मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

लोक काय म्हणतील!




लोक काय म्हणतील ह्याचा विचार करण्यात मागच्या काही पिढ्यांची आयुष्यं गेली. लोक म्हणजे कोणता जनसमुदाय ह्या विषयीच्या संकल्पना त्या वेळी स्पष्ट होत्या. हल्ली बऱ्याचजणांनी नोकरी धंद्यानिमित्त गावं सोडली आणि त्यानंतर लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचं भय बऱ्यापैकी कमी झालं. आता इथं लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मी "लोक काय म्हणतील या गोष्टीचं भय" हा शब्दप्रयोग केला म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की लोकांचं म्हणणं हे बऱ्याच वेळा नवीन पिढीला नकोसं  किंवा बंधनकारक असं असु शकतं. 


बऱ्याच वेळा जुने लोक नवीन पिढी परंपरांचे कसे पालन करत आहे याविषयी आपली मते नोंदवत असत / असतात. जुन्या लोकांनी आपल्या नवीन पिढीकडून असलेल्या परंपरापालनाच्या अपेक्षांची पातळी केव्हाही शिथिल केली नाही. त्यामुळे नवीन पिढी ही या परीक्षणास यशस्वीरित्या सामोरे जाण्याची शक्यता तशी कमीच होती. त्यामुळे प्रयत्न करुन सुद्धा जर मी अयशस्वी होणार असेल आणि या जुन्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकणार नसेन तर त्यापेक्षा प्रयत्नच न केलेला बरा या निष्कर्षापर्यंत नवीन पिढीतील काही लोकं येऊन पोहोचली! त्यानंतर काहीजणांना गावाबाहेर आपले दुसरे विश्व निर्माण करण्यात यश मिळाले आणि त्यांचा हळूहळू आपल्या मूळ विश्वाशी किंवा मूळ लोकांशी संपर्क कमी झाला किंवा संपुष्टात आला. 

इथं एक फरक ध्यानात घेण्यासारखा आहे तो म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या लोक या समूहात कोणत्या व्यक्तींचा समावेश करावा हे आपल्या हाती नसतं. त्यामुळे कौतुक करणारे, टीका करणारे अशा सर्व प्रकारच्या व्यक्ती या लोक या समूहात समाविष्ट व्हायच्या.  त्यातील टीका करणाऱ्या व्यक्तींचा समूह त्यांच्या टिप्पणीमुळे त्रासदायक ठरत असल्याने
नवीन पिढीतील काही जणांनी हा घटक आपल्याभोवताली जे काही नवीन लोक जमवले त्यावेळी लक्षात घेतला. टीकाटिप्पणी करणाऱ्या व्यक्तींना नवीन लोकसमुहात स्थान मिळाले नाही. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वातील त्रुटी जाणवून देणाऱ्या फुकटच्या सल्लागारांची उणीव नवीन पिढीला जाणवू लागली. 

अजून एक मुद्दा हा स्थायित्वाविषयीचा! पूर्वीच्या व्याख्येतील लोक ही एक सामुदायिक विचारधारा असायची! आता ही विचारधारा गेल्या किती पिढ्यांच्या अनुभवातून तावून-सुलाखून निघून बनली गेली आहे हा विचार करणेसुद्धा महत्त्वाचे आहे.  साधारणतः सध्याच्या मराठी कुटुंबातील वंशावळीचा इतिहास पाहता ही विचारधारा मागील दोनशे वर्षात बनली गेली आहे असे मानण्यास वाव आहे. अर्थात याला सन्माननीय अपवाद असू शकतात. आता लोक या  संज्ञेच्या पारंपारिक व्याख्येमध्ये विशिष्ट व्यक्ती अभिप्रेत नसून काही विशिष्ट भूमिका अभिप्रेत असतात.  वेगवेगळ्या व्यक्ती काळानुसार या भूमिकांमध्ये शिरत असतात आणि आपली वेळ संपताच एक तर दुसऱ्या भूमिकेत शिरतात किंवा काळाच्या पडद्यामागे जातात. ह्या गोष्टीमुळं वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक सामूहिक ज्ञानाचा आपल्याला लाभ होऊ शकतो. 
फक्त आपल्यामध्ये काही कठीण टिप्पणी सहन करण्याचे संयम असावा.  याउलट आपण आपल्याला अनुकूल असा ज्या व्यक्तींच्या समूह आपल्या भोवताली गोळा करतो आणि ज्यांना आपण आपली नवीन लोक बनवतो हा व्यक्ती समूह काहीसा अस्थायी स्वरूपाचा असतो. तुमची नोकरीची ठिकाणे बदलली तर ही लोकं तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात.  इतकंच काय तर जर तुमचं सोशल स्टेटस बदललं तरीही ही यातील काही व्यक्ती तुमच्या लोक या व्याख्येत समाविष्ट होण्यास चक्क नकार देऊ शकतात. त्यामुळे ह्या आपणच बनवलेल्या लोक या व्यक्ती समूहाविषयी जास्त अपेक्षा अगदी सुरुवातीलाच ठेवू नयेत.  ह्या नवीन लोक समूहाचा एक फायदा मात्र असा आहे की भवतालच्या व्यावसायिक विश्वातील घडामोडींविषयी या समूहातून आपल्याला ज्ञान मिळण्याची शक्यता जास्त असते. 


सारांश असा की तुमच्या गावाचा किंवा कुटुंबांचा वर्षानुवर्षे चालत आलेला लोक म्हणून जो काही व्यक्ती समूह आहे त्यामध्ये वयाच्या विशिष्ट टप्प्यावर तुम्ही सहभागी होणे इष्ट आहे. आपल्या माहितीचा, आपण जमा केलेल्या ज्ञानाचा या लोक समूहात शिरकाव करुन  या लोकसमूहाचे आणि त्या समुहाच्या विचारधारेचे कालानुरूप परिवर्तन करणे इष्ट राहील. कोणास ठाऊक परिवर्तित केलेला हा परंपरागत लोकसमूह नवीन पिढीला कदाचित आकर्षित करू शकेल!




शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

चला रन आऊट होऊ या!!



स्थळ:  लाहोर (पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड हेडक्वॉर्टर्स 

बैठकीचा मसुदा: अबुधाबी इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजहर अली ज्या पद्धतीने धावबाद झाला त्याची चौकशी!!

बैठकीस सुरुवात होते. 

पाकिस्तान बोर्ड अध्यक्ष: -  "इन्शा अल्ला! अबुधाबी येथे १८ ऑक्टोबर २०१८ रोजी जे काही घडलं त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटची सर्वत्र नाचक्की झाली आहे!! जगभरातील क्रिकेट रसिक हास्यरसात डुंबून गेले आहेत. 

अशा या अयोग्य कारणासाठी पाकिस्तानी क्रिकेटला प्रकाश झोतात आणणाऱ्या अजहर आली आणि असद शफिक,  तुम्हां दोघांना इथं काही प्रश्न विचारले जाणार आहेत.  
तुम्ही आपआपल्या सद्सदविवेक बुद्धीला जागृत राहून या प्रश्नांची उत्तरे द्यावीत"

अजहर आणि असत दोघेही माना डोलावतात!

अध्यक्ष: -  "पहिला प्रश्न,  तुम्ही दोघे पीचच्या मध्यभागी राहून नक्की कसली चर्चा करीत होतात?"

अजहर:  "चेंडू ज्याप्रकारे स्विंग झाला आणि माझ्या बॅटची कड घेऊन गल्लीच्या क्षेत्ररक्षकाला चुकवून थर्ड मॅनच्या दिशेने गेला त्याबद्दल आम्ही दोघे आश्चर्य व्यक्त करीत होतो!! आम्ही दोघे मिळून १३० कसोटी सामने खेळलो आहोत आणि नऊ हजारच्या वर धावा जमवल्या आहेत! परंतु आत्तापर्यंत अबुधाबीसारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात कसोटी सामन्याच्या केवळ तिसऱ्या दिवशी सकाळी चेंडू इतका स्विंग होऊ शकतो ही अशक्यप्राय गोष्ट आहे मिलॉर्ड!!!"

अध्यक्ष : (वैतागुन)  इथं मिलॉर्ड वगैरे कोण नाही! मी बसलो आहे! तुमचा अध्यक्ष!! 

दोघेही चपापतात!! इतक्यात तिथे उपस्थित असलेल्या डोळ्याचा डॉक्टर हात वरती करतो!!

डोळ्याचा डॉक्टर : - "मी सुद्धा तेच म्हणु इच्छित आहे  सर!! ते दोघे स्विंगची वगैरे चौकशी करीत नव्हते.  अजहरने फटका मारला.  परंतु असदच्या डोळ्यांच्या क्षमतेविषयी मला सुरुवातीपासूनच शंका आहे!! त्याला दूरवरचे सोडा, पण जवळचे सुद्धा दिसत नाही!! ही सर्व मंडळी रात्री बॉलीवूड चित्रपट पाहत असतात,  त्यावेळी हा असद टीव्हीच्या अत्यंत जवळ जाऊन मोठ्या रसिकतेने हिंदी चित्रपट पाहत असतो!! त्यामुळे त्याची दृष्टी अधिकच खराब झाली आहे!! 

"खामोश" अध्यक्ष अत्यंत रागाने ओरडतात. ह्यात आपल्याला नवीन बॉलीवूड सिनेमे पाहता येत नाहीत पण ही मंडळी मात्र खुलेआम पाहतात ह्याचाच विशाद जास्त होता!

तितक्यात अजून एक व्यक्ती हात वरती करते.  ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पाकिस्तान संघाचा व्यवस्थापक असतो!

व्यवस्थापक : "सर यामध्ये एक गंभीर मुद्दा आहे! संघाच्या बैठकीमध्ये सर्व खेळाडूंना आपली मतं मांडण्याची संधी दिली जात नाही.  त्यामुळे एकमेकांशी चर्चा करण्यासाठी ते मिळेल त्या संधीची वाट पाहत असतात!आणि त्यामुळे असे हास्यास्पद प्रसंग उद्भवतात. 

पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराजची मुद्रा पहाण्यासारखी होते दोन-तीन अपशब्द उदगारून तो गप्प बसतो. 

इतक्यात पाकिस्तान बोर्ड अध्यक्षांना एक खलिता आणून दिला जातो.  या प्रसंगामुळे पाकिस्तानी संघांची लोकप्रियता आकाशाला भिडली असून या प्रसंगात सहभागी असणाऱ्या अजहर आणि असद या दोघांना मनोरंजनपर कार्यक्रमासाठी भारतातून निमंत्रण येत आहेत अशी ती बातमी होती! निलेश साबळे ह्यानं तर त्या दोघांना थेट मुंबईची तिकिटं पाठवली होती आणि भाऊ कदम हार घेऊन स्वागतासाठी सज्ज असल्याचा फोटोही पाठवला होता!

ती बातमी वाचताच अध्यक्षांची मुद्रा एका क्षणात पालटते! ते अजहर आणि असद यांचे कौतुक करु लागतात. या कार्यक्रमात शक्य असेल आम्हा सर्वांना सहभागी करून घ्या. अशी विनंती ते या दोघांना करतात आणि सभा समाप्त होते!!

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

Get your मेंदु sorted!!



साधारणतः सुट्टीच्या दिवशी घराची साफसफाई करण्याची किंवा घर थोड्या प्रमाणात नीटनेटकं करण्याची सवय आपल्यापैकी काहीजणांना असते.  दसरा दिवाळी आली की मग मात्र वर्षभराची साफसफाई केली जाते. घर नीटनेटकं होतं आणि आपण एका नव्या जोमाने सणासुदीच्या हंगामाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. 

आज मात्र एका वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. आपण आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली येतो. त्या विचारसरणीच्या नकळत प्रेमात सुद्धा पडतो. काहीजणांना ही जाणीव स्पष्टपणे होते तर काही जणांना होत नाही! ज्यांना ही जाणीव स्पष्टपणे होते; त्यातील काहीजण या विचारसरणीचा उघडपणे पुरस्कार करण्याचे धोरण अंगिकारतात,  तर काही जण आपली विचारसरणी आपल्यापाशी या धोरणाचा स्वीकार करतात. 

आता होतं काय की आपल्यासमोर आयुष्यातील करण्यासारख्या अनेक गोष्टींची यादी सदैव असते. इंग्लिशमध्ये याला 'टू डू लिस्ट' हे अधिकृत नाव देण्यात आलं आहे. 'टू डू लिस्ट' दैनंदिन पातळीवरील करण्यासारख्या गोष्टींची यादी असते. आयुष्यभराच्या पातळीवरील करण्यासारख्या गोष्टींची यादी लक्षात घेतली तर त्याला बकेट लिस्ट म्हणण्याची प्रथा सद्यकाली रुढ होत आहे.  जेव्हा केव्हा आपणास सुट्टी मिळते त्यावेळी प्रत्येकाने स्वतःसाठी (जमल्यास त्यात आपल्या नवऱ्याला / बायकोला समावेश करुन) फुरसतीचा काही काळ काढून ठेवावा.  साप्ताहिक सुट्टी असेल तर हा काही काळ म्हणजे दोन-तीन तास आणि जर आठवडाभराची सुट्टी घेतली असेल तर हा काळ  दिवसभराचा असावा!

आता या काळात आपण काय करावे?  प्रथम आपली 'टू डू लिस्ट' आणि 'बकेट लिस्ट' दोन्ही कागदावर मांडून घ्याव्यात.  त्यामध्ये सुद्धा 'टू डू लिस्ट' मध्ये प्राधान्यक्रम मांडून घ्यावा. त्यानंतर आपल्याला ज्ञात असलेल्या काही विचारसरणी कागदाच्या दुसऱ्या बाजूला लिहाव्यात.  आता या विचारसरणीची उदाहरण द्यायची म्हटली तर 

१) मला व्यावसायिक जगात खूप यश मिळवायचं आहे. 
२) मला माझ्या आई-वडिलांची आणि नातेवाईकांची काळजी घ्यायची आहे.
३) मला शांततेने जीवन जगायचं आहे आणि त्यासाठी व्यवसायिक यशाशी तडजोड करण्याची माझी तयारी आहे. 
४) मला माझा मुलाबाळांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. 
५) मला भोवतालच्या समाजामध्ये मानाचे स्थान मिळवायचे आहे. 
६) मला खूप पैसा मिळवायचा आहे. 
७) मला खुप प्रवास करायचा आहे, दक्षिण अमेरिकेला भेट द्यायची आहे वगैरे वगैरे !!

ह्या सर्व विचारसरणी कागदाच्या दुसऱ्या बाजूवर मांडून झाल्या की 100% उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवून तुम्ही यातील कोणत्या विचारसरणींना किती टक्के देणार आहात हेसुद्धा लिहावेत. आता अशा प्रकारे तुमच्या विचारसरणीना देण्यात येणारं वेटेज (महत्त्व) ठरविण्यात आले की ही संयुक्त विचारसरणीचे आयुध घेऊन तुमच्या 'टू डू लिस्ट' कडे आणि 'बकेट लिस्ट' या दोन्हीकडे वळावे.  केवळ एक दोन दिवसाची सुट्टी असेल तर फक्त 'टू डू लिस्ट' कडेच पहावे असा माझा अनाहूत सल्ला आहे.  आता या 'टू डू लिस्ट' मधील प्राधान्यक्रमातील सुरुवातीच्या काही गोष्टींवर आपण ठरविलेल्या संयुक्त विचारसरणींच्या मदतीने आक्रमण करुन पुढील काही काळात आपण या 'टू डू लिस्ट' मधील हे सुरुवातीचे प्राधान्य असलेले पाच-सहा महाभाग कसे काही हातावेगळे करू शकतो  याचे धोरण आखावे.  ह्या नियोजनात आपल्यासोबत बायको नवरा असण्याचे प्रयोजन अशासाठी की त्यांच्या सहकार्याशिवाय तुमचे धोरण यशस्वी होण्याची शक्यता कमी असते आणि ह्या सर्व फंदात तुमच्या वागण्यात बदल घडला तर उगाचच संशयाचं वातावरण नको!

हा उपक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्णपणे अयशस्वी होण्याची शक्यता गृहित धरावी. जसे की तुम्ही या प्राधान्यक्रमातील पाच-सहा गोष्टींवर पुढील दीड-दोन महिन्यात लक्ष केंद्रित करून त्यांचे उकलन करण्याचा बेत बनवता पण तो काही कारणास्तव यशस्वी होत नाही. परंतु त्याने हताश न होता पुन्हा एकदा ही नियोजन बैठक दोन तीन महिन्याच्या कालावधीनंतर भरवावी. त्यामध्ये मागच्या कालावधीत जे काही बरोबर घडलं त्यापासून स्फूर्ती घ्यावी आणि जे काही चुकीचं घडलं त्यातून धडा शिकावा! हे आवर्तन साधारणतः चार-पाच वेळा केलं की मग मात्र तुम्हाला वस्तुस्थितीशी अनुरूप अशी ध्येयं ठरवता येणं बऱ्यापैकी शक्य होतं किंवा त्याची शक्यता वाढीस लागते, मग मात्र आपला मेंदू शांत होतो कारण अपेक्षाभंगाचे दुःख आपल्याला कमी प्रमाणात होऊ लागतं!  यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या अपेक्षा वस्तुस्थितीशी मिळत्याजुळत्या बनू लागतात!! बकेट लिस्टविषयी सल्ला घेण्यासाठी माधुरी दिक्षीत नेने ह्यांच्याशी संपर्क साधावा !! आला क्षण जगावा ह्या विचारसरणीच्या वाचकांनी ह्या पोस्टकडे दुर्लक्ष करावं !

दसऱ्याच्या सर्व वाचकांना शुभेच्छा आणि आपल्या घराबरोबर आपला मेंदू सुद्धा नीटनेटका करण्याचा यत्न करावा ही विनंती!!

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

मोगरा


आज बंगल्यामध्ये सायंकाळपासुनच लगबग सुरु होती. माळीदादा आधीच नीटनेटक्या असलेल्या बागेला अजून सोंदर्य आणून द्यायचा प्रयत्न करीत होते. पाण्याच्या कारंज्यामध्ये सर्व फुलं न्हाऊन निघत होती अन प्रसन्नचित्ताने पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यावर डोलत होती. बंगल्यातील मोठ्या दिवाणखान्यात संगीताच्या बैठकीची तयारी मोठ्या जोमानं सुरु होती. रंगनाथरावांची आणि त्यांच्या सोबतीला साथ देणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची आसनं व्यवस्थित मांडून ठेवण्यात आली होती.  मैफिल संध्याकाळी उशिरा सुरु होऊन बहुदा पहाटेपर्यंत चालणार होती. त्यामुळे अशा मैफिलीला पोषक वातावरणासाठी आवश्यक अशी प्रकाशरचना करण्यासाठी दिवाणजी आपली प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. 

रंगनाथरावांना सर्व काही अगदी परिपूर्ण हवं असे.  संपूर्ण बैठकीत त्यांना काही खटकेल असे घडलं तर त्यांचा मुड खराब होऊन जाई! आजचा कार्यक्रम तसा खासच असणार होता. शहरातील बरीचशी प्रतिष्ठित मंडळी कार्यक्रमाला हजर असणार होती. कार्यक्रमाला अजूनही दीड तास बाकी असला तरी रंगनाथराव आपल्या रियाजामध्ये मग्न होते अशा दिवशी त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय आणलेला त्यांना अजिबात खपत नसे हे त्यांच्या नजीकच्या सर्व मंडळींना माहीत होतेच! आणि त्या सर्व नजीकच्या मंडळीमध्ये समावेश होता तो त्यांची अर्धांगी राधिका हिचा!

या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि त्यांच्या पुर्वतयारीमध्ये त्यांचा सहभाग असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला पूर्ण रंगत येत नसे. एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांना माहेरी जावं लागलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनात छोट्या मोठ्या उणिवा राहून गेल्या होत्या. मग त्यामुळे रंगनाथरावांचा शेवटपर्यंत सुर लागलाच नाही.  सर्व रसिकांनी दाद दिली खरी परंतु कुठेतरी काहीतरी राहून गेलं याची जशी रसिकांना जाणीव झाली तशी रंगनाथरावांनासुद्धा!!

ठरल्याप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजता मंडळींचं आगमन व्हायला सुरुवात झाली. त्यांचे स्वागत करण्यात आणि बैठकीमधील त्यांच्या स्थानावर त्यांना  आग्रहानं बसवून देण्यात व्यवस्थापकासोबत राधिकानेसुद्धा मनापासून सहभाग घेतला होता. 
ठीक सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.  सुरुवातीपासून आज रंगनाथरावांचा सूर लागला होता. एकाहून एक सुरेख राग ते गात होते आणि मंडळी मंत्रमुग्ध होऊन गाण्याचा आस्वाद घेत होती!  राधिकेच्या खास देखरेखीखाली सर्व रसिकांची अल्पोपहाराची सोयसुद्धा अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली होती! त्यामुळे रसिकांसाठी ही एक सुवर्णपर्वणी होती असं म्हणायला हरकत नाही! अपेक्षेनुसार मैफिल पहाटेपर्यंत चालली.  रंगनाथरावांना साथ देण्यास आलेले कलाकारसुद्धा ताकदीचे होते. त्यामुळे मध्ये काही वेळ विश्रांती घेऊन रंगनाथराव ताजेतवाने  होऊन येत होते.  आणि पुन्हा रसिकांना आपल्या सुरांच्या वर्षावात न्हाऊ घालत होते. 

गवाक्षांतून पहाटेचा झुंजुमुंजु वारा मंडळींच्या अंगावर आला आणि मग रंगनाथरावांनी आपल्या शेवटच्या सुरांनी रसिकांना तृप्ततेच्या शिखरावर नेऊन बैठकीचा शेवट केला! कधी नव्हे ते दोन मिनिटं बोलुन त्यांनी रसिकांचं आभार सुद्धा मानले. त्यातील त्यांचं शेवटचं वाक्य राधिकेला सुखद धक्का देऊन गेलं! "हे सर्व काही शक्य झालं ते केवळ माझ्या सौभाग्यवतीमुळे!" आपल्या आभारप्रदर्शनाच्या शेवटी ते बोलले! आपली आयुष्यभराची मेहनत या एका वाक्यामुळे सार्थकी लागली असं तिला  त्याक्षणी वाटले! सर्व मंडळी निघतोवर सकाळ झाली होती.  सूर्यदेवाची कोवळी किरणे शयनगृहात प्रवेश करती झाली होती. घरातील थोडीफार आवराआवर करुन कौतुकाचा तो क्षण रंगनाथरावांच्या तोंडून पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी म्हणून राधिका घाईघाईने येती झाली. तोवर रंगनाथराव एखाद्या लहान मुलाप्रमाणे निद्रादेवीच्या अधीन झाले होते.  त्यांची ही गाढ झोप पाहून राधिका हिरमुसली झाली!

दुसरा दिवस अगदी निवांत चालला होता.  दिवसाच्या ह्यावेळी झोप येणं राधिकेला शक्यच नव्हते! परंतु थोडा वेळ तिने झोपण्याचा प्रयत्न केला.  मग ह्या अयशस्वी प्रयत्नानंतर ती उठून घराच्या आवराआवरीला लागली.  रंगनाथराव दुपारी केव्हातरी उठले तोवर घर आपलं पूर्वीचं रुप घेऊन त्यांच्या स्वागतासाठी हजर होतं.  ते घर आणि मालकीण दोघेही रंगनाथरावांच्या एका कौतुकाच्या शब्दासाठी आणि नजरेसाठी आसुसलेले होते.  परंतु रंगनाथराव मात्र आपल्याच तंद्रीमध्ये होते. आपली आंघोळ वगैरे आटपून ते जेवणासाठी आले.  त्यांच्या खास पसंतीचा मेनू राधिकेनं बनवला होता.  त्यांनी राधिकेकडे घरातील सर्व व्यावहारिक गोष्टींची चौकशी केली.  कार्यक्रमासाठी ज्या काही गोष्टी मागवल्या होत्या त्या सर्व गोष्टींची बिले वेळच्या वेळी चुकवण्यासाठी त्यांनी राधिकेला  स्मरण करुन दिले.  त्यानंतर मात्र ते विविध  लोकांकडून  येणाऱ्या अभिनंदनपर  फोन कॉल्सना उत्तरं देण्यात  गढून गेले!

दुपारी दमल्याभागल्या राधिकेला केव्हा डोळा लागला ते तिचं तिला कळलं नाही! जाग आली ती सायंकाळच्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर येऊन तिला उठवलं म्हणून! आपल्याला इतकी कशी गाढ झोप लागली या अपराधीभावनेनं राधिका झटपट उठून बाहेर आली! तर तोवर रंगनाथराव आणि ड्रायव्हर शहरामध्ये कामासाठी गेलं असल्याचे तिला समजलं! ती चहाचा कप घेऊन बाहेर झोपाळ्यावर घेऊन बसली. समोरच मोगरा फुलला होता! संध्याकाळच्या वाऱ्यावर मोगऱ्याची फुलं
डुलत होती. राधिकेला ती फुले पाहून काय वाटलं कुणास ठाऊक परंतु ती झोपाळ्यावरुन त्या फुलांच्या जवळ जाऊन बसली, त्यांना अलगदपणे गोंजारुन त्यांच्याशी शब्दांवाचुनच्या गप्पा मारु लागली! अचानक एक एकटी संध्याकाळ एकटी राहिली नव्हती!

शहरातून रात्री केव्हातरी रंगनाथराव परतले ते पुढील सात दिवसासाठी आपण नागपुरात दौऱ्यासाठी जात आहोत ही बातमी घेऊनच! का कुणास ठाऊक पण एका त्रयस्थ भावनेनं राधिकेने त्यांची ही बातमी ऐकून घेतली!यांत्रिकपणे झटपट तिनं  रावांची तयारी करुन दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच रावांना निघायचे असल्यामुळे त्यांना रात्री लगेच झोपणे आवश्यक आहे हे अध्याहृतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच राव आपल्या ड्रायव्हर सोबत निघून गेले. आठवडाभरासाठीचे पैसे रात्रीच तिला देण्यास ते विसरले नव्हते. 

पुर्ण दिवस राधिकेला खायला उठला होता. काय करावं हे समजत नव्हतं!
ती असंच काहीतरी काम काढून वेळ पुढे ढकलत होती. सायंकाळी पुन्हा एकदा झोपाळ्यावर येऊन बसली असता तो मोगरा एकदा तिला हसताना आणि डुलताना दिसला! तिच्या मनात विचार आला हा किती सुंदर नाच करीत आहे ना! तिला काय वाटलं कुणास ठाऊक! ती मग त्या पुन्हा मोगऱ्याजवळ गेली! बराच वेळ काही न बोलता त्याच्याजवळ बसून राहिली!  "मी तुझ्यासारखे नृत्य केले तर तुला आवडेल ना?" तिनं हळुवारपणे मोगऱ्याला विचारले आणि काय आश्चर्य! त्या मोगऱ्यानं जणु काही आनंदानं स्वतःभोवती डुलकी घेतली !

पुढील आठवडाभर राधिकेचा नृत्याचा सराव जोमानं सुरु होता! महाविद्यालयात असताना ती एक बऱ्यापैकी शास्त्रीय नृत्य करायची! पण पदवीनंतर लगेच लग्न जमलं आणि मग सारं काही राहुनच गेलं होतं ! राधिकेच्या नृत्याचा आवाज ऐकुन एक दिवस तिची शेजारच्या बंगल्यातील मैत्रीण जुई न राहवुन तिच्याकडं आली. "अगं तु इतकं सुंदर नृत्य करतेस हे मला माहीतच नव्हतं !" तिचं नृत्य पाहुन जुई म्हणाली. जुईला सुद्धा शास्त्रीय नृत्याची चांगलीच जाणीव होती. आठवडाभर दोघींचा सराव अगदी जोमात सुरु राहिला! मधल्या काही वर्षांचा जणु काही खंड पडलाच नाही असंच राधिकेला वाटु लागलं ! 

दिवसेंदिवस सायंकाळी मोगरा अजुनच जोमानं फुलू लागला होता!

राधिका सायंकाळी ध्वनिमुद्रिका लाऊन आपल्या नृत्याचा सराव करत होती. आणि अचानक अंगणात रावांची गाडी येऊन थांबली. राव आज येणार हे माहिती असलं तरी इतक्या लवकर येतील ही राधिकेनं अपेक्षा केली नव्हती! राव दिवाणखान्यात येईस्तोवर राधिकेला आवरायला वेळ मिळाला नाही ! राधिकेला ह्या अवतारात पाहुन रावांच्या चेहऱ्यावरील रागाचे भाव पाहुन राधिका पार भयभीत झाली होती. 

पुढील काही दिवस रावांनी अगदी अबोला धरला होता. राधिकेला काय करावं हे अजिबात समजत नव्हतं! शेवटी आठवड्याभरानंतर न राहवुन तिनं  रावांकडं विषय काढला, "काय झालं अबोला धरायला?" "ह्या वाड्यातील सुनेनं आजतोवर कधी नाच केला नव्हता! " कडक स्वरात एक वाक्य  बोलुन राव दिवाणखान्याबाहेर निघुन गेले होते. 

रावांच्या ह्या उत्तरानंतर राधिकेकडं पर्याय उरला नव्हता! एका भरल्या घरातील रितेपण घेऊन जगण्यावाचुन तिच्याकडं दुसरा पर्याय तिला दिसत नव्हता! बागेतील मोगऱ्याचा बहरसुद्धा ओसरला होता! 

समोरच गाण्याची ध्वनिमुद्रिका पडली होती "मोगरा फुलला"... राधिकेनं जवळच पडलेलं पेन घेतलं आणि त्यावर शब्द खरडले "आणि कोमेजला देखील !!"

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

उत्तर ध्रुवावरून उडणारी विमानं !



एअरलाईन व्यवसायाविषयी मी जबरदस्त आदर बाळगुन आहे. प्रचंड गुंतवणूक करुन प्रचंड अनिश्चिततेच्या वातावरणात ह्या एअरलाईन कंपन्यांचे मालक ह्या कंपन्या चालवत असतात. आपल्या कंपनीच्या विमानप्रवासाचे भाडं स्पर्धात्मक ठेवण्याचं कठीण आव्हान त्यांच्यासमोर असतं. 

ह्या स्पर्धात्मक भाडं ठेवण्याच्या प्रकारात दोन ठिकाणातील सर्वोत्तम मार्ग शोधुन काढणं हासुद्धा एक प्रकार येतो. राजकीय संबंधांमुळं एखाद्या देशाच्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास परवानगी नाकारणं असा प्रकार सुद्धा घडु शकतो. मागील एका पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणं headwind आणि tailwind ही मंडळी सुद्धा नफा तोट्यावर परिणाम करु शकतात. प्रत्येक एअरलाईनचे स्वतःचं असं एक घरचं विमानतळ असतं ज्याला हब म्हणतात. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात जेव्हा थांबा घेण्याची वेळ येते अशा वेळी एकतर उड्डाण ह्या घरच्या विमानतळावरुन करायचं किंवा थांबा ह्या घरच्या विमानतळावर घ्यायचा अशी पद्धत आहे. 

आजच्या ह्या पोस्टमध्ये अमेरिकेच्या पुर्व अथवा पश्चिम किनारपट्टीवरुन उड्डाण करणाऱ्या आणि जगभरच्या विविध ठिकाणी जाणाऱ्या विमानांसाठी आर्थिकदृष्ट्या कोणता मार्ग उत्तम ठरु शकतो ह्याचं ठोबळमानानं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे काही सखोल विश्लेषण नाही ह्याची नोंद घ्यावी. 

खालील तक्ता पाहिला असता आपल्याला असं आढळुन येतं की उगम,  एअरलाईन / तिचं हब आणि शेवटचा थांबा हे घटक लक्षात घेता बऱ्याच उदाहरणात प्रवासमार्ग ठरवणं हे सोपं (No-Brainer) असु शकतं. कारण पर्यायी मार्ग हा बराच दीर्घ पल्ल्याचा बनतो. 

परंतु काही उदाहरणात प्रथमदर्शनी पहिली पसंत वाटणारा मार्ग आणि पर्यायी समजला जाणारा मार्ग ह्यात अटीतटीची चुरस होऊ शकते. 
उगम 
एअरलाईन /
 हब 
अंतिम स्थान 
थांबा 
मार्ग 
अमेरिका पुर्व  किनारा
युरोपिअन 
भारत 
युरोप 
पुर्व  किनारा - अटलांटिक - युरोप - भारत
अमेरिका पुर्व  किनारा
गल्फ 
भारत 
गल्फ 
पुर्व  किनारा - अटलांटिक - गल्फ - भारत
अमेरिका पश्चिम किनारा 
पूर्व आशिया 
भारत 
पूर्व आशिया 
पश्चिम किनारा - पॅसिफिक  - पूर्व आशिया
 -
भारत
अमेरिका पश्चिम किनारा 
भारत 
भारत 
पूर्व आशिया 
पश्चिम किनारा - पॅसिफिक  - पूर्व आशिया
 -
भारत
अमेरिका पश्चिम किनारा 
युरोपिअन 
भारत 
युरोप 
१) पश्चिम किनारा - अटलांटिक - युरोप - भारत
२)पश्चिम किनारा - पॅसिफिक  - पूर्व आशिया  - भारत
अमेरिका पश्चिम किनारा 
गल्फ 
भारत 
गल्फ 
१) पश्चिम किनारा - अटलांटिक - गल्फ - भारत
२) पश्चिम किनारा - उत्तर ध्रुव  - गल्फ - भारत







ही अटीतटीची चुरस होण्याचं कारण म्हणजे पृथ्वी वरील नकाशात दाखविल्याप्रमाणं सपाट नसुन गोल आहे. 

ह्यामध्येही दोन पर्याय येतात. वरील तक्त्यातील पाचव्या पर्यायात दर्शविल्याप्रमाणं अमेरिकन पश्चिम किनाऱ्यावरून भारतात येण्यासाठी तुम्ही पुर्ण अमेरिका पालथी घालुन, अटलांटिक ओलांडुन युरोपात आपल्या हबवर थांबा घेऊन भारतात येऊ शकता. हा प्रवास तुम्ही थेटही करू शकता ज्यासाठी तुमच्याकडं सतत १५ -१६ उड्डाण करणारी यंत्रणा हवी. जर तुम्ही हबला विश्रांती घेण्याचा अट्टाहास बाळगत नसाल तर तुम्ही पॅसिफिकवरुन पुर्व आशियामार्गे भारतात येऊ शकता. ह्या उदाहरणात horizontal वर्तुळाकार लक्षात घेण्यात आला आहे. 

आता एक मनोरंजक उदाहरण गल्फमधील एअरलाईन्ससाठी ! वरील तक्त्यातील सहावा पर्याय ! त्यांच्यासाठी पृथ्वीचा spherical shape लक्षात घेता उत्तर ध्रुवावरून एक पर्यायी मार्ग उपलब्ध होतो. 




आता ज्यांना ह्या मार्गानं प्रवास करायला मिळाला असेल ते भाग्यवान होत. पृथ्वीच्या ध्रुवावरून उड्डाण करताना 'आज मैं  उपर  उत्तर ध्रुव नीचे ' वगैरे गाणं ते म्हणु शकतात. उत्तर ध्रुवावरुन उड्डाण करताना बर्फाच्छादित पृथ्वी किती सुंदर दिसत असेल !!! आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ही उड्डाणं सुद्धा १५  - १६ तासांची होतात आणि मध्ये काही गडबड झाली तर आपत्कालीन थांबा घेण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसावेत! अशा विमानांच्या वैमानिकांना आदरपुर्वक सलाम !

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

What is relevance of sin / cos थिटा!!

ह्या आठवड्यात व्हाट्सअँपवर एक संदेश वाचनात आला. ज्या सरांनी sin / cos थिटा ही मंडळी आमच्या डोक्यात घुसविण्यासाठी बराच आटापिटा केला, प्रसंगी छडीमार सुद्धा केला त्या सरांच्या आम्ही शोधात आहोत. अर्धे आयुष्य आटपुन गेलं तरी sin / cos थिटा ह्या मंडळींचा व्यावहारिक उपयोग आम्ही अनुभवला नाही असा काहीसा त्या संदेशाचा मतितार्थ होता. 

लौकिकार्थानं पहायला गेलं तर मंडळींचं म्हणणं योग्य होतं. साधारणतः ९५% मंडळीची शैक्षणिक जीवनानंतर sin / cos थिटा ह्या कठीण मंडळींशी गाठ पडत नाही. परंतु तसं पाहिलं तर शैक्षणिक जीवनातील बऱ्याच गोष्टींचा आपण व्यावहारिक जीवनात वापर करत नाहीत. ज्या वेगानं आपण संगणकीय युगाकडं झेप घेत आहोत ते पाहता ना आपल्याला व्याकरणाची गरज भासते ना गणिताची !! म्हणुन ह्या सर्व गोष्टी शालेय जीवनातुन बाद करायच्या का हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा?

खरं बघता शालेय जीवनाचं महत्त्व सद्यकाळात पुनर्लेखित करावं लागणार आहे. भ्रमणध्वनीपासुन मुलांना दुर ठेवणारा काळ, आपल्या आयुष्यातील स्वहस्ते काही लिखाण करण्याचा / गणितं सोडविण्याचा काळ, व्याकरण / निबंध  ह्या प्रकारांशी आयुष्यात संबंध येण्याचा काळ अशा दृष्टीनं आपल्याला ह्या काळाकडं पहावं लागणार आहे. थोडक्यात म्हणजे आपला मेंदु मुलभूत संकल्पनांच्या संपर्कात येण्याचा हा आयुष्यातील एकमेव काळ असणार आहे. sin / cos थिटा  ही मंडळी आपल्या मेंदूला तल्लख ठेवण्याचे काम करतात. हा तल्लख झालेला मेंदू आपल्याला बाकीच्या व्यावहारिक बाबींमध्ये कामास येऊ शकतो. आपल्या शैक्षणिक जीवनात आपल्या मेंदूला घडविण्याचे कार्य पार पाडले जाते.

थोडा खोलवर विचार करता बऱ्याच गोष्टींकडं हल्ली प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं जाऊ लागलं आहे. त्यांची नक्की गरज काय, ह्या गोष्टी संदर्भहीन का मानल्या जाऊ नयेत हे प्रश्न नवीन पिढी उघडपणे विचारु लागली आहे. ह्या बऱ्याच गोष्टींमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या चालीरिती, सणांच्या वेळी पाळण्यात येणाऱ्या प्रथा, एकत्र कुटूंबपद्धती ह्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. 

sin / cos थिटा आणि चालीरिती / प्रथा ह्यांना स्वतःची उपयुक्तता सिद्ध करण्याची गरज का पडली असा विचार केला तर ह्यामागं प्रत्येक गोष्टीचं माहात्म्य तिच्या आर्थिक फायद्यावर जोखुन पहाण्याच्या नव्यानं निर्माण झालेल्या वृत्तीचा सहभाग दिसुन येतो. बऱ्याच वेळा हे प्रश्न उपस्थित करणाऱ्या नवीन पिढीच्या शंकांचं योग्य प्रकारे निरसन करण्याच्या क्षमतेचा (किंबहुना योग्य संवादकलेचा) असलेला जुन्या पिढीतील अभाव हे ही ह्यास कारणीभुत ठरतं. आपल्या मतांविरुद्ध असलेली मतं ऐकुन घेण्याची आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडण्याची तयारी मोजके जुने लोक दाखवितात असं माझं निरीक्षण आहे. त्यामागं त्यांना तरुण वयात आलेले अनुभव कारणीभुत असावेत. 

थोडक्यात काय तर एका गोंधळलेल्या मनःस्थितीतुन एक समाज म्हणुन आपण चाललो आहोत. आपला गोंधळ नक्की काय आहे हे जरी आपण कागदावर उतरवलं तरीसुद्धा तो एक मोठा टप्पा ठरू शकतो. नाहीतरी जे काही शिकुन तात्काळ आर्थिक फायदा होतो असं आपल्याला वाटतंय त्या सर्वांची शाश्वतता तरी कोणाला माहितेय? त्या मानाने sin / cos थिटा परवडले योग्य पर्यायांच्या अभावामुळं ही मंडळी पुढील २० - ३० वर्षे तरी आपलं पुस्तकांतील स्थान कायम राखतील हे नक्की !!

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

प्रसन्न पोट ते मेंदु स्वास्थ

To
गोष्ट दहावीच्या वेळची आहे. त्यावेळी मी अभ्यासासाठी आमच्या सरांच्या घरी जात असे. आमच्या घरातील जेवण बनविण्यासाठी घालवला जाणारा वेळ आणि सरांच्या घरात जेवणाच्या तयारीवर घालवणारा घालवला जाणारा वेळ यामध्ये मला कमालीची तफावत दिसून येत असे. या घटकाव्यतिरिक्त अजून एक फरक मला जाणवून आला तो म्हणजे आमच्याकडे मांसाहाराचे  असलेलं अधिक प्रमाण! याविषयी सापळे मॅडमशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की अभ्यासाच्या मुलांनी साधारणता चिकन मटण टाळावे परंतु मासे खाल्ले तर ते फायदेशीर ठरू शकते. सापळे मॅडम यांच्याशी ही चर्चा साधारणता जानेवारी फेब्रुवारी महिन्यात झाली होती, ज्यावेळी स्टडी लिव्ह म्हणजे अभ्यासाची सुट्टी चालू होती! अभ्यासाच्या सुट्टीमध्ये तुम्ही आहार कसा नियंत्रित करता यावर तुमची अभ्यासाची  परिणामकता अवलंबून असते.  ह्यामागील महत्वाचं कारण म्हणजे आपण बऱ्याच वेळा केवळ घरात बसुन अभ्यास करत असतो. 

आता हे सर्व विचार काहीसे जुनाट किंवा पारंपारिक पद्धतीचे समजले जाण्याची शक्यता आहे. परंतु याबाबतीत मी ठाम आहे! तुम्ही जर एकाग्रतेने अभ्यास इच्छित असाल तर तुमचे पोट प्रसन्न असले पाहिजे. पोट प्रसन्न म्हणजे एकतर ते तुडुंब भरलेले नसावे आणि तुम्ही पचायला जड अशा पदार्थांचे सेवन केलेले नसावे! एका दिवसात पूर्ण एकाग्रतेने सात ते आठ तासापलीकडे अभ्यास करणं हे बहुतांशी मुलांना शक्य होत नाही या माझ्या मतावर मी पूर्णपणे ठाम आहे! ह्या अवधीत मेंदु पुर्ण क्षमतेनं कार्य करत असावा. 

आता वळुयात ते व्यावसायिक जगताकडे! मी आजतोवर व्यावसायिक जगतामध्ये जे मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्ती पाहिल्या आहेत त्यातील बऱ्याचशा व्यक्ती या शारीरिक तंदुरुस्तीच्या (फिटनेस लेव्हल) बाबतीत अत्यंत जागृत असून त्यांनी आपला फिटनेस अत्यंत उच्च पातळीवर राखून ठेवल्याचं मला आढळून आलं आहे. कोणत्याही विधानाप्रमाणे या विधानाला सुद्धा अपवाद आहेतच! परंतु फिटनेस आणि व्यावसायिक यश याचा अन्योन्यसंबंध आहे असं माझं मत आहे. व्यावसायिक यश म्हणजे अत्यंत उच्चपदावरील व्यक्ती असा अर्थ मला अभिप्रेत आहे! अशा व्यक्तींविषयी मी मनात खास आदर बाळगुन आहे. 

असं का होत असावं याची  कारणीमिमांसा करण्याचा मी प्रयत्न केला.  उच्चपदावर तुम्हाला असंख्य डेटा पॉईंट्सचे थोड्यावेळात विश्लेषण करून निर्णय घ्यायचे असतात, बऱ्याच वेळा पूर्ण बरोबर अथवा पुर्ण चूक ह्यामधील पर्यायांची तुम्हांला निवड करायची असते. अशावेळी तुमचा मेंदू पूर्णपणे जागरूक असून असणे आवश्यक आहे.  शारीरिक फिटनेस मेंदूला ही पूर्ण जागृतता कायम ठेवण्यास मदत करतो असे माझे मत बनले आहे. 

सारांश योग्य आणि माफक प्रमाणातील आहार हा तुमच्या शैक्षणिक आयुष्यात आणि व्यावसायिक जगतात फार मोलाची कामगिरी बजावतो. 

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...