीच करायची गरज होती का हा विचार मनात आला. मर्यादित वेळ आणि अनाठायी खर्च टाळण्याचा हेतू मनात बाळगून जर तुम्ही युरोपला भेट देण्याचा विचार करत असाल तर व्हेनिस शहर तुम्ही नक्कीच वगळू शकता. बॉलीवूड गाण्यांवर छायाचित्रण करण्याची तुमच्या मनातील खुमखुमी तुम्ही नक्कीच टिटलिसच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर रस्त्यांवर दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे मधील गाण्याच्या साथीनं पूर्ण करू शकता!

ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया / माहितीमायाजाल 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 

(क्रमशः )

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...