मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २० जुलै, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ६ - ब्रुसेल्स, लक्सेनबर्ग

आधीच्या भागांच्या लिंक्स 
१७ जून २०२४ 


आजच्या दिवसाची सुरुवात तुलनेनं सावकाश झाली. वेकअप कॉलची वेळ सकाळी सात वाजता होती. आयबिस हे मोठ्या क्षमतेचे हॉटेल असल्यामुळे नाश्त्यासाठी त्यांच्या उपहारगृहात पर्यटकांच्या प्रत्येक गटासाठी विशिष्ट वेळा राखून ठेवण्यात आल्या होत्या.  अतुल आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी सकाळच्या उठण्याच्या, नाश्त्याच्या आणि प्रस्थान वेळा व्हाट्सअप ग्रुपवर पाठवत असे. प्रत्येक कुटुंबाने या वेळांचे कटाक्षाने पालन करणे अपेक्षित असे. आज मात्र पावणेनऊ ही प्रस्थान करण्याची तुलनेने उशिराची वेळसुद्धा आमच्या गटातील काहीजणांना पाळता आली नाही.  अतुलने मोजक्या परंतु कडक शब्दात सर्वांना दिलेल्या वेळा पाळण्याचे महत्त्व विशद करून सांगितले.  यापुढे जर उशीर झाला तर उशीर करणाऱ्या पर्यटकांना स्वखर्चाने टॅक्सी करून पुढच्या ठिकाणी यावं लागेल असं त्यानं बजावलं. त्यानं ज्या पद्धतीने हा संदेश दिला तो व्यवस्थापन कौशल्याचा हा उत्तम पाठ होता.  ह्या घटनेनंतर आमच्या ग्रुपने प्रत्येक दिवशी सर्व वेळा पाळल्या. 

प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय म्हणता येईल अशी विमान कंपनी असते.  हॉलंड देशाची के.  एल. एम. ही राष्ट्रीय विमान कंपनी आहे असं आपण म्हणू शकतो.  थोड्याच वेळात आम्हाला Schiphol हा विमानतळ दिसला.  इथं अनेक विमानं अगदी जवळून पाहता आली. विमानं आपल्या हँगरमधून रस्त्यानं रनवे पर्यंत जायचा रस्ता आम्ही पाहिला.  इंग्रजीमध्ये  Schiphol या शब्दाचं भाषांतर केलं असता Ship  Hole असे होते.  इथं असलेल्या मोठ्या तलावामध्ये बुडालेल्या अनेक जहाजांच्या घटना लक्षात घेता Schiphol हे नाव देण्यात आले असावे अशी दंतकथा आहे.  युरोपियन देशांमध्ये भौगोलिक सानिध्यामुळं  एकच शब्द  विविध भाषांमध्ये थोडीफार वेगळं रूपं धारण करून अवतरत असावा. भाषातज्ञांनीच  ह्यावर भाष्य करणं योग्य!  

रस्त्याच्या कडेला दिसलेल्या varthak हा शब्द असलेल्या पाटीकडे आमचे लक्ष वेधून अतुल  म्हणाला की इथं काही आपल्या वर्तकांनी मालमत्ता विकत घेतली नाही तर हा शब्द स्थानिक भाषेत प्रस्थान या अर्थाने वापरला जातो.  वाटेत एक मोठा वाहनतळ सुद्धा आम्हांला दिसला.  विमानतळावर जाणारे प्रवासी इथं आपल्या कार पार्क करून प्रवासाला जातात परतल्यावर बाहेर पडल्यानंतर आपली कार त्यांना तात्काळ उपलब्ध असते. 




नेदरलँड्समधील प्रमुख आकर्षण म्हणजे ट्यूलिप गार्डन! ट्यूलिपचा बहर पहायचा असेल तर मे महिन्याच्या आत तुम्हाला इथं यायला हवं. आम्ही जून मध्ये प्रवास करत असल्यामुळे ट्युलिपचा बहर पाहण्याची संधी आम्हांला मिळाली नाही.  युरोपातील अनेक देशांप्रमाणं  नेदरलँडची जमीन ही खूप सुपीक आहे असं मानलं जातं.  ट्यूलिप या फुलांची जिथे शेती केली जाते तो विभाग आम्हाला बसमधून जाताना दिसला.  युरोस्टार पासून आम्हांला आधुनिक पद्धतीच्या पवनचक्क्या दिसत होत्या.  परंतु अजूनही मोजक्या पारंपारिक पवनचक्क्या युरोपात अस्तित्वात आहेत.  अशाच एका पारंपरिक पवनचक्कीचं हे छायाचित्र !


पुढील रस्त्यावर दोन्ही बाजूला वैविध्यपूर्ण नयनरम्य दृश्यांची मालिका उलगडत राहिली. 




बारा दिवसांच्या सहलीत बसमधून एकत्र प्रवास करताना तुम्ही एका कुटुंबासारखेच होऊन जाता.  परंतु सततच्या प्रवासामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळं  अजूनही बसमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले नव्हते.  ऋषीभाई यांनी यासाठी आज पुढाकार घेतला.  ऋषीभाई हे मुंबईतील सत्तरीला पोहोचलेले युवक.  त्यांनी बसमधील प्रत्येक जोडप्याने येऊन आपली लग्नगाठ कशी जुळली ह्याची कथा सांगावी अशी कल्पना मांडली.  सर्व प्रवाशांनी (त्यात महिलावर्गाचा पुढाकार जास्त) ती उचलून धरली.  अर्थात आमचा पुढील तीन तासांचा प्रवास अत्यंत मनोरंजक असा झाला.  तीस-पस्तीस वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाच्या आणि अजूनही मजबूत धाग्यांनी जोडल्या गेलेल्या  सहप्रवासाच्या कथा ऐकणं हा एक मजेशीर अनुभव होता. एकमेकांना कोपरखळ्या मारण्याची ही संधी काहीजणांनी सुरेखरित्या साधली.  

आजचा आमचा प्रवास एम्स्टरडॅम - ब्रुसेल्स - लक्सेंमबर्ग असा होता.  हे एकंदरीत ३६५ किलोमीटर इतके अंतर होते.  ह्यातील एमस्टरडेम ते ब्रुसेल्स हे अंतर जवळपास दोनशे दहा किलोमीटर इतके होते. ब्रुसेल्स  इथे आम्ही तीन तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो.  तिथं एका भारतीय उपहारगृहात आम्ही रुचकर भोजन घेतलं.  

ब्रुसेल्स हे शहर स्थापत्यशास्त्राच्या सुंदर कलाविष्काराचे उदाहरण असलेल्या अनेक इमारतींचे शहर आहे.  इथं आपल्याला व्यावसायिक आणि रहिवाशी या दोन्ही प्रकारच्या इमारती आढळून येतात.  आम्ही इथं गाॅथिक चर्च पाहिलं. 


Berlaymont building ह्या इमारतीमध्ये युरोपिअन महासंघाचे मुख्य कार्यालय आहे. भोवताली फायनान्स टॉवर, पोलीस मुख्यालय अशा महत्वाच्या इमारती होत्या. 



इथं जुन्या वापरलेल्या कार व इतर गोष्टी भंगारात टाकून देण्यासाठी वापरात येणारी मोठी जागा आम्हांला दिसली. 


बांधकामासाठी बहुदा नदीपात्रातून काढल्या गेलेल्या वाळुचे ढिगारे एका ठिकाणी दिसले. ही छायाचित्रं इथं समाविष्ट करण्याचा इतकाच हेतू की युरोपात सुद्धा नित्याच्या आयुष्यातील गरजा भागविण्यासाठी ही सुंदर नसणारी स्थळं अस्तित्वात असतात. आयुष्य म्हणजे केवळ सौंदर्य नाही.  



आता वेळ होती ती ब्रुसेल्स शहरातील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे Manneken Pis ह्या स्थळाला भेट देण्याची!  पाण्याच्या कारंज्यामध्ये लघवी करणाऱ्या छोट्या मुलाचा हा पुतळा आहे. हा इथं १६१८ सालापासून नवीन रूपात अस्तित्वात आहे. विकिपीडिया वर थोडा शोध घेतला असता मूळ पुतळ्याची वारंवार नासधूस केली गेल्यानं १९६५ सालापासून ह्या पुतळ्याची प्रतिकृती इथं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. मूळ पुतळा ब्रुसेल्स संग्रहालयात जपून (लपवून) ठेवण्यात आला आहे. प्रसंगानुरूप ह्या मुलाला कपडे परिधान केले जातात. युरो स्पर्धेचा ज्वर सर्वत्र पसरला असल्यानं खालील छायाचित्रात हे बालक फुटबॉलचा वेष परिधान केल्याचं दिसतं.  सर्व काही ठीक पण ह्या पुतळ्याचा इतका गाजावाजा करण्याचं कारण काय असा प्रश्न मनात नक्कीच निर्माण होतो. 


Grand-Place (French: [ɡʁɑ̃ plas]) अथवा Grand Square किंवा  डच भाषेत Grote Markt हा ब्रुसेल्सच्या मध्यवर्तीय भागातील मुख्य चौक आहे. ह्या चौकाचं आकारमान ६८ गुणिले ११० मीटर असून हा पूर्णपणे लाद्यांनी आच्छादित आहे. ह्या चौकाभोवती टाऊन हॉल आणि आणि उत्तर दिशेला ब्रेड हाऊस ह्या भव्य इमारती आहेत. टाऊन हॉल ही ह्या चौकातील एकमेव मध्ययुगातील इमारत आहे. ब्रेड हाऊस आणि संपूर्ण ग्रँड प्लेस हा युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समाविष्ट आहे. ह्या चौकाचं बांधकाम अकराव्या शतकात सुरु होऊन सतराव्या शतकात संपलं. 



इथं सुप्रसिद्ध बेल्जियम चॉकलेट्सची आणि बेल्जियम वॅफल्सची दुकानं होती. अतुलच्या परिचयातील एका चॉकोलेट दुकानात आम्ही प्रवेश केला. इथं आम्हांला चवीसाठी विविध स्वादाची चॉकोलेटस  देण्यात आली. वीणा वर्ल्डच्या गटाला खास सवलत म्हणून एक जबरदस्त ऑफर आम्हांला देण्यात आली. खरंतर घरगुती चोकोलेट्स एक पॅकेट २४ युरोला होते. आमच्या ग्रुपसाठी १०० युरोला अशी आठ पॅकेट्स देण्यात आली. अर्थात आमच्या गटातील बहुतेकांनी इथं भरपूर खरेदी केली. इथं एक धोक्याची सूचना देऊ इच्छितो. ही चॉकोलेट्स वितळू न देता भारतातील घरात आणणं हे जवळपास अशक्यप्राय काम आहे.  आमच्याबाबतीत सुद्धा हेच झालं. वितळलेल्या चॉकोलेट्सचा लगदा मित्रमंडळी, नातेवाईक ह्यांना देणं इष्ट न समजलं जात असल्यानं सध्या मी ही चॉकलेट्स संपविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. हा माणूस सातत्यानं कारली का विकत घेत आहे हा आमच्या बोरिवलीच्या भाजीवाल्याला पडलेला प्रश्न ! 


चॉकलेट्स खाऊन झाल्यावर सुप्रसिद्ध बेल्जियम वॅफेल्सचा आस्वाद घेणं क्रमप्राप्त होतं. रांगेत राहून वगैरे विकत घेतलेलं बेल्जियम वॅफेल्स त्यांच्या मुंबईत मिळणाऱ्या अवताराच्या तोडीस तोड नव्हतं असं बहुतेक सहप्रवाशांचं मत पडलं ! आता बोला !

युरोपात बऱ्याच ठिकाणी विनामूल्य स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध असे. परंतु जर दीर्घ प्रवासात असं विनामूल्य स्वच्छतागृह उपलब्ध होणार नसेल तर आम्हांला उपलब्ध असलेलं सशुल्क स्वच्छतागृह वापरण्याची सूचना केली जात असे. प्रति माणशी एक - दीड युरो असे हे शुल्क असे. 

पुन्हा एकदा बसमध्ये बसून आम्ही दोन तासांचा प्रवास करून लक्सेनबर्ग इथं पोहोचलो.  लक्सेमबर्ग हा अत्यंत विकसित असा देश असून आय. एम.  एफ. (जागतिक नाणेनिधी संघ) आणि जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगातील प्रतिमाणशी सर्वाधिक जीडीपी (दरडोई  असलेला देश आहे.  या देशात प्रवेश करण्यासाठी प्रति प्रवासी २५० युरो इतके शुल्क द्यावे लागते असे आम्हाला सांगण्यात आले.  इंटरनेटवर याला दुजोरा देणारी माहिती मिळाली नाही.  ऍमस्टरडॅम ते ब्लॅक फॉरेस्ट जर्मनी ह्या प्रवासातील एक मधला थांबा म्हणून बऱ्याच वेळा लक्सेनबर्गकडे पाहिलं जायचं. हळूहळू त्याची प्रतिमा बदलत चालली आहे. लक्सेनबर्ग हा एक देश व  शहरसुद्धा आहे.  जवळपास सात लाख लोकसंख्या असलेला हा देश युरोपातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये गणला जातो.  लक्सेनबर्ग शहरांमध्ये संध्याकाळी फिरण्याचा अनुभव संस्मरणीय होता.  या शहराची श्रीमंती या फेरफटक्यामध्ये पावलोपावली जाणवत होती. सुर्याचं पिवळेधम्मक ऊन शहरातील उच्चभ्रू  परिसराला, सुंदरशा इमारतींना साजिरं रूप प्रदान करत होतं.  इथं आम्ही एक ट्रॅम राईड घेतली.  दर चार-पाच मिनिटांनी ट्रॅम येत होत्या.  अर्थातच इथं तुम्ही हव्या त्या स्थानकावर चढवून हवं तिथे उतरू शकत होता. हा ट्रॅमप्रवास विनामूल्य होता. लक्सेनबर्ग शहरातील हे अल्पावधीचं वास्तव्य मनाला अगदी तरतरी आणून देणारं ठरलं.  सायंकाळचे जेवण आम्ही स्वागत या उपहारगृहात घेतले.  इथे जेवण अत्यंत रुचकर होते. इथे बनवण्यात आलेले वरण अजूनही माझ्या लक्षात आहे.  या शहराचे सौंदर्य, ही संध्याकाळ आमच्या नक्कीच कायम लक्षात राहील. 










त्यानंतर आमची वाटचाल हॉटेलच्या दिशेने सुरू झाली.  हा रस्ता, भोवतालचा निसर्ग अत्यंत नयनरम्य असा होता.  युरोपातील शहरांपासून दूरच्या भागातील गावांचे सौंदर्य कसे असतं,  मावळत्या दिनकराच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये ते कसं खुलून उठतं याचा अनुभव आम्ही घेत होतो.  अशाच एका घराचं हे दूरवरून घेतलेलं चित्र! इथल्या गवतावर  सायंकाळी घराबाहेर बसून आकाशातील ढगांकडे पहायला, भोवतालच्या पक्षांच्या गुंजन ऐकण्याचा अनुभव नक्कीच स्वर्गीय असेल!  








हा रस्ता संपू नये असं वाटत असतानाच आमचं Threeland हे हॉटेल आलं.  या संपूर्ण सहलीतील सर्वोत्तम हॉटेलपैकी एक असं हे म्हणता येईल.  येथील खोल्या प्रशस्त होत्या. ह्या हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या पाटीकडं निरखून पाहिलं असता तुम्हांला हॉटेल, Brasserie व रेस्टॉरंट अशी तीन वेगवेगळी नावं दिसतील. Brasserie आणि रेस्टॉरंटमधील फरक माहितीमायाजाल सुरेखरित्या समजावून सांगतं. 

French brasseries and bistros tend to offer more traditional and affordable meals, with fairly speedy service and noisy atmosphere, while restaurants are usually better for more special fares. 

बाथरूम वगैरे अत्यंत स्वच्छ आणि आधुनिक सोयींनी परिपूर्ण असं होतं.  साडेनऊ झाले तरी संधीप्रकाश रेंगाळत होता.  त्यामुळे उत्साही सहप्रवासी हॉटेल भोवतालच्या निसर्गरम्य परिसराचा फेरफटका मारण्यासाठी निघाले.  आमच्या सहलीतील ही एक संस्मरणीय अशा संध्याकाळच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बिछान्यावर लोळण घेणं मी पसंत केलं !







ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 
(क्रमशः )

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ५ - हॉलंड, मडुरोडॅम

आधीच्या भागांच्या लिंक्स 

प्रस्तावना

पूर्वतयारी, बोरिवली ते लंडन

लंडन दर्शन

२०२४ - युरोप सहल - भाग ४- फ्रान्स




१६ जून २०२४ 

युरोप पहावा कसा गड्या?  युरोप पाहताना तुम्ही रसिक बनायला हवं. तुम्ही अगदी आसुसलेल्या नजरेने दिसणारं सारं काही मनःपटलावर साठवून ठेवायला तयार राहायला हवं. आपलं शहर, आपल्या कार्यालयातील / घरातील चिंता सारं काही त्या काळात दूर सारायला हवं. युरोपातील दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं, कधी निळेशार तर कधी अभ्राच्छादित आकाश, बर्फाने आच्छादलेली पर्वतांची शिखरं  (त्यांचीसुद्धा अनेक लोभस रूपं, कधी दुरून दिसणारी तर कधी आपल्या अवतीभोवती वावरणारी), ऐतिहासिक महत्व असणारी अनेक शहरं  (ह्या शहरांनी जसं वैभव पाहिलं तसंच दोन महायुद्धांमध्ये प्रचंड हिंसाचार पाहिला), गॉथिक वास्तुशास्त्राची परंपरा आपल्या खांद्यांवर घेऊन अनेक वर्षांच्या इतिहासाला साक्षीदार असलेल्या अनेक प्राचीन वास्तू, संपत्तीचं प्रदर्शन करणारे विविध राजवाडे, ऐतिहासिक महत्त्व जपतांनाच आधुनिकतेची योग्य कास धरलेली शहरं,  पुरातन वस्तुंची योग्य काळजी घेणारी कलात्मक संग्रहालयं सारं काही अगदी संस्मरणीय असतं, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारं असतं. आपल्याच माणसांना ह्या मोकळया वातावरणात प्रसन्न मुद्रेनं वावरताना पाहणं नक्कीच आनंददायी असतं. इंग्लंडचे थंड वातावरण, तिथली औपचारिकता,  फ्रान्सची कलात्मकता, तारुण्याची / कलेची आस,  ऍमस्टरडॅममधील काहीसं वेगळं वातावरण, स्वित्झर्लंड / ऑस्ट्रियामधील स्वर्गीय सौंदर्य, फुफ्फुसांना पुढील कित्येक महिन्यांसाठी पुरणारा ताजातवाना प्राणवायू, स्वित्झर्लंड / ऑस्ट्रिया सोडून इटलीमध्ये प्रवेश करताना हिरवेपणाची काहीशी कमी गडद झालेली छटा, तिथल्या माणसांत जाणवणारं काहीसं रांगडेपण सर्व काही न विसरता येण्यासारखं ! इंग्लंडमध्ये क्वचितच दिसणाऱ्या सायकल पुढील प्रवासाचा अविभाज्य घटक झाला हा एक अजून दखल घेण्यासारखा मुद्दा !

ह्या सहलवर्णनाच्या शृंखलेतील हा पाचवा भाग! मोजक्याच पण हुरूप आणणाऱ्या प्रतिक्रिया ! लंडन, पॅरिस ही मोठी शहरं पाहून झाल्यानंतर आता वाटचाल निसर्गाच्या अद्भुत नजराण्याच्या दिशेनं ! पॅरिसच्या हॉटेलातील नाश्ता हा पूर्णपणे कॉन्टिनेटल होता. पोहे, उपमा, डोसे ह्यांच्या पलीकडं सुद्धा नाश्ता असू शकतो, तो आपल्याला आवडू शकतो ह्याची पुन्हा एकदा आठवण करून देणारा! आज मोठा टप्पा गाठायचा होता. फ्रांस, बेल्जियम ते हॉलंड ! आमची बस सरासरी १०० किमी प्रतितास ह्या वेगानं प्रवास करत होती. ह्या सर्व प्रवासात मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची आठवण होणं काहीसं नैसर्गिक आणि खऱ्या वसईकराचं लक्षण ! 

आजचा प्रवास खूपच नेत्रसुखद होता. भुरभुरता पाऊस, पावसाच्या पाण्यानं तृप्त होऊन हवेच्या झोक्यांवर डुलणारी शेतं,  धरणीमातेला, निसर्गाला ताजतवानं ठेवण्याची आस बाळगणारे, आकाश व्यापून टाकणारे,  जलाचा प्रचंड साठा वाहणारे मोठमोठाले मेघ, हवेच्या झोक्यांवर डुलणाऱ्या महाकाय पवनचक्क्या - सारं सारं काही आम्हांला प्रसन्नतेच्या हिंदोळ्यावर अगदी हळुवार वेगानं घेऊन जाणारं होतं. आयफोन भले निसर्गाची रूपं छानपणे साठवून ठेवेल पण हा अनुभव मात्र ज्याचा त्यानं घ्यावा, पुढं सावकाश रवंथ करावा. 

युरोपात चालकांनी विशिष्ट तासांनंतर विश्रांती घेणं आवश्यक असतं. एक म्हण आहे - देवावर भरंवसा तर ठेवावाच पण आपली कार लॉक सुद्धा करावी. त्या उक्तीनुसार सर्वजण नियमांचं पालन तर करतीलच पण यंत्रणेत सुद्धा अशा काही योजना कराव्यात की नियम मोडणं दुरापास्त व्हावं.  Tachograph  / Tachometer नावाचा एक नवीनच प्रकार मला ह्या सहलीत कळला. प्रत्येक चालकाचा एक Tachograph आयडी असतो. सकाळी बस चालू करताना ह्यात लॉगइन केल्याशिवाय बहुदा बस सुरु होत नाही. मग ह्या चालकानं दिवसभरात सतत किती तास बस चालविली, चार तासानंतर थांबा घेतला की नाही, वेगमर्यादेचे पालन केले की नाही ह्या सर्व गोष्टींवर नजर ठेवली जाते. देश बदलला की बस बाजूला घेतली जाते. बस बाजूला घेऊन हा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी  वेगळा छोटासा मार्ग (Diversion) बनविलेला असतो.  आपत्कालीन प्रसंगात अडकलेल्या वाहनासाठी SOS (Save Our Souls) मार्गिका असते. ठराविक अंतरावर टेलिफोन बूथ असतात जेणेकरून संकटग्रस्त चालक यंत्रणेशी संपर्क साधू शकतो.  ह्या प्रवासात अतुलने सांगितल की फ्रान्सच्या ८.५ कोटी लोकसंख्येपैकी केवळ २.५ कोटी स्थानिक आहेत. बाकी सर्व पूर्व युरोप व इतर खंडांतून आलेले स्थलांतरित आहेत. हीच कथा बऱ्याच इतर देशांची ! करोनामुळं स्वदेशी परतलेले बहुतांशी स्थलांतरित न परतल्याने मनुष्यबळाची मोठी चणचण निर्माण झाली आहे. 

बेल्जियम मध्ये मॅकडॉनल्ड उपहारगृहात आम्हांला बर्गर, फ्रेंच फ़्राईज आणि ट्रॉपिकाना असं भोजन देण्यात आलं. आमच्यासाठी चाळीस आसने राखून ठेवण्यात आली होती. आजच्या भागातील भारतीय ग्राहकाच्या क्रयशक्तीचा विजय असो हे विधान वापरण्यासाठी ही योग्य जागा ! बसमध्ये एव्हाना गायकमंडळी जागृत झाली होती. ह्या युरोपियन मस्त वातावरणात मुकेशची सत्तरीतील गाणी ऐकणं हा आमच्यातील काहींसाठी नक्कीच आनंददायी अनुभव नव्हता.  




आज अँटवर्प (Antwerp) हे शहर पार केलं. थोड्या वेळातच आम्ही हॉलंड ह्या देशात होतो. इंग्लंडमधील वास्तव्य आणि विमानप्रवासाच्या निमित्तानं फ्रान्समध्ये घेतलेला थांबा ह्यामुळं ह्या  सहलीत आतापर्यंत माझ्या बायोडाटामध्ये नवीन देशांची भर पडली नव्हती. आज त्या यादीत बेल्जियम, हॉलंड हे देश समाविष्ट झाले.  आमचा मोर्चा आता मदुरोडॅम ह्या प्रतिकृती संग्रहालयाकडं वळला.  



हॉलंड देशातील प्रसिद्ध वास्तूंच्या २५:१ ह्या प्रमाणात बनविलेल्या ह्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. ह्या प्रतिकृती बनवितांना,मूळ वास्तूंतील सर्व  बारकावे ह्या प्रतिकृतींमध्ये उतरवताना घेतलेली मेहनत आपल्याला थक्क करून सोडते. विविध वास्तूंभोवती अविरत फिरणाऱ्या बस, रेल्वेगाड्या, माणसं सारं काही हुबेहूब वाटत राहतं. Honey I shrunk the kids ह्या चित्रपटाची आठवण येते. त्यातील मुलांसाठी अथवा लिलिपुटसाठी हे अगदी योग्य विश्व ! फुटबॉल मैदानातील ध्वनिरचना, विमानाची प्रतिकृती सारं काही सुरेख! एक संकल्पना ते ती प्रत्यक्षात साकार आणणे ह्यामागं किती मेहनत घेतली गेली असेल हा फक्त विचार करूनसुद्धा थक्क व्हायला होतं. इथल्या प्रतिकृतींची ही काही मोजकी छायाचित्रं !













































रात्रीचा मुक्काम इबिस ह्या हॉटेलात होता. मदुरोडॅम ते इबिस हा प्रवास अगदी सुखद सूर्यप्रकाशात पार पडला. हिरवीगार शेतं, जवळच्या विमानतळावर उतरणारी, तिथून उड्डाण करणारी विमानं सारं काही छान होतं. ऍमस्टरडॅम शहराच्या काही भागांत  देहविक्रीचा व्यवसाय अधिकृतपणे चालतो. वेगवेगळ्या प्रकारची माणसं येतात. त्यामुळं रात्री भटकंती करायला गेलात तर सांभाळून असं आम्हांला सांगण्यात आलं. 

इबिस हॉटेल बाह्यदर्शनी ठीकठाक असले तरी त्यातील खोल्या अत्यंत छोट्या आणि सुविधा अगदीच बेताच्या होत्या. तिघांच्या बॅग्स उघडता क्षणी सर्व खोली व्यापून गेली होती.  जेवणात वैविध्य असले तरी एकंदरीत मामला फारसा खास वाटत नव्हता. परंतु जेवणाच्या टेबलावरून रात्री नऊ वाजता घेतलेलं छायाचित्र मनाला अगदी शांत करणारं होतं. 


नाश्ता फ्रान्समध्ये, दुपारचे भोजन बेल्जियममध्ये आणि रात्रीचे जेवण हॉलंडमध्ये असा एक अनोखा विक्रम नोंदवून आम्ही निद्राधीन झालो! 

ही पोस्ट काहीशी संक्षिप्त आणि थोड्या वेगळ्या धाटणीची!  प्रवासवर्णनाच्या 'आँखों देखा हाल'  पद्धतीपासून फारकत घेत मनातील भावनांना टिपून घेण्याचा प्रयत्न करणारी, छायाचित्रांना अधिक बोलतं करणारी! 

(क्रमशः )

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...