मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

बालदिन


विश्वाचे कारभार व्यवस्थित चालावेत म्हणून काही भुमिकांची निर्मिती करण्यात आली आहे.  जसे की घरामध्ये वडील, शाळा-कॉलेजातील  शिक्षक, रस्त्यावर पोलीस आणि ऑफिसमध्ये व्यवस्थापक वगैरे वगैरे!! आता या भूमिका बजावणारी माणसे सुद्धा माणसेच असतात. त्यामुळे सतत या भूमिकांमध्ये राहून कायदा आणि सुव्यवस्था शाबूत ठेवणे हे कधीकधी त्यांनासुद्धा त्रासदायक वाटू शकतं. त्यामुळे ही मंडळी सुद्धा आपल्या या कडकपणाच्या अधिकृत भूमिकेमधून पळवाट काढून काही वेळ आपल्या मूळ स्वरूपात प्रकट होण्याची संधी शोधत असतात. 

पुर्वी ठीक होतं. या भूमिकांनी सतत आपला मुखवटा कायम ठेवावा अशीच त्यांच्याकडून अपेक्षा असायची. आणि या भुमिका बजावणाऱ्या माणसांनी या अपेक्षेपुढे चक्क शरणागती पत्करली होती. त्यामुळे पुर्वीचे वडील गंभीर म्हणजे गंभीरच दिसायचे! फारच झालं तर एखादी स्मितरेषा कधीतरी त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असे आणि ही स्मितरेषा ते माणूस असल्याचा पुरावा त्यांच्या मुलांना, पत्नीला देत असे.  कधीकधी केवळ एका या पुराव्याच्या आधारे आयुष्यसुद्धा काढावं लागत असे. 

आता काळ बदलला आहे. माणसं आपल्या अधिकृत भूमिकेत कमीत कमी वेळ काढण्याची मनोवृत्ती बाळगुन आहेत.  ज्याक्षणी आपल्या अधिकृत भूमिकेची कालमर्यादा संपते, त्यावेळी ते झटकन स्विच मारुन आपल्या मूळरुपात (बालरुपात)  येतात व  विविध फोरमवर आपलं हे मूळ रूप दर्शवितात.  हे वेगवेगळे फोरम म्हणजे सोशल मीडिया,  मित्रांची बैठक वगैरे वगैरे!

आता हा प्रकार म्हणायला गेला तर माणुसकीशी सुसंगत! कारण या भूमिका निभावणारी माणसं सुद्धा माणसंच आहेत. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की या माणसांची अनधिकृत (हा चुकीचा शब्दप्रयोग - इथं अधिकृतेतर असं वाचावा) रूपे ज्या श्रोतावर्गांसमोर समोर येतात त्यांना या अधिकृत भूमिकांचे विरळ झालेले हे रुप किंवा कडकपणा पचवण्याची प्रगल्भता असायला हवी.  नाहीतर त्यांच्या मनात या अधिकृत भूमिकांचे हे मनमोकळे रुपच घर करून बसते.  

त्यामुळे या व्यक्ती ज्यावेळी परत आपल्या अधिकृत भूमिकांमध्ये येऊन मानवजातीच्या हिताच्या दृष्टीने अथवा व्यवहार बिनबोभाट चालावेत ह्या हेतूनं योग्य असे संदेश देऊ इच्छितात त्यावेळी त्यांच्यासमोरील श्रोतावर्ग हा काहीसा या संदेशांचे गांभीर्य ओळखण्याच्या पलीकडच्या मनस्थितीत गेलेला असतो. 

आजच्या बालदिनाच्या निमित्ताने या गंभीर रुपातील भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींच्या बालरुपात जाण्याच्या हक्कांची जाणीव ठेवूयात!   त्यांच्यासमोरील त्यांच्या अधिकृत रुपातील सेवाग्रहण करणाऱ्या वर्गाला त्यांच्या अधिकृत आणि मनमोकळ्या भूमिकांमध्ये गल्लत न करणाऱ्या प्रशिक्षणाची गरज मान्य करुयात!

अजुन एक मुद्दा! आजच्या काळात काही पालक, शिक्षक,व्यवस्थापक तुम्हांला असेही मिळतील जे ह्या भुमिकांच्या पारंपरिक रुपांना पुर्णपणे छेद देणारे असतील! तेव्हा त्यांच्या बाह्यरुपावर न जाता त्यांनी दिलेल्या संदेशाकडं लक्ष द्या !!

काही वर्षांनी जेव्हा आपल्याला ह्या भुमिकांमध्ये रोबो दिसतील त्यावेळी सर्वांच्याच बालपणाची कसोटी लागली असेल तेव्हा माणुसकीने बहुव्याप्त अशा शेवटच्या काही बालदिनांपैकी अशा एका आजच्या बालदिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...