मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २१ मार्च, २०२१

कुत्र्याचे गोंडस पिल्लु आणि POV (Point of View)

 



घराभोवतालच्या परिसरात काही भटकी कुत्री भटकत असतात. साधारणतः ही मोठी कुत्री असतात. त्यांचा तसा फारसा उपद्रव नसल्यानं त्यांच्याकडं आम्ही फारसं लक्ष देत नसतो. धाक असावा म्हणुन अधूनमधून जोरानं ओरडुन त्यांना पळवुन लावण्यापलीकडं ते आमचं लक्ष वेधुन घेत नाहीत. 

पण मध्यंतरी एक घटना घडली. ह्या गटामध्ये एक कुत्र्याचं पिल्लु सहभागी झालं. दिसायला गोंडस असं ! ह्या पिल्लाच्या चेहऱ्यावर कुतूहलभावना ओसंडुन वाहत असते. बहुदा त्यानं बरीच लाडीगोडी लावून ह्या मोठ्या कुत्र्यांच्या गटात आपला शिरकाव करुन घेतला असावा असा मला दाट संशय आहे. कुत्र्याचं पिल्लु ज्यावेळी आपल्या छोट्या पंजांनी मोठ्या कुत्र्यांच्या अंगावर लाडाने थापटी मारते त्यावेळचे मोठ्या कुत्र्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे ! 

हे सारं वर्णन कुत्र्याचं पिल्लु आणि पाटील कुटुंबीय गुण्यागोविंद्याने नांदु असा समज करु देणारे ! म्हणायला गेलं तर अधूनमधून त्याला पाहुन जोराने मारलेल्या बोंबेव्यतिरीक्त ह्या द्वैराष्ट्रीय संबंधात बाधा यावी अशी आगळीक पाटील कुटुंबियांकडून घडली नव्हती! जे काही घडलं त्याला सर्वस्वी हे कुत्र्याचे पिल्लुच जबाबदार असं विधान कुटुंबियांचा जबाबदार प्रतिनिधी म्हणुन मी करु इच्छितो. 

तर झालं असं ! घराबाहेरच्या परिसरात फिरण्यासाठी असलेली पादत्राणे आम्ही दरवाजाबाहेर ठेवतो. वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे हो ती ! दुपारच्या वामकुक्षीच्या वेळी किंवा रात्री साडेनऊनंतर सर्व काही सामसुम झाल्यानंतर ही टोळी परिसरात एक फेरफटका मारण्यासाठी येते. अशा वेळी जन्मजात असलेल्या कौतुहलभावनेनं ह्या पिल्लुच्या सारासारबुद्धीचा ताबा घेतला असावा. सर्वप्रथम आमचे जे दोन स्लिपर्सचे जोड आहेत त्याकडं ह्या पिल्लुचं लक्ष गेलं. निळ्या जोडातील एक आणि लाल जोडातील एक अशा दोन स्लीपर्स घेऊन त्यानं पलायन केलं. बहुदा मोठ्या कुत्र्यांनी त्याचा रंगशिकवणीचा वर्ग आयोजित केला असल्यानं त्याला दोन्ही रंगाचे एकेक स्लीपर्स हवे असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी गडबड उडाली. पण आता एक लाल आणि एक निळी अशा स्लिपर्सची आम्ही सवय करुन घेतली आहे. काल दुपारी घरी आलेल्या बाईंची चप्पल पळविली त्यानं ! नशिबानं परिसरात मिळाली ! 

त्यानं केवळ पाटील कुटुंबियांवर लक्ष केंद्रित केलं आहे असं नाही. शेजाऱ्यांच्या पादत्राणांना सुद्धा त्यानं योग्य न्याय दिला आहे. आज सकाळी गेटबाहेर त्यानं आणुन टाकलेलं हे असंच एक चप्पल ! 


त्याच्या ह्या कारवायांना वैतागुन त्याला दुषण देणं हा झाला मनुष्याचा दृष्टिकोन (Point Of View). पण आपल्याला त्या पिल्लुचा दृष्टिकोन सुद्धा लक्षात घ्यायला हवा ना ! ईश्वरानं त्याला ह्या पृथ्वीवर जन्म दिला ! जन्मासोबत कुतूहलभावनासुद्धा दिली ! त्याच्यासाठी ह्या रंगीबेरंगी स्लीपर्स किंवा बाकी चपला ह्या एक प्रकारे खेळणं असणार ! आपल्या संदर्भाने हे आम्हांला आमचं घर वाटत असणार तर त्या पिल्लुच्या आणि कुत्र्यांच्या संदर्भाने तो त्यांचा भुभाग असणार ! मग ह्या स्लिपर्स गायब होण्याच्या प्रकारात त्याची पुर्णपणे चूक म्हणता येणार नाही ना ! 

थोडक्यात सांगायचं झालं तर आयुष्यात ज्या ज्या वेळी आपला दुसऱ्या जीवांशी, वृक्षांशी संबंध येत असतो त्या त्या वेळी त्यांचा सुद्धा एक दृष्टिकोन असतो हे ध्यानात असलं पाहिजे ! जीवन एकांगी दृष्टीकोनातुन नसावं त्यात सहजीवनाची भावना असावी ! 

ह्या साक्षात्काराबद्दल धन्यवाद पिल्लु !

(तळटीप - ह्या पोस्टसाठी त्याचा फोटो असावा म्हणुन आज सकाळपासुन मी त्याची वाट पाहत होतो. शेवटी मगाशी काही वेळापुर्वी त्याचं अंगणात आगमन झालं. मी जवळ जाऊन त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर ते पळालं. आता लोक म्हणतात शस्त्रांनी केलेले वार भरुन निघतील पण शब्दांचे नाही ! त्याचप्रमाणे कदाचित पिल्लु म्हणाले असेल एकवेळ दगड मारला तर चालेल पण बोंब नको ! )

शनिवार, ६ मार्च, २०२१

तुमच्या, आमच्या, सर्वांच्या कार्बन पाऊलखुणा !!!

 

माणसं निरागसतेनं सोशल मीडियावर वावरत असतात. म्हणजे ते आपल्या निरागसतेविषयी स्वतःला ठामपणे बजावत असतात. आपला सोशल मीडियावरील वावर हा मनात कोणताही वाईट हेतु न बाळगता असतो असं सर्वांनाच वाटत असतं. परंतु खरोखर पाहता असला काही प्रकार असतो का ह्याविषयी मी साशंक आहे !! 

प्रत्यक्ष जीवनात जसा आपल्या उपस्थितीने काहीजणांना आनंद होतो तर काहींना नाही! तसलाच काहीसा प्रकार सोशल मीडियावरसुद्धा असतो. तुमच्या किमान तटस्थ उपस्थितीची एक लक्ष्मणरेषा असते; तुम्ही जोवर त्या मर्यादेत असता तोवर तुमचं अस्तित्व कोणालाच खटकत नाही. पण विविध कारणास्तव लोक ही मर्यादा ओलांडतात. 

कधी आयुष्याच्या एका टप्प्यावर लोकांचा आत्मविश्वास बळावतो आणि ते जगापुढे सादर होतात. काही उदाहरणांत लोकांना आपल्या भिडस्तपणावर मात करण्यात यश मिळते आणि मग ते सातत्यानं जगापुढं सादर होऊ लागतात. 

जगापुढं एखाद्या व्यक्तीनं सादर होण्यास सुरुवात करणे ही एक विश्लेषण करण्यास योग्य अशी घटना आहे. सोशल मीडियावर सादर होणाऱ्या माणसांसाठी सोशल मीडियाने आधीच काही विशिष्ट विशेषणांची यादी बनविलेली असते. सोशल मीडियावरील तुम्ही निर्माण केलेल्या काही डेटा पॉईंट्सच्या आधाराने त्यातील काही विशेषणे तुमच्याशी जोडली जातात. बऱ्याच वेळा वेगवेगळे गट तुम्हांला वेगवेगळ्या विशेषणांशी जोडतात. 

आपल्या सोशल मीडियावर व्यक्त होण्याच्या गरजेला प्राधान्य द्यावं की आपण कोणत्या विशेषणांशी जोडले जात आहोत ह्याची चिंता करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न! सोशल मीडियावर व्यक्त होण्याची गरज काही जणांच्या बाबतीत अगदी तीव्र असते. त्या क्षणाला व्यक्त झाल्याशिवाय चैन पडत नाही अशी ही अवस्था असते. 

व्यक्त होणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा दोन शक्यता संभवतात. काहीजण आपल्याशी जोडल्या जाणाऱ्या विशेषणांची चिंता करत असल्यानं घाबरत-घुबरत व्यक्त होतात तर काहीजण विशेषणांची अजिबात चिंता करत नाहीत आणि अगदी मुक्तपणे व्यक्त होतात !  

पोस्टचे शीर्षक काहीसं गैरसमज निर्माण करणारे आहे. काहीजणांचा सोशल मीडियावरील वावर बऱ्याच जणांना आनंददायी असतो. त्यामुळं सरसकट त्याला कार्बन पाऊलखुणा संबोधणे योग्य नाही. तरीही तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालात तर नक्कीच कोणाला तरी तुमच्या वावराचा काहीसा त्रास झाला असेल ही शक्यता निर्माण होते! 

त्यामुळं दररोज रात्री झोपण्याआधी स्वतःशीच खालील काही वाक्यं म्हणणे इष्ट !

हे सर्वशक्तिमाना !

सोशल मीडियावरील आज माझ्या अल्पमतीला अनुसरुन मी काही प्रमाणात वावर केला !

ह्या वावराने जाणता अजाणता भूतलावरील प्रेमळ व्यक्तींना कष्ट पोहोचले असू शकतात.  

ह्या घटनेबद्दल मला नक्कीच वाईट वाटतंय ! 

ह्या कष्टनिर्मितीचे अचुक विश्लेषण जर मला प्राप्त झालं तर नक्कीच मी माझ्या वावरात बदल घडवुन आणीन!!!

सोमवार, १ मार्च, २०२१

सावर रे सावर रे !!

मध्यंतरी काही प्रतिकुल म्हणाव्या अशा गोष्टी एकत्र घडल्या. म्हटलं तर प्रतिकुल; म्हटलं तर नाही! म्हणजे झालं काय तर कार्यालयीन विश्वात  एक असं किचकट काम पदरात पडलं ज्यात मेहनतीच्या पलीकडं एका अनोळखी प्रांतातील ज्ञान आवश्यक होते, वसईतील थंडीनं बराच जम बसविला, मी ऑनलाईन बुद्धिबळाच्या आहारी गेलो (अजुनही त्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय !) आणि त्यात भर म्हणुन बागकामासाठीचा पंप बंद पडला. गेले महिनाभर विविध तज्ञ लोकांना विनंती करुन सुद्धा अजुन तो काही दुरुस्त झाला नाही. बहुदा नवीन घ्यावा लागेल ! 

ह्यात झालं असं की बाग सुकू लागली. थंडी, कार्यालयीन काम आणि बुद्धिबळ ह्या घटकांमुळे मी काहीसा उदासीन झालो. दररोज ही सुकणारी छोटी झाडं पाहुन मन दुःखी व्हायचं, पण का कोणास ठाऊक जिद्द कमी पडत होती. थोडीफार मोठी झाडं जशी की काही वर्षांची जास्वंदी वगैरेनी पाण्याअभावीसुद्धा टिकाव धरला. पण गेल्या एक जूनला लावलेली जास्वंदीची फांदी, 



इतके महिने सतत पाण्याची सवय झालेल्या दुर्वा वगैरे बिचाऱ्या पाण्याअभावी झुरू लागल्या. 


त्यातल्या काही अगदी सुकल्या देखील ! 


ब्राह्मी आणि लिलीच्या हिरवेगारपणा काहीसा लयीला गेला ! 



अचानक गेल्या आठवड्यात काही घटना घडल्या. थंडीचा जोर कमी झाला, कार्यालयीन काम काहीसं आटोक्यात आलं. आणि मग शनिवारी अचानक मुड सुधारला. विहिरीला दाजींनी नवीन रस्सी सुद्धा आणली. 


मग ऍमेझॉनवरील आणलेली झारी घेतली. हाताने विहिरीचे पाणी उपसुन झाडांना पाणी देण्याचा उद्योग सुरु केलाय. य चांगलं वाटतंय ! 



गेले दोन दिवस ह्या सर्व इवल्या झाडांना दररोज पाणी देतोय! त्यांची नाराजी दूर व्हायला खुप वेळ लागणार ! गेले काही दिवस मी बाजुने जाऊन सुद्धा मी पाणी देत नाही हे पाहुन सुद्धा त्यांना कसं वाटलं असेल ?  त्यांनी माझ्याविषयी गमावलेला विश्वास मी परत मिळवु शकेन का? आता माझा आशावाद कायम राहो ही अपॆक्षा !  आज सकाळी दिसलेल्या दुसऱ्या बहरातील जांभळाच्या फुलाचा फोटो ! 



पोस्टचा मुख्य मुद्दा ! ह्या सर्व प्रकारात ऑनलाईन बुद्धिबळाच्या आहारी जाणं हा खुप चिंताजनक प्रकार वाटतोय मला ! माझ्यासारख्या एका जीवनात स्थिरावलेल्या माणसाच्या बाबतीत सुद्धा हा प्रकार होऊ शकतो !माझं  chess.com वरील मानांकन १४२५ वर जाऊन मग ह्या काळात ते १२५० च्या आसपास घसरले. मनःस्थिती चांगली नसताना ह्या पातळीवरील खेळाडूंशी सतत खेळु नये हे कळुन सुद्धा वळत नव्हते ! जगातील माणसं सतत तुमच्याशी खेळायला तयार असतात. सामना हरला की पुढील सामना जिंकायला हवाच ही एक वेगळीच भावना तुमचा ताबा घेते. ह्यात खिलाडुभावना कमी आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची खुमखुमी जास्त असते. प्रतिस्पर्ध्याला हरविण्याची खुमखुमी सतत तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला आव्हान देत असते. आभासी दुनियेतील हा झाला एक प्रकार. दुसरा एक प्रकार ज्या बाबतीत मी काहीसा नशीबवान ठरलो तो ऍमेझॉन प्राईमचे अंगी ओढवुन घेतलेले सदस्यत्व ! इथंही जाहिरातीच्या व्यत्ययाशिवाय विविध मालिका, चित्रपट सतत तुमच्यासमोर येत राहतात. ह्याच्यापासुन स्वतःला वाचविणे हे भविष्यकाळातील सर्वांपुढं आणि खासकरुन तरुण पिढीपुढं मोठं आव्हान ठरणार आहे. 

निसर्गाची आवड, छापलेल्या पुस्तकवाचनाची ओढ आणि चांगल्या मित्रांची संगत ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीच पुढील काळातील मानसिक स्वास्थ्याचा आशेचा किरण ठरणार आहेत ! आपण ऑनलाईन दुनियेतील एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलो आहोत हे मान्य करणे हा ह्यातून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा टप्पा ठरणार आहे ! 

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

अहमदाबाद कसोटी - यारों की मैफिल

 


स्थळ - अहमदाबाद कसोटी मैदान 

दिनांक - २६ फेब्रुवारी २०२१

वेळ - सकाळी ७ वाजता 

रुट भल्या पहाटे जॉगिंगसाठी मैदानावर येतो.  तिथं विराट आधीच उत्साहानं मैदानाला फेऱ्या मारत असतो. रुट त्याला पाहुन मंदस्मित देतो. त्याला पाहुन विराट आपलं धावणं थांबवतो आणि त्याच्याजवळ येतो. 

विराट - "भिडु काय म्हणतोस?"

रुट - "काय म्हणणार साहेबा ! रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला !" 

विराट - "अबे काय झालं? झालं काय तुला ?"

रुट - "पाहुण्यांना वागविण्याची ही काय रीत झाली? लहानपणी आईनं सांगितलेल्या कोल्हा आणि बगळा ह्यांच्या खिरीच्या गोष्टीसारखा हा प्रकार झाला !"

विराट - (चेहऱ्यावर आलेलं हसु महत्प्रयासानं दाबुन ) "अरे तुझ्या आईनं पण तुला सांगितलेली ही गोष्ट !! मला नव्हती सांगितलेली माझ्या आईनं ! पण मागे एकदा अजिंक्यने संत्रा ज्यूसचे चार-पाच प्याले रिचविले तेव्हा त्याला चढल्यावर त्यानं ही गोष्ट सांगितली होती आम्हां सर्वांना !"

रुट आपलं सारे दुःख विसरुन खो खो हसु लागतो. 

विराट - "अबे हसतो काय ?"

रुट - "तुम्ही एक तर पार्टीत संत्राज्युस पिता आणि वर असल्या गोष्टी ऐकता !!"

विराट - "ती मुंबईची बाळबोध पोरं रे ती !ते जाऊ दे ! तुला इतकं तोंड मारुन बसायला काय झालं ? जिंदगीत पुन्हा कधी आठ धावांत पाच बळी मिळणार नाहीत हे लक्षात ठेव समजलं ?"

रुट - (हळुवार शब्दांत) "हो रे ! पण काही झालं तरीआपण कप्तान! वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी महत्वाची हो कि नाही?"

विराट - "हो ते ही खरंच !"

रुट - "पण विराटभाई मला एक सांग ! तू पण एक ओव्हर टाकुन बघायची नाही का ? जिंदगीत कसोटी सामन्यात विकेट मिळविण्याची ह्याहून उत्तम संधी मिळणार नाही कधी !"

विराट - "येडा समजला तु मला ! तुझ्या त्या बेन स्टोकचे टाळकं आधीच फिरलेले असते आणि मला समोर पाहुन सहा षटकार वगैरे मारले असते तर सामना फिरला नसता का रे भाऊ?"

रुट - "ते पण खरं रे !"

विराट - (हळुवार शब्दांत) - "खरं सांगु , माझ्या मनात तो  विचार आलेला रे मुळे !"

रुट - "मुळे कुठे आला इथं !"

विराट - "तुच रे तो ! पण हे अक्षर आणि अश्विन जबरदस्त लबाड ! सहाव्या चेंडूनंतर माझ्याकडं पाहतच नव्हते! थेट दुसऱ्याला चेंडु द्यायचे ! नाहीतर आयुष्यातील पहिली विकेट मिळाली असती ना रे भाऊ ! "

रुट - "हो असतात दुःख एकेकाची ! बाकी तुझं नशीब जबरदस्त रे भाऊ !"

विराट - "ते कसं काय ?"

रुट - "आख्या सामन्यात तुझ्या त्या पुजाराने ना एक धाव केली ना तुझ्या त्या बुमराहने एक बळी घेतला ! तरीही तु दहा विकेटने जिंकला ना रे ! तुझा तो रोहित काय खाऊन आलाय माहिती नाही !"

विराट - (डोळे विस्फारुन पाहत) - "खरंच की रे भाऊ ! "

रुट - (पुन्हा एकदा हळुवार स्वरात ) "विराट, ते ढोकळे तयार झाले असतील का रे ! मगाशी इथं यायच्या आधी पहिला कॅटीन मध्ये जाऊन आलो ! तर तो म्हणाला थोडा वेळानं ये !"

विराट - "काय माहिती! मी पण जाऊन पाहून आलेलो ! जरा जास्त जातील म्हणुन मैदानाला अधिकच्या दोन फेऱ्या मारल्या रे ! इतकं खिदीखिदी हसायला काय झालं !"

रुट - "तेच म्हटलं, भाऊ सामना जिंकल्यावर दुसऱ्या दिवशी इतक्या लवकर मैदानावर आला कसा ?"

विराट - "काय सांगु ! त्या अनुष्काला ब्रेकफास्ट काय जमत नाय रे आधीच  ! इतके दिवस लॉकडाऊन मध्ये कसे काढले माझे मलाच माहिती ! आणि आता वामिका आल्यावर तर काय बघायलाच नको ! त्यामुळं जितके दिवस बाहेर आहे तोवर चांगलं दणकुन ब्रेकफास्ट करतो म्हणतो !"

रुट - "विराट भाऊ, तुझं गणित कसं आहे रे ?"

विराट - (रागानं ) - "xxx - नको ते विषय काढायचे नाहीत मुळ्या !!"

रुट - दचकुन - "सॉरी तसं नाही रे माझं गणित जरा कमकुवत आहे म्हणुन म्हटलं विचारावं !"

विराट - "ठीक आहे ठीक आहे ! मॅटर काय आहे ! म्हणजे आपलं गणित थोडं कच्चं असलं तरी आपला आत्मविश्वास सॉलिड आहे !"

रुट - "म्हणजे ह्या पिंक बॉलचा आणि  वर्गमूळ  / वर्गचा काही संबंध तर नाही ना !"

विराट - "समजेल असे बोल रे मुळ्या !"

रुट - "म्हणजे बघ ! ऍडलेडला तुम्ही छत्तीसला सर्वबाद झालात !"

विराट - (अगदी भडकुन ) - "xxx - नको ते विषय काढायचे नाहीत मुळ्या !!"

रुट - "ऐकुन तर घे रे कोहली ! म्हणजे बघ आम्ही सुद्धा इथं ८१ ला सर्व बाद झालो ! तुम्ही एकही गडी न गमावता ४९ धावा करुन जिंकलात !"

विराट - (थोडा शांत होत) "मग ह्यात काय मोठं ?"

रुट - "ते मला पण समजलं नाही पहिल्यांदा भाऊ ! पण काल रात्री आमचा तो संख्यातज्ञ मला सांगत होता ३६, ८१, ४९ बघा हे सारे पुर्ण वर्ग ! हा स्कोर पिंक बॉलच्या सामन्यातच का होत असावा ?"

विराट - "पुर्ण वर्ग ! ओह हो !"

रुट - "समजलं नसेल तर इथं थेट बोलायचं रे ! नाटकं करायला ही पत्रकार परिषद नाहीये !३६ म्हणजे सहा गुणिले सहा ! ८१ म्हणजे नऊ गुणिले नऊ ! ४९ म्हणजे सात गुणिले सात !"

विराट - "ओह माय गॉड ! ओह माय गॉड !"

रुट -" तो अजुन एक म्हणाला भारताची पहिल्या डावातील संख्या १४५ = १२ चा वर्ग + १ चा वर्ग ! तुमच्याकडे कोणी आहे की नाही संख्यातज्ञ वगैरे !"

विराट - ताठ मानेनं - "आहेत ना ! बरेच आहेत ! पैसेवाले बोर्ड आहे आमचे !मसालाडोसा खाल्यावर माझी सरासरी किती आणि इडली खाल्ल्यावर किती ह्याचे सॉलिड डिटेल्स आहेत आमच्याकडे ! पण आम्ही शेअर नाही करत ! सॉलिड सीक्रेट आहे ते !" 

रुट - "कामाचे काही सांगतात का ते ?"

विराट - "अचानक दुःखी होत - त्याला अक्कल नाही ! नको ते आकडे त्यानं रवी अंकलला दाखविले आणि इतका दहा विकेटने सामना जिंकुनसुद्धा रवी अंकल मला ओरडले ! "

रुट - (खुश होत) "काय म्हणाला तो?"

विराट - "कोणाला सांगणार नसशील तर सांगतो !"

रुट - "नाही सांगणार ! देवाशप्पथ !!" 

विराट - "तो म्हणाला पहिल्या डावात इंग्लंड ७४ ला २ अशा स्थितीत होते. तिथुन ११२ ला सर्वबाद आणि दुसऱ्या डावात ८१. म्हणजे  ७४ ला २ नंतर नंतर पहिल्या डावातल्या आठ आणि दुसऱ्या डावातल्या दहा अशा अठरा विकेट केवळ ११९ धावांत गेल्या !"

रुट -" xxx - आमचे फलंदाज इतके भयंकर आहेत आता कळलं मला ! पण ह्याच्यात तुला ओरडण्यासारखे काय होते ?"

विराट - "ते रवी अंकल ! आधीच ड्राय स्टेट मध्ये असल्यानं टाळकं फिरलंय त्यांचं ! पुढे काय होणार माहिती नाही ! ते म्हणाले, तुला अक्कल नाही विराट!  इशांतची शंभरावी कसोटी म्हणुन त्याला मानाचं एक षटक देऊन पहिल्या डावात सुद्धा अश्विन / अक्षरलाच पुर्ण गोलंदाजी द्यायची नाही का?"

रुट - "पॉईंट आहे ते म्हणाले त्यात !"

विराट - (रागाने) "काय ?"

रुट - (उभा राहत, पवित्रा घेत) "तुला अक्कल नाही विराट! ह्यात पॉईंट आहे ! आणि जोरात पळत सुटतो !"

विराट - "गेला एकदाचा ! आता अनुष्काला फोन लावतो नाहीतर पुन्हा ओरडा बसायचा !" 

कसाबसा त्याचा फोन लागतो आणि तो ऐकून घेणं सुरु करतो तितक्यात रुट धावत धावत येतो !

रुट - "कोणाशी बोलतोयस?"

विराट - खुणेनेच - अनुष्काशी 

रुट - (मुद्दाम मोठ्यानं) - "विराटभाई मस्त ढोकळा बनलाय कॅन्टीनमध्ये ! घरी गेल्यावर खायला मिळणार नाही असा ढोकळा ! ये लवकर !" 

विराट - "हॅलो हॅलो ! .... तोवर फोन कट झालेला असतो !"

विराट हताश होऊन त्या भव्य मैदानाकडं पाहत बसतो !

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

माझा होशील ना - अनामिक पत्र !




प्रति निर्माता / दिग्दर्शक,

माझा होशील ना मालिका !

महोदय,

आपली माझा होशील ना ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे ह्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आनंद व्यक्त करु इच्छितो. अशा ह्या लोकप्रिय मालिकेच्या आमच्या व्यवसायांना  महत्वाचं स्थान मिळाल्याबद्दल आम्ही प्रारंभीस आनंदित झालो होतो. परंतु जसजशी मालिका पुढं प्रवास करत गेली तसतसं ह्या मालिकेत केल्या गेलेल्या आमच्या व्यवसायांच्या विपर्यस्त चित्रणामुळं आम्ही व्यथित झालो असुन आमची व्यथा ह्या पत्राद्वारे आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. 

१) बाऊन्सर्स - ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर बाऊन्सर्सचा मारा करुन त्यांना जायबंदी केलं होतं. जरी त्या बाऊन्सर्सचा आणि आमचा बादरायण संबंध नसला तरी काही अज्ञानी लोकांनी त्या दौऱ्यापासून आमच्याकडं संशयानं पाहण्यास सुरुवात केली. त्यामुळं आम्ही आधीच दुःखी मनःस्थितीत होतो.  त्या व्यथेत ह्या मालिकेने भर घातली आहे. 

अ - आदित्यला आम्ही व्यवस्थित चोप दिल्यावर सुद्धा तो केवळ दोन दिवसांच्या त्याच्या मामांनी केलेल्या घरगुती उपायानंतर पुन्हा सईचा नाद धरतो हे केवळ अशक्य आहे. प्रत्यक्ष जीवनात आम्ही चोप दिल्यानंतर असे आशिक किमान आठवडाभर इस्पितळात राहतात. त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. पण ह्या मालिकेतील चित्रीकरणानंतर काही मजनु मंडळींचा आत्मविश्वास उगाचच बळावून त्यामुळं त्यांच्यावर असा दुर्धर प्रसंग ओढवला तर त्याची नैतिक जबाबदारी आपली राहील. 

त्याचप्रमाणं ही बाहयकरणी बलदंड दिसणारी मंडळी फक्त इतकाच चोप देऊ शकतात हे पाहुन ह्या व्यवसायात येऊ पाहणारी होतकरी मंडळी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करु लागतील. त्यामुळं ह्या व्यवसायाला कदाचित योग्य मंडळींचा तुडवडा भासु शकतो. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? आम्ही काय त्या डॅडू आणि मामा लोकांना बाऊन्सर्स म्हणून घ्यावं काय?

ब - ज्याप्रमाणं आदित्य आणि त्याच्या बाजुच्या अनाहुत पाहुण्यांनी मालिकेतील बाऊन्सर्स उपस्थित असताना देखील लग्नमंडपात प्रवेश केला त्या प्रसंगात बाऊन्सर्सच्या बौद्धिक क्षमतेवर अप्रत्यक्षरित्या आघात करण्यात आला आहे अशी आमची भावना झाली आहे. त्या मामाची पंजाबी बायको काहीही बरळते आणि बाऊन्सर्स तिला आत जाऊ देतात. हे केवळ अस्वीकारणीयच नव्हे तर सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. अशा चित्रीकरणामुळं आम्हांला भविष्यात मिळणाऱ्या व्यावसायिक संधींवर मर्यादा येऊ शकतात ह्याची आपल्याला जाण आहे काय? 

२) डॉक्टर्स - सुयशला डॉक्टर दाखवुन आमच्या व्यवसायाचा घोर अपमान करण्यात आला आहे. मालिकेला आता एक वर्ष होईल. ह्या तथाकथित डॉक्टरने एक वैद्यकीय संज्ञातरी व्यवस्थित उच्चारली आहे का ह्याचा खुलासा आम्ही तुमच्याकडं मागत आहोत? कोणताही डॉक्टर आपल्या होणाऱ्या किंवा झालेल्या बायकोसाठी इतका वेळ देऊ शकत नाही ही सत्यपरिस्थिती असताना ह्या बोगस डॉक्टरनं एक पुर्ण वर्ष सईच्या मागे धावण्यात वाया घालवलं आहे.  वर्ष वाया घालवलं तर घालवलं आणि तरीही त्याला सई मिळाली नाही. जर तुमचे गुन्हे आम्ही माफ करावेत असं तुम्हांला वाटत असेल तर तुमच्या कथानकात योग्य फेरफार करुन सुयशला न्याय मिळवुन द्यावा अशी आमची मागणी आहे. नाहीतर भविष्यात ह्या व्यवसायाकडं वळणाऱ्या मराठी युवकांची संख्या कमी होऊन त्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असाल ! 

३) वेटर - सुयशने ज्या प्रमाणात मालिकेत खलनायकपणा केला आहे ते पाहता त्याला वेटरचा ड्रेस घालु देणे हे योग्य नव्हे. त्यामुळं आमच्या व्यवसायाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन झाली आहे. आणि तो मामा वेटर बनुन जो गोंधळ घालतो ते कसे काय शक्य आहे? असा कोणीही ऐरागैरा माणुस वेटरचे रुप नाही घेऊ शकत?

४) खानसामा / घोडेवाला - आम्ही आमची निष्ठा पुर्णपणे नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबाप्रती वाहिलेली असते. ह्या मालिकेत आम्ही नवऱ्या मुलाच्या लग्नात अडथळे आणतो हे जे काही चित्रीकरण करण्यात आले आहे ते चुकीचे आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो.  

आमच्या ह्या तक्रारींची योग्य दखल घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत. नाहीतर उद्या १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सई आणि आदित्यच्या लग्नात आम्ही मोर्चा काढु असा निर्वाणीचा इशारा आम्ही देत आहोत. 


आपले निषेधकर्ते 

बाऊन्सर्स / डॉक्टर्स /  वेटर्स / खानसामा / घोडेवाला

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

वो सिकंदर ही दोस्तो कहलाता हैं !


एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील वर्षागणिक कामगिरीचा आलेख अभ्यासणे हा एक सखोल अभ्यासाचा विषय असु शकतो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज हे संघ १९७० च्या सुमारास बलाढ्य मानले जाणारे संघ होते. परंतु १९९० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या संघाच्या कामगिरीस जी उतरती कळा लागली त्यातुन तो संघ अद्याप सावरु शकला नाही. त्या बेटांवरील तरुण बहुदा बास्केटबॉल सारख्या पर्यायी खेळांच्या किंवा इतर पर्यायांच्या मागे लागले असावेत असा एक विचारप्रवाह आहे. संगकारा आणि जयवर्धने ह्यांच्या निवृत्तीनंतर सुरु झालेला श्रीलंका संघाचा संघर्ष सुद्धा काहीसा असाच! कदाचित ह्यामागे स्थानिक क्रिकेटच्या दर्जात झालेली घसरण ह्यासारखी वेगळी कारणंअसावीत. देशांतर्गत अशांततेचा फटका पाकिस्तानच्या कामगिरीला बसला आहे. दक्षिण आफ्रिकेतील काही धोरणामुळं त्या देशातील काही गुणवान खेळाडूंनी इंग्लिश कौंटी क्रिकेटचा रस्ता धरला. kolpak deal ह्यावर थोडा शोध घेऊन पहा !

आता वळूयात ऑस्ट्रेलिया संघाकडे! ह्या संघाचा बलाढ्य गुणांक काही प्रमाणात घसरणीला लागला आहे! त्यांच्या संघाचे सरासरी वय पाहिलं तर ते तिशीच्या पलीकडं आहे. पुर्वीही हे असंच असायचं पण हे तिशीपल्याडचे खेळाडू त्यावेळी रथी - महारथी बनलेले असत. सध्याचे तिशीपलीकडील हे खेळाडु अजुनही आपल्या संघर्षाच्या कालावधीतच अडकुन बसलेले आहेत. ऑस्ट्रेलियन तरुण खेळाडु भारतीय युवा खेळाडूंच्या तुलनेनं अजुनही प्राथमिक शाळेत आहेत असे परवा ग्रेग चॅपल म्हणाला ते उगाच नव्हे! चौथ्या सामन्यात भारतानं एक अत्यंत रोमहर्षक विजय मिळविला त्यावेळी एकंदरीत सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या खेळाचे वर्णन त्यांचे काही माजी खेळाडु unaustralian  असे करत होते. पुर्वीचा तो आत्मविश्वास, ती मग्रुरी, तो एक जगज्जेत्याचा आविर्भाव कुठंतरी नाहीसा झाला आहे! कसोटी क्रिकेटमध्ये तर नक्कीच ! भारतीय मालकांच्या IPL संघातुन खेळण्याचा ह्यात किती हातभार हे देव जाणो !

ह्याउलट भारतातील परिस्थिती आहे ! इथं क्रिकेटने अगदी व्यावसायिक रुप धारण केले आहे. भारतीय खेळाडूंची तंदुरुस्ती, मनोबल ह्यात गेल्या काही वर्षात लक्षणीय सुधारणा झाली आहे. रणजी, दुलीप करंडकांचे सामने ह्यावर लक्ष देणारा जाणता वर्ग अजुनही अस्तित्वात आहे. क्रिकेटच नव्हे तर एकंदरीत परंपरांचे जतन करणाऱ्या विनायक पंडित, रोहन गुरव ह्यांच्यासारख्या मंडळींचे कौतुक करावं तितकं थोडकं ! स्थानिक सामन्यांच्या वेळी जाणवणारी राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांची उपस्थिती नक्कीच सुखावणारी असते! अशाने होतं काय की आंतरराष्ट्रीय संघांसाठी नवीन खेळाडूंचा सदैव पुरवठा होत राहतो! ह्या  स्वप्नाच्या मागे लागुन किती युवक आपल्या करियरचा बळी देत असतील हा वेगळा मुद्दा ! भारतातील जे गुणवान खेळाडु जसे की पुजारा, विहारी आणि आता अजिंक्य ज्यांना IPL मध्ये संधी मिळत नाही, पण ज्यांच्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या क्षमतेमुळं भारताची मान जगभर उंचावली जाते अशा मंडळींना विशेष मोबदला मिळायला हवा! 

आपण चौथ्या कसोटीत ज्या अनुनभवी गोलंदाजांचा संच घेऊन खेळलो आणि तरीही विजय मिळवला हा एक चमत्कारच म्हणायला हवा ! सिराज,  शार्दुल, नटराजन, वॉशिंग्टन ही मंडळी सातत्यानं मारा करत राहिली. शेवटपर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही! कोणतीही एक भागीदारी विशिष्ट मर्यादेपेक्षा मोठी न होऊ देण्याची कामगिरी ह्या मंडळींनी बजावली! खरंतर आपली पहिली पसंती असलेले उमेश अथवा सध्याचा इशांत ह्यापेक्षा नक्कीच नव्या दमाचे गोलंदाज खेळविणे केव्हाही इष्ट ! भारतभर आपल्या काहीशा उर्मट स्वभावानं प्रसिद्ध झालेल्या रवी शास्त्रीला ह्या भारतीय संघात निर्माण झालेल्या जिद्दीचा किती वाटा द्यावा हा प्रत्येक क्रिकेट रसिकाने सोडविण्याचा आपापला प्रश्न !

चौथ्या सामन्यातील कलाटणी देणारा एक महत्वाचा क्षण म्हणजे वॉशिंग्टन आणि शार्दुल ह्यांची पहिल्या डावातील एक मोठी भागीदारी ! ज्या सहजतेनं ह्या दोघांनी फलंदाजी केली त्यामुळं भारतीय संघाच्या मनोबलात कमालीचा फरक पडला आणि चौथ्या डावात भारतापुढं नक्की किती आव्हान ठेवावं ह्याबाबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात काहीसा संभ्रम निर्माण करण्याचं काम ह्या भागीदारीने केलं ! पाचव्या दिवसाच्या खेळपट्टीवर शुभनम आणि रिषभ ह्यांनी केलेली फलंदाजी पुढील कित्येक दशके भारतीय क्रिकेट रसिकांच्या चर्चेचा विषय बनुन राहील ! शुभनमने ह्या मालिकेत ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळं भारतीय फलंदाजीच्या उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्ने रसिकांना पडु लागली आहेत ! 

ऑस्ट्रेलिया संघाचं नक्की काय चुकलं? 

१) पेन ही कर्णधार म्हणुन नक्कीच चुकीची निवड असे मला वाटत राहिले आहे. संघाला स्फुरण देऊन त्यांच्याकडुन स्फूर्तिदायक कामगिरी करुन घेण्यात त्याला कमालीचं अपयश आलं ! खरंतर स्मिथ हाच ह्या संघाचा कर्णधार असायला हवा होता. पण अधुनमधुन काही बेजबाबदार वर्तवणुक करुन त्यानं आपल्या प्रगल्भतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत. 

२)गोलंदाजांची निवड हा सुद्धा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरला. स्टार्कच्या कामगिरीविषयी आणि एकंदरीत भवितव्याविषयी  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुर्णवेळ IPL खेळल्यामुळे कमिन्स चौथ्या कसोटीपर्यंत नक्कीच दमला होता. सिडनीत पाचव्या दिवशी ह्या सर्वांना अश्विन आणि विहारीने खुपच दमविलं होतं. तेही भारताच्या पथ्यावर पडलं. आणि शेवटी तुम्ही एकदा का तिशीच्या पलीकडे गेलात की एक वेगवान गोलंदाज म्हणुन तुमच्या कामगिरीत नक्कीच फरक पडतो ! 

३) वेड, ग्रीन, पेन ही मंडळी केवळ सरासरी / साधारण खेळाडु म्हणुन मालिकाभर वावरली.  स्टिव्ह वॉ, मकग्राथ, क्लार्क, पॉईंटिंग सारख्या खेळाडूंची उंची त्यांना गाठता आली नाही. प्रतिस्पर्ध्याला नॉक आऊट पंच देण्याचं एक शास्त्र असतं ते ह्या मंडळींना अजुन आत्मसात करायचं आहे.  भारतीय संघ सदैव सामन्यात आपलं आव्हान टिकवुन राहिला. त्यामुळं गोलंदाजांवर सदैव काहीसा दबाव राहिला. 

४) वरकरणी पाहता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाने ऍडलेडचा अपवाद वगळता वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्ट्या बनवल्या नाहीत. मेलबर्न सारख्या ठिकाणी तर हल्ली ड्रॉप इन पिचेस वापरली जातात. त्यामुळं वेगवान गोलंदाजांच्या धारदारतेत काहीशी उणीव निर्माण होते. कदाचित मुळ भारतीय गोलंदाजीचा संच पाहुन ऑस्ट्रेलियाने सुद्धा कदाचित धसका घेतला असावा. 

आपल्याकडे सुद्धा सर्व काही आलबेल आहे असं नाही. पंतचा झेल सुरुवातीलाच घेतला गेला असता तर चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं आणि कदाचित ही पोस्ट लिहली सुद्धा गेली नसती! पण जर तरला अर्थ नसतो असं म्हणतात ते उगीच नाही ! ज्या प्रमाणात, ज्या प्रकारे भारतीय खेळाडु संबंध मालिकाभर जायबंदी होत राहिले ही स्वीकारणीय बाब नव्हती. ह्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी जी जबाबदार मंडळी आहेत त्यांना ह्याचा नक्कीच जाब विचारायला हवा ! भुवनेशकुमार आठवतो का तुम्हांला ? हा गडी एक सामना खेळला की पुढील दहा सामने अनफिट असतो ! 

जाता जाता विराट की अजिंक्य ? सध्या सर्वांनी अजिंक्यचे गुणगान करावेत असा माहोल आहे. विराटच्या बाजुनं बोलायचं झालं तर ह्या संघात जी विजिगिषु वृत्ती आहे त्याचं बऱ्याच प्रमाणात श्रेय त्याला जातं. पण आता नक्कीच इंग्लंडविरुद्ध मायभूमीवर होणाऱ्या मालिकेत एक कर्णधार म्हणुन त्याच्या कामगिरीकडे सर्वजण बारीक लक्ष ठेवून असणार ! वेगळ्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर त्या ऍडलेडच्या सर्वबाद (शमी बाद ) ३६ धावांसोबत मालिकेतील भारतातील सर्व दुर्दैवांची मालिका सुद्धा संपली. त्यानंतर बऱ्याच गोष्टींत नशिबानं आपल्याला हात दिला.  म्हणायला गेलं तर ब्रिस्बेन इथं दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला पावसाच्या शक्यतेचा विचार करुन काहीसा आक्रमक खेळ करावा लागला. जर पुर्ण दोन दिवसाचा खेळ होणार आहे हे त्यांना माहिती असतं तर कदाचित त्यांनी आपल्या डावाची आखणी वेगळ्या प्रकारे केली असती ! 

असो एका संस्मरणीय मालिका विजयाची नोंद भारतीय संघानं केली! शेवटी एक खरा क्रिकेट चाहता खेळाकडुन काय अपेक्षा ठेवून असतो? तर मधुर स्मृतींचा ठेवा ! ह्या मालिकेने ह्या मधुर स्मृती भरभरुन दिल्या! आणि अगदीच दृष्ट लागायला नको म्हणुन ऍडलेडच्या त्या सर्वबाद ३६ चा तीटसुद्धा लावला ! 

मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांवरील पोस्टच्या ह्या लिंक्स ! 

तिसरी कसोटी 

दुसरी कसोटी 




गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

सिडनी टेस्ट - सहेला रे ते सहना रे !



चांगला मुड असला की कधीतरी मी शास्त्रीय संगीत ऐकतो. त्यातील खरं तर मला काही कळत नाही.तरीही ते ऐकताना प्रचंड छान वाटतं. किशोरी आमोणकर यांची सहेला रे आणि प्रभा अत्रे यांची जमुना किनारे मोरा गाव सावरे ...या रचनांपासुन सुरुवात करुन मग यु ट्युबच्या artificial intelligence च्या मी अधीन होतो. ह्या जाणकार गायिका ह्या स्वर्गीय रचनांद्वारे आपल्याला एका शब्दांपलीकडच्या  विश्वात घेऊन जातात.  एकेक रचना तासभर सुद्धा चालु राहते. मोजके शब्दच, वारंवार येत राहणारे! पण प्रत्येकवेळी त्यांच्या उच्चारात, सादरीकरणात वैविध्य असतं. जितका अधिक पट्टीचा कलाकार तितकी त्याची / तिची ह्या विशिष्ट शब्दरचना खुलवण्याची क्षमता जास्त! क्षमतेचा कलाकार आणि सोबतीला जाणता श्रोता असला की मैफिलीला रंग चढतो.

हँझलवुड, बुमराह अथवा कमिन्स ही मंडळी तासनतास आँफ स्टंपच्या बाहेर मारा करत रहातात वा करु शकतात. वरवर पाहता हे सर्व चेंडू आँफ स्टंपच्या बाहेर ह्या वर्गात मोडतात, पण त्यातला खरा फरक समोर उभ्या असलेल्या शुभनम अथवा रोहितलाच समजु शकतो. प्रत्येक चेंडूवर बळी मिळायलाच हवा असा आग्रह नाही. हळुवारपणे फलंदाजांना आपल्या जाळ्यात पकडण्याची कला म्हणजे कसोटी क्रिकेट. आँफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूपैकी काही झपकन आत शिरणारे, काही नाकासमोर बघत सरळ जाणारे तर काही फलंदाजांना मोहात पाडत हळुवारपणे बाहेर पडणारे ! शास्त्रीय संगीतातील जागांप्रमाणे ह्या सुद्धा गोलंदाजाच्या आपल्या जागा असतात. 

आधुनिक काळात End Result ला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे असं आपल्याला सदैव वाटत राहतं, जसं की परीक्षेतील गुण, एखाद्या कंपनीने मिळवलेला नफा ! हा अंतिम निर्णय जरी महत्त्वाचा असला तरी दीर्घकालीन विचार केला तर अंतिम निर्णय काय मिळाला ह्याइतकेच किंबहुना त्यापेक्षा किंचित अधिक तो कसा मिळविला गेला ही बाब महत्त्वाची ठरते. सातत्याने यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे योग्य तंत्र, नैतिक मार्गाने वाटचाल करण्याची प्रबळ इच्छाशक्ती वगैरे घटक महत्त्वाचे ठरतात. कसोटी क्रिकेट म्हणा किंवा शास्त्रीय संगीत म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला जीवनाविषयी खूप काही शिकवतात. अनिर्णित सामना हा लौकिकार्थाने विजय नाही पण सिडनीचा पराकाष्ठेने अनिर्णित ठेवलेला सामना अनेक विजयांपेक्षा रसिकांच्या ह्दयात वरच्या स्थानावर राहील. 

मागच्या पिढीतील अनेकांनी वसई विरार सारख्या लांबवरच्या भागातून चर्चगेटला येऊन आयुष्यभर नोकरी केली. पगार काही आताच्या पिढीइतका आकर्षक नसला तरीही त्यांनी एक शिस्तबद्ध आयुष्य जगण्यात, संस़्कारक्षम अशी दुसरी पिढी घडविण्यात आपल्या आयुष्याचे सार्थक मानलं. चर्चगेट स्थानकात प्रवेश करणाऱ्या लोकलमध्ये उडी मारुन पटकावलेली विंडो सीट दिवसातील समाधानाचा एक क्षण म्हणुन  त्यांना पुरेशी होती. गलेलठ्ठ बचत बँकेत नसली तरीही समाधानाची पुरेशी पुंजी त्यांनी बाळगली. कसोटी क्रिकेटसुद्धा काहीसं असंच! झटपट लोकप्रियता मिळवुन देणारं हे माध्यम राहिलं नाही, पण समाधान मात्र भरभरुन देऊ शकतं !

काही महिन्यांपूर्वी मी विहारी आणि पुजारावर एक पोस्ट लिहली होती. वर्षातील बहुतांश वेळ भारतीय संघापासुन दुर रहात एकट्याने सराव करणं, वर्षात पंधरा वीस मिळणाऱ्या फलंदाजीच्या संधीचं मोल करणं ह्यासाठी मोठा मनाचा निग्रह लागतो. हे दोघे तो भरभरून दाखवतात, आता त्यात अश्विन सुद्धा समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

अजून एक गोष्ट! फलंदाज म्हणून अजिंक्य ह्या कसोटीवर आपला फारसा ठसा उमटवु शकला नाही पण त्याच्यासाठी संघातील प्रत्येकाने शत प्रतिशत योगदान दिले. मी घाईघाईने अनुमान बांधणार नाही पण कर्णधार असो वा व्यवस्थापक असो, जो आपल्या संघसदस्याला व्यक्त होण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक देतो त्याच्यासाठी सदस्य जिवापाड मेहनत करण्यास तयार असतात हा नेहमीचा अनुभव असतो

आँस्ट्रलियानं आपला दुसरा डाव सहा गडी बाद असतानाच घोषित केला होता. डाव घोषित कधी करावा ही कसोटी क्रिकेट मधील एक खास जागा ! कधी उगाचच डाव लांबविला असा दोष कप्तानाच्या माथी येऊ शकतो तर कधी उगाचच आक्रमकता दाखवली जाऊन सामना गमावण्याची वेळ येऊ शकते. दोन कसोटीआधी ज्या संघाला छत्तीस धावांत गारद केले त्यांच्यापुढे तीनशे साडेतीनशेच्या पलीकडे लक्ष्य ठेवण्यात काय हशील आहे असा विचार नक्कीच पेनच्या मनात आला असणार. पण त्यांनं अँडलेड आणि सिडनीच्या खेळपट्टींमधला फरक बरोबर जाणला. जर तर ला खरोखरच अर्थ नसतो. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रोहितला हुकचा फटका मारून बाद होण्याची दुर्बुद्धी झाली नसती तर किंवा पंत अजून तासभर टिकून राहिला असता तर चारशेचे लक्ष्य चौथ्या डावात सुद्धा सहज गाठले असते असं ज्याप्रमाणे आपल्याला वाटु शकतं त्याचप्रमाणे पेनने मोक्याच्या क्षणी झेल सोडले नसते तर विजय आँस्ट्रलियाच्या अगदी समीप होता. धावफलक फसवा असतो, त्यानं भारतानं दुसऱ्या डावात केवळ पाचच बळी गमावले असं दाखवलं असलं तरी जाडेजा जायबंदी होता आणि त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांना बाद करण्यासाठी कमिन्स आणि मंडळींना बहुधा सात आठ षटके पुरेशी ठरु शकली असती. हे लक्षात घेतलं तर अश्विन आणि विहारी ह्यांच्या खेळीचं महत्व ध्यानात येतं. 

Sledging मुळे प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक प्रमाणात आपले नुकसान होऊ शकते हा धडा जरी पेनला जरी मिळाला असला तरी आजच्या काळात आपण सर्वांनी तो लक्षात घेण्यास काही हरकत नसावी. आपले काम योग्य प्रकारे करत रहावे, उगाचच दुसऱ्याला चुका करायला भाग पाडण्यासाठी आपली शक्ती वाया घालु नये. 

ज्या क्षणी सामना अनिर्णित घोषित झाला त्यावेळी विहारीने शर्ट काढून गोलगोल फिरवला नाही किंवा अश्विनने पेनला शेलक्या शब्दांत चार गोष्टी सुनावल्या नाहीत. हे सारं करण्यासाठी त्यांच्या अंगी त्राण उरलं नव्हतं हे जरी खरे असले तरी एरव्ही सुद्धा त्यांनी हे अजिबात केलं नसतं. Cricket is a Gentleman's Game ह्या उक्तीवर विश्वास ठेवणारी ही मंडळी !

भारतीय खेळाडूंनी ह्या सामन्यात जी जिद्द दर्शवली त्याला तोड नाही.  विहारी, पुजारा, अश्विन, जडेजा ह्यांनी आपल्या जखमांची / दुखापतींची पर्वा केली नाही. एकशेचाळीसच्या वेगानं सातत्यानं तुमच्या अंगावर फेकले जाणारे चेंडूचा सामना करत असताना आपल्या एकाग्रतेत भंग होणं खरं तर स्वाभाविक! पण त्यांनी आपल्या विकेटला खुप जपलं. पंत हा एक विवादाचा मुद्दा बनला आहे. त्यानं सोडलेल्या झेलांची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागली. पण चौथ्या डावात आक्रमणाच्या पुर्ण तयारीत असणाऱ्या चार ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्याचं धाडस ह्या पट्ठ्यानं दाखवलं. 

खेळपट्टी बनविणाऱ्या अनामिकाला सुद्धा अभिवादन ! पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राच्या शेवटापर्यंत खेळपट्टी उत्तमरित्या टिकली. केवळ फलंदाजांना धार्जिणी अशी ही खेळपट्टी नव्हती, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना ह्या खेळपट्टीनं पुरेसं साहाय्य केले. 

आता थोडं प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या कामगिरीविषयी! स्मिथ आणि लाबूशेन ह्यांनी एकदा का खेळपट्टीवर जम बसविला का गोलंदाजांची खैर नसते. विशेषतः भारतीय गोलंदाजांची ! स्मिथचा फलंदाजीचा पवित्रा, काही फटके विशेष प्रेक्षणीय नसले तरी धावांची टांकसाळ उघडण्यात तो माहीर आहे. लाबूशेन हा भविष्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा भार समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहील ह्याविषयी शंका नाही. बाकी कमिन्स, हॅझलवूड ही गोलंदाज मंडळी प्रचंड गुणवत्ता बाळगणारी! त्यांच्यासमोर एखादा चेंडु खेळायला मिळावा अशी इच्छा मी बाळगुन आहे. स्टार्क बहुदा आता उतरणीला लागला असावा असा माझा कयास आहे. वॉर्नरला ह्या सामन्यात आपला खास प्रभाव दाखवता आला नाही. 

एकंदरीत जुन्या मुल्यांवरील विश्वास पक्का करणारी ही कसोटी ! पैशाचा बाजार मांडणाऱ्या IPL मुळे संघातील महत्त्वाच्या खेळाडुंच्या फिटनेसची काय वाताहात झाली आहे हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतच आहोत. आखातात घाईघाईनं IPL  भरविण्यात काय अर्थ होता हा प्रश्न विचारण्याची हिंमत अथवा इच्छाशक्ती कोणीच दर्शवली नाही, दोन महिन्यांपुर्वी मांडला गेलेला हा बाजार पुन्हा एप्रिलमध्ये मांडला जाईल. पण ह्या दोन बाजारांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांचा अगदी रसिकतेने आनंद लुटूयात. फलंदाजाला बाद करण्यासाठी पहिल्याच चेंडूत याँर्करच टाकायला हवा असे नाही, त्याला तीन चार उसळते चेंडू टाकून, मनात धडकी भरवुन मग अचानक याँर्कर टाकून त्याला बाद करता येऊ शकते. गोलंदाजाला सतत चौकार, षटकार मारणे आवश्यक नाही तर नवा चेंडू तासभर खेळून काढून मग दमलेल्या गोलंदाजाला नंतर नामोहरम करता येतं हे मोलाचे धडे कसोटी क्रिकेट आपल्याला शिकवतं. हे सारे धडे वरवर पाहता कदाचित समजणार नाहीत,. त्यासाठी खोलवर जायला हवं. आयुष्यात सुद्धा असंच असतं नाही! सारं काही एका समाधानी आयुष्यासाठीचे आवश्यक घटक ! Long live Test Cricket !

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...