मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २७ जुलै, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ७ - ब्लॅक फॉरेस्ट, Rhine फॉल्स

आधीच्या भागांच्या लिंक्स 

प्रस्तावना

पूर्वतयारी, बोरिवली ते लंडन

लंडन दर्शन

२०२४ - युरोप सहल - भाग ४- फ्रान्स

२०२४ - युरोप सहल - भाग ५ - हॉलंड, मडुरोडॅम



१८ जून २०२४

युरोपातील वास्तव्याचा आजचा आमचा पाचवा दिवस.  सहलीचे वेळापत्रक हे अत्यंत दगदगीचे असले तरीही थंड, प्रदूषणमुक्त हवेमुळं चेहऱ्यावर थोडीफार टवटवी आली होती.  त्याहून महत्वाची बाब म्हणजे ह्या निसर्गदर्शनानं मनात एक नवचैतन्य निर्माण झालं होतं.  मागील पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे थ्रीलँड या हॉटेलच्या खोल्या आरामदायी, युरोपियन मानकाच्या मानानं मोठ्या आकाराच्या होत्या. एका व्यवस्थित झोपेमुळे निर्माण होणाऱ्या प्रसन्नतेला सोबत घेतच आम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हॉटेलच्या उपाहारगृहात पोहोचलो. आता हे रेस्टॉरंट होते की Brasserie हे देव जाणे!

युरोपातील मुख्य शहरी प्रदेशापासून दूर असे हे हॉटेल! भारतीय प्रवासकंपन्या घेऊन येणाऱ्या आमच्यासारख्या सहलगटांचा अपवाद वगळता इथल्या कर्मचाऱ्यांना बहुदा इतक्या मोठ्या संख्येने अचानक पर्यटक नाश्त्यासाठी येण्याची सवय नसावी. पाश्चात्य देशातील नागरिकांशी ज्यावेळी तुम्ही संपर्कात येता त्यावेळी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. त्यांना नियमानुसार विशिष्ट पद्धतीनं आयुष्य जगण्याची सवय असते. त्यामुळं आपल्यातील बऱ्याच जणांच्या मनात वारंवार कायद्याच्या चौकटीत बसणारी तरीही पावलोपावली मूळ नियमांपासून काहीशी दुरावणारी वर्तणूक करण्याची सतत जी उर्मी डोकावत असते त्या ऊर्मीमुळं ही पाश्चात्य लोक काहीशी गोंधळतात, वैतागतात. एक पर्यटक म्हणून आपण ज्यावेळी आपण परदेशात जातो त्यावेळी आपल्या देशाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही अशी वर्तणूक करू नये.  आपण जिथं जातो तिथली आचारसंहिता जाणून घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा! आपल्या क्रयशक्तीचा अभिमान असावा पण दुराभिमान नको! आरंभीस प्रसन्न मुद्रेने आमचे स्वागत करणारा  त्यांचा सेवकवर्ग कालांतराने काहीसा वैतागलेला वाटला.  येथील नाश्त्याचा दर्जा अतिउत्कृष्ट असा होता.  कॉफी,  विविध प्रकारचे ब्रेडस,  Scrambled eggs, केक सर्व काही अगदी चविष्ट होते.  एके ठिकाणी ताज्या संत्र्यांचा रस देखील होता. मी जरी तो प्राशन केला नसला तरी ज्या कोणी त्याचा स्वाद घेतला त्यांनी त्याला मनापासून दाद दिली. 



बस हॉटेलमधून बाहेर पडल्यावर नजीकच्या परिसरात सकाळी शाळेत जाणारी मुले दिसली.  सकाळच्या प्रसन्न वेळी हसतखेळत शाळेत जाणारी मुले पाहण्यासारखा आनंद दुसरा नाही.  निरागसता, खोडकरपणा,  नवीन गोष्टी जाणून घेण्याचे कुतूहल हे सर्व या मुलांमध्ये आपल्याला जाणवतं.  आजचा आमचा प्रवास लक्झेनबर्ग ते  titisee (टीटीसी),  त्यानंतर titisee ते Rhine धबधबा असा होता.  लक्झेनबर्ग ते टीटीसी या प्रवासामध्ये अत्यंत नयनरम्य अशा भूभागातून आम्ही जात होतो.  लंडन सोडल्यानंतर फ्रान्सला युरोस्टारने जाताना हिरव्या शेतांना जो प्रारंभ झाला तो संपूर्ण युरोपच्या प्रवासभर आमची साथ करणार होता.  प्रत्येक दिवशी ह्या हिरव्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांचे प्रदर्शन निसर्ग आम्हाला घडवत होता. हे सारं शब्दांत तर पकडू शकत नाहीच, कॅमेरात टिपलं तरी प्रत्यक्ष पाहताना मनातून जी उत्स्फुर्त दाद नकळत येते त्याचा स्वतःच अनुभव घ्यायला हवा.  





अशा निसर्गरम्य परिसरात राहणारी लोक किती सुदैवी हा विचार मनात डोकावला. 




ह्या रुबाबदार अश्वांनी दिवसभर चरण्याचा आनंद लुटला तरीही संपणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात ताजतवानं गवत अवतीभोवती आहे. 




ब्लॅक फॉरेस्ट हा भूभाग जर्मनी आणि स्वित्झर्लंड यांच्या सीमारेषेच्या सानिध्यात वसलेला आहे.  ब्लॅक फॉरेस्ट विभागातील झाडांचे बुंधे हिरव्या गडद रंगाचे असून काही प्रमाणात काळ्या  रंगाकडे झुकणारे असतात. त्यामुळे ह्या जंगलांना ब्लॅक फॉरेस्ट हे नाव पडले. या प्रदेशात डिसेंबर ते मार्च या महिन्यांत होणारा हिमवर्षाव ह्या जंगलांना जे रूप प्रदान करतो त्या रुपावरुन आपल्या सर्वांचा आवडत्या ब्लॅक फॉरेस्ट या केकच्या संरचनेची संकल्पना पुढे आली असावी असं म्हटलं जातं. 

आधीच्या पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणं जेव्हा जेव्हा आम्ही दुसऱ्या देशात प्रवेश करत असू त्यावेळी जॅक बस बाजूला घेऊन टॅकोमीटरमध्ये नवीन देशाची नोंद करत असे. आम्ही जसजसं टीटीसीच्या जवळ येत चाललो तसतसं भूभागानं डोंगराळ रूप धारण केलं होतं. (बाकी हे सतत टीटीसी लिहिताना उगाचच तिकीट तपासनीस आठवत राहतो!) घाट सुरु झाला होता.   


आता वेळ होती इथल्या रहिवाश्यांच्या भाग्याचा हेवा करण्याची ! 



थोड्याच वेळात आम्ही टीटीसी इथलं प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुक्कु घड्याळांच्या दुकानापाशी येऊन पोहोचलो.  आधी पोटोबा मग विठोबा ह्या उक्तीप्रमाणे सर्वप्रथम आम्ही बर्गर, फ्रेंच फ़्राईस आणि कोक असं दुपारचं भोजन घेतलं. अर्थात ते स्वादिष्ट होतं. प्रत्येक उपहारगृहात आम्ही आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेत होतो. युरोपात नळाचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे असे आम्हांला सांगण्यात आले होते. त्यावर आम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला होता. आम्हांला संपूर्ण प्रवासात पाण्यामुळं काही त्रास झाला नाही. 

कुक्कु (अर्थात कोकिळा) घड्याळं हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे. दर तासाला कोकिळा घड्याळाचा दरवाजा उघडते आणि बाहेर येऊन मंजुळ आवाजात गाते.  इथल्या ह्या दुकानाबाहेर दर तासाला गाणाऱ्या कोकिळेची, त्यासोबत नृत्य करणाऱ्या जोडप्यांची सुंदर संरचना घड्याळासोबत करण्यात आली आहे. त्या नाचणाऱ्या जोडप्यांचं अनुकरण करत व्हिडीओ टिपणाऱ्या काही पर्यटकांच्या प्रयत्नांविषयी मी बोलणं टाळतोय.  


कुक्कु घड्याळांचा उगम सतराव्या शतकांच्या आरंभी झाला. त्यावेळी कोकिळेचा आवाज ऐकणं शुभ मानलं जात असे. ब्लॅक फॉरेस्ट भागातील शेतकऱ्यांनी लाकडांच्या ओंडक्याचा वापर करून कोकिळेच्या मंजुळ स्वरानं मन प्रसन्न करणारी ही घड्याळं बनविली. इतक्या शतकांनंतर सुद्धा हा ब्रँड  जगातील अनेक देशांत प्रसिद्ध आहे. 

ही घड्याळं यांत्रिक आणि क्वार्ट्झ ह्या दोन प्रकारात उपलब्ध असतात. यांत्रिक प्रकारातील घड्याळात सुद्धा दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील घड्याळांना दर दिवशी तर दुसऱ्या प्रकारातील घड्याळांना दार आठवड्याला चावी द्यावी लागते. क्वार्ट्झ प्रकारातील घड्याळं बॅटरीवर चालतात.  दुकानातील विक्रेत्या मुलीनं आम्हां सर्वांना ह्या घड्याळांविषयी इत्यंभूत माहिती दिली. ही घड्याळं इथून जगभर कशी पाठविली जातात, त्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते वगैरे वगैरे ! मला एकंदरीत यांत्रिकी गोष्टींविषयी फारसं आकर्षण नाही. कोकिळेला वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी देण्यासाठी जे मानाचं स्थान मिळालं आहे ते ठीक, दार तासातासाला तिला त्रास का द्यावा हे माझं प्रामाणिक मत !




हे उपहारगृह, कोकिळा घड्याळ  दुकान हे सर्व डोंगरांनी वेढलेल्या संकुलात आहेत. हा अत्यंत हिरवागार प्रदेश आहे. आज कडक ऊन पडलं होतं. तापमान तेवीस - पंचवीस अंश सेल्सिअस वगैरे झालं होतं. युरोपातील पाचवा दिवस असल्यानं किती हा प्रचंड उन्हाळा असं बोलण्याचा हक्क आम्हांला मिळाला होता, जो आम्ही बजावत होतो.  हे अस्वल इतक्या उन्हात इथं काय करतंय हे त्याला विचारण्याचा मला मोह झाला होता. 













आता आमची वाटचाल ऱ्हाईन धबधब्याच्या दिशेनं सुरु झाली. हा एक डोळ्याचं पारणं फेडणारा असा धबधबा असून त्याच्या भोवतालच्या परिसरात संपूर्ण कुटुंबासोबत दिवस आनंदानं दिवस व्यतित करता येऊ शकतो. ऱ्हाईन धबधब्याची काही नेत्रसुख देणारी छायाचित्रं !

 

ह्या शृंखलेत प्रथमच ब्लॉगपोस्ट मध्ये व्हिडीओ समाविष्ट करण्याचा माझा प्रयत्न ! हा सफल होऊन वाचकांना तो दर्शक ह्या रूपात आवडावा ही आशा !




'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख' गाण्याची आठवण करून देणारं बदक !
 

रांगेत उभं राहून आम्ही धबधब्याच्या अगदी जवळ गेलो. खटकणारी गोष्ट म्हणजे आम्ही लाईफ जॅकेट्स परिधान केली नव्हती. त्या मागचं कारण काही मला उलगडलं नाही ! ही बाब वगळता धबधबा जवळून पाहणं हा नक्कीच एक आनंददायी अनुभव होता. पाण्याचे थंड तुषार अंगावर येत होते. एका क्षणी हा बोटीला थेट धबधब्यात घुसवतो की काय ही भिती प्राजक्ताला वाटली. धबधब्याच्या प्रचंड आवाजात तिनं हळूच मला ती बोलून दाखवली. अर्थात तिचं बोलणं ऐकू येणं काही शक्य नसलं तरी चेहऱ्यावरील भाव सर्व काही सांगून जात होते. जॅकने आपल्यासोबत ड्रोन आणला होता. ऱ्हाईन धबधब्याचा आणि भोवतालच्या परिसराचं त्यानं ड्रोनद्वारे टिपलेला व्हिडीओ अगदी अप्रतिम झाला आहे. त्यानं जरी तो व्हाट्सअँप द्वारे आमच्यासोबत शेयर केला असला तरी तो मी शेअर करणं उचित नाही. 






ही सफर संपताच आम्ही आईसक्रीम सेवन केलं. भोवतालच्या परिसरात छायाचित्रणासाठी मुबलक संधी होती. 





प्रसन्न मनानं आम्ही आता स्वित्झर्लंडमधील झुरिच शहरात प्रवेश करत होतो. तापमान आता उबदार ह्या संज्ञेच्या आवाक्यापलीकडं गेलं असलं तरीही झुरिच शहराचं प्रथमदर्शन त्याच्या प्रेमात पाडणारं होतं. 







आमचा आजचा मुक्काम prizeotel ह्या हॉटेलात होता.  स्वित्झर्लंडमधील हॉटेलचे नियम कडक आहेत. खोली सोडण्याच्या वेळी  (चेक आउट)  हॉटेलचा कर्मचारीवर्ग प्रत्येक खोलीची तपासणी करतो. तुम्ही डोक्याला तेल लावून उशांना सुद्धा त्याचा प्रसाद दिला असेल, खोली झंडू बामाच्या सुगंधाने व्यापली असेल, अंघोळ करताना शॉवरचे पाणी बाथरूमच्या लादीवर येऊ दिलं असेल तर तुम्हांला तगडा दंड होऊ शकतो अशी काहीशी ताकीद आम्हांला देण्यात आली होती. त्यामुळं खोलीत प्रवेश करताना काही सहप्रवाशांचे चेहरे भयभीत झाले होते. 

भारतीय उपहारगृहातून जेवण ह्या हॉटेलमध्ये आणण्यात आलं होतं. मोठ्या मेजावर विविध पदार्थ मांडून ठेवण्यात आले होते. नागपूरच्या पद्धतीने बनविण्यात आलेली वांग्याची रुचकर भाजी हे ह्या जेवणाचं खास वैशिष्ट्य ! हॉटेलच्या जवळच एक रेल्वेस्टेशन आणि नागरी वसाहतीचा परिसर होता. रात्रीच्या नऊ वाजताच्या उजेडात आम्ही ह्या निसर्गरम्य परिसरात फेरफटका मारून निद्राधीन झालो !
 
ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
विकिपीडिया 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 
(क्रमशः )

शनिवार, २० जुलै, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ६ - ब्रुसेल्स, लक्सेनबर्ग

आधीच्या भागांच्या लिंक्स 
१७ जून २०२४ 


आजच्या दिवसाची सुरुवात तुलनेनं सावकाश झाली. वेकअप कॉलची वेळ सकाळी सात वाजता होती. आयबिस हे मोठ्या क्षमतेचे हॉटेल असल्यामुळे नाश्त्यासाठी त्यांच्या उपहारगृहात पर्यटकांच्या प्रत्येक गटासाठी विशिष्ट वेळा राखून ठेवण्यात आल्या होत्या.  अतुल आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी सकाळच्या उठण्याच्या, नाश्त्याच्या आणि प्रस्थान वेळा व्हाट्सअप ग्रुपवर पाठवत असे. प्रत्येक कुटुंबाने या वेळांचे कटाक्षाने पालन करणे अपेक्षित असे. आज मात्र पावणेनऊ ही प्रस्थान करण्याची तुलनेने उशिराची वेळसुद्धा आमच्या गटातील काहीजणांना पाळता आली नाही.  अतुलने मोजक्या परंतु कडक शब्दात सर्वांना दिलेल्या वेळा पाळण्याचे महत्त्व विशद करून सांगितले.  यापुढे जर उशीर झाला तर उशीर करणाऱ्या पर्यटकांना स्वखर्चाने टॅक्सी करून पुढच्या ठिकाणी यावं लागेल असं त्यानं बजावलं. त्यानं ज्या पद्धतीने हा संदेश दिला तो व्यवस्थापन कौशल्याचा हा उत्तम पाठ होता.  ह्या घटनेनंतर आमच्या ग्रुपने प्रत्येक दिवशी सर्व वेळा पाळल्या. 

प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय म्हणता येईल अशी विमान कंपनी असते.  हॉलंड देशाची के.  एल. एम. ही राष्ट्रीय विमान कंपनी आहे असं आपण म्हणू शकतो.  थोड्याच वेळात आम्हाला Schiphol हा विमानतळ दिसला.  इथं अनेक विमानं अगदी जवळून पाहता आली. विमानं आपल्या हँगरमधून रस्त्यानं रनवे पर्यंत जायचा रस्ता आम्ही पाहिला.  इंग्रजीमध्ये  Schiphol या शब्दाचं भाषांतर केलं असता Ship  Hole असे होते.  इथं असलेल्या मोठ्या तलावामध्ये बुडालेल्या अनेक जहाजांच्या घटना लक्षात घेता Schiphol हे नाव देण्यात आले असावे अशी दंतकथा आहे.  युरोपियन देशांमध्ये भौगोलिक सानिध्यामुळं  एकच शब्द  विविध भाषांमध्ये थोडीफार वेगळं रूपं धारण करून अवतरत असावा. भाषातज्ञांनीच  ह्यावर भाष्य करणं योग्य!  

रस्त्याच्या कडेला दिसलेल्या varthak हा शब्द असलेल्या पाटीकडे आमचे लक्ष वेधून अतुल  म्हणाला की इथं काही आपल्या वर्तकांनी मालमत्ता विकत घेतली नाही तर हा शब्द स्थानिक भाषेत प्रस्थान या अर्थाने वापरला जातो.  वाटेत एक मोठा वाहनतळ सुद्धा आम्हांला दिसला.  विमानतळावर जाणारे प्रवासी इथं आपल्या कार पार्क करून प्रवासाला जातात परतल्यावर बाहेर पडल्यानंतर आपली कार त्यांना तात्काळ उपलब्ध असते. 




नेदरलँड्समधील प्रमुख आकर्षण म्हणजे ट्यूलिप गार्डन! ट्यूलिपचा बहर पहायचा असेल तर मे महिन्याच्या आत तुम्हाला इथं यायला हवं. आम्ही जून मध्ये प्रवास करत असल्यामुळे ट्युलिपचा बहर पाहण्याची संधी आम्हांला मिळाली नाही.  युरोपातील अनेक देशांप्रमाणं  नेदरलँडची जमीन ही खूप सुपीक आहे असं मानलं जातं.  ट्यूलिप या फुलांची जिथे शेती केली जाते तो विभाग आम्हाला बसमधून जाताना दिसला.  युरोस्टार पासून आम्हांला आधुनिक पद्धतीच्या पवनचक्क्या दिसत होत्या.  परंतु अजूनही मोजक्या पारंपारिक पवनचक्क्या युरोपात अस्तित्वात आहेत.  अशाच एका पारंपरिक पवनचक्कीचं हे छायाचित्र !


पुढील रस्त्यावर दोन्ही बाजूला वैविध्यपूर्ण नयनरम्य दृश्यांची मालिका उलगडत राहिली. 




बारा दिवसांच्या सहलीत बसमधून एकत्र प्रवास करताना तुम्ही एका कुटुंबासारखेच होऊन जाता.  परंतु सततच्या प्रवासामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळं  अजूनही बसमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले नव्हते.  ऋषीभाई यांनी यासाठी आज पुढाकार घेतला.  ऋषीभाई हे मुंबईतील सत्तरीला पोहोचलेले युवक.  त्यांनी बसमधील प्रत्येक जोडप्याने येऊन आपली लग्नगाठ कशी जुळली ह्याची कथा सांगावी अशी कल्पना मांडली.  सर्व प्रवाशांनी (त्यात महिलावर्गाचा पुढाकार जास्त) ती उचलून धरली.  अर्थात आमचा पुढील तीन तासांचा प्रवास अत्यंत मनोरंजक असा झाला.  तीस-पस्तीस वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाच्या आणि अजूनही मजबूत धाग्यांनी जोडल्या गेलेल्या  सहप्रवासाच्या कथा ऐकणं हा एक मजेशीर अनुभव होता. एकमेकांना कोपरखळ्या मारण्याची ही संधी काहीजणांनी सुरेखरित्या साधली.  

आजचा आमचा प्रवास एम्स्टरडॅम - ब्रुसेल्स - लक्सेंमबर्ग असा होता.  हे एकंदरीत ३६५ किलोमीटर इतके अंतर होते.  ह्यातील एमस्टरडेम ते ब्रुसेल्स हे अंतर जवळपास दोनशे दहा किलोमीटर इतके होते. ब्रुसेल्स  इथे आम्ही तीन तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो.  तिथं एका भारतीय उपहारगृहात आम्ही रुचकर भोजन घेतलं.  

ब्रुसेल्स हे शहर स्थापत्यशास्त्राच्या सुंदर कलाविष्काराचे उदाहरण असलेल्या अनेक इमारतींचे शहर आहे.  इथं आपल्याला व्यावसायिक आणि रहिवाशी या दोन्ही प्रकारच्या इमारती आढळून येतात.  आम्ही इथं गाॅथिक चर्च पाहिलं. 


Berlaymont building ह्या इमारतीमध्ये युरोपिअन महासंघाचे मुख्य कार्यालय आहे. भोवताली फायनान्स टॉवर, पोलीस मुख्यालय अशा महत्वाच्या इमारती होत्या. 



इथं जुन्या वापरलेल्या कार व इतर गोष्टी भंगारात टाकून देण्यासाठी वापरात येणारी मोठी जागा आम्हांला दिसली. 


बांधकामासाठी बहुदा नदीपात्रातून काढल्या गेलेल्या वाळुचे ढिगारे एका ठिकाणी दिसले. ही छायाचित्रं इथं समाविष्ट करण्याचा इतकाच हेतू की युरोपात सुद्धा नित्याच्या आयुष्यातील गरजा भागविण्यासाठी ही सुंदर नसणारी स्थळं अस्तित्वात असतात. आयुष्य म्हणजे केवळ सौंदर्य नाही.  



आता वेळ होती ती ब्रुसेल्स शहरातील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे Manneken Pis ह्या स्थळाला भेट देण्याची!  पाण्याच्या कारंज्यामध्ये लघवी करणाऱ्या छोट्या मुलाचा हा पुतळा आहे. हा इथं १६१८ सालापासून नवीन रूपात अस्तित्वात आहे. विकिपीडिया वर थोडा शोध घेतला असता मूळ पुतळ्याची वारंवार नासधूस केली गेल्यानं १९६५ सालापासून ह्या पुतळ्याची प्रतिकृती इथं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. मूळ पुतळा ब्रुसेल्स संग्रहालयात जपून (लपवून) ठेवण्यात आला आहे. प्रसंगानुरूप ह्या मुलाला कपडे परिधान केले जातात. युरो स्पर्धेचा ज्वर सर्वत्र पसरला असल्यानं खालील छायाचित्रात हे बालक फुटबॉलचा वेष परिधान केल्याचं दिसतं.  सर्व काही ठीक पण ह्या पुतळ्याचा इतका गाजावाजा करण्याचं कारण काय असा प्रश्न मनात नक्कीच निर्माण होतो. 


Grand-Place (French: [ɡʁɑ̃ plas]) अथवा Grand Square किंवा  डच भाषेत Grote Markt हा ब्रुसेल्सच्या मध्यवर्तीय भागातील मुख्य चौक आहे. ह्या चौकाचं आकारमान ६८ गुणिले ११० मीटर असून हा पूर्णपणे लाद्यांनी आच्छादित आहे. ह्या चौकाभोवती टाऊन हॉल आणि आणि उत्तर दिशेला ब्रेड हाऊस ह्या भव्य इमारती आहेत. टाऊन हॉल ही ह्या चौकातील एकमेव मध्ययुगातील इमारत आहे. ब्रेड हाऊस आणि संपूर्ण ग्रँड प्लेस हा युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समाविष्ट आहे. ह्या चौकाचं बांधकाम अकराव्या शतकात सुरु होऊन सतराव्या शतकात संपलं. 



इथं सुप्रसिद्ध बेल्जियम चॉकलेट्सची आणि बेल्जियम वॅफल्सची दुकानं होती. अतुलच्या परिचयातील एका चॉकोलेट दुकानात आम्ही प्रवेश केला. इथं आम्हांला चवीसाठी विविध स्वादाची चॉकोलेटस  देण्यात आली. वीणा वर्ल्डच्या गटाला खास सवलत म्हणून एक जबरदस्त ऑफर आम्हांला देण्यात आली. खरंतर घरगुती चोकोलेट्स एक पॅकेट २४ युरोला होते. आमच्या ग्रुपसाठी १०० युरोला अशी आठ पॅकेट्स देण्यात आली. अर्थात आमच्या गटातील बहुतेकांनी इथं भरपूर खरेदी केली. इथं एक धोक्याची सूचना देऊ इच्छितो. ही चॉकोलेट्स वितळू न देता भारतातील घरात आणणं हे जवळपास अशक्यप्राय काम आहे.  आमच्याबाबतीत सुद्धा हेच झालं. वितळलेल्या चॉकोलेट्सचा लगदा मित्रमंडळी, नातेवाईक ह्यांना देणं इष्ट न समजलं जात असल्यानं सध्या मी ही चॉकलेट्स संपविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. हा माणूस सातत्यानं कारली का विकत घेत आहे हा आमच्या बोरिवलीच्या भाजीवाल्याला पडलेला प्रश्न ! 


चॉकलेट्स खाऊन झाल्यावर सुप्रसिद्ध बेल्जियम वॅफेल्सचा आस्वाद घेणं क्रमप्राप्त होतं. रांगेत राहून वगैरे विकत घेतलेलं बेल्जियम वॅफेल्स त्यांच्या मुंबईत मिळणाऱ्या अवताराच्या तोडीस तोड नव्हतं असं बहुतेक सहप्रवाशांचं मत पडलं ! आता बोला !

युरोपात बऱ्याच ठिकाणी विनामूल्य स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध असे. परंतु जर दीर्घ प्रवासात असं विनामूल्य स्वच्छतागृह उपलब्ध होणार नसेल तर आम्हांला उपलब्ध असलेलं सशुल्क स्वच्छतागृह वापरण्याची सूचना केली जात असे. प्रति माणशी एक - दीड युरो असे हे शुल्क असे. 

पुन्हा एकदा बसमध्ये बसून आम्ही दोन तासांचा प्रवास करून लक्सेनबर्ग इथं पोहोचलो.  लक्सेमबर्ग हा अत्यंत विकसित असा देश असून आय. एम.  एफ. (जागतिक नाणेनिधी संघ) आणि जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगातील प्रतिमाणशी सर्वाधिक जीडीपी (दरडोई  असलेला देश आहे.  या देशात प्रवेश करण्यासाठी प्रति प्रवासी २५० युरो इतके शुल्क द्यावे लागते असे आम्हाला सांगण्यात आले.  इंटरनेटवर याला दुजोरा देणारी माहिती मिळाली नाही.  ऍमस्टरडॅम ते ब्लॅक फॉरेस्ट जर्मनी ह्या प्रवासातील एक मधला थांबा म्हणून बऱ्याच वेळा लक्सेनबर्गकडे पाहिलं जायचं. हळूहळू त्याची प्रतिमा बदलत चालली आहे. लक्सेनबर्ग हा एक देश व  शहरसुद्धा आहे.  जवळपास सात लाख लोकसंख्या असलेला हा देश युरोपातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये गणला जातो.  लक्सेनबर्ग शहरांमध्ये संध्याकाळी फिरण्याचा अनुभव संस्मरणीय होता.  या शहराची श्रीमंती या फेरफटक्यामध्ये पावलोपावली जाणवत होती. सुर्याचं पिवळेधम्मक ऊन शहरातील उच्चभ्रू  परिसराला, सुंदरशा इमारतींना साजिरं रूप प्रदान करत होतं.  इथं आम्ही एक ट्रॅम राईड घेतली.  दर चार-पाच मिनिटांनी ट्रॅम येत होत्या.  अर्थातच इथं तुम्ही हव्या त्या स्थानकावर चढवून हवं तिथे उतरू शकत होता. हा ट्रॅमप्रवास विनामूल्य होता. लक्सेनबर्ग शहरातील हे अल्पावधीचं वास्तव्य मनाला अगदी तरतरी आणून देणारं ठरलं.  सायंकाळचे जेवण आम्ही स्वागत या उपहारगृहात घेतले.  इथे जेवण अत्यंत रुचकर होते. इथे बनवण्यात आलेले वरण अजूनही माझ्या लक्षात आहे.  या शहराचे सौंदर्य, ही संध्याकाळ आमच्या नक्कीच कायम लक्षात राहील. 










त्यानंतर आमची वाटचाल हॉटेलच्या दिशेने सुरू झाली.  हा रस्ता, भोवतालचा निसर्ग अत्यंत नयनरम्य असा होता.  युरोपातील शहरांपासून दूरच्या भागातील गावांचे सौंदर्य कसे असतं,  मावळत्या दिनकराच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये ते कसं खुलून उठतं याचा अनुभव आम्ही घेत होतो.  अशाच एका घराचं हे दूरवरून घेतलेलं चित्र! इथल्या गवतावर  सायंकाळी घराबाहेर बसून आकाशातील ढगांकडे पहायला, भोवतालच्या पक्षांच्या गुंजन ऐकण्याचा अनुभव नक्कीच स्वर्गीय असेल!  








हा रस्ता संपू नये असं वाटत असतानाच आमचं Threeland हे हॉटेल आलं.  या संपूर्ण सहलीतील सर्वोत्तम हॉटेलपैकी एक असं हे म्हणता येईल.  येथील खोल्या प्रशस्त होत्या. ह्या हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या पाटीकडं निरखून पाहिलं असता तुम्हांला हॉटेल, Brasserie व रेस्टॉरंट अशी तीन वेगवेगळी नावं दिसतील. Brasserie आणि रेस्टॉरंटमधील फरक माहितीमायाजाल सुरेखरित्या समजावून सांगतं. 

French brasseries and bistros tend to offer more traditional and affordable meals, with fairly speedy service and noisy atmosphere, while restaurants are usually better for more special fares. 

बाथरूम वगैरे अत्यंत स्वच्छ आणि आधुनिक सोयींनी परिपूर्ण असं होतं.  साडेनऊ झाले तरी संधीप्रकाश रेंगाळत होता.  त्यामुळे उत्साही सहप्रवासी हॉटेल भोवतालच्या निसर्गरम्य परिसराचा फेरफटका मारण्यासाठी निघाले.  आमच्या सहलीतील ही एक संस्मरणीय अशा संध्याकाळच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बिछान्यावर लोळण घेणं मी पसंत केलं !







ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 
(क्रमशः )

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...