लोक काय म्हणतील ह्याचा विचार करण्यात मागच्या काही पिढ्यांची आयुष्यं गेली. लोक म्हणजे कोणता जनसमुदाय ह्या विषयीच्या संकल्पना त्या वेळी स्पष्ट होत्या. हल्ली बऱ्याचजणांनी नोकरी धंद्यानिमित्त गावं सोडली आणि त्यानंतर लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचं भय बऱ्यापैकी कमी झालं. आता इथं लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मी "लोक काय म्हणतील या गोष्टीचं भय" हा शब्दप्रयोग केला म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की लोकांचं म्हणणं हे बऱ्याच वेळा नवीन पिढीला नकोसं किंवा बंधनकारक असं असु शकतं.
बऱ्याच वेळा जुने लोक नवीन पिढी परंपरांचे कसे पालन करत आहे याविषयी आपली मते नोंदवत असत / असतात. जुन्या लोकांनी आपल्या नवीन पिढीकडून असलेल्या परंपरापालनाच्या अपेक्षांची पातळी केव्हाही शिथिल केली नाही. त्यामुळे नवीन पिढी ही या परीक्षणास यशस्वीरित्या सामोरे जाण्याची शक्यता तशी कमीच होती. त्यामुळे प्रयत्न करुन सुद्धा जर मी अयशस्वी होणार असेल आणि या जुन्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकणार नसेन तर त्यापेक्षा प्रयत्नच न केलेला बरा या निष्कर्षापर्यंत नवीन पिढीतील काही लोकं येऊन पोहोचली! त्यानंतर काहीजणांना गावाबाहेर आपले दुसरे विश्व निर्माण करण्यात यश मिळाले आणि त्यांचा हळूहळू आपल्या मूळ विश्वाशी किंवा मूळ लोकांशी संपर्क कमी झाला किंवा संपुष्टात आला.
इथं एक फरक ध्यानात घेण्यासारखा आहे तो म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या लोक या समूहात कोणत्या व्यक्तींचा समावेश करावा हे आपल्या हाती नसतं. त्यामुळे कौतुक करणारे, टीका करणारे अशा सर्व प्रकारच्या व्यक्ती या लोक या समूहात समाविष्ट व्हायच्या. त्यातील टीका करणाऱ्या व्यक्तींचा समूह त्यांच्या टिप्पणीमुळे त्रासदायक ठरत असल्याने
नवीन पिढीतील काही जणांनी हा घटक आपल्याभोवताली जे काही नवीन लोक जमवले त्यावेळी लक्षात घेतला. टीकाटिप्पणी करणाऱ्या व्यक्तींना नवीन लोकसमुहात स्थान मिळाले नाही. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वातील त्रुटी जाणवून देणाऱ्या फुकटच्या सल्लागारांची उणीव नवीन पिढीला जाणवू लागली.
अजून एक मुद्दा हा स्थायित्वाविषयीचा! पूर्वीच्या व्याख्येतील लोक ही एक सामुदायिक विचारधारा असायची! आता ही विचारधारा गेल्या किती पिढ्यांच्या अनुभवातून तावून-सुलाखून निघून बनली गेली आहे हा विचार करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. साधारणतः सध्याच्या मराठी कुटुंबातील वंशावळीचा इतिहास पाहता ही विचारधारा मागील दोनशे वर्षात बनली गेली आहे असे मानण्यास वाव आहे. अर्थात याला सन्माननीय अपवाद असू शकतात. आता लोक या संज्ञेच्या पारंपारिक व्याख्येमध्ये विशिष्ट व्यक्ती अभिप्रेत नसून काही विशिष्ट भूमिका अभिप्रेत असतात. वेगवेगळ्या व्यक्ती काळानुसार या भूमिकांमध्ये शिरत असतात आणि आपली वेळ संपताच एक तर दुसऱ्या भूमिकेत शिरतात किंवा काळाच्या पडद्यामागे जातात. ह्या गोष्टीमुळं वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक सामूहिक ज्ञानाचा आपल्याला लाभ होऊ शकतो.
फक्त आपल्यामध्ये काही कठीण टिप्पणी सहन करण्याचे संयम असावा. याउलट आपण आपल्याला अनुकूल असा ज्या व्यक्तींच्या समूह आपल्या भोवताली गोळा करतो आणि ज्यांना आपण आपली नवीन लोक बनवतो हा व्यक्ती समूह काहीसा अस्थायी स्वरूपाचा असतो. तुमची नोकरीची ठिकाणे बदलली तर ही लोकं तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात. इतकंच काय तर जर तुमचं सोशल स्टेटस बदललं तरीही ही यातील काही व्यक्ती तुमच्या लोक या व्याख्येत समाविष्ट होण्यास चक्क नकार देऊ शकतात. त्यामुळे ह्या आपणच बनवलेल्या लोक या व्यक्ती समूहाविषयी जास्त अपेक्षा अगदी सुरुवातीलाच ठेवू नयेत. ह्या नवीन लोक समूहाचा एक फायदा मात्र असा आहे की भवतालच्या व्यावसायिक विश्वातील घडामोडींविषयी या समूहातून आपल्याला ज्ञान मिळण्याची शक्यता जास्त असते.
सारांश असा की तुमच्या गावाचा किंवा कुटुंबांचा वर्षानुवर्षे चालत आलेला लोक म्हणून जो काही व्यक्ती समूह आहे त्यामध्ये वयाच्या विशिष्ट टप्प्यावर तुम्ही सहभागी होणे इष्ट आहे. आपल्या माहितीचा, आपण जमा केलेल्या ज्ञानाचा या लोक समूहात शिरकाव करुन या लोकसमूहाचे आणि त्या समुहाच्या विचारधारेचे कालानुरूप परिवर्तन करणे इष्ट राहील. कोणास ठाऊक परिवर्तित केलेला हा परंपरागत लोकसमूह नवीन पिढीला कदाचित आकर्षित करू शकेल!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा