मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

मोगरा


आज बंगल्यामध्ये सायंकाळपासुनच लगबग सुरु होती. माळीदादा आधीच नीटनेटक्या असलेल्या बागेला अजून सोंदर्य आणून द्यायचा प्रयत्न करीत होते. पाण्याच्या कारंज्यामध्ये सर्व फुलं न्हाऊन निघत होती अन प्रसन्नचित्ताने पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यावर डोलत होती. बंगल्यातील मोठ्या दिवाणखान्यात संगीताच्या बैठकीची तयारी मोठ्या जोमानं सुरु होती. रंगनाथरावांची आणि त्यांच्या सोबतीला साथ देणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची आसनं व्यवस्थित मांडून ठेवण्यात आली होती.  मैफिल संध्याकाळी उशिरा सुरु होऊन बहुदा पहाटेपर्यंत चालणार होती. त्यामुळे अशा मैफिलीला पोषक वातावरणासाठी आवश्यक अशी प्रकाशरचना करण्यासाठी दिवाणजी आपली प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. 

रंगनाथरावांना सर्व काही अगदी परिपूर्ण हवं असे.  संपूर्ण बैठकीत त्यांना काही खटकेल असे घडलं तर त्यांचा मुड खराब होऊन जाई! आजचा कार्यक्रम तसा खासच असणार होता. शहरातील बरीचशी प्रतिष्ठित मंडळी कार्यक्रमाला हजर असणार होती. कार्यक्रमाला अजूनही दीड तास बाकी असला तरी रंगनाथराव आपल्या रियाजामध्ये मग्न होते अशा दिवशी त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय आणलेला त्यांना अजिबात खपत नसे हे त्यांच्या नजीकच्या सर्व मंडळींना माहीत होतेच! आणि त्या सर्व नजीकच्या मंडळीमध्ये समावेश होता तो त्यांची अर्धांगी राधिका हिचा!

या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि त्यांच्या पुर्वतयारीमध्ये त्यांचा सहभाग असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला पूर्ण रंगत येत नसे. एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांना माहेरी जावं लागलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनात छोट्या मोठ्या उणिवा राहून गेल्या होत्या. मग त्यामुळे रंगनाथरावांचा शेवटपर्यंत सुर लागलाच नाही.  सर्व रसिकांनी दाद दिली खरी परंतु कुठेतरी काहीतरी राहून गेलं याची जशी रसिकांना जाणीव झाली तशी रंगनाथरावांनासुद्धा!!

ठरल्याप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजता मंडळींचं आगमन व्हायला सुरुवात झाली. त्यांचे स्वागत करण्यात आणि बैठकीमधील त्यांच्या स्थानावर त्यांना  आग्रहानं बसवून देण्यात व्यवस्थापकासोबत राधिकानेसुद्धा मनापासून सहभाग घेतला होता. 
ठीक सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.  सुरुवातीपासून आज रंगनाथरावांचा सूर लागला होता. एकाहून एक सुरेख राग ते गात होते आणि मंडळी मंत्रमुग्ध होऊन गाण्याचा आस्वाद घेत होती!  राधिकेच्या खास देखरेखीखाली सर्व रसिकांची अल्पोपहाराची सोयसुद्धा अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली होती! त्यामुळे रसिकांसाठी ही एक सुवर्णपर्वणी होती असं म्हणायला हरकत नाही! अपेक्षेनुसार मैफिल पहाटेपर्यंत चालली.  रंगनाथरावांना साथ देण्यास आलेले कलाकारसुद्धा ताकदीचे होते. त्यामुळे मध्ये काही वेळ विश्रांती घेऊन रंगनाथराव ताजेतवाने  होऊन येत होते.  आणि पुन्हा रसिकांना आपल्या सुरांच्या वर्षावात न्हाऊ घालत होते. 

गवाक्षांतून पहाटेचा झुंजुमुंजु वारा मंडळींच्या अंगावर आला आणि मग रंगनाथरावांनी आपल्या शेवटच्या सुरांनी रसिकांना तृप्ततेच्या शिखरावर नेऊन बैठकीचा शेवट केला! कधी नव्हे ते दोन मिनिटं बोलुन त्यांनी रसिकांचं आभार सुद्धा मानले. त्यातील त्यांचं शेवटचं वाक्य राधिकेला सुखद धक्का देऊन गेलं! "हे सर्व काही शक्य झालं ते केवळ माझ्या सौभाग्यवतीमुळे!" आपल्या आभारप्रदर्शनाच्या शेवटी ते बोलले! आपली आयुष्यभराची मेहनत या एका वाक्यामुळे सार्थकी लागली असं तिला  त्याक्षणी वाटले! सर्व मंडळी निघतोवर सकाळ झाली होती.  सूर्यदेवाची कोवळी किरणे शयनगृहात प्रवेश करती झाली होती. घरातील थोडीफार आवराआवर करुन कौतुकाचा तो क्षण रंगनाथरावांच्या तोंडून पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी म्हणून राधिका घाईघाईने येती झाली. तोवर रंगनाथराव एखाद्या लहान मुलाप्रमाणे निद्रादेवीच्या अधीन झाले होते.  त्यांची ही गाढ झोप पाहून राधिका हिरमुसली झाली!

दुसरा दिवस अगदी निवांत चालला होता.  दिवसाच्या ह्यावेळी झोप येणं राधिकेला शक्यच नव्हते! परंतु थोडा वेळ तिने झोपण्याचा प्रयत्न केला.  मग ह्या अयशस्वी प्रयत्नानंतर ती उठून घराच्या आवराआवरीला लागली.  रंगनाथराव दुपारी केव्हातरी उठले तोवर घर आपलं पूर्वीचं रुप घेऊन त्यांच्या स्वागतासाठी हजर होतं.  ते घर आणि मालकीण दोघेही रंगनाथरावांच्या एका कौतुकाच्या शब्दासाठी आणि नजरेसाठी आसुसलेले होते.  परंतु रंगनाथराव मात्र आपल्याच तंद्रीमध्ये होते. आपली आंघोळ वगैरे आटपून ते जेवणासाठी आले.  त्यांच्या खास पसंतीचा मेनू राधिकेनं बनवला होता.  त्यांनी राधिकेकडे घरातील सर्व व्यावहारिक गोष्टींची चौकशी केली.  कार्यक्रमासाठी ज्या काही गोष्टी मागवल्या होत्या त्या सर्व गोष्टींची बिले वेळच्या वेळी चुकवण्यासाठी त्यांनी राधिकेला  स्मरण करुन दिले.  त्यानंतर मात्र ते विविध  लोकांकडून  येणाऱ्या अभिनंदनपर  फोन कॉल्सना उत्तरं देण्यात  गढून गेले!

दुपारी दमल्याभागल्या राधिकेला केव्हा डोळा लागला ते तिचं तिला कळलं नाही! जाग आली ती सायंकाळच्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर येऊन तिला उठवलं म्हणून! आपल्याला इतकी कशी गाढ झोप लागली या अपराधीभावनेनं राधिका झटपट उठून बाहेर आली! तर तोवर रंगनाथराव आणि ड्रायव्हर शहरामध्ये कामासाठी गेलं असल्याचे तिला समजलं! ती चहाचा कप घेऊन बाहेर झोपाळ्यावर घेऊन बसली. समोरच मोगरा फुलला होता! संध्याकाळच्या वाऱ्यावर मोगऱ्याची फुलं
डुलत होती. राधिकेला ती फुले पाहून काय वाटलं कुणास ठाऊक परंतु ती झोपाळ्यावरुन त्या फुलांच्या जवळ जाऊन बसली, त्यांना अलगदपणे गोंजारुन त्यांच्याशी शब्दांवाचुनच्या गप्पा मारु लागली! अचानक एक एकटी संध्याकाळ एकटी राहिली नव्हती!

शहरातून रात्री केव्हातरी रंगनाथराव परतले ते पुढील सात दिवसासाठी आपण नागपुरात दौऱ्यासाठी जात आहोत ही बातमी घेऊनच! का कुणास ठाऊक पण एका त्रयस्थ भावनेनं राधिकेने त्यांची ही बातमी ऐकून घेतली!यांत्रिकपणे झटपट तिनं  रावांची तयारी करुन दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच रावांना निघायचे असल्यामुळे त्यांना रात्री लगेच झोपणे आवश्यक आहे हे अध्याहृतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच राव आपल्या ड्रायव्हर सोबत निघून गेले. आठवडाभरासाठीचे पैसे रात्रीच तिला देण्यास ते विसरले नव्हते. 

पुर्ण दिवस राधिकेला खायला उठला होता. काय करावं हे समजत नव्हतं!
ती असंच काहीतरी काम काढून वेळ पुढे ढकलत होती. सायंकाळी पुन्हा एकदा झोपाळ्यावर येऊन बसली असता तो मोगरा एकदा तिला हसताना आणि डुलताना दिसला! तिच्या मनात विचार आला हा किती सुंदर नाच करीत आहे ना! तिला काय वाटलं कुणास ठाऊक! ती मग त्या पुन्हा मोगऱ्याजवळ गेली! बराच वेळ काही न बोलता त्याच्याजवळ बसून राहिली!  "मी तुझ्यासारखे नृत्य केले तर तुला आवडेल ना?" तिनं हळुवारपणे मोगऱ्याला विचारले आणि काय आश्चर्य! त्या मोगऱ्यानं जणु काही आनंदानं स्वतःभोवती डुलकी घेतली !

पुढील आठवडाभर राधिकेचा नृत्याचा सराव जोमानं सुरु होता! महाविद्यालयात असताना ती एक बऱ्यापैकी शास्त्रीय नृत्य करायची! पण पदवीनंतर लगेच लग्न जमलं आणि मग सारं काही राहुनच गेलं होतं ! राधिकेच्या नृत्याचा आवाज ऐकुन एक दिवस तिची शेजारच्या बंगल्यातील मैत्रीण जुई न राहवुन तिच्याकडं आली. "अगं तु इतकं सुंदर नृत्य करतेस हे मला माहीतच नव्हतं !" तिचं नृत्य पाहुन जुई म्हणाली. जुईला सुद्धा शास्त्रीय नृत्याची चांगलीच जाणीव होती. आठवडाभर दोघींचा सराव अगदी जोमात सुरु राहिला! मधल्या काही वर्षांचा जणु काही खंड पडलाच नाही असंच राधिकेला वाटु लागलं ! 

दिवसेंदिवस सायंकाळी मोगरा अजुनच जोमानं फुलू लागला होता!

राधिका सायंकाळी ध्वनिमुद्रिका लाऊन आपल्या नृत्याचा सराव करत होती. आणि अचानक अंगणात रावांची गाडी येऊन थांबली. राव आज येणार हे माहिती असलं तरी इतक्या लवकर येतील ही राधिकेनं अपेक्षा केली नव्हती! राव दिवाणखान्यात येईस्तोवर राधिकेला आवरायला वेळ मिळाला नाही ! राधिकेला ह्या अवतारात पाहुन रावांच्या चेहऱ्यावरील रागाचे भाव पाहुन राधिका पार भयभीत झाली होती. 

पुढील काही दिवस रावांनी अगदी अबोला धरला होता. राधिकेला काय करावं हे अजिबात समजत नव्हतं! शेवटी आठवड्याभरानंतर न राहवुन तिनं  रावांकडं विषय काढला, "काय झालं अबोला धरायला?" "ह्या वाड्यातील सुनेनं आजतोवर कधी नाच केला नव्हता! " कडक स्वरात एक वाक्य  बोलुन राव दिवाणखान्याबाहेर निघुन गेले होते. 

रावांच्या ह्या उत्तरानंतर राधिकेकडं पर्याय उरला नव्हता! एका भरल्या घरातील रितेपण घेऊन जगण्यावाचुन तिच्याकडं दुसरा पर्याय तिला दिसत नव्हता! बागेतील मोगऱ्याचा बहरसुद्धा ओसरला होता! 

समोरच गाण्याची ध्वनिमुद्रिका पडली होती "मोगरा फुलला"... राधिकेनं जवळच पडलेलं पेन घेतलं आणि त्यावर शब्द खरडले "आणि कोमेजला देखील !!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...