मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २५ मे, २०२०

भव्य तो निसर्ग !

मे महिन्यात आलेला हा सुट्टीचा दिवस ! सोमवारी आलेली ही सुट्टी, ती ही लॉकडाऊनच्या कालावधीतील ! अचानक गवसलेले हे फोटो! आज पाहिलेल्या शेकडो फोटोतील हे मोजके फोटो! ह्या फोटोत का कोणास ठाऊक एक कोणतातरी समान धागा मला जाणवला ! हा धागा शब्दांत तंतोतंत पकडणं कठीणच ! 

बहुसंख्य फोटोत निसर्गाचं एक भव्य रुप सामोरं उभं ! ह्यात रुढार्थानं म्हणायला गेलं तर सौंदर्य असं भरलेलं नाही, तरीही त्यातलं शतप्रतिशत निसर्गपण मनाला भावतं ! कुठंतरी अस्पष्टपणे जाणवुन गेलेलं आपलं छोटेपण मनात एक निनावी भावना निर्माण करुन जाते.  

ह्या पहिल्या फोटोत मला जाणवुन गेलं ते गवताचं विस्कटलेपण ! जिम कॉर्बेट नॅशनल पार्कातील हा फोटो ! इथं काही काळापुर्वी हत्तींचा कळप येऊन गेला असावा की काय असा अंदाज बांधायला मला उगाचच आवडतं! डाव्या कोपऱ्यात फोटोत डोकावणाऱ्या फांदीवर राहिलेल्या मोजक्या पानांच्या मनात कोणते विचार सुरु असतील ह्याचा थोडातरी अंदाज आपणास बांधता आला तर किती बरं होईल असं मला वाटुन जातं !




हे छायाचित्रही साधारणतः सारखंच ! फक्त इथं दुरवर डोकावणारी एक टेकडी ! पौर्णिमेच्या रात्री इथं हरिणांचा कळप ह्या विस्तृत पसरलेल्या गवताळ प्रदेशात कसा मुक्तपणं विहार करत असेल अशी कविकल्पना क्षणभर करावयास आपण मुक्त आहोत ! 


मार्च महिन्यात जवळपास शुष्क होत चाललेल्या नदीचं हे पात्र ! जेव्हा पावसाळ्यात हीच नदी अगदी रौद्र रुप धारण करत असेल तेव्हा तिच्या किनाऱ्याला उभं राहताना सुद्धा किती भय वाटत असणार ! ह्या नदीच्या पात्रात आता निवांत पहुडलेल्या त्या छोट्या दगडांना त्यावेळी नदीचा तो शक्तिशाली प्रवाह किती वेगानं ढकलत असावा ! कदाचित उंच पर्वतराजीतील एका विशाल पाषाणाचे आपल्या जोरदार प्रवाहानं नदीने तुकडे करत त्यांना हे रुप दिलं असणार ! रात्री  ह्याच पाण्याच्या शोधात येणारे वन्य पशु! त्यांची दुनिया एक न्यारी असणार! 


हे चित्र नक्की कुठून घेतलं ते आठवत नाही! परंतु ह्यात त्या डोंगरराईत मनुष्याने केलेली घुसखोरी इंचाइंचात जाणवते !  मनुष्यानं घुसखोरी केली नसती तर हे चित्र कसे दिसले असते ह्याचे कल्पनाचित्र रंगविण्यात मी दंग होतो ! 


दूरदूर पसरलेल्या भातशेतीचे हे मनोहर चित्र ! माझं लक्ष मात्र उजव्या कोपऱ्यात मनुष्यानं सुरु केलेल्या आणि कदाचित अर्धवट सोडुन दिलेल्या बांधकामाकडं जातं ! ह्या बांधकामातील एखाद्या विटेचे आत्मवृत्त असा निबंध लिहावयास कोणाला तरी उद्युक्त करावं अशी मला मनोमन इच्छा होत आहे !


हे ही सारखंच चित्र ! फक्त कोपऱ्यात दिसणारी एक टुमदार हवेली !त्यातल्या एका खिडकीत बसुन एका थंडीच्या सायंकाळी सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेली ही भातशेती पाहायला किती धमाल येणार ! 


नदीचं हे रोडावलेलं पात्र ! पण सांजवेळी मनात एक हुरहूर निर्माण करणारं! त्या नदीच्या पात्रावर बांधलेला तो एक चित्राला वेगळं रुप प्राप्त करुन देणारा हा पुल ! पावसाळ्यात ह्या नदीचं रौद्र रुप ह्या फारशा मजबुत न वाटणाऱ्या पुलावर उभं राहुन पाहताना मनात नक्की काय भावना निर्माण होतील कोणास ठाऊक ! 




सोमवार, १८ मे, २०२०

सांजशकुन - पाणमाय!



कथा फ्लॅशबॅक स्वरूपातील,  एका मातेने सांगितलेली !आयुष्याच्या सायंकाळी  आपल्या संसाराच्या  बहरलेल्या वेलीकडे अत्यंत समाधानाने पहात असता तिला आपल्या वडिलांनी सांगितलेलं वाक्य आठवतं, "अति सुखाच्या क्षणीच माणसाने सावध राहावे,  कारण माणसाचं पूर्ण सुख दैवाला पहावत नाही!"

मग तिला धाकटा मुलगा आपल्याला अचानक लाभलेल्या श्रीमंतीचे रहस्य विचारतो.  तिनं  या प्रश्नाचे उत्तर देणे आयुष्यभर टाळलेलं असतं. परंतु आज छोटा अगदी हट्टालाच पेटलेला असतो. "मी कोणताही अधर्म ना करता हे सर्वकाही मिळवलं आहे!" हे उत्तर तुला पुरेसं नाही का?  ती छोट्याला अजिजीनं विनविते. परंतु आज छोटा तिचं काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत  नसतो! जर  हे रहस्य तुम्हांला  सांगितले तर कदाचित मला मृत्यूला सामोरं जावं लागेल या सत्याची जाणीव त्या सर्वांना करून देते.  ते ही आम्हांला चालेल ह्या सर्वांच्या एकमुखी उत्तरानं  तिला प्रचंड धक्का बसतो. ज्याच्याबरोबर आयुष्यभर संसार केला त्या नवऱ्याकडूनसुद्धा तिला अनुकूल प्रतिसाद मिळत नाही. अचानक तिच्या मनामध्ये या सर्वांविषयी अलिप्ततेतची भावना दाटून येते! मग एका निर्विकार मनाने ती आपलीआणि पाणमायेची कहाणी सर्वांना ऐकवते. 

पुर्वायुष्यातील अत्यंत गरिबीच्या एका पराकोटीच्या क्षणी तिचा निर्धार ढासळतो. ती विहिरीमध्ये आपला जीव देण्यासाठी पायऱ्या उतरु लागते. अशावेळी तिला भेटते ती पाण्यातील तिची पाणमाय! ही पाणमाय तिची सोन्यांच्या चकत्यांनी तिची ओटी भरते.  मग तिला सापडतो तो समृद्धीचा एक अक्षय ठेवा! त्यानंतर तिच्या कुटुंबाला दिवसेंदिवस  समृद्धीची साथ लाभत जाते. आपलं हे मोठं रहस्य ती सर्वांना सांगते!

पाणमायेने घातलेल्या अटीनुसार ज्या क्षणी तिनं हे रहस्य इतरांना सांगितलं तो तिचा भुतलावरील अंतिम दिवस ठरणार असतो. तिला आपल्या पाणमायेकडे परतणं क्रमप्राप्त असतं. आयुष्यभराचे पाश असे एका क्षणात सोडुन निर्मोही मनानं पाणमायेकडे परतणे तिला अवघड जातं. मग पाणमाय तिची समजुत काढते. ही तुझी एकटीची कहाणी नाही! ही आपल्या संपुर्ण स्त्रीजातीची कहाणी आहे ! कथेचा शेवट होतो तो पुढील वाक्यानं !
मग पाण्याने तिला सर्व बाजुंनी आपुलकीनं स्पर्श केला आणि आपल्यात माहेरी आणलं !

जी. ए. च्या बाकी कथांशी तुलना केली तर ह्या कथेची काठिण्यपातळी थोडी कमीच ! नेहमीप्रमाणं कथेतील पात्र नक्की कशाचं प्रतिक ह्याचा अर्थ लावता येणं सहज नाही!  तरीही  स्त्रीनं कुटुंबाप्रती केलेल्या असीम त्यागाची आणि आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील सदस्यांनी तिच्याप्रती दर्शवलेल्या कृतघ्न मानसिकतेची ही कहाणी आहे ! आता मी हे आत्मविश्वासानं बोलतोय खरं पण जी. ए. ना अभिप्रेत असलेला अर्थ बराचसा वेगळाही असु शकतो !

ही पाणमाय म्हणजे नक्की कोण ? प्रत्येक स्त्रीची पाणमाय वेगवेगळी असु शकते !  मातेच्या, बहिणीच्या, आत्याच्या, मावशीच्या, मामीच्या, मैत्रिणीच्या, शेजारणीच्या कोणत्याही रुपात प्रत्येक स्त्रीला ही पाणमाय भेटु शकते! एक संसार उभा करणं, कोणतीही अपेक्षा न बाळगता आयुष्याच्या सायंकाळपर्यंत तो चालवणं हे एकटीचं काम नव्हे हे साऱ्या पाणमाया जाणुन असतात. एकटीनं हा भर उचलताना कोणत्याही कमकुवत क्षणी स्त्रीने हार मानु नये म्हणुन ह्या पाणमाया तिची साथ निभावतात. प्रत्यक्ष घरात तिच्या भोवताली नसल्या तरी तिच्या एका प्रतिसादात तिच्या वेदनेची आर्तता ह्या पाणमाया शेकडो मैलांवरुनसुद्धा ओळखु शकतात! 

आता ह्या कथेतील भावलेली काही वाक्यं !

ज्या क्षणी छोटा तिला रहस्य सांगण्याचा आग्रह धरतो आणि त्यापायी तिचा जीव गेला तरीही कोणालाही त्याची पर्वा नसणार ह्याची तिला जाणीव होते त्यावेळी - पाहतापाहता प्रत्येकाशी असलेला एकेक अदृश्य धागा तुटून गेला! 

पाणमायेकडे दुसऱ्यांदा परत आल्यावर पाणमाय तिला आपल्या जागेवर बसवुन पुन्हा एकदा कुणाचीतरी बहीण, मुलगी, बायको, आई असा खेळ मांडायला निघुन जाते! हे चक्र असेच चालु राहणार असतं! - हा तुझा काय, माझा काय , सगळ्यांचाच शाप आहे . आमच्याखेरीज त्यांचे क्षणभरही चालत नाही . आम्ही नसलो तर ती माणसे निखाऱ्यावरच्या फटिकाच्या लहरींप्रमाणं फुटतील . पण नंतर मात्र सुख अंगावर येतं आणि  त्या क्षणी मात्र आपण कुणाकुणाला नको होतो ! 

जी. ए. च्या इतर बहुतांश कथांप्रमाणे ही कथा सुद्धा कथेच्या शेवटाला आवर्तनात गुंतून जाते! ही माता आता पाणमायेच्या भुमिकेत शिरते तर पाणमाय ह्या मातेच्या ! जीवनातील विविध भुमिकांच्या आवर्तनांचा खेळ सदैव सुरुच राहणार आहे आणि आपण दैवानं आपल्याला सोपवुन दिलेल्या भूमिकेचं ओझं कदाचित बाळगत असु ! 

शनिवार, १६ मे, २०२०

समाजसेवा




समाजसेवा हे एक व्रत आहे. प्रत्यक्ष समाजसेवा न करता समाजसेवेच्या संबंधित मला जाणवलेल्या काही गोष्टी !

१. एखाद्या व्यक्तीनं समाजसेवेला वाहुन घेण्याची प्राथमिक आणि दुय्यम कारणं वेगवेगळी असतात. निरपेक्ष समाजसेवा ही दुर्मिळ गोष्ट असावी.समाजातील गरजु व्यक्तींना मदत व्हावी हा सर्वांचाच प्राथमिक हेतु असायला हवा आणि बहुतांशी उदाहरणांत तो असतोच. 

२. दुय्यम कारणांची टक्केवारी समाजसेवेच्या शुद्ध हेतुत बाधा निर्माण करते. दुय्यम कारणे वेगवेगळी असु शकतात. इथं ती नमुद करुन मला कोणाचाही रोष ओढवुन घ्यायचा नाही. 

३. प्रत्येक व्यक्तीला समाजसेवेला प्रवृत्त करणाऱ्या दुय्यम कारणांची त्या व्यक्तीची सदसदविवेकबुद्धी त्या व्यक्तीला व्यवस्थित जाणीव करुन देत असते. परंतु ही कारणे खुल्या दिलाने अगदी स्वतःशीच मान्य करण्याचा दिलदारपणा सुद्धा मोजके लोक दाखवु शकतात.  

४. दुय्यम कारणे असणे हे अजिबात वाईट नाही. काही न करता गप्प बसुन राहण्यापेक्षा आपले दुय्यम हेतु साध्य करीत समाजसेवा करणे केव्हाही इष्टच ! 

५. आता एका संवेदनशील मुद्याला स्पर्श करुयात ! प्रत्येकाची समाजसेवा आपलं एक वैशिष्ट्य बाळगुन असते. समाजसेवेचे अनेक गुणधर्म (attribute) असतात. प्रत्येक समाजसेवा ह्यातील काही गुणधर्मांच्या आधारे उजवी ठरते तर काही गुणधर्मांत तिला सुधारणेस वाव असतो. 

६. कोणाच्याही समाजसेवेवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह दुसऱ्या समाजसेवकाने अथवा समाजसेवा न करणाऱ्या व्यक्तीनं टाळावा. प्रत्येक समाजसेवा आपल्या जागी श्रेष्ठ असते. 

७. दुसऱ्याच्या समाजसेवेवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह टाळणे जरी इष्ट असले तरी आपल्या समाजसेवेचे, त्यामागील प्राथमिक, दुय्यम कारणांचे परीक्षण प्रत्येक समाजसेविकेने / सेवकाने ठराविक कालावधीनंतर करत राहणं इष्ट !

८. आपल्या समाजसेवेवर टीका होण्याचे, त्यावर शंका निर्माण करण्याचे प्रसंग अधुनमधुन उदभवतात. अशा वेळी आपल्या कार्यावर विश्वास ठेवणं इष्ट ! आपल्या कार्याला आपल्या वतीनं बोलु द्यावं ! आपल्याला बोलावं लागलंच तर ते पुर्णपणे अधिकृत भाषेत बोलावं !

९. निंदकाचं घर असावं शेजारी ह्या उक्तीतील मतितार्थाप्रमाणं ह्या निंदकाच्या टीकेतील मतितार्थावर लक्ष केंद्रित करुन त्यातुन योग्य ती सुधारणा आपल्या कार्यपद्धतीत करावी ! ही टीका वैयक्तिक पातळीवर न घेण्याचा प्रयत्न करावा ! 

१०.  प्रत्येक गोष्टीप्रमाणं कोणताही समाजसेवक कालबाह्य होण्याची वेळ कधीतरी येतेच. ही वेळ ओळखुन सन्मानानं सामाजिक जीवनातुन निवृत्ती घ्यावी !

शनिवार, २ मे, २०२०

सांजशकुन - भाग १ !


सद्यकाळात घरातुन पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची व्याप्ती व्यवस्थित आहे. आज बऱ्याच दिवसांनी आलेल्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीमुळं वसईच्या घरातील कपाटाची तपासणी केली असता सांजशकुन हे जी. ए. कुलकर्णी ह्यांचं पुस्तक हाती लागलं. त्यातील सत्यकथा ह्या मासिकात १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या अस्तिस्तोत्र आणि १९७० साली प्रसिद्ध झालेल्या पत्रिका ह्या कथांचा मला झालेला बोध ! जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या कथांमध्ये बरंचसं गुढ वातावरण असतं. त्यातील पात्रे ही कोणत्या तरी अद्भुत शक्तीच्या प्रभावाखाली वावरताना आढळतात. त्या कथांमधील विश्वही आपल्या भोवताली असणाऱ्या विश्वापासुन बरंच फारकत घेऊन आपलं वेगळं असं एक अस्तित्व जपते. 

अस्तिस्तोत्र

कथेची सुरुवात होते ती "उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणं वाटणाऱ्या स्वच्छ चकचकीत आभाळाखाली समुद्र स्थिर आहे " ह्या खोलवर अर्थाच्या वाक्यानं ! आभाळाच्या कवटीशी केलेल्या तुलनेशी आपण स्वतःला काहीसं सरावून घेत असतानाच जी. ए. समुद्राकडं वळतात.  प्रत्येक परिच्छेदानंतर ते समुद्राच्या शांततेकडं, स्तब्धतेकडं, निर्ममतेकडं आणि त्यानं बजावलेल्या केवळ निरीक्षकाच्या भूमिकेकडं अंगुलीनिर्देश करीत राहतात. 

समुद्र केवळ शांत आहे, समुद्र केवळ स्तब्ध आहे....  

कथा संपुर्णपणे प्रतीकात्मक विश्वात वावरत राहते. त्यामुळं कवटीमय वाटणारं आकाश, अनासक्त पाणी बाळगणारा समुद्र, त्यातील विक्षिप्त आकृतीचे क्षारांचे खडक, भोवताली पसरलेली रखरखीत वाळु हे सर्व घटक मानवी मर्त्य किंवा त्यापलीकडील जीवनातील ज्ञात / अज्ञात शक्तींचे रुपक असावेत असं सदैव वाटत राहतं. 

त्यानंतर सुरु होते ती एक श्रुंखला ! आभाळ ही एक कवटी, त्यानं आच्छादलेल्या वाळवंटात पसरलेले टेकाड्याएवढ्या कवट्या असलेल्या अतिप्राचीन प्राण्यांचे सांगाडे, त्या कवट्यांचं उन्हानं कोलमडून जाणे, तरीही एका कवटीने तग धरुन राहणे, दुरवरुन आलेल्या एका वृद्धाने ह्या एकमेव कवटीचा सहारा घेणे, कालपरत्वे त्या महाकाय कवटीने सुद्धा धगीपुढे कोलमडुन जाणे. धगीपासुन आपले रक्षण करणाऱ्या त्या कवटीच्या विनाशामुळं त्या वृद्धाचे सुद्धा कोलमडणे. त्याची जगण्याची जिद्द संपताच त्याच्या कवटीच्या सावलीत आलेला कीटक, कालांतरानं त्याचा संपलेला प्रवास आणि त्याच्या शरीराच्या आधाराला आलेली मुंगी ! ही शृंखला जी. ए. इथेच संपवतात ती "कोठेतरी तिच्याहुनही लहान जीवाणू वाट पाहत आहे" ह्या वाक्यानं ! 

संपुर्ण कथेत रंगविलेल्या जीवनाच्या एकमेव चाहुलीचा प्रतीकात्मक पुरावा! त्यानंतर जी. ए. मृत समुद्रातील जीवनाच्या संपुर्णपणे अभावाकडं वळतात. मृत समुद्राच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे! कथा संपते ती "आता समुद्र केवळ आहे !" ह्या वाक्यानं !

एकंदरीत विविध रुपातील मनुष्यजन्माच्या श्रुंखलेतील प्रवास आणि त्यानंतर अस्तित्वात असु शकणाऱ्या मुक्तीचे रुपक असणारा समुद्र ! जो आपले कायमस्वरुपी अस्तित्व बाळगुन असतो!    


पत्रिका

एका प्रासादाच्या विशाल पायऱ्यांपाशी आलेला परंतु आपली स्मृती गमावुन बसलेला हा कथेचा नायक ! प्रथमदर्शी उघडण्यास कठीण परंतु नायकाच्या हळुवार स्पर्शानं सहज उघडणारं प्रासादाचे महाकाय द्वार !प्रासादाच्या अंतर्भागात व्यापुन टाकणारा किट्ट अंधार ! अंधाराला सरावलेली त्याची नजर. त्या प्रासादात कोणी आहे का हे जाणुन घेण्यासाठी त्यानं दिलेल्या अनेक हाका  ! आणि प्रत्युत्तर म्हणुन आलेले केवळ त्याचेच शब्द !  

 मग त्याला दिसलेला अनेक वेटोळी घेतलेला आणि बऱ्याच उंचावर जाणारा एक जिना. त्या जिन्याच्या वरच्या सज्ज्यावर कठड्यावर तेजस्वी कृष्ण्वस्त्रे परिधान केलेली आकृती ! त्या जिन्याची एकेक पायरी ओलांडण्यासाठी त्यानं केलेला कष्टप्रद प्रवास ! शेवटी एकदाचा त्या आकृतीसमोर उभं ठाकून त्यानं माझ्या सादीला तुम्ही उत्तर का नाही दिलंत असा केलेला निकराचा प्रश्न ! त्यावर त्यानं ऐकलेली प्रत्युत्तरे म्हणजे माझीच उत्तरे असा त्या आकृतीने केलेला खुलासा ! त्यानंतर तु उंबरा ओलांडुन मला ती पत्रिका दे आणि मला मुक्त कर ही त्या आकृतीने केलेली विनंतीवजा आज्ञा ! तो उंबरा ओलांडताना सर्पमुखांनी केलेले विषारी फुत्कार ! 

ती पत्रिका त्या आकृतीला सुपूर्द केल्यानंतर त्या आकृतीने मानलेलं आभार आणि त्यासोबत परत जाण्याची धुडकावून लावलेली विनंती ! त्या आकृतीने ती कृष्ण्वस्त्रं ह्याला परिधान करायला लावत तुला मुक्तीसाठी असंच कोणीतरी पत्रिका घेऊन घेण्याची वाट पाहत राहावं लागेल हे सांगणं ! मग त्या व्यक्तीचं निर्भरपणे उंबरा ओलांडून, जिना उतरत, महाद्वार उघडून प्रासादाच्या बाहेर पडणे ! 

आता ह्या नायकाच्या वाट्याला आलेली दीर्घ प्रतीक्षा, ती त्याची पत्रिका घेऊन येणाऱ्या दुसऱ्या कोणाची ! ह्या प्रतिक्षेचा कालावधी किती असणार हे कोणीच सांगु शकणार नाही ! तोवर सहन करावं लागणारं प्रदीर्घ एकटेपण! 

पुन्हा एक प्रतीकात्मक कथा ! बहुदा जन्म-मृत्यू, आत्मा ह्यांच्यातील मनुष्याच्या प्रवासाची ! ह्यातील कोणतं रुपक कसलं ते फक्त जी. ए. च जाणोत !

प्रत्येक कथा केवळ ३-४ पानांची पण समजण्यास प्रचंड वेळ लावणारी ! आणि इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा आपणास समजलेला अर्थ जी. ए. ना अभिप्रेत असलेल्या अर्थाशी अंशतः तरी जुळला असेल ह्याची शाश्वती नाही !

शीर्षक भाग १ जरी असलं तरी हे धाडस सातत्यानं करण्याची हिंमत मी पुन्हा करेनच ह्याची हमी मी सध्यातरी देणार नाही ! 

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

तस्वीर बनाता हुँ !



मधुअण्णा म्हणजेच मधुकर पांडुरंग पाटील ह्यांचा जन्म ५ जुन १९३२ साली झाला. भाऊ आणि आजी ह्यांना चार पुत्र आणि तीन कन्या अशी एकंदरीत सात मुलं ! मोठी आत्या गंगुताई म्हणजेच आमच्या ताईनंतर अण्णा !

अण्णांचे शालेय शिक्षण वसईच्या न्यू इंग्लिश स्कुल शाळेत झाले. शाळेच्या नवीन इमारतीसाठी आम्ही विटा वाहिल्या आहेत असे ते म्हणत असत. भाऊ १९७२ साली निवर्तल्यावर अण्णांनी आमच्या कुटुंबप्रमुखाची जबाबदारी स्वीकारली! घराजवळची वाडी आणि वालीवची शेती ह्या दोन्ही सांभाळण्यासाठी त्यांनी आणि बाबांनी मोठा पुढाकार घेतला. अण्णांनी सुरुवातीला लाकडाच्या विक्रीचा व्यवसाय केला. त्यांची वखार होती. ह्या लाकडाच्या कारभारासाठी त्यांना बऱ्याच वेळी जंगलात जावे लागे. अण्णा हे पानवेलीचा व्यापार करणाऱ्या सोसायटीचे सभासद होते. ही पाने उत्तर भारतात, गुजरातेत विक्रीसाठी जात.  अधुनमधून अण्णा ह्या पानाच्या वसुलीसाठी गुजरातेत, उत्तर भारतात ट्रेनने जात. त्यांचा हा दौरा आठ-आठ किंवा कधी कधी पंधरा दिवसापर्यंत चाले. त्याकाळात फोनचा वापर जवळपास नसल्याने आणि अण्णांकडून पत्र वगैरे लिहिण्याची अपेक्षा बाळगता येत नसल्याने इतके दिवस केवळ फक्त त्यांची वाट बघण्याशिवाय मोठीआईकडे आणि आम्हा सर्वांकडे पर्याय नसे. मग अचानक अण्णा एखाद्या सकाळी परतत. येताना ते बरीच मिठाई वगैरे घेऊन येत असल्याने आम्हां मुलांची खूप मजा होई. ह्या संदर्भातील दाजींनी सांगितलेल्या माहितीनुसार जुन्याघरच्या नानांना पानाच्या व्यवहारासंबंधी उत्तरेकडील लोकांशी संवाद साधण्यासाठी उर्दु शिक्षकाची नेमणुक करण्यात आली होती. 

माझ्या लहानपणी मी मोठी-आई आणि अण्णांकडेच बहुतांश वेळ असायचो. त्या दोघांना माझा खुप लळा होता. ते माझे खूप लाडही करत असत. एकदा अण्णा वाड्याला काही कामानिमित्त गेले असता मी आई, सुपितताई, बंधु बोर्डीला गेलो. अण्णा वाड्याहुन परतल्यावर त्यांना माझी खूप आठवण आली, त्यांनी तडक बोर्डीचा रस्ता गाठला. त्यावेळी मी बहुदा तीन वर्षांचा असेन. मी झोपलेला होतो. पण अण्णांना पाहुन मी लगेचच उठुन त्यांच्यासोबत वसईला परत येण्यासाठी तयार झालो. अण्णा घरातील सर्व लहान मुलांचे खूप लाड करीत. आपल्या सायकलवरुन शाळेतील गेलेल्या घरातील मुलांना आणण्याची जबाबदारी ते स्वखुशीने पार पाडत. 

अण्णांना कुत्रे बाळगायचा म्हटला तर तसा शौक होता आणि म्हटली तर ती गरजसुद्धा होती. चार्ली - ब्राऊनी ही जोडी, मोती हा कुत्रा आणि राणी ही भयंकर आक्रमक कुत्री ही अण्णांनी बाळगलेल्या श्वान मंडळीतील काही उल्लेखनीय नावे! गल्लीत चार्ली - ब्राऊनीचा दरारा होता. अंगणातून मंडळी विचारत, "अहो, कुत्र्यांना बांधलं आहे का?" आणि मगच अंगणात शिरायची हिंमत दाखवीत. अण्णा भल्या पहाटे उठून बऱ्याच वेळा मसूरवाडीत शिपायला जात. अशा अगदी सकाळच्या वेळी अंधारात चार्ली - ब्राऊनीची जोडगोळी अण्णांना साथ देई. वाडीत सापांचे स्थानिक प्रकार जसे की अदिलवट, दिवड वगैरे निघत. ह्या दोघांना अशा जनावरांचा लगेचच सुगावा लागे आणि मग भुंकून - भुंकून ते अशा उपद्रवी प्राण्यांना बेजार करीत आणि निघून जायला परावृत्त करीत. एकदा का वाडीत पोहोचले की ही जोडगोळी मोक्याची जागा पकडून बसून राहत. आणि अण्णांची चाहूल घेत राहत. अण्णांचे काम आटपल की "चला रे!" अशी साद घातली की ही मंडळी तडक उठून घरचा रस्ता पकडीत. ते पुढे आणि अण्णा मागे असा प्रवास चालू राही. मी लहान असताना मी सुद्धा अण्णांबरोबर वाडीत जाई. हा वाडीचा रस्ता अगदी घनदाट झाडीने व्यापलेला असे. अण्णा आपल्या उमेदीच्या काळात शिकारीसाठी जंगलात सुद्धा जात असत. जंगलातुन त्यांनी रानडुक्कर वगैरे प्राण्यांची शिकार करुन आणल्याचं मला अस्पष्टसे आठवते. 

अण्णांना व्यवस्थित राहण्याची फार आवड होती ! कुठेही बाहेर पडण्याआधी ते व्यवस्थित पेहराव केल्याशिवाय बाहेर पडत नसत. रेमंडचे चांगल्या प्रतीचे कापड घेऊन एखाद्या विशिष्ट शिंप्याकडुनच कपडे शिवुन घेण्यासाठी ते फार आग्रही असत. डांगेकडे कपडे शिवण्यासाठी जात असत. अण्णा तलत मेहमूदच्या गायकीचे मोठे शौकीन ! तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती ! जिंदगी देने वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया अशा अनेक तलतच्या तरल स्वरातील असंख्य गाण्याच्या कॅसेट्स त्यांच्याकडे होत्या. जरा सवड मिळाली की आपल्या गॅलरीत बसुन ह्या गाण्याचा आस्वाद घ्यायला त्यांना खुप आवडे! अण्णांना पुर्वी पाइपची आवड होती. परंतु कालांतरानं त्यांनी ह्या सवयींवर नियंत्रण आणलं.

मोठ्याआईने अण्णांना खूप सांभाळले. तिच्या हातच्या स्वयंपाकाची सर दुर्मिळच ! कोणत्याही भाजीत, आमटीत ती अशी काही जादू करते  की खाणारा अगदी तृप्त होऊनच पानावरुन उठला पाहिजे! त्यामुळे अगदी आतापर्यंत सुद्धा अण्णा सर्व काही चवीचे पदार्थ पचवु शकत ! परंतु बऱ्याच सकाळी मात्र सात्विक अशा कणेरीच त्यांच्या दिवसाची सुरुवात होई! त्या सोबत लसणाच्या दोन - तीन पाकळ्या ! मोठी आई अण्णांना सफरचंद, डाळिंब ह्यासारखी फळे व्यवस्थित कापुन, सोलुन आकर्षकरित्या डिशमध्ये मांडुन देत असे !
ह्या दोघांचे सहजीवन एक आदर्श सहजीवन होते ! दोघांचे जरी वादविवाद होत असले तरी त्यांचं एकमेकांवर नितांत प्रेम होते , त्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे  ! 

अण्णांचा वसईत जनसंपर्क दांडगा होता. रस्त्याने जाताना येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मंडळींची ते आपुलकीने चौकशी करीत. त्यांनी आमच्या घराच्या विस्ताराच्या (वरचा मजला) आणि दिदीचे वाडीतील घर बांधण्याच्या कामात मोठा पुढाकार घेतला होता. १९८८ साली वालीवची शेती विकल्यानंतर ढेकाळे इथे चार भावांनी मिळुन शेती घेतली. अण्णा जीप घेऊन ह्या शेतीच्या देखरेखीसाठी दररोज जात असत.अण्णा ह्या काळात जीप चालविण्यास शिकले होते. अण्णांनी भागीदारीत मिठागराचा व्यवसाय केला. प्रकृतीच्या कितीही तक्रारी असल्या तरी मोठ्या जिद्दीनं रिक्षात बसुन कामगारांच्या देखरेखीसाठी मिठागराची फेरी त्यांनी चुकवली नाही. 

अण्णांचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन खूप आशावादी होता. मोठ्याआईच्या भरभक्कम साथीनं गेले काही वर्षे पाय साथ देत नसतानादेखील त्यांनी आपला व्यायाम सुरु ठेवला होता. अगदी गेल्या वर्षीपर्यंत  ते जिना उतरुन वॉकरच्या साहाय्यानं  अंगणात काही फेऱ्या मारत आणि गल्लीतील लोकांची चौकशी करत. 

आज गुड फ्रायडेच्या दिवशी अण्णा आपल्या सर्वांना सोडुन गेले. अण्णांच्या पवित्र स्मृतीला सर्व पाटील कुटुंबीयांतर्फे अभिवादन !

(अण्णांच्या आठवणींवर आधारित ह्या लेखात दाजी, बंधु, माई, सुपित ताई ह्यांनी माहिती दिली आहे. )

बुधवार, २५ मार्च, २०२०

Discovery Time




जगावर येणाऱ्या भयावह संकटाच्या संकल्पनेवर बेतलेले अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. जगाचा शेवट जवळ आला आहे, केवळ नायक, मोजकी मंडळी त्या संकटाचा मुकाबला करत आहेत असं काहीसं चित्र ह्यात रेखाटलं गेलेलं असतं. आज आपण ज्या परिस्थितीत सापडलो आहोत ती परिस्थिती काहीशी ह्या चित्रपटांची आठवण करुन देणारी आहे. 


करोना पुर्वीचे जग !

करोनापुर्वीचे जग काहीसं वेगळं होतं. तुमचा पैसा, तुमची पत ह्याचा तुम्हांला गर्व करता येत असे. पैसे खर्च करुन तुम्ही काहीही विकत घेता येण्याची घमेंड बाळगु शकत होता. निसर्गानं सर्व माणसांना एका पातळीवर निर्माण केलं असलं तरी माणसानं कृत्रिम पातळ्या निर्माण केल्या होत्या. आभासी दुनिया निर्माण करुन त्यात आभासी चलनाद्वारे संपत्ती निर्माण करण्याच्या मागे बहुतांशी मनुष्यजात लागली होती. 

सद्यस्थिती 

आजच्या परिस्थितीत हे सर्व काही नाहीसे झालं आहे. आपला जीव वाचवण्याची काळजी घेणे हा सर्व मानवजातीचा प्राधान्यक्रम झाला आहे. ह्यात राव-रंक सर्वजण एका पातळीवर आले आहेत. 

मनःपुर्वक आभार !

इथं आपल्या सर्वांचा दिनक्रम सुरु ठेवण्यास जी मंडळी हातभार लावत आहेत, त्यांचे मनापासुन आभार मानावेसे वाटतात. किराणामाल दुकानदार, दूधवाला, सफाई कामगार, पोलीस,टोलनाक्यावरील  कर्मचारी हे सर्व कोणाचे तरी पती, मुलगा, पिता आहेतच.  आपण साधं थोडा वेळ बाहेर पडलो तर घरात आल्यावर तातडीनं हात स्वच्छ धुण्याच्या मागे लागतो, अंघोळ करतो. ही मंडळी मात्र दीर्घकाळ बाहेर राहत आहेत ते केवळ आपला दिनक्रम सुरळीत चालु राहावा ह्यासाठी! 

इस्पितळात काम करणारे नर्स, डॉक्टर आणि बाकीचा कर्मचारीवर्ग हे तर अधिक धोकादायक परिस्थितीत कार्य करत आहेत. ज्यांना करोनाची लागण झाली आहे अशा रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात ही मंडळी येत आहेत ते केवळ मास्क, बाकीच्या प्रतिबंधात्मक आवरणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवून ! त्यांच्या स्वाथ्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ईश्वराकडे प्रार्थना! 

दृढ मनोबलाची आवश्यकता 

ह्या करोनाने काही वेगळ्या परिस्थिती निर्माण केल्या आहेत. दहावीच्या एस. एस. सी. बोर्डाचा शेवटचा पेपर बाकी आहे. वर्षभर अभ्यास करुन सतत तणावाखाली राहणाऱ्या मुलांना कधी एकदा आपण ह्या तणावातुन मुक्त होऊ असं झालं असेल. परंतु आता त्यांना परिस्थिती निवळण्याची वाट पाहावी लागणार! ह्या प्रदीर्घ कालावधीनंतर ज्यावेळी पेपर पुन्हा घेतले जातील त्यावेळी अशा परीक्षांसाठी लागणारी मनःस्थिती पुन्हा आणणे कठीण असणार आहे. एस. एस. सी. परीक्षा हे केवळ एक उदाहरण झाले अशा अनेक परीक्षांत मुलं अडकून बसली आहेत. त्यांनी ह्या काळात आपलं मनोधैर्य शाबुत ठेवावं ! ज्यांच्या परीक्षा आटोपल्या आहेत त्यांनासुद्धा घरातच बसावं लागणार आहे! वर्षभराच्या अभ्यासाच्या तणावमुक्तीसाठी ज्या काही योजना आखल्या होत्या त्या सर्वांवर पाणी पडलं आहे ! 

परदेशी शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलेल्या तरुण मुला-मुलींसाठी हा कसोटीचा काळ आहे. आपल्या कुटुंबियांपासुन दुर तर राहावे लागणार आहे त्याचवेळी प्रदीर्घ काळ मोजक्या जागेत आपल्या रूममेट्स सोबत एकत्र राहावे लागणार आहे. 

मोजक्या जागेत एकत्र राहण्याचा प्रसंग एखाद्या कुटुंबासाठीसुद्धा कठीण ठरु शकतो. संवाद,चर्चा काही काळ ठीक असते परंतु प्रदीर्घ चालत राहिल्यास त्याचं परिवर्तन विसंवादात होऊ शकतं. त्यामुळं ह्या काळात कुटुंबाने संवाद कसा साधायचा ह्याविषयी काही मार्गदर्शक तत्वे आखुन घ्यावीत.  आलटुन पालटुन कुटुंबसदस्यांनी संवाद - पर्यवेक्षकाची भुमिका बजावावी. संवाद जराही कटुतेकडे जात असल्याची शक्यता निर्माण झाल्यास टाईमआउट घोषित करावा.

काही कुटुंबांना एकत्र बसुन संवाद करण्याची कदाचित सवयही नसेल. ह्या निमित्तानं जी संवादसंधी निर्माण झाली आहे त्याचा पुरेपूर लाभ उठवावा. एका घरात वेगवेगळी आयुष्य जगणारी अनोळखी माणसे ह्या निमित्तानं एकत्र येऊ शकतात. माझ्या नोकरीधंद्यात  काय घडत आहे, मला ह्या क्षणी कोणत्या गोष्टींविषयी आशावादी वाटत आहे, कोणत्या गोष्टींविषयी असुरक्षितता वाटत आहे इथुन प्रारंभ करावा ! 

नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर आपलं बोलणं कमी झालं आहे. प्रथम फोन कोणी करावा हा इगोचा भाग सर्वप्रथम आडवा येतो. त्याला सरळ बाजुला सारावे. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या मंडळींशी आपण संपर्क गमावलेला असतो तो केवळ वेळ नाही ह्या कारणास्तव ! त्यांचा फोन नंबर चिकाटीनं शोधुन काढुन मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलावं !  

कार्यालयात एकत्र येऊन काम केल्यामुळं संघभावनेस चालना मिळत असे. आता सर्वजण घरुन काम करत असल्यानं केवळ कामासाठी फोन कॉल्स होतात. ह्या रिमोट काम करण्याच्या कार्यपद्धतीत संघभावनेस चालना देण्यासाठी काही नवीन सर्जनशील पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे. लंच अवर ऑन व्हिडिओ कॉल  असं काही थोड्याच दिवसात ऐकायला मिळालं तर आश्चर्यचकित होऊ नकात ! 

एकंदरीतच हा काळ सर्वांसाठी कसोटीचा असणार आहे ! ज्यांचं मनोबल चांगलं आहे अशी मंडळी ह्यातुन सहजपणे तावूनसुलाखून बाहेर निघतील. भविष्यात असले प्रसंग वारंवार येऊ शकतात. त्यामुळं पुढील पिढीला मानसिकदृष्ट्या कणखर बनविणं किती महत्वाचे आहे ह्याची जाणीव करोनाने आपल्या सर्वांना करुन दिली आहे. 

करोनानंतरचे जग !

जग करोनामुक्त कधी होईल हे आजच्या घडीला छातीठोकपणे कोणीच सांगु शकत नाही. किंबहुना करोनाचा प्रभाव कमी झाला तरी त्याची भिती सदैव मनुष्यजातीच्या आसपास राहणारच आहे. सध्याच्या काळात आपल्या वागण्यात करोनाने काहीसा बदल घडवुन आणला आहे. जीवनाच्या अशाश्वततेच्या जाणिवेनं आपल्या सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडलं आहे. 

पण ज्या क्षणी ह्या भयाची तीव्रता काहीशी कमी होईल किंवा पैशाच्या जोरावर करोनापासुन जीव वाचविण्याची हमी माणसाला प्राप्त होईल त्यावेळी माणसांचे वागणं कसे असेल? करोनापुर्वीची मग्रुरी परत त्याच प्रमाणात मनुष्यजातीतील काही लोकांना ग्रासुन टाकेल का?  हल्लीच्या जगाविषयी, त्यातील मनुष्यांविषयी भाबडेपणा बाळगणं फार कठीण आहे. त्यामुळं बहुतांशी मंडळी पुन्हा संपत्तीनिर्मितीच्या मागे लागतील. 

करोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर बरेचसे प्रतिकुल परिणाम होऊ शकतील. ही शक्यता प्रत्यक्षात उतरू शकते ह्याची जाणीव असु द्यात आणि ती प्रत्यक्षात उतरली तर आपल्या बाबतीत जो काही worst case scenario होऊ शकतो ह्याची आधीच अटकळ बांधुन ठेवा, त्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तयारी करा ! केवळ चांगला विचार केल्यानं एखादी वाईट गोष्ट घडायची टळत नाही, पण जर वाईट शक्यतेचा आधीपासुन विचार केला तर त्याचा धक्का कमी बसतो. जगात वाईट गोष्टी अहोरात्र घडत असतात त्यातील काही गोष्टी क्वचितच आपल्या वाट्यालाही येणारच. पण वाईट गोष्टी घडल्यानंतर गगनभरारी घेणाऱ्या लोकांची संख्या कमी नसते हे ही ध्यानात ठेवा ! 

शनिवार, १४ मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - ३



आपण अवेळी विचारलेल्या प्रश्नामुळं आजोबांचे ज्ञानदायी संभाषण अचानक थांबलं ह्याची चुटपुट लागु आजींना लागुन राहिली. तीच चुटपूट घेऊन लागु आजी रात्री झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्या लवकर उठल्या. आकाशवाणीवर मंगल प्रभात हा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरु होता. भल्या पहाटे "घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ! उठी लवकरी वनमाळी " ही शाहीर होनाजी बाळा ह्यांची अमर भुपाळी ऐकुन त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या आपसुकच ओल्या झाल्या. "जुनं ते सोनं" असं पुटपुटतच त्या घराबाहेर पडल्या. 

आसमंतात एक सुखद असा गारवा भरुन राहिला होता. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. लागु आजी प्रसन्न मनानं मंदिराकडील रस्त्यावर चालु लागल्या. 

"गुड मॉर्निंग आजी !" मागुन आवाज आला तशा त्या थांबल्या. 

"सुप्रभात वेदा !" आजींनी सुहास्य मुद्रेनं वेदाला अभिवादन केलं. 

"कशा आहात तुम्ही, आजी?" वेदाने त्यांना विचारलं. 

"मी मजेत आहे ! तू कशी आहेस, जॉगिंग झालं का? " आजी म्हणाल्या. 

"हो, तुम्ही कुठं मंदिरात निघालात का? वेदाने त्यांना विचारलं. 

त्यांची मान होकारार्थक प्रतिसाद देतेय ह्याचा पुसटसा अंदाज येताच "मी सुद्धा येते तुमच्या सोबत !" वेदाने घोषित करुन टाकलं. खरंतर काही वर्षांपुर्वी आजीचे देवळात जाण्याविषयीचे नियम अगदी कडक होते. सकाळची आंघोळ न केलेल्या वेदाला आपल्यासोबत मंदिरात घेऊन जायला त्या कदापि तयार झाल्या नसत्या. पण वयानुसार त्यांच्या स्वभावात बराच फरक पडत चालला होता. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या माणसांसाठी आपल्या नियमांत थोडेफार बदल करण्यास त्या अनुभवानं शिकल्या होत्या. 

देवदर्शन झालं. देवापुढं बराच वेळ डोळे मिटुन नमस्कार करणाऱ्या वेदाला पाहुन पुन्हा एकदा लागु आजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. इतक्या तरुण वयात नवऱ्यासोबत न पटल्याने घटस्फोट घेऊन वेदा एकटी राहत होती. व्यवस्थापनाची पदवी घेतलेली वेदा एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या अधिकारी पदावर होती. आपलं देवदर्शन आटोपलं तसं आजी भिंतीपाशी असलेल्या बाकांवर येऊन बसल्या. मिनिटा दोन मिनिटांनी वेदाही त्यांच्या बाजुला येऊन बसली. का कोणास ठाऊक पण नेहमी उत्साहानं भरलेली वेदा देवळात मात्र अगदी शांत झाली होती. काही वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग अचानक वेदाला न राहवुन तिनं आजींच्या कुशीत आपलं डोकं लपविले. 

"का ग वेडाबाई ! काय झालं ?" आजींनी तिला विचारलं. 

"काही नाही ! -" एका हळव्या क्षणावर मात करत वेदा सावरली होती. 

हिच्याशी आज सविस्तर बोलावंच असा विचार आजींच्या मनात आला. इतक्यात अचानक कालचे आजोबा आजींना दिसले. 

"आजोबा !" आजींनी आपल्या मोकळ्या स्वभावाला  अनुसरुन आजोबांना मोठ्यानं साद दिली. 

"अरे वा तुम्ही आज मंदिरात सकाळीच भेटलात !" आजोबांनी त्यांचे स्वागत केले! 

"या बसा ना इथं ! आजींनी वेदाच्या बाजुला त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली. जणू काही आपण आजोबांना गेले कित्येक वर्षे ओळखत आहोत ह्या थाटात आजीबाईंनी वेदाला आजोबांचा परिचय करुन दिला. आजोबांना वेदाने पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतलेल्या विषयाची बरीच माहिती होती. त्यामुळं त्या दोघांच्या गप्पा बऱ्याच रंगल्या. लागु आजी आपल्या परीनं त्या संभाषणात सहभागी होत होत्या. 

"सर्वतोपरी प्रयत्न करुनसुद्धा सुखाचं माप सर्वांच्या पदरात देव का देत नाही? " वेदाच्या तोंडुन अचानक आलेल्या ह्या  प्रश्नानं आजी जरी दचकल्या तरी आजोबा मात्र स्थितप्रज्ञ होते. 

"तु एक गहन प्रश्न विचारलास मुली ! आपण सर्वांनी आपल्या सुखाच्या झोळ्या इतक्या मोठ्या बनवुन ठेवल्या आहेत की बिचारा भगवंत आपल्या सर्वांसाठी पुरेनासा झाला आहे !" आजोबा उत्तरले. 

"असं नाही हो आजोबा ! माझ्या अगदी किमान माफक अपेक्षा होत्या! त्याच्यासाठी सर्व करिअरचा त्याग करण्याची माझी तयारी होती. पण का कोणास ठाऊक, आमच्या तारा  कधी जुळल्याच नाहीत ! " अचानक स्वतःभोवती घातलेले सर्व बांध झुगारुन देऊन वेदा बोलली. 

"मुली, आपण सर्वांनी आपली आयुष्य ना खुप क्लिष्ट बनवुन ठेवली आहेत ! पुर्वी कसं साधं सोपं असायचं. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी  चांगलं आणि वाईट अशी दोन वर्तुळं बनवलेली असायची. समाजाला तुमच्यासाठी जे काही चांगलं वाटतंय त्या वर्तुळात तुम्हांला सक्तीनं ढकललं जायचं ! वडीलधारी माणसांचा, समाजाचा हा निर्णय पटला नाही तरी सर्वजण स्वीकारत असत. आयुष्य जरी परिपुर्ण नसलं तरी केवळ आपल्या बाबतीतच असं घडत नाहीए, आपल्या सोबत बरेचजण आहेत केवळ ह्या गोष्टीवर सारेजण समाधान मानुन आयुष्य कंठीत करत असत. 

आता ना  चांगलं, वाईट अशी दोनच पर्यायांची वर्तुळं राहिली नाहीत. प्रत्येक निर्णयासाठी आपल्याभोवती  पर्यायांची अनेक वर्तुळं बनली आहेत.  प्रत्येक वर्तुळात चांगलं, वाईट वेगवेगळ्या प्रमाणात वास्तव्य करुन आहे. पुर्वी समाजासाठी ग्राह्य असलेली चांगल्या वाईटाची व्याख्या आता व्यक्तिसापेक्ष बनली आहे. त्यामुळं तुझं बरोबर की माझं ह्याच्या पलीकडं जाऊन एकत्रितपणे आयुष्य व्यतित करण्याची दोघांकडे असलेली इच्छाशक्ती हाच सर्वात महत्वाचा घटक ठरत चालला आहे !" 
आजोबांनी आपलं लांबलचक बोलणं एका दमात सांगुन टाकलं. 

वेदा आणि आजी दोघीही अगदी एकाग्रचित्तानं  त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यांचं बोलणं संपलं तरीही त्यांची भारावलेली अवस्था कायम होती. अचानक वेदाचा फोन वाजला तसं ती फोन घेऊन थोडी बाजुला गेली. आजीची तंद्री काही काळ कायमच होती. एका मिनिटातच वेदा परतली तर आजीला एकटीलाच पाहुन आश्चर्यचकित झाली. 

"आजी! आजोबा कुठं गेले? " वेदाने विचारलं. 

"अगंबाई कुठं गेले असतील ! " आजी दचकल्याच !

काहीवेळानं दोघीही मंदिराबाहेर पडुन इमारतीच्या दिशेनं चालु लागल्या. वेदाशी बोलत असल्या तरी आजीबाईंच्या मनात मात्र आजोबांचे काल आणि आज अचानक नाहीसे होणे हा निव्वळ योगायोग असणं कितपत शक्य आहे ह्यावर विचारमंथन सुरु होते. 

(क्रमशः)

आधीच्या भागांच्या लिंक्स 

भाग पहिला 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post.html

भाग दुसरा 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post_10.html


कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...