मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

What is relevance of sin / cos थिटा!!

ह्या आठवड्यात व्हाट्सअँपवर एक संदेश वाचनात आला. ज्या सरांनी sin / cos थिटा ही मंडळी आमच्या डोक्यात घुसविण्यासाठी बराच आटापिटा केला, प्रसंगी छडीमार सुद्धा केला त्या सरांच्या आम्ही शोधात आहोत. अर्धे आयुष्य आटपुन गेलं तरी sin / cos थिटा ह्या मंडळींचा व्यावहारिक उपयोग आम्ही अनुभवला नाही असा काहीसा त्या संदेशाचा मतितार्थ होता. 

लौकिकार्थानं पहायला गेलं तर मंडळींचं म्हणणं योग्य होतं. साधारणतः ९५% मंडळीची शैक्षणिक जीवनानंतर sin / cos थिटा ह्या कठीण मंडळींशी गाठ पडत नाही. परंतु तसं पाहिलं तर शैक्षणिक जीवनातील बऱ्याच गोष्टींचा आपण व्यावहारिक जीवनात वापर करत नाहीत. ज्या वेगानं आपण संगणकीय युगाकडं झेप घेत आहोत ते पाहता ना आपल्याला व्याकरणाची गरज भासते ना गणिताची !! म्हणुन ह्या सर्व गोष्टी शालेय जीवनातुन बाद करायच्या का हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा?

खरं बघता शालेय जीवनाचं महत्त्व सद्यकाळात पुनर्लेखित करावं लागणार आहे. भ्रमणध्वनीपासुन मुलांना दुर ठेवणारा काळ, आपल्या आयुष्यातील स्वहस्ते काही लिखाण करण्याचा / गणितं सोडविण्याचा काळ, व्याकरण / निबंध  ह्या प्रकारांशी आयुष्यात संबंध येण्याचा काळ अशा दृष्टीनं आपल्याला ह्या काळाकडं पहावं लागणार आहे. थोडक्यात म्हणजे आपला मेंदु मुलभूत संकल्पनांच्या संपर्कात येण्याचा हा आयुष्यातील एकमेव काळ असणार आहे. sin / cos थिटा  ही मंडळी आपल्या मेंदूला तल्लख ठेवण्याचे काम करतात. हा तल्लख झालेला मेंदू आपल्याला बाकीच्या व्यावहारिक बाबींमध्ये कामास येऊ शकतो. आपल्या शैक्षणिक जीवनात आपल्या मेंदूला घडविण्याचे कार्य पार पाडले जाते.

थोडा खोलवर विचार करता बऱ्याच गोष्टींकडं हल्ली प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं जाऊ लागलं आहे. त्यांची नक्की गरज काय, ह्या गोष्टी संदर्भहीन का मानल्या जाऊ नयेत हे प्रश्न नवीन पिढी उघडपणे विचारु लागली आहे. ह्या बऱ्याच गोष्टींमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या चालीरिती, सणांच्या वेळी पाळण्यात येणाऱ्या प्रथा, एकत्र कुटूंबपद्धती ह्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. 

sin / cos थिटा आणि चालीरिती / प्रथा ह्यांना स्वतःची उपयुक्तता सिद्ध करण्याची गरज का पडली असा विचार केला तर ह्यामागं प्रत्येक गोष्टीचं माहात्म्य तिच्या आर्थिक फायद्यावर जोखुन पहाण्याच्या नव्यानं निर्माण झालेल्या वृत्तीचा सहभाग दिसुन येतो. बऱ्याच वेळा हे प्रश्न उपस्थित करणाऱ्या नवीन पिढीच्या शंकांचं योग्य प्रकारे निरसन करण्याच्या क्षमतेचा (किंबहुना योग्य संवादकलेचा) असलेला जुन्या पिढीतील अभाव हे ही ह्यास कारणीभुत ठरतं. आपल्या मतांविरुद्ध असलेली मतं ऐकुन घेण्याची आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडण्याची तयारी मोजके जुने लोक दाखवितात असं माझं निरीक्षण आहे. त्यामागं त्यांना तरुण वयात आलेले अनुभव कारणीभुत असावेत. 

थोडक्यात काय तर एका गोंधळलेल्या मनःस्थितीतुन एक समाज म्हणुन आपण चाललो आहोत. आपला गोंधळ नक्की काय आहे हे जरी आपण कागदावर उतरवलं तरीसुद्धा तो एक मोठा टप्पा ठरू शकतो. नाहीतरी जे काही शिकुन तात्काळ आर्थिक फायदा होतो असं आपल्याला वाटतंय त्या सर्वांची शाश्वतता तरी कोणाला माहितेय? त्या मानाने sin / cos थिटा परवडले योग्य पर्यायांच्या अभावामुळं ही मंडळी पुढील २० - ३० वर्षे तरी आपलं पुस्तकांतील स्थान कायम राखतील हे नक्की !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...