एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील वर्षागणिक कामगिरीचा आलेख अभ्यासणे हा एक सखोल अभ्यासाचा विषय असु शकतो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज हे संघ १९७० च्या सुमारास बलाढ्य मानले जाणारे संघ होते. परंतु १९९० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या संघाच्या कामगिरीस जी उतरती कळा लागली त्यातुन तो संघ अद्याप सावरु शकला नाही. त्या बेटांवरील तरुण बहुदा बास्केटबॉल सारख्या पर्यायी खेळांच्या किंवा इतर पर्यायांच्या मागे लागले असावेत असा एक विचारप्रवाह आहे. संगकारा आणि जयवर्धने ह्यांच्या निवृत्तीनंतर सुरु झालेला श्रीलंका संघाचा संघर्ष सुद्धा काहीसा असाच! कदाचित ह्यामागे स्थानिक क्रिकेटच्या दर्जात झालेली घसरण ह्यासारखी वेगळी कारणंअसावीत. देशांतर्गत अशांततेचा फटका पाकिस्तानच्या कामगिरीला बसला आहे. दक्षिण आफ्रिकेतील काही धोरणामुळं त्या देशातील काही गुणवान खेळाडूंनी इंग्लिश कौंटी क्रिकेटचा रस्ता धरला. kolpak deal ह्यावर थोडा शोध घेऊन पहा !
आता वळूयात ऑस्ट्रेलिया संघाकडे! ह्या संघाचा बलाढ्य गुणांक काही प्रमाणात घसरणीला लागला आहे! त्यांच्या संघाचे सरासरी वय पाहिलं तर ते तिशीच्या पलीकडं आहे. पुर्वीही हे असंच असायचं पण हे तिशीपल्याडचे खेळाडू त्यावेळी रथी - महारथी बनलेले असत. सध्याचे तिशीपलीकडील हे खेळाडु अजुनही आपल्या संघर्षाच्या कालावधीतच अडकुन बसलेले आहेत. ऑस्ट्रेलियन तरुण खेळाडु भारतीय युवा खेळाडूंच्या तुलनेनं अजुनही प्राथमिक शाळेत आहेत असे परवा ग्रेग चॅपल म्हणाला ते उगाच नव्हे! चौथ्या सामन्यात भारतानं एक अत्यंत रोमहर्षक विजय मिळविला त्यावेळी एकंदरीत सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या खेळाचे वर्णन त्यांचे काही माजी खेळाडु unaustralian असे करत होते. पुर्वीचा तो आत्मविश्वास, ती मग्रुरी, तो एक जगज्जेत्याचा आविर्भाव कुठंतरी नाहीसा झाला आहे! कसोटी क्रिकेटमध्ये तर नक्कीच ! भारतीय मालकांच्या IPL संघातुन खेळण्याचा ह्यात किती हातभार हे देव जाणो !
ह्याउलट भारतातील परिस्थिती आहे ! इथं क्रिकेटने अगदी व्यावसायिक रुप धारण केले आहे. भारतीय खेळाडूंची तंदुरुस्ती, मनोबल ह्यात गेल्या काही वर्षात लक्षणीय सुधारणा झाली आहे. रणजी, दुलीप करंडकांचे सामने ह्यावर लक्ष देणारा जाणता वर्ग अजुनही अस्तित्वात आहे. क्रिकेटच नव्हे तर एकंदरीत परंपरांचे जतन करणाऱ्या विनायक पंडित, रोहन गुरव ह्यांच्यासारख्या मंडळींचे कौतुक करावं तितकं थोडकं ! स्थानिक सामन्यांच्या वेळी जाणवणारी राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांची उपस्थिती नक्कीच सुखावणारी असते! अशाने होतं काय की आंतरराष्ट्रीय संघांसाठी नवीन खेळाडूंचा सदैव पुरवठा होत राहतो! ह्या स्वप्नाच्या मागे लागुन किती युवक आपल्या करियरचा बळी देत असतील हा वेगळा मुद्दा ! भारतातील जे गुणवान खेळाडु जसे की पुजारा, विहारी आणि आता अजिंक्य ज्यांना IPL मध्ये संधी मिळत नाही, पण ज्यांच्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या क्षमतेमुळं भारताची मान जगभर उंचावली जाते अशा मंडळींना विशेष मोबदला मिळायला हवा!
आपण चौथ्या कसोटीत ज्या अनुनभवी गोलंदाजांचा संच घेऊन खेळलो आणि तरीही विजय मिळवला हा एक चमत्कारच म्हणायला हवा ! सिराज, शार्दुल, नटराजन, वॉशिंग्टन ही मंडळी सातत्यानं मारा करत राहिली. शेवटपर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही! कोणतीही एक भागीदारी विशिष्ट मर्यादेपेक्षा मोठी न होऊ देण्याची कामगिरी ह्या मंडळींनी बजावली! खरंतर आपली पहिली पसंती असलेले उमेश अथवा सध्याचा इशांत ह्यापेक्षा नक्कीच नव्या दमाचे गोलंदाज खेळविणे केव्हाही इष्ट ! भारतभर आपल्या काहीशा उर्मट स्वभावानं प्रसिद्ध झालेल्या रवी शास्त्रीला ह्या भारतीय संघात निर्माण झालेल्या जिद्दीचा किती वाटा द्यावा हा प्रत्येक क्रिकेट रसिकाने सोडविण्याचा आपापला प्रश्न !
चौथ्या सामन्यातील कलाटणी देणारा एक महत्वाचा क्षण म्हणजे वॉशिंग्टन आणि शार्दुल ह्यांची पहिल्या डावातील एक मोठी भागीदारी ! ज्या सहजतेनं ह्या दोघांनी फलंदाजी केली त्यामुळं भारतीय संघाच्या मनोबलात कमालीचा फरक पडला आणि चौथ्या डावात भारतापुढं नक्की किती आव्हान ठेवावं ह्याबाबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात काहीसा संभ्रम निर्माण करण्याचं काम ह्या भागीदारीने केलं ! पाचव्या दिवसाच्या खेळपट्टीवर शुभनम आणि रिषभ ह्यांनी केलेली फलंदाजी पुढील कित्येक दशके भारतीय क्रिकेट रसिकांच्या चर्चेचा विषय बनुन राहील ! शुभनमने ह्या मालिकेत ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळं भारतीय फलंदाजीच्या उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्ने रसिकांना पडु लागली आहेत !
ऑस्ट्रेलिया संघाचं नक्की काय चुकलं?
१) पेन ही कर्णधार म्हणुन नक्कीच चुकीची निवड असे मला वाटत राहिले आहे. संघाला स्फुरण देऊन त्यांच्याकडुन स्फूर्तिदायक कामगिरी करुन घेण्यात त्याला कमालीचं अपयश आलं ! खरंतर स्मिथ हाच ह्या संघाचा कर्णधार असायला हवा होता. पण अधुनमधुन काही बेजबाबदार वर्तवणुक करुन त्यानं आपल्या प्रगल्भतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत.
२)गोलंदाजांची निवड हा सुद्धा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरला. स्टार्कच्या कामगिरीविषयी आणि एकंदरीत भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुर्णवेळ IPL खेळल्यामुळे कमिन्स चौथ्या कसोटीपर्यंत नक्कीच दमला होता. सिडनीत पाचव्या दिवशी ह्या सर्वांना अश्विन आणि विहारीने खुपच दमविलं होतं. तेही भारताच्या पथ्यावर पडलं. आणि शेवटी तुम्ही एकदा का तिशीच्या पलीकडे गेलात की एक वेगवान गोलंदाज म्हणुन तुमच्या कामगिरीत नक्कीच फरक पडतो !
३) वेड, ग्रीन, पेन ही मंडळी केवळ सरासरी / साधारण खेळाडु म्हणुन मालिकाभर वावरली. स्टिव्ह वॉ, मकग्राथ, क्लार्क, पॉईंटिंग सारख्या खेळाडूंची उंची त्यांना गाठता आली नाही. प्रतिस्पर्ध्याला नॉक आऊट पंच देण्याचं एक शास्त्र असतं ते ह्या मंडळींना अजुन आत्मसात करायचं आहे. भारतीय संघ सदैव सामन्यात आपलं आव्हान टिकवुन राहिला. त्यामुळं गोलंदाजांवर सदैव काहीसा दबाव राहिला.
४) वरकरणी पाहता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाने ऍडलेडचा अपवाद वगळता वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्ट्या बनवल्या नाहीत. मेलबर्न सारख्या ठिकाणी तर हल्ली ड्रॉप इन पिचेस वापरली जातात. त्यामुळं वेगवान गोलंदाजांच्या धारदारतेत काहीशी उणीव निर्माण होते. कदाचित मुळ भारतीय गोलंदाजीचा संच पाहुन ऑस्ट्रेलियाने सुद्धा कदाचित धसका घेतला असावा.
आपल्याकडे सुद्धा सर्व काही आलबेल आहे असं नाही. पंतचा झेल सुरुवातीलाच घेतला गेला असता तर चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं आणि कदाचित ही पोस्ट लिहली सुद्धा गेली नसती! पण जर तरला अर्थ नसतो असं म्हणतात ते उगीच नाही ! ज्या प्रमाणात, ज्या प्रकारे भारतीय खेळाडु संबंध मालिकाभर जायबंदी होत राहिले ही स्वीकारणीय बाब नव्हती. ह्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी जी जबाबदार मंडळी आहेत त्यांना ह्याचा नक्कीच जाब विचारायला हवा ! भुवनेशकुमार आठवतो का तुम्हांला ? हा गडी एक सामना खेळला की पुढील दहा सामने अनफिट असतो !
जाता जाता विराट की अजिंक्य ? सध्या सर्वांनी अजिंक्यचे गुणगान करावेत असा माहोल आहे. विराटच्या बाजुनं बोलायचं झालं तर ह्या संघात जी विजिगिषु वृत्ती आहे त्याचं बऱ्याच प्रमाणात श्रेय त्याला जातं. पण आता नक्कीच इंग्लंडविरुद्ध मायभूमीवर होणाऱ्या मालिकेत एक कर्णधार म्हणुन त्याच्या कामगिरीकडे सर्वजण बारीक लक्ष ठेवून असणार ! वेगळ्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर त्या ऍडलेडच्या सर्वबाद (शमी बाद ) ३६ धावांसोबत मालिकेतील भारतातील सर्व दुर्दैवांची मालिका सुद्धा संपली. त्यानंतर बऱ्याच गोष्टींत नशिबानं आपल्याला हात दिला. म्हणायला गेलं तर ब्रिस्बेन इथं दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला पावसाच्या शक्यतेचा विचार करुन काहीसा आक्रमक खेळ करावा लागला. जर पुर्ण दोन दिवसाचा खेळ होणार आहे हे त्यांना माहिती असतं तर कदाचित त्यांनी आपल्या डावाची आखणी वेगळ्या प्रकारे केली असती !
असो एका संस्मरणीय मालिका विजयाची नोंद भारतीय संघानं केली! शेवटी एक खरा क्रिकेट चाहता खेळाकडुन काय अपेक्षा ठेवून असतो? तर मधुर स्मृतींचा ठेवा ! ह्या मालिकेने ह्या मधुर स्मृती भरभरुन दिल्या! आणि अगदीच दृष्ट लागायला नको म्हणुन ऍडलेडच्या त्या सर्वबाद ३६ चा तीटसुद्धा लावला !
मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांवरील पोस्टच्या ह्या लिंक्स !
छान
उत्तर द्याहटवा