घराभोवतालच्या परिसरात काही भटकी कुत्री भटकत असतात. साधारणतः ही मोठी कुत्री असतात. त्यांचा तसा फारसा उपद्रव नसल्यानं त्यांच्याकडं आम्ही फारसं लक्ष देत नसतो. धाक असावा म्हणुन अधूनमधून जोरानं ओरडुन त्यांना पळवुन लावण्यापलीकडं ते आमचं लक्ष वेधुन घेत नाहीत.
पण मध्यंतरी एक घटना घडली. ह्या गटामध्ये एक कुत्र्याचं पिल्लु सहभागी झालं. दिसायला गोंडस असं ! ह्या पिल्लाच्या चेहऱ्यावर कुतूहलभावना ओसंडुन वाहत असते. बहुदा त्यानं बरीच लाडीगोडी लावून ह्या मोठ्या कुत्र्यांच्या गटात आपला शिरकाव करुन घेतला असावा असा मला दाट संशय आहे. कुत्र्याचं पिल्लु ज्यावेळी आपल्या छोट्या पंजांनी मोठ्या कुत्र्यांच्या अंगावर लाडाने थापटी मारते त्यावेळचे मोठ्या कुत्र्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे !
हे सारं वर्णन कुत्र्याचं पिल्लु आणि पाटील कुटुंबीय गुण्यागोविंद्याने नांदु असा समज करु देणारे ! म्हणायला गेलं तर अधूनमधून त्याला पाहुन जोराने मारलेल्या बोंबेव्यतिरीक्त ह्या द्वैराष्ट्रीय संबंधात बाधा यावी अशी आगळीक पाटील कुटुंबियांकडून घडली नव्हती! जे काही घडलं त्याला सर्वस्वी हे कुत्र्याचे पिल्लुच जबाबदार असं विधान कुटुंबियांचा जबाबदार प्रतिनिधी म्हणुन मी करु इच्छितो.
तर झालं असं ! घराबाहेरच्या परिसरात फिरण्यासाठी असलेली पादत्राणे आम्ही दरवाजाबाहेर ठेवतो. वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे हो ती ! दुपारच्या वामकुक्षीच्या वेळी किंवा रात्री साडेनऊनंतर सर्व काही सामसुम झाल्यानंतर ही टोळी परिसरात एक फेरफटका मारण्यासाठी येते. अशा वेळी जन्मजात असलेल्या कौतुहलभावनेनं ह्या पिल्लुच्या सारासारबुद्धीचा ताबा घेतला असावा. सर्वप्रथम आमचे जे दोन स्लिपर्सचे जोड आहेत त्याकडं ह्या पिल्लुचं लक्ष गेलं. निळ्या जोडातील एक आणि लाल जोडातील एक अशा दोन स्लीपर्स घेऊन त्यानं पलायन केलं. बहुदा मोठ्या कुत्र्यांनी त्याचा रंगशिकवणीचा वर्ग आयोजित केला असल्यानं त्याला दोन्ही रंगाचे एकेक स्लीपर्स हवे असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी गडबड उडाली. पण आता एक लाल आणि एक निळी अशा स्लिपर्सची आम्ही सवय करुन घेतली आहे. काल दुपारी घरी आलेल्या बाईंची चप्पल पळविली त्यानं ! नशिबानं परिसरात मिळाली !
त्यानं केवळ पाटील कुटुंबियांवर लक्ष केंद्रित केलं आहे असं नाही. शेजाऱ्यांच्या पादत्राणांना सुद्धा त्यानं योग्य न्याय दिला आहे. आज सकाळी गेटबाहेर त्यानं आणुन टाकलेलं हे असंच एक चप्पल !
त्याच्या ह्या कारवायांना वैतागुन त्याला दुषण देणं हा झाला मनुष्याचा दृष्टिकोन (Point Of View). पण आपल्याला त्या पिल्लुचा दृष्टिकोन सुद्धा लक्षात घ्यायला हवा ना ! ईश्वरानं त्याला ह्या पृथ्वीवर जन्म दिला ! जन्मासोबत कुतूहलभावनासुद्धा दिली ! त्याच्यासाठी ह्या रंगीबेरंगी स्लीपर्स किंवा बाकी चपला ह्या एक प्रकारे खेळणं असणार ! आपल्या संदर्भाने हे आम्हांला आमचं घर वाटत असणार तर त्या पिल्लुच्या आणि कुत्र्यांच्या संदर्भाने तो त्यांचा भुभाग असणार ! मग ह्या स्लिपर्स गायब होण्याच्या प्रकारात त्याची पुर्णपणे चूक म्हणता येणार नाही ना !
थोडक्यात सांगायचं झालं तर आयुष्यात ज्या ज्या वेळी आपला दुसऱ्या जीवांशी, वृक्षांशी संबंध येत असतो त्या त्या वेळी त्यांचा सुद्धा एक दृष्टिकोन असतो हे ध्यानात असलं पाहिजे ! जीवन एकांगी दृष्टीकोनातुन नसावं त्यात सहजीवनाची भावना असावी !
ह्या साक्षात्काराबद्दल धन्यवाद पिल्लु !
(तळटीप - ह्या पोस्टसाठी त्याचा फोटो असावा म्हणुन आज सकाळपासुन मी त्याची वाट पाहत होतो. शेवटी मगाशी काही वेळापुर्वी त्याचं अंगणात आगमन झालं. मी जवळ जाऊन त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर ते पळालं. आता लोक म्हणतात शस्त्रांनी केलेले वार भरुन निघतील पण शब्दांचे नाही ! त्याचप्रमाणे कदाचित पिल्लु म्हणाले असेल एकवेळ दगड मारला तर चालेल पण बोंब नको ! )
एक नंबर लिहिलंय तुम्ही...
उत्तर द्याहटवा