मधुअण्णा म्हणजेच मधुकर पांडुरंग पाटील ह्यांचा जन्म ५ जुन १९३२ साली झाला. भाऊ आणि आजी ह्यांना चार पुत्र आणि तीन कन्या अशी एकंदरीत सात मुलं ! मोठी आत्या गंगुताई म्हणजेच आमच्या ताईनंतर अण्णा !
अण्णांचे शालेय शिक्षण वसईच्या न्यू इंग्लिश स्कुल शाळेत झाले. शाळेच्या नवीन इमारतीसाठी आम्ही विटा वाहिल्या आहेत असे ते म्हणत असत. भाऊ १९७२ साली निवर्तल्यावर अण्णांनी आमच्या कुटुंबप्रमुखाची जबाबदारी स्वीकारली! घराजवळची वाडी आणि वालीवची शेती ह्या दोन्ही सांभाळण्यासाठी त्यांनी आणि बाबांनी मोठा पुढाकार घेतला. अण्णांनी सुरुवातीला लाकडाच्या विक्रीचा व्यवसाय केला. त्यांची वखार होती. ह्या लाकडाच्या कारभारासाठी त्यांना बऱ्याच वेळी जंगलात जावे लागे. अण्णा हे पानवेलीचा व्यापार करणाऱ्या सोसायटीचे सभासद होते. ही पाने उत्तर भारतात, गुजरातेत विक्रीसाठी जात. अधुनमधून अण्णा ह्या पानाच्या वसुलीसाठी गुजरातेत, उत्तर भारतात ट्रेनने जात. त्यांचा हा दौरा आठ-आठ किंवा कधी कधी पंधरा दिवसापर्यंत चाले. त्याकाळात फोनचा वापर जवळपास नसल्याने आणि अण्णांकडून पत्र वगैरे लिहिण्याची अपेक्षा बाळगता येत नसल्याने इतके दिवस केवळ फक्त त्यांची वाट बघण्याशिवाय मोठीआईकडे आणि आम्हा सर्वांकडे पर्याय नसे. मग अचानक अण्णा एखाद्या सकाळी परतत. येताना ते बरीच मिठाई वगैरे घेऊन येत असल्याने आम्हां मुलांची खूप मजा होई. ह्या संदर्भातील दाजींनी सांगितलेल्या माहितीनुसार जुन्याघरच्या नानांना पानाच्या व्यवहारासंबंधी उत्तरेकडील लोकांशी संवाद साधण्यासाठी उर्दु शिक्षकाची नेमणुक करण्यात आली होती.
माझ्या लहानपणी मी मोठी-आई आणि अण्णांकडेच बहुतांश वेळ असायचो. त्या दोघांना माझा खुप लळा होता. ते माझे खूप लाडही करत असत. एकदा अण्णा वाड्याला काही कामानिमित्त गेले असता मी आई, सुपितताई, बंधु बोर्डीला गेलो. अण्णा वाड्याहुन परतल्यावर त्यांना माझी खूप आठवण आली, त्यांनी तडक बोर्डीचा रस्ता गाठला. त्यावेळी मी बहुदा तीन वर्षांचा असेन. मी झोपलेला होतो. पण अण्णांना पाहुन मी लगेचच उठुन त्यांच्यासोबत वसईला परत येण्यासाठी तयार झालो. अण्णा घरातील सर्व लहान मुलांचे खूप लाड करीत. आपल्या सायकलवरुन शाळेतील गेलेल्या घरातील मुलांना आणण्याची जबाबदारी ते स्वखुशीने पार पाडत.
अण्णांना कुत्रे बाळगायचा म्हटला तर तसा शौक होता आणि म्हटली तर ती गरजसुद्धा होती. चार्ली - ब्राऊनी ही जोडी, मोती हा कुत्रा आणि राणी ही भयंकर आक्रमक कुत्री ही अण्णांनी बाळगलेल्या श्वान मंडळीतील काही उल्लेखनीय नावे! गल्लीत चार्ली - ब्राऊनीचा दरारा होता. अंगणातून मंडळी विचारत, "अहो, कुत्र्यांना बांधलं आहे का?" आणि मगच अंगणात शिरायची हिंमत दाखवीत. अण्णा भल्या पहाटे उठून बऱ्याच वेळा मसूरवाडीत शिपायला जात. अशा अगदी सकाळच्या वेळी अंधारात चार्ली - ब्राऊनीची जोडगोळी अण्णांना साथ देई. वाडीत सापांचे स्थानिक प्रकार जसे की अदिलवट, दिवड वगैरे निघत. ह्या दोघांना अशा जनावरांचा लगेचच सुगावा लागे आणि मग भुंकून - भुंकून ते अशा उपद्रवी प्राण्यांना बेजार करीत आणि निघून जायला परावृत्त करीत. एकदा का वाडीत पोहोचले की ही जोडगोळी मोक्याची जागा पकडून बसून राहत. आणि अण्णांची चाहूल घेत राहत. अण्णांचे काम आटपल की "चला रे!" अशी साद घातली की ही मंडळी तडक उठून घरचा रस्ता पकडीत. ते पुढे आणि अण्णा मागे असा प्रवास चालू राही. मी लहान असताना मी सुद्धा अण्णांबरोबर वाडीत जाई. हा वाडीचा रस्ता अगदी घनदाट झाडीने व्यापलेला असे. अण्णा आपल्या उमेदीच्या काळात शिकारीसाठी जंगलात सुद्धा जात असत. जंगलातुन त्यांनी रानडुक्कर वगैरे प्राण्यांची शिकार करुन आणल्याचं मला अस्पष्टसे आठवते.
अण्णांना व्यवस्थित राहण्याची फार आवड होती ! कुठेही बाहेर पडण्याआधी ते व्यवस्थित पेहराव केल्याशिवाय बाहेर पडत नसत. रेमंडचे चांगल्या प्रतीचे कापड घेऊन एखाद्या विशिष्ट शिंप्याकडुनच कपडे शिवुन घेण्यासाठी ते फार आग्रही असत. डांगेकडे कपडे शिवण्यासाठी जात असत. अण्णा तलत मेहमूदच्या गायकीचे मोठे शौकीन ! तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती ! जिंदगी देने वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया अशा अनेक तलतच्या तरल स्वरातील असंख्य गाण्याच्या कॅसेट्स त्यांच्याकडे होत्या. जरा सवड मिळाली की आपल्या गॅलरीत बसुन ह्या गाण्याचा आस्वाद घ्यायला त्यांना खुप आवडे! अण्णांना पुर्वी पाइपची आवड होती. परंतु कालांतरानं त्यांनी ह्या सवयींवर नियंत्रण आणलं.
मोठ्याआईने अण्णांना खूप सांभाळले. तिच्या हातच्या स्वयंपाकाची सर दुर्मिळच ! कोणत्याही भाजीत, आमटीत ती अशी काही जादू करते की खाणारा अगदी तृप्त होऊनच पानावरुन उठला पाहिजे! त्यामुळे अगदी आतापर्यंत सुद्धा अण्णा सर्व काही चवीचे पदार्थ पचवु शकत ! परंतु बऱ्याच सकाळी मात्र सात्विक अशा कणेरीच त्यांच्या दिवसाची सुरुवात होई! त्या सोबत लसणाच्या दोन - तीन पाकळ्या ! मोठी आई अण्णांना सफरचंद, डाळिंब ह्यासारखी फळे व्यवस्थित कापुन, सोलुन आकर्षकरित्या डिशमध्ये मां डुन देत असे !
ह्या दोघांचे सहजीवन एक आदर्श सहजीवन होते ! दोघांचे जरी वादविवाद होत असले तरी त्यांचं एकमेकांवर नितांत प्रेम होते , त्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे !
अण्णांचा वसईत जनसंपर्क दांडगा होता. रस्त्याने जाताना येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मंडळींची ते आपुलकीने चौकशी करीत. त्यांनी आमच्या घराच्या विस्ताराच्या (वरचा मजला) आणि दिदीचे वाडीतील घर बांधण्याच्या कामात मोठा पुढाकार घेतला होता. १९८८ साली वालीवची शेती विकल्यानंतर ढेकाळे इथे चार भावांनी मिळुन शेती घेतली. अण्णा जीप घेऊन ह्या शेतीच्या देखरेखीसाठी दररोज जात असत.अण्णा ह्या काळात जीप चालविण्यास शिकले होते. अण्णांनी भागीदारीत मिठागराचा व्यवसाय केला. प्रकृतीच्या कितीही तक्रारी असल्या तरी मोठ्या जिद्दीनं रिक्षात बसुन कामगारांच्या देखरेखीसाठी मिठागराची फेरी त्यांनी चुकवली नाही.
अण्णांचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन खूप आशावादी होता. मोठ्याआईच्या भरभक्कम साथीनं गेले काही वर्षे पाय साथ देत नसतानादेखील त्यांनी आपला व्यायाम सुरु ठेवला होता. अगदी गेल्या वर्षीपर्यंत ते जिना उतरुन वॉकरच्या साहाय्यानं अंगणात काही फेऱ्या मारत आणि गल्लीतील लोकांची चौकशी करत.
आज गुड फ्रायडेच्या दिवशी अण्णा आपल्या सर्वांना सोडुन गेले. अण्णांच्या पवित्र स्मृतीला सर्व पाटील कुटुंबीयांतर्फे अभिवादन !
(अण्णांच्या आठवणींवर आधारित ह्या लेखात दाजी, बंधु, माई, सुपित ताई ह्यांनी माहिती दिली आहे. )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा