मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

बधाई हो !


चित्रपटाच्या कथानकाकडे आणि त्यातुन देऊ इच्छिलेल्या संदेशाकडं आपण नंतर येऊयात!  चित्रपट आम्हांला आवडला तो त्याच्या उत्तम सादरीकरणामुळे, त्यातील खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे, देखण्या आयुष्यमानमुळे आणि सुंदर सनया मल्होत्रामुळे! ही पोस्ट मुक्तछंद आहे, जे काही आवडलं ते कोणताही विशिष्ट क्रम, मांडणी विचारात न घेता इथं मांडतोय !

चित्रपटातील दोन्ही घरं आवडली! आयुष्यमानचं मध्यमवर्गीय कुटुंबाचं घर! ज्या घरात पाचजणांना मुक्तसंचार करता येत नाही असं हे घर! ह्या घराचं एक वास्तववादी चित्रण या चित्रपटात केलं जातं. याउलट सनयाचे एक नितांतसुंदर घर! त्यामधून ओसंडून वाहणारी श्रीमंती ही एका हॉलिवूडच्या चित्रपटाप्रमाणे एका कलात्मकदृष्ट्या दाखवण्यात आली आहे. इतकी श्रीमंत सनया इतक्या छोट्या ऑफिसात कशी (का) काम करत असेल हीच या चित्रपटातील एक न पटण्यासारखी गोष्ट!

सुरुवातीला सासू आपल्या सुनेचे छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाभाडे काढत असते. हे जसं काही घरात घडत असावं त्याप्रमाणे हुबेहूब चित्रित करण्यात आले आहे. आपण फस्त केलेल्या आंब्यांच्या फोडीचा हिशोब न ठेवता सुनेनं किती फोडी खाल्ल्या ह्याकडे लक्ष असणारी सासु लक्षात राहण्याजोगी!  स्त्रियांच्या किटी पार्टीतील वातावरण थोडक्यात दाखवण्यात आले आहे परंतु ते सुद्धा अगदी सुंदररित्या!

आयुष्यमान या चित्रपटात खरोखर भाव खाऊन जातो.  त्याची विविध  व्यक्तीरेखांसोबत असलेली नाती सुंदररित्या फुलवण्यात आली आहेत.  

सर्वप्रथम त्यांचे समवयस्क तीन मित्र! सुरुवातीला एकमेकांच्या मैत्रिणींवरून चेष्टा करणारे ते मित्र ज्यावेळी त्यांना आयुष्यमानच्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याची चाहूल लागते त्यावेळी त्याची ज्याप्रकारे फिरकी घेतात ते पाहण्याजोगं! 

त्यानंतर आयुष्यमान आणि त्याच्या धाकट्या भावाचे एक सुंदर नातं! कोणताही गंभीर प्रसंग ओढवला की एका उंच भिंतीवर हे दोघेजण बसतात आणि आपली मन की बात बोलत राहतात! ह्या दोघांच्यातही अंतर तसं जास्तच१ त्यामुळं  काहीवेळा आयुष्यमान त्याला मोठ्या माणसाप्रमाणं सल्ला देत असतो तर काही वेळा दोघांची दुःख सारखे असल्यामुळे एका समवयस्क मित्राप्रमाणे दुःख वाटून घेत असतो. 

आयुष्यमान आणि त्याच्या आजीचं नातंसुद्धा पाहण्यासारखं! सुरुवातीला या नात्याला फुलायला वाव मिळत नसतो.  परंतु जसजशी परिस्थिती गंभीर होत जाते तेव्हा मात्र हे दोघे एकत्र येतात. प्रसंगी खेळकरपणे एकमेकांची चेष्टा सुद्धा करतात! 

आयुष्यमान व त्याचे वडील यांचं नातं मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादा विशीतला तरुण आणि पन्नाशीतील बाप ह्याचं नातं कसं असावं त्याप्रमाणं असतं!  परंतु चित्रपटात एक कलाटणीचा क्षण येतो आणि त्या वेळेपासून आयुष्यमान आपल्या काहीशा बावळटपणाकडे झुकणाऱ्या मध्यमवर्गीय आई-बाबा आणि कुटुंबाच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. त्याक्षणी तो एखाद्या वडिलांच्या मित्रांप्रमाणे त्यांच्या सोबतीला उभा राहतो!

चित्रपटात मला सर्वात जास्त आवडलेलं नातं म्हणजे आयुष्यमान खुराणा आणि त्याची प्रेयसी सनया मल्होत्रा ह्यांचं!  ह्या नात्यातील फुलवण्यात आलेले कंगोरे! आयुष्यमान नवीन पिढीतील एका तरुण मुलाचे प्रतिनिधित्व करणारा! आता आपण या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने पाहुयात.  भारतीय पुरुष हे बऱ्याच अंशी कर्मठ म्हणता येतील. किंबहुना पुर्वीच्या पिढ्यांमध्ये त्यांचे अंतरंग आणि बाह्यरुप हे दोन्ही कर्मठ असायचं!
आता गेल्या एक पिढीमध्ये भारतीय पुरुषांचे बाह्यरुप बदललं आहे असं आपणास नक्कीच म्हणता येईल. परंतु ह्यांचं अंतरंग मात्र अजुनही पारंपरिक पद्धतीने विचार करतं असं कधी कधी वाटतं. पण नक्की काही सांगता येत नाही! कदाचित हा मुद्दा निघाला म्हणून असं होत असावं. बाकी सर्व मुद्द्यांच्या बाबतीत आयुष्यमान हा नक्कीच पुढारलेला आहे. अगदी विवाहापुर्वीचे  मैत्रीसंबंध कोणत्या पातळीवर न्यायचे या मुद्द्यावरसुद्धा! सनयाची व्यक्तिरेखा अगदी प्रगल्भपणे रेखाटण्यात आली आहे. आपली भावी सासू गरोदर आहे हे कळल्यावर ती फारशी काही आश्चर्यचकित होत नाही. याउलट आयुष्यमानने संभाव्य भावाला आपल्या लग्नात घोड्यावर बसवताना जो शब्द वापरला तो शब्द ऐकून अगदी खळखळून हसते.  बाकी मग ती या बातमीमुळे आयुष्यमानला नक्की कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. 

चित्रपटातील कलाटणीचा क्षण तसा एकच म्हणता येणार नाही. सुरुवातीला ती बातमी जाहीर झाल्यावर जसा हा कलाटणीचा क्षण येतो तसा तो मग नंतर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसे कुटुंबातील एका सदस्याच्या बाजूंना कशी उभी राहतात तेव्हासुद्धा येत राहतो. 

नीना गुप्ताच्या सासुबाईच्या बाबतीत हा क्षण एका लग्नाच्या वेळी आपल्या सुनेवर बाकीच्या सुना ज्यावेळी या गोष्टीमुळे टीका करत असतात त्यावेळी येतो! आणि मग ती अगदी ठामपणे आपल्या सुनेच्या मागे उभी राहते 

तसाच हा क्षण आयुष्यमान च्या बाबतीत ज्यावेळी त्याची भावी सासू त्याच्या त्या ठिकाणच्या अस्तित्वाची जाणीव नसताना ज्याप्रकारे त्याच्या कुटुंबावर टीका करते आणि आपल्या मुलीला तिच्यावर पडणाऱ्या संभाव्य जबाबदारीची जाणीव करून देते त्यावेळी येतो! मग त्याला आपण आपल्या कुटुंबाच्या मागे कसं ठामपणे उभं राहिलं पाहिजे ह्याची जाणीव होते!

मला हा चित्रपट आवडला तो ह्याच कारणास्तव! मध्यमवर्गीय कुटुंबात एक जे टीम स्पिरीट असतं ते सर्वसाधारणवेळी अदृश्य होऊन राहिलेलं असतं.  भोवतालच्या परिस्थितीनं आपल्या सामान्यत्वाची सतत जाणीव करुन दिल्यामुळं आलेल्या एक प्रकारच्या नैराश्यामुळं कदाचित हे होत असावं. परंतु ज्यावेळी अडचणीची परिस्थिती येते त्यावेळी हे टीम स्पिरीट उफाळून येतं आणि एका प्रचंड संघभावनेने सर्वजण उभे ठाकतात.  याचं एक उत्तम चित्रीकरण या चित्रपटात आपणास पहावयास मिळतं. 

नीना गुप्ताचा अभिनय सुंदरच! जे काही घडलं त्याविषयी आता इलाज नाही परंतु उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला ठामपणे सामोरे जाण्याची जिद्द एक स्त्रीच दाखवू शकते. ते तिनं संपुर्ण चित्रपटात सुरेखरित्या आपल्या अभिनयातून दाखवून दिलं आहे. या प्रकरणामुळे आयुष्यमान आणि त्याच्या प्रेयसीच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे हे समजायला तिला वेळ लागत नाही.  ती आपल्या मुलाकडून सर्व तपशील जाणून घेते आणि आपल्या मुलाला तिच्या आईची माफी मागण्याचा सल्ला देते. 

आयुष्यमान आपल्या संभाव्य सासूच्या घरी येतो त्यावेळी ती असासुसुद्धा अगदी मौनव्रत धारण करते, एकदम डिफिकल्ट अॅक्ट करते.  परंतु त्यावेळी मनातल्या मनात मात्र तिने या मुलाच्या चांगुलपणा विषयी आपला निग्रह पक्का केलेला असतो. सायंकाळी सनया परतल्यावर तिच्याशी आईने साधलेला संवाद हृदयस्पर्शी!

आता वेळ आली आहे ती या चित्रपटाच्या मुख्य विषयाविषयी लिहिण्याची! परंतु ह्या विषयावर या ब्लॉगमध्ये आपली मत मांडण्याइतका  मी अथवा हा ब्लॉग पुढारलेला नाही त्यामुळे असु देत!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...