मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

खेल को खेल रहने दो, उसे सायन्स ना बनाओ !


पुर्वी क्रिकेट खेळ ही एक कला होती. खेळात एक प्रकारची नैसर्गिकता होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पोटाची ढेरी असलेले अनेक खेळाडु पाहायला मिळायचे. प्रतिस्पर्धी फलंदाजाने उत्कृष्ट फटका मारला तर त्याला दाद म्हणुन बहुदा त्या फटक्याचा मनापासुन पाठलाग न करण्याची मानसिकता बऱ्याच खेळाडूंत आढळुन येई! केवळ त्या चेंडुला सोबत म्हणुन ते सीमारेषेपर्यंत धावत जात असावेत असा मला संशय येई !

पण मध्यंतरी केव्हातरी क्रिकेटने कलेकडून व्यवसायाचा प्रवास प्रचंड वेगानं केला. तुम्ही केवळ फलंदाज अथवा गोलंदाज असणं हे पुरेसं ठरेनासं झालं.  तुम्ही क्षेत्ररक्षण करताना किती धावा अडविल्या किंवा बहाल केल्या हे तुमच्या पापपुण्याच्या खात्यात जमा होऊ लागले. 

त्यानंतर अजुन एक घटना घडली! निवृत्त क्रीडापटूंची फौजच्या फौज समालोचक, स्तंभलेखक म्हणुन प्रवेश करती झाली. आता ह्या लोकांना सामन्याच्या पुर्ण कालावधीत बोलणं आवश्यक होऊ लागलं. सामन्याच्या काही दिवस आधी आणि नंतर रकानेच्या रकाने भरणं आवश्यक होऊ लागलं. इतक्या प्रमाणात बोलणं, लिहिणं करायचं असेल तर मग उपलब्ध आकडेवारीला संगणकाच्या हाती (CPU) सोपवुन त्याचा कीस पाडण्याची वृत्ती उदयास आली. ४५ ते ५० षटकांच्या दरम्यान भारताच्या उत्तर भागात गोलंदाजी करताना जर भारत पहिली गोलंदाजी करत असेल तर बुमराह प्रतिषटक ४.३४ च्या गतीने धावा देतो आणि जर भारत पाठलाग करत असेल तर हेच प्रमाण ४.५३ होते. अशा अनाकलनीय आकडेवारीचा मारा क्रीडारसिकांवर होऊ लागला ! विराट कोहलीला बाद करायचं असेल तर त्याला राऊंड द विकेट मारा करुन त्याच्या अंगावर उसळी घेणारा चेंडु टाकावा असा सल्ला आमच्या गल्लीतील फेकी गोलंदाजी करणारा मुलगा म्हणाला तेव्हा मी केवळ विस्मय प्रदर्शित केला हे सौम्य विधान ठरेल. त्यालाही दोष का द्यावा? बहुदा त्यानं आदल्या दिवशीच्या सामन्यातील आकडेवारी पाहिली होती. 

इथं एक मुद्दा मी स्पष्ट करु इच्छितो! ही सर्व आकडेवारी, हे सर्व विश्लेषण क्रिकेट खेळाडु, त्यांचे मार्गदर्शक, प्रतिस्पर्धी, सहाय्यक ह्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचे आहे. त्यावर ते आपले डावपेच ठरवत असतात. परंतु ज्यावेळी मी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहत असतो त्यावेळी ह्या सर्व आकडेवारीच्या बोज्याखाली मला कससंच होतं. त्यातला मानवी घटक नाहीसा झाल्यासारखं वाटतं ! म्हणुनच मी म्हणतोय खेल को खेल रहने दो... 

बाकी कोणताही  कप्तान ज्यावेळी सामना हरल्यानंतर Boys played well! म्हणतो त्यावेळी हरवलेला हा माणुसकी घटक मला सापडतो ! सामन्याचे विश्लेषण नंतर करु पण ह्या क्षणी माझ्या संघातील खेळाडूंच्या प्रयत्नांची दाद देणं हे ज्या कप्तानाला महत्वाचं वाटतं तो कप्तान माझ्यासाठी आदर्श असतो ! 

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

ज्ञानकण!




अलीकडच्या काळात वाचनात / ऐकण्यात आलेले काही ज्ञानकण 

१) कोणत्याही कंपनीत जसजसं तुम्ही वरच्या पदावर जात राहता तसतसं तुमच्या जबाबदारीमधील संदिग्धतेचे प्रमाण वाढत जाते; त्याचबरोबर अपयशाबद्दल सबबी देण्याची तुम्हांला दिलेली सवलत झपाट्यानं कमी होते. 

२) भले तुम्ही तुमच्या संघटनेमधील छोटे मोठे निर्णय घेण्याचा अधिकार कनिष्ठ पातळीकडे सुपूर्द करु शकता, (किंबहुना तो तुम्ही तसा करायलाच हवा) परंतु त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी मात्र सदैव तुम्हांकडेच राहील. 

३) हल्लीच्या काळातील एक लोकप्रिय वाक्य ! ज्या गोष्टी / जे गुण  तुम्हांला एका विशिष्ट पदापर्यंत घेऊन येतात, त्याच गोष्टींच्या / त्याच गुणांच्या आधारे त्यापुढील वाटचाल आपण करु शकु हे मानणं चुकीचं ठरु शकतं. 

४) विधान ३ ला आव्हान देणारं विधान ! तुमच्यातील उणिवांवर सदैव लक्ष देऊ नकात ! तुमच्या सामर्थ्यस्थळांवर लक्ष दिल्यास तुम्ही पुढे बरीच मजल मारु शकाल ! 

५) विधान ४ ला पुरक विधान ! तुमच्यातील उणिवा ह्या जन्मीच दुर करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या उणिवा झाकणाऱ्या माणसांचं कोंडाळं तुमच्याभोवती गोळा करा ! ह्या माणसांची करियरमध्ये योग्य प्रगती होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची ! 

६) आपण एखादया पदावर खरोखर प्रभावीपणे काम करत आहोत की नाही ह्याचा शहानिशा करणं म्हटलं तर अवघडच ! त्या भुमिकेच्या मानसिकतेमध्ये राहुन हे परीक्षण करणं शक्य नाही. ज्याप्रमाणे रंगमंचावर विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला आपल्या भुमिकेची सार्थता जाणुन घेण्यासाठी गॅलरीत स्वतःला कल्पून स्वतःकडे अलिप्तपणे पाहता यायला हवं त्याचप्रमाणे विशिष्ट पदावर काम करणाऱ्या आपल्या स्वतःचे गॅलरीत बसुन आपणास परीक्षण करता यायला हवं ! 

७) काही न करता चहा / कॉफीचा कप हातात घेऊन एखादया उद्यानातील कारंजांचा आनंद घेण्याची क्षमता तुमच्याकडं असावी ! न जाणो अशा स्थितीतुनच तुम्हांला स्वतःचा Gallery View घेण्याची क्षमता विकसित करता येईल. 

८) पुरेशा माहितीअभावी निर्णय घेता येत नाही म्हणुन निर्णय घेणं पुढं ढकलणं हे एका विशिष्ट वेळेनंतर खुप चुकीचं / गुन्हेगारी स्वरुपाचं ठरतं. उपलब्ध माहितीला पुरेशा माहितीत परिवर्तित करण्यासाठी भोवतालच्या वातावरणाची तुम्हांला सखोल माहिती असावी. आपण ह्या बाबतीत जर कमी पडत असु तर त्याची तुम्हांला तात्काळ जाणीव व्हायला हवी !

९) जर तुमच्या कामाचं स्वरुप, तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सतत तणाव आणत असतील तर काही काळ स्वतःला गांभीर्यानं घेणं सोडुन द्या ! काही ठिकाणी तुम्ही प्रभाव पाडु शकला नाहीत तरीही पृथ्वी फिरायची काही थांबत नाही !

१०) चिकाटी , जिद्द, अपयशानं खचुन न जाणं हे मोठे गुण आहेत ! बंद खोलीच्या आत होणाऱ्या मोठ्या पातळीवरील मिटींग्स मध्ये तुम्ही सदैव विजयी होणार नाहीत ! परंतु त्यातुन जर तुम्ही योग्य धडा घेण्याची क्षमता दर्शविलीत तर  तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे !


आदित्य पाटील 

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

हिकीकोमोरी


पुन्हा एकदा एक परदेशी वृत्तवाहिनी आणि एक विचारप्रवृत्त करणारा कार्यक्रम ! ह्यावेळी जपानमधील हिकीकोमोरी अर्थात सामाजिक जीवनापासुन पुर्णपणे अलिप्त झालेल्या तरुणवर्गाविषयी एक कार्यक्रम पाहण्यात आला. ही युवामंडळी स्वतःला आपल्या घरात खरंतर खोलीत कोंडुन घेतात आणि वर्षोनुवर्षे समाजापासुन अगदी अलिप्त जीवन जगतात. 

ह्या मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण एकदा हिकीकोमोरी बनलेली मंडळी आयुष्यभर तशीच बनलेली राहतात आणि दरवर्षी नव्यानं त्यात मंडळी सामील होत राहतात. ह्यातील बहुतांशी मंडळी ही आपल्या आईवडिलांवर उपजीविकेसाठी अवलंबुन असतात. जोवर आईवडील सक्रिय असतात तोवर ह्या वाढलेल्या मुलांना सांभाळतात. पण ज्यावेळी आईवडील म्हातारे होतात त्यावेळी मात्र बिकट परिस्थिती निर्माण होते. आपल्या पश्चात ह्या मुलांचे हाल होऊ नयेत म्हणुन पालकांनीच त्यांना मारुन टाकल्याची उदाहरणं आहेत. 

हे नक्की का होत असावं? सामाजिक जीवनात वावरण्याचे बरेच नियम अत्यंत कठोर असावेत; बहुदा सर्वांनाच ते झेपत नसावेत. त्यामुळं आपल्याला न झेपणाऱ्या सामाजिक नियमांपासुन पळवाट म्हणुन मंडळी कदाचित हा मार्ग पत्करत असावीत. ह्यातील काही मंडळी ऑनलाईन राहुन काही कामं करतात, पैसा कमावतात. परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. मी पाहिलेल्या कार्यक्रमात चित्रित केलेला तरुण अगदी हलाखीच्या परिस्थितीत एकटा राहत होता. सामाजिक कार्य करणारा एक वृद्ध त्याच्या घरी जाऊन त्याला भेटला. त्याला आपल्यासोबत घेऊन भोजनासाठी उपहारगृहात घेऊन गेला. 

प्रत्येक समाजाचे स्वतःचे असे विशिष्ट प्रश्न असतात. आपल्या भारतीय समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. सामाजिक जीवनात, क्रीडा क्षेत्रात झपाट्यानं लोप पावणाऱ्या सुसंस्कृततेचा अभाव आणि त्यासोबत आलेली विनाकारण आक्रमकता हा एक नव्यानं क्षितिजावर आलेला प्रश्न आहे. कपिलदेव परवाच म्हणाला, "क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे असं म्हणु नका! आम्ही ज्यावेळी खेळलो त्यावेळी तो होता, आता नाही !" युवा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जो प्रकार घडला तो ही ह्याचेच उदाहरण आहे. आपली संस्कृती लक्षात घेता  आपल्याकडं हा प्रकार घडणं नक्कीच दुर्दैवी आहे. परंतु एक समाज म्हणुन आपण आपले जे काही प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत त्यात सुसंस्कृत वागणं हा नक्कीच वरच्या स्थानावर नाही. अतिआत्मविश्वास बाळगुन असलेल्या आक्रमक युवा पिढीचं नक्की काय करावं ही कदाचित नजीकच्या भविष्यकाळात आपली समस्या बनु शकते. 

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

थोड़ा है....

शहरात वास्तव्य करत असल्यानं बऱ्याच वेळा एकंदरीत आयुष्याविषयी आपण उगाचच क्लिष्ट चित्र मनात निर्माण करतो. आपलं आयुष्य, आपल्या जीवनातील डेटा पॉईंट्स ह्या चित्राला उगाचच पुष्टी देत राहतात. पण अचानक काही कार्यक्रम, काही पुस्तकं, काही लेख आपल्याला ह्या पलीकडं सुद्धा जग अस्तित्वात आहे ह्याची सुखद जाणीव करुन देतात. 


आज रविवारच्या एका शांत सायंकाळी असाच एक सुरेख कार्यक्रम चिनी वाहिनी CGTN वर पाहण्यात आला. २००८ साली चीनच्या सिचुआन (Sichuan) प्रांतात विनाशकारी भुकंप झाला. ह्या भुकंपानं इथल्या लोकांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवुन आणली. हळुहळू लोकांची आयुष्य जरी पुर्वपदावर आली असली तरी दुरवर अंतर्गत चीनमध्ये पसरलेल्या बऱ्याच गावांमध्ये मनोरंजनाची साधनं मात्र अजुनही पुर्ववत झाली नाहीत. अशा वेळी सरकारनं अशा दुर्गम भागातील लोकांच्या मनोरंजनासाठी म्हणुन प्रोजेक्टरवर सिनेमा दाखविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

हे  वाचुन आपल्यापैकी बऱ्याच जणांना पुर्वी गावात उन्हाळ्यात येणाऱ्या फिरत्या सिनेमाच्या तंबुंची आठवण आली असेल. सरकारने ही सुविधा उपलब्ध करुन दिली खरी पण ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणीतरी पुढं यायला हवं ना? इथं पुढं झालाय तो हा ह्या कार्यक्रमाचा नायक !  खरंतर त्याला शहरात चांगली नोकरी मिळु शकली असती परंतु हा नायक जाणीवपुर्वक ह्या व्यवसायाची निवड करतो. त्याच्या वडिलांनी सुद्धा हाच पेशा स्वीकारला होता. कदाचित त्यामुळं सुद्धा त्यानं हा निर्णय घेतला असावा. 


ह्या पेशातून त्याला खास उत्पन्न मिळत नाही. प्रत्येक कार्यक्रमामागे मिळणारे अमेरिकन १५ डॉलर्स चीनच्या ग्रामीण भागात सुद्धा अपुरेच ठरतात. त्यावर ह्या प्रोजेक्टरचा खर्च सांभाळणं वगैरे बाबी आल्याच! परंतु असा पेशा निवडणारी माणसं जरा हटके असतात. त्यांनी पुर्ण विचार करुन हा निर्णय घेतलेला असतो. नायक म्हणतोही की संगणकासमोर बसुन मी ही खूप पैसे कमावु शकलो असतो पण लोकांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांच्या जीवनात आनंद फुलविणं माझ्यासाठी महत्वाचं आहे ! त्याचे वडील अजुनही त्याच्यासोबत जमेल तसे गावात फिरुन त्याला प्रोजेक्टरची मांडणी करण्यात मदत करतात.   

आजची ह्या दोघांची भेट आहे ती क्युयांग गावाला ! दोन तासाच्या मोटारीच्या प्रवासानंतर हे गाव येतं. हल्ली रस्ता झाला म्हणुन मोटारीनं दोन तासात जाऊ शकतात. नाहीतर पुर्वी सायकलवर सर्व सामान टाकुन दोन - दोन दिवस प्रवास करुन ही मंडळी जात असत. काही तास लवकर पोहोचुन ही मंडळी सायंकाळी सात वाजता क्युयांग गावाच्या मुख्य सेंटरवर चित्रपट दाखवला जाईल अशी घोषणा करतात. ह्यात त्यांच्या मोटारीजवळ येऊन मला इतक्या लांब येता येणार नसल्यानं माझ्या घरासमोरच चित्रपट दाखवाल का अशी विनंती करणारी वृद्ध स्त्री लक्षात राहते! 



नायक शेतात काम करणाऱ्या गावकऱ्यांना सुद्धा जाऊन भेटतो आणि चित्रपटाला येण्याची विनंती करतो. चित्रपट युद्धावरचा आहे की प्रणयाधारित आहे असा प्रश्न एक वयस्क स्त्री खट्याळपणे विचारते ! मोजकं उत्पन्न असल्यानं मनोरंजनासाठी खर्च करणं गावकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळं गावात बहुधा सामाजिक कार्यक्रमांची वानवाच असावी. त्यात नोकरीधंद्यांसाठी शहरात जाऊन राहणाऱ्या तरुण मंडळींची समस्या ह्या ही गावाला भेडसावणारी ! त्यामुळं ह्या नायकाशी बोलण्यास उत्सुक अनेक वृद्ध मंडळी दिसतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यक्रमांचा अभाव असल्यानं गावातील स्त्रियांना सुद्धा एकत्र येण्यास फार कमी संधी मिळत असाव्यात. त्यामुळं सिनेमाचा असा शो असला की त्याआधी काही वेळ हजर होऊन स्त्रिया एकत्रितपणे नाचसुद्धा करतात! 



पुर्ण वेळ चित्रपट पाहत थांबणे काही वृद्ध मंडळींना शक्य होत नाही. ही मंडळी मग घरी निघुन जातात. काही वेळानं चित्रपट संपतो. नायक आपल्या वडिलांना घेऊन सामानासकट दोन तासाच्या प्रवासानंतर घरी परततो. एकत्र जेवण केलं जातं. नायक, त्याची पत्नी आणि आई वडील एकत्र भोजन करुन अंगणात आपल्यासाठी पुन्हा एकदा प्रोजेक्टर उभारुन सिनेमाचा आनंद लुटतात. हिवाळ्याआधी हा शेवटचा शो असल्यानं आता पुन्हा एकदा तात्पुरत्या नोकरीच्या शोधात शहरात जाणं क्रमप्राप्त आहे !



एका  दीर्घ दिवसानंतर रात्रीचं जेवण आटपुन अंगणात बसलेला नायक आपल्या आईवडिलांकडे पाहत बोलतो. कदाचित माझ्या आईवडिलांना मी 
जीवनातील मोठाली सुखं देऊ शकत नसीन. पण मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना मी गरम पाण्याचा प्याला देऊ शकतो ह्यातच ते समाधानी आहेत आणि मी ही ! 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...