मध्यंतरी काही प्रतिकुल म्हणाव्या अशा गोष्टी एकत्र घडल्या. म्हटलं तर प्रतिकुल; म्हटलं तर नाही! म्हणजे झालं काय तर कार्यालयीन विश्वात एक असं किचकट काम पदरात पडलं ज्यात मेहनतीच्या पलीकडं एका अनोळखी प्रांतातील ज्ञान आवश्यक होते, वसईतील थंडीनं बराच जम बसविला, मी ऑनलाईन बुद्धिबळाच्या आहारी गेलो (अजुनही त्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय !) आणि त्यात भर म्हणुन बागकामासाठीचा पंप बंद पडला. गेले महिनाभर विविध तज्ञ लोकांना विनंती करुन सुद्धा अजुन तो काही दुरुस्त झाला नाही. बहुदा नवीन घ्यावा लागेल !
ह्यात झालं असं की बाग सुकू लागली. थंडी, कार्यालयीन काम आणि बुद्धिबळ ह्या घटकांमुळे मी काहीसा उदासीन झालो. दररोज ही सुकणारी छोटी झाडं पाहुन मन दुःखी व्हायचं, पण का कोणास ठाऊक जिद्द कमी पडत होती. थोडीफार मोठी झाडं जशी की काही वर्षांची जास्वंदी वगैरेनी पाण्याअभावीसुद्धा टिकाव धरला. पण गेल्या एक जूनला लावलेली जास्वंदीची फांदी,
इतके महिने सतत पाण्याची सवय झालेल्या दुर्वा वगैरे बिचाऱ्या पाण्याअभावी झुरू लागल्या.
त्यातल्या काही अगदी सुकल्या देखील !
ब्राह्मी आणि लिलीच्या हिरवेगारपणा काहीसा लयीला गेला !
अचानक गेल्या आठवड्यात काही घटना घडल्या. थंडीचा जोर कमी झाला, कार्यालयीन काम काहीसं आटोक्यात आलं. आणि मग शनिवारी अचानक मुड सुधारला. विहिरीला दाजींनी नवीन रस्सी सुद्धा आणली.
मग ऍमेझॉनवरील आणलेली झारी घेतली. हाताने विहिरीचे पाणी उपसुन झाडांना पाणी देण्याचा उद्योग सुरु केलाय. य चांगलं वाटतंय !
गेले दोन दिवस ह्या सर्व इवल्या झाडांना दररोज पाणी देतोय! त्यांची नाराजी दूर व्हायला खुप वेळ लागणार ! गेले काही दिवस मी बाजुने जाऊन सुद्धा मी पाणी देत नाही हे पाहुन सुद्धा त्यांना कसं वाटलं असेल ? त्यांनी माझ्याविषयी गमावलेला विश्वास मी परत मिळवु शकेन का? आता माझा आशावाद कायम राहो ही अपॆक्षा ! आज सकाळी दिसलेल्या दुसऱ्या बहरातील जांभळाच्या फुलाचा फोटो !
निसर्गाची आवड, छापलेल्या पुस्तकवाचनाची ओढ आणि चांगल्या मित्रांची संगत ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीच पुढील काळातील मानसिक स्वास्थ्याचा आशेचा किरण ठरणार आहेत ! आपण ऑनलाईन दुनियेतील एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलो आहोत हे मान्य करणे हा ह्यातून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा टप्पा ठरणार आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा