मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २५ मार्च, २०२१

Making Of घरगुती मसाला!

मसाला शब्दाचा तसा माझा पुर्वापार संबंध ! 

१) लहानपणी शाळेत असताना एक आण्याची कोंबडी आणि चार आण्याचा मसाला ही म्हण ऐकली होती. त्यानंतर खरंतर ही म्हण विसरुन  गेलो होतो. पण मग पॉवरपॉईंट प्रेसेंटेशनने पुन्हा त्या म्हणीची आठवण करुन दिली. 

२) त्यानंतर २००८ साली कॅनडाचा सहकारी भारतात महिनाभर वास्तव्याला होता. प्रथेनुसार त्याला पंचतारांकित उपहारगृहात चमचमीत भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायची संधी देत असु. त्यानं सुद्धा तोंडदेखलं कौतुक करावं अशी आमची अपेक्षा ! पण एकदा तो म्हणाला, "आदित्य, तुम्हां लोकांना पदार्थाची मूळ चव कशी घ्यावी हे माहितच नाही ! तुम्ही तुमच्या मसाल्याच्या चवींनी पदार्थाची मुळ चव मारुन टाकता ! एखादा नदीतील गळ टाकुन पकडलेला मासा बेक / रोस्ट  करुन खाताना त्या माशाच्या मूळ चवीचा आस्वाद कसा तृप्त करुन टाकतो ! अतिथी देवो भव असल्यानं त्याच्याशी मी वाद घातला नाही! पण तु एकदा वसईतील बोंबील कालवण खाऊन बघच असे मनातल्या मनात नक्कीच म्हटलं ! बोंबलाची चव कशी आपसुक त्या कालवणाच्या थेंबाथेंबात उतरलेली असते !

३) त्यानंतर मात्र मसाल्याचा जो अनुभव आला त्यानं मला हादरवून टाकलं. एका साध्या ऑफिसातुन थेट ३०० कोटींचा मसाल्याचा उद्योग चालवला जाऊ शकतो ह्याचा साक्षात्कार ज्यावेळी मला झाला त्यावेळी cloud, cassandra, AI / MLसारं सारं काही निरर्थक वाटु लागलं मला ! कसाबसा मी त्यातुन सावरलो  ! 

पण गेले वर्षभर मसाला सतत घरात लुडबुड करत राहिला. भाजी बेचव झाली मसाल्यावर हमखास खापर फोडलं जायचं. आपण उगाचच इंग्लंडच्या फलंदाजांना दोष देत राहतो ! पण म्हटलं तर मुद्द्यात तथ्य होते. गेल्या वर्षी नेहमीचा मसाला मिळाला नव्हता ! इथुन सुरु झाला तो एक जिद्दीचा प्रवास ! मसाल्याविषयी खूप काही माहिती गोळा करण्यात आली. मसाला बनविणं हे एक शास्त्र आहे हे सिद्ध करणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे 

१) मसाल्याची कच्ची सामुग्री दर्जेदार असायला हवी. ह्याबाबतीत आमचे नातेवाईक असलेल्या होळीवरच्या घरत कुटुंबियातील मीनाताई आणि प्रतिभाताई ह्यांनी वाशीहून उत्तम मसाल्याची ऑर्डर देण्यात मदत केली ! त्या स्वतः वाशीला जाऊन प्रत्यक्ष तपासणी करुन मगच ऑर्डर देतात. ह्यातील काही कच्ची सामुग्री 




२)मसाला कोणत्या महिन्यात बनवावा ह्याविषयी सुद्धा सिद्धांत मांडण्यात आले आहेत ! एप्रिलपासुन आकाशात ढगांचे आगमन होण्यास सुरुवात होते. ज्यादिवशी मिरच्या सुकवाव्यात त्याच दिवशी जर ढगाळ हवामान असेल तर आली का पंचाईत ! त्यामुळं मसाला मार्चमध्ये बनवावा हा सिद्धांत!

३) मसाल्यात साधारणतः ३० - ४० विविध घटक असतात. तज्ञ लोक ह्या विविध घटकांचे प्रमाण गुप्त राखतात. मसाला अभ्यासाचा भाग म्हणुन अशा विविध तज्ञ लोकांच्या प्रमाणांची माहिती गोळा करण्यात आली. ३ किलोच्या मसाल्यासाठी इतकी सामुग्री तर दीड किलोला किती वगैरे त्रैराशिक मांडण्यात आली. मी त्यात थोडीफार मदत केली. पण सर्वच आकडेवारी मला बरोबर जमली असावी की नाही ह्याविषयी मी काहीसा साशंक आहे आणि त्यामुळं थोडं दडपण सुद्धा आले आहे! बाकी आम्ही सुद्धा हे प्रमाण गुप्त ठेवणार आहोत म्हणजे आपोआप तज्ञ लोकांत आमचा समावेश होईल ! 

४) मसाल्याच्या कच्च्या सामुग्रीत साधारणतः लोक तीन प्रकारच्या मिरच्या वापरतात. इथं पाच प्रकारच्या मिरच्या वापरण्यात आल्या आहेत ! हा ही एक मोठा निर्णय ! ह्या मिरच्या कशा सुकवाव्यात हे सुद्धा मोठं शास्त्र ! घराच्या गच्चीवर सुकवाव्यात म्हटल्या तर वाऱ्यानं उडुन जातील ही भीती !  ह्या दोन भितींमुळं त्या मिरच्यांवर पातळ फडका टाकून त्या सुकविण्यात आल्या आहेत !  सोशल मीडियावर व्हयरल झालेला हा मिरच्या सुकविण्याच्या प्रोसेसमधील फोटो ! 




शेवटी पत्र्यांवर मिरच्या सुकविण्यात आल्या आणि त्यात चांगलं यश मिळालं ! 

५) मिरच्या उन्हात सुकविल्या तरी बाकीची कच्ची सामुग्री तव्यावर खरपूस भाजुन घ्यावी लागते. हे काम आटोपण्यास दुपारी तीन ते साडेपाच ही उत्तम वेळ असं शास्त्रात म्हटलं आहे! 

६) मसाला दळून देणाऱ्या गिरण्यांना  ह्या हंगामात खास मागणी असते. काल सकाळी जाऊन ह्या गिरणीवाल्याची मी वेळ घेऊन आलो, प्रत्यक्ष मसाला दळताना ह्या लोकांना उगाचच प्रश्न विचारु नयेत. त्याचा राग ते मसाल्यावर काढू शकतात. 

अशा विविध प्रक्रियांमधून तावूनसुलाखून निघालेला हा मसाला ! 

आता हा मसाला वर्षभर टिकवायचा म्हटला तर त्याची साठवणूक सुद्धा नीट करता यायला हवी. हा मसाला पाण्याशी अजिबात संपर्क येऊ न देता बरण्यांमध्ये बंद करता यायला हवा ! माझ्यासारख्या नवख्या लोकांना जी कामे अजिबात सोपवली जात नाहीत त्यात ह्या अशा बरण्यांमधून थोड़ा मसाला काढुन देणे ह्या कामाचा समावेश होतो ! 

आता खरी परीक्षेची घडी समोर आहे ! ह्या मसाल्याची चाचणी म्हणुन तो भाजीत येत्या एक दोन दिवसांत वापरला जाईल ! त्यावेळी पहिला घास घेतल्यावर चेहऱ्यावर कसे हावभाव असावेत ह्याविषयी संशोधन सुरु आहे ! काही टिप्स असल्यास सुचवाव्यात ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...