साधारणतः सुट्टीच्या दिवशी घराची साफसफाई करण्याची किंवा घर थोड्या प्रमाणात नीटनेटकं करण्याची सवय आपल्यापैकी काहीजणांना असते. दसरा दिवाळी आली की मग मात्र वर्षभराची साफसफाई केली जाते. घर नीटनेटकं होतं आणि आपण एका नव्या जोमाने सणासुदीच्या हंगामाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.
आज मात्र एका वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. आपण आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली येतो. त्या विचारसरणीच्या नकळत प्रेमात सुद्धा पडतो. काहीजणांना ही जाणीव स्पष्टपणे होते तर काही जणांना होत नाही! ज्यांना ही जाणीव स्पष्टपणे होते; त्यातील काहीजण या विचारसरणीचा उघडपणे पुरस्कार करण्याचे धोरण अंगिकारतात, तर काही जण आपली विचारसरणी आपल्यापाशी या धोरणाचा स्वीकार करतात.
आता होतं काय की आपल्यासमोर आयुष्यातील करण्यासारख्या अनेक गोष्टींची यादी सदैव असते. इंग्लिशमध्ये याला 'टू डू लिस्ट' हे अधिकृत नाव देण्यात आलं आहे. 'टू डू लिस्ट' दैनंदिन पातळीवरील करण्यासारख्या गोष्टींची यादी असते. आयुष्यभराच्या पातळीवरील करण्यासारख्या गोष्टींची यादी लक्षात घेतली तर त्याला बकेट लिस्ट म्हणण्याची प्रथा सद्यकाली रुढ होत आहे. जेव्हा केव्हा आपणास सुट्टी मिळते त्यावेळी प्रत्येकाने स्वतःसाठी (जमल्यास त्यात आपल्या नवऱ्याला / बायकोला समावेश करुन) फुरसतीचा काही काळ काढून ठेवावा. साप्ताहिक सुट्टी असेल तर हा काही काळ म्हणजे दोन-तीन तास आणि जर आठवडाभराची सुट्टी घेतली असेल तर हा काळ दिवसभराचा असावा!
आता या काळात आपण काय करावे? प्रथम आपली 'टू डू लिस्ट' आणि 'बकेट लिस्ट' दोन्ही कागदावर मांडून घ्याव्यात. त्यामध्ये सुद्धा 'टू डू लिस्ट' मध्ये प्राधान्यक्रम मांडून घ्यावा. त्यानंतर आपल्याला ज्ञात असलेल्या काही विचारसरणी कागदाच्या दुसऱ्या बाजूला लिहाव्यात. आता या विचारसरणीची उदाहरण द्यायची म्हटली तर
१) मला व्यावसायिक जगात खूप यश मिळवायचं आहे.
२) मला माझ्या आई-वडिलांची आणि नातेवाईकांची काळजी घ्यायची आहे.
३) मला शांततेने जीवन जगायचं आहे आणि त्यासाठी व्यवसायिक यशाशी तडजोड करण्याची माझी तयारी आहे.
४) मला माझा मुलाबाळांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
५) मला भोवतालच्या समाजामध्ये मानाचे स्थान मिळवायचे आहे.
६) मला खूप पैसा मिळवायचा आहे.
७) मला खुप प्रवास करायचा आहे, दक्षिण अमेरिकेला भेट द्यायची आहे वगैरे वगैरे !!
ह्या सर्व विचारसरणी कागदाच्या दुसऱ्या बाजूवर मांडून झाल्या की 100% उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवून तुम्ही यातील कोणत्या विचारसरणींना किती टक्के देणार आहात हेसुद्धा लिहावेत. आता अशा प्रकारे तुमच्या विचारसरणीना देण्यात येणारं वेटेज (महत्त्व) ठरविण्यात आले की ही संयुक्त विचारसरणीचे आयुध घेऊन तुमच्या 'टू डू लिस्ट' कडे आणि 'बकेट लिस्ट' या दोन्हीकडे वळावे. केवळ एक दोन दिवसाची सुट्टी असेल तर फक्त 'टू डू लिस्ट' कडेच पहावे असा माझा अनाहूत सल्ला आहे. आता या 'टू डू लिस्ट' मधील प्राधान्यक्रमातील सुरुवातीच्या काही गोष्टींवर आपण ठरविलेल्या संयुक्त विचारसरणींच्या मदतीने आक्रमण करुन पुढील काही काळात आपण या 'टू डू लिस्ट' मधील हे सुरुवातीचे प्राधान्य असलेले पाच-सहा महाभाग कसे काही हातावेगळे करू शकतो याचे धोरण आखावे. ह्या नियोजनात आपल्यासोबत बायको नवरा असण्याचे प्रयोजन अशासाठी की त्यांच्या सहकार्याशिवाय तुमचे धोरण यशस्वी होण्याची शक्यता कमी असते आणि ह्या सर्व फंदात तुमच्या वागण्यात बदल घडला तर उगाचच संशयाचं वातावरण नको!
हा उपक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्णपणे अयशस्वी होण्याची शक्यता गृहित धरावी. जसे की तुम्ही या प्राधान्यक्रमातील पाच-सहा गोष्टींवर पुढील दीड-दोन महिन्यात लक्ष केंद्रित करून त्यांचे उकलन करण्याचा बेत बनवता पण तो काही कारणास्तव यशस्वी होत नाही. परंतु त्याने हताश न होता पुन्हा एकदा ही नियोजन बैठक दोन तीन महिन्याच्या कालावधीनंतर भरवावी. त्यामध्ये मागच्या कालावधीत जे काही बरोबर घडलं त्यापासून स्फूर्ती घ्यावी आणि जे काही चुकीचं घडलं त्यातून धडा शिकावा! हे आवर्तन साधारणतः चार-पाच वेळा केलं की मग मात्र तुम्हाला वस्तुस्थितीशी अनुरूप अशी ध्येयं ठरवता येणं बऱ्यापैकी शक्य होतं किंवा त्याची शक्यता वाढीस लागते, मग मात्र आपला मेंदू शांत होतो कारण अपेक्षाभंगाचे दुःख आपल्याला कमी प्रमाणात होऊ लागतं! यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या अपेक्षा वस्तुस्थितीशी मिळत्याजुळत्या बनू लागतात!! बकेट लिस्टविषयी सल्ला घेण्यासाठी माधुरी दिक्षीत नेने ह्यांच्याशी संपर्क साधावा !! आला क्षण जगावा ह्या विचारसरणीच्या वाचकांनी ह्या पोस्टकडे दुर्लक्ष करावं !
दसऱ्याच्या सर्व वाचकांना शुभेच्छा आणि आपल्या घराबरोबर आपला मेंदू सुद्धा नीटनेटका करण्याचा यत्न करावा ही विनंती!!
Nice one .The fluency is awesome
उत्तर द्याहटवा