मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

गोंधळलेली मध्यमवयीन माणसं


आयुष्य आपल्यापुढं काय वाढून ठेवेल हे नक्की सांगता येत नाही. तुम्हांला जाणवो  वा ना जाणवो  पण ह्या पोस्टमध्ये विनोदाची पेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

आंतरिक मानसिक गोंधळ हा बहुसंख्य भारतीय मध्यमवयीन  माणसांच्या प्राक्तनात लिहिला असावा. ह्याला अपवाद दोन प्रकारची माणसं. पहिला प्रकार म्हणजे आपल्याला आयुष्याचं कोडं उलगडण्याची सुतराम शक्यता नाही हे पूर्णपणे उमजलेली माणसं. त्यामुळं त्यांना विचार न करता वागण्याचा परवाना मिळालेला असतो. मजेत जगतात ही माणसं. दुसरा प्रकारात आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं हे जाणवलेली माणसं. हल्लीच्या भाषेत म्हणायचं झालं तर पूर्णपणे sorted असतात ही माणसं. आपल्याला हवं तेव्हा हवं तसं वागतात. कोणत्या लोकांशी कधी संपर्क ठेवावा हे त्यांना नक्की माहिती असतं. बऱ्यापैकी मजेत आयुष्य जगता येतं त्यांना. फक्त अशी लोक कदाचित जाणते अजाणतेपणी दुसऱ्यांचा वापर करून घेण्याची शक्यता असते. 

आता वळुयात पोस्टच्या केंद्रस्थानी असलेल्या जमातीकडं - गोंधळलेली मध्यमवयीन माणसं! इथं ही माणसं का गोंधळलेली असतात ह्याविषयी मी विविध मुद्दे सादर करत आहे. 

१. मोकळा वेळ - ह्या मध्यमवयीन  माणसांचा बालपणीचा काळ आईवडिलांकडून आज्ञा स्वीकारण्यात, त्यानंतर नवऱ्याला आज्ञा देण्यात / बायकोकडून आज्ञा घेण्यात आणि मुलांचं संगोपन करण्यात व्यस्त गेलेला असतो. अचानक एका टप्प्यावर आज्ञांची देवाणघेवाण विविध कारणांस्तव मंदावते, मुलं स्वावलंबी होतात. इतका प्रचंड वेळ फावला वेळ ह्या वर्गात दाखल झाल्यानं ह्या माणसांचा मेंदू अगदी गोंधळून जातो. देवानं आपल्याला इतका महत्वाचा मनुष्यजन्म दिला आणि त्यातील तासनतास, दिवसेंदिवस आपण असेच वाया घालवत बसलो तर पूर्ण आयुष्याचा हिशोब मांडायला बसल्यावर देव आपल्याला ओरडेल अशी त्यांना भिती वाटू लागते. त्यातच भर म्हणून उमराव जान मधील - तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी  ह्या ओळी त्यांच्या कानावर पडतात. त्यामुळं आपण एखादा छंद जोपासला पाहिजे ह्याचा त्यांना साक्षात्कार होतो. 

काही जणांना काही कारणास्तव मोकळा वेळ मिळत नाही. 'भला उसके पास मोकळा वेळ हैं और मेरे पास क्यू नहीं ?' ह्या विचारानं ते गोंधळून जातात. 

२. न उमगलेल्या गोष्टी - प्रत्येक माणसाला आयुष्यात न समजलेल्या बऱ्याच गोष्टी असतात. आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कधीतरी समजू शकतात हा विश्वास बाळगून ही माणसं आयुष्य जगत असतात. पण एका क्षणी ह्या गोष्टी आपल्याला कधीच समजू शकणार नाहीत ह्याची त्यांना जाणीव होते. त्यामुळं त्यांच्या गोंधळात अजून भर पडते. वानगीदाखल काही उदाहरणं 

अ . शेअरबाजारातील चढावउतार. आपण प्रचंड अभ्यास करून घेतलेल्या शेयर्सचे आपण गुंतवणूक केल्यानंतर गडगडणे !

ब. Age is just a number - अमीरखान वगैरे मंडळीचे आवडतं असलेल्या ह्या वाक्याचं मराठी भाषांतर 'वय हा एक केवळ आकडा आहे' हे असावं का आणि असल्यास त्याचा नक्की अर्थ काय?

क. TOI  बरोबर येणाऱ्या बॉम्बे टाईम्स चे नामांतर मुंबई टाईम्स करावं म्हणून अजून कोणी आंदोलन कसं छेडलं नाही? त्यातील जे कोणी सेलेब्रिटी आहेत त्यातील बहुतांश लोकांना आपण कसं काय ओळखत नाही?

ड. प्रत्येक देशाकडं असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या प्रमाणात त्या देशानं चलन बाळगावं असं ह्या माणसांनी लहानपणापासून ऐकलेले असते. ह्यामागचं नक्की कारण दहा मित्रांनी दहा बैठकीत समजावून सांगितल्यावर सुद्धा आपल्या डोक्यात प्रकाश का पडत नाही 

अशी ही यादी वाढतच जाते 

३. आपण ज्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो अशा लोकांची दिवसेंगणिक कमी होत जाणारी संख्या - हळुहळू आपलं फार कमी लोकांशी पटत आहे ह्याचा साक्षात्कार ह्या लोकांना होतो. ह्यासाठी ही लोक सुरुवातीला दुसऱ्यांना दोषी धरतात. मग काही काळानं कदाचित खरी समस्या आपणच आहोत ह्याची जाणीव त्यांना होऊ लागते. हे आपल्या बाबतीत कसं काय होऊ शकते ह्याचा प्रचंड धक्का त्यांना बसतो. बिचारी अजूनच गोंधळून जातात. 

मध्यमवर्गीय माणसं गोंधळून जाण्याची तीन कारणं आपण पाहिलीत. आता ही लोक ह्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहुयात. 

१. छंद - आपल्याला काही छंद असायला हवा ह्याची जाणीव त्यांना होते. ह्या वयात छंद जोपासणं हे काहीसं कठीण जात असलं तरीही हे लोक जिद्दीनं प्रयत्न करतात. ब्लॉग लिहिणं, कविता करणं, फुलांचे फोटो काढणं, किशोरकुमारची गाणी गाणं, वनात शांत बसलेल्या पक्ष्यांना कॅमेरात टिपणं वगैरे वगैरे. जोवर हा छंद आपला वेळ योग्य रितीनं व्यतीत करण्यासाठी आपण जोपासत आहोत तोवर ठीक. ज्याक्षणी आपण कौतुकाच्या अपेक्षेनं हे करायला जातो तिथं गोंधळ होतो. छंदामध्ये योग्य अंशी विरक्ती समाविष्ट असावी. 

२. कंपू - आपल्यासारख्या समविचारी लोकांचा कंपू बनवून चर्चा, सामाजिक कार्य करणे वगैरे वगैरे. काहीजणांना कंपू बनवून विधायक कार्य करायचं असतं, तर काहीजणांना केवळ धमाल करायची असते तर काहीजणांना काही भव्यदिव्य ध्येयाच्या पडद्याआडून वेळ घालवायचा असतो, आपली प्रसिद्ध होण्याची भूक भागवून घ्यायची असते. एक गोष्ट मात्र खरी की असे कंपू चांगली कामं नक्कीच करतात. त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. फक्त ह्यात गटबाजी होऊ नये, किंवा एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे असले प्रकार होऊ नयेत आणि योग्य वेळ येताच आपण बाजूला होऊन नवीन लोकांना संधी देता यायला हवी. आणि हो कंपूच्या माध्यमातून मदिराप्राशनाचे वाढतं प्रमाण अगदी चुकीचं. पण हल्ली ह्या मुद्द्यावरून लोक अगदी आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळं ह्यावर न बोललेलंच बरं !

ह्या आधी मांडलेला मुद्दा पुन्हा एकदा मांडतोय. तुम्ही जर स्वतःला काही चांगल्या गोष्टीत व्यस्त ठेवू पाहत असाल तर वाचन, संगीतश्रवण, निसर्ग ह्यासारखे उत्तम पर्याय नाहीत. सर्वशक्तिमानाकडं परतण्याच्या मार्गावर असताना एक समृद्ध व्यक्तिमत्व होऊन त्याच्याकडं परतणं केव्हाही इष्ट !

एक गोंधळलेला माणुस 

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

एअरबस ते एसटी via पार


 

सायंकाळी नेहमीप्रमाणे पारावर कंपू गप्पा मारायला जमला होता. वर्षानुवर्षे ही रामगावची परंपरा होती. अचानक दूरवरून भाऊराव तावातावाने पाराच्या दिशेनं येताना दिसले.

नाना - "अरे हा का आज वैतागलेला दिसतोय ?"

तात्या - " ह्याला काय वैतागायला कारण लागतं होय ? बहुदा शेजाऱ्याने ह्याच्या पोरानं उडविलेला फुगा बेचकीनं फोडलेला असावा"

आधीच वैतागलेल्या भाऊरावांच्या कानावर तात्यांचे हे वाक्य ओझरते पडले. बसता बसता तात्याला एक धक्का देण्याची संधी भाऊरावाने सोडली नाही. 

आप्पा - "भाऊ, झालं तरी काय इतकं वैतागायला?"

भाऊ - "काय सांगु आप्पा, पोरगी म्हणते की मी आता कॉलेजात जाणार नाही!"

आप्पा - "अन ते का म्हणून ?"

भाऊ - " ते आपले टाटा आणि एअर इंडिया मिळून ४७० विमानं घेणार आहेत ना, म्हणून"  हे सांगताना भाऊंच्या कपाळावरील आठ्या स्पष्ट दिसत होत्या. 

गुरुजी - "म्हणजे सारिकाला एक विमान वगैरे देणार की काय, टाटा ?"

हे बोलणारे गुरुजी होते म्हणून वाचले, दुसरं कोणी असतं तर भाऊंचा सर्व राग त्याच्यावर निघाला असता. 

भाऊ - "नाही हो! तिला एअर होस्टेस होण्याची स्वप्नं पडू लागली आहेत. जगातील प्रत्येक शहरात थेट विमानसेवा सुरु करणार एअर इंडिया. म्हणजे आपली नक्कीच हवाई सुंदरी म्हणून वर्णी लागेल असा तिला आत्मविश्वास वाटू लागला आहे. काल कोण्या मैत्रिणीशी बोलत होती फोनवर. अमुकतमुक शहरांतील फोटो इंस्टावर टाकला तर किमान पाचशे लाईक मिळतील असं म्हणत होती!

बाजूला बसलेल्या खट्याळ टिनूला फुटलेल्या हास्यरसाच्या उकळ्या तो मोठ्या प्रयत्नानं दाबून ठेवत होता. मोठ्या गांभीर्याचा आव आणत तो म्हणाला, "भाऊ, बघा आपली कोकणात मोठी जमीन आहे. टाटांना सांगा इतकी ४७० विमानं ठेवायला नवीन विमानतळ तर लागणारच की नाही. तुमचीच जमीन देऊन टाका त्यांना विमानतळासाठी! मुलगी एअर होस्टेस, जमिनीवर विमानतळ! तुम्ही अगदी सेटल होऊन जाल बघा !"

टिनूच्या ह्या बोलण्यानं मात्र कंपू अगदी गंभीर झाला. त्याच्या बोलण्यात तथ्य आहे असंच सर्वांना वाटू लागलं. त्याच वेळी कधी नव्हे त्या सगुणाबाई पारासमोरून चालल्या होत्या. सर्व कंपूला एकत्र आणि तेही गंभीर पाहून त्यांना आपलं कुतूहल आवरता आलं नाही.  

सगुणाबाई - "रामराम ! आज सर्वजण कोणत्या विषयावर चर्चा करताहेत? " 

तात्यांनी त्यांना थोडक्यात सर्व चर्चेचा तपशील सांगितला. अचानक सगुणाबाईंच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. 

सगुणाबाई - "कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात असं काही आम्ही होऊ देणार नाहीत. आम्ही आंदोलन उभारू !"

"आंदोलन" शब्द ऐकताच तात्यांचे कान टवकारले.  आंदोलनासाठी लागणारी माणसे आम्ही सवलतीच्या दरात पुरवू असं हळूच त्यांनी सगुणाबाईंच्या कानात सांगितलं. सगुणाबाई अजूनच रागावल्या. त्यांचा रागावलेला चेहरा पाहताच त्यांना शांत करण्यासाठी विमानतळ जरी झालं तरी त्याच्या धावपट्टीवर आपण रविवारी सकाळी लहान मुलांच्या खेळांचं आयोजन करू असे तात्यांनी म्हणताच त्यांचा राग काहीसा निवळला. 

गावात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा सदानंद उर्फ सँडी इतका वेळ शांत बसून हे ऐकत होता. अचानक तो उभा राहिला. 

सँडी - "Guys, Please listen to me! I have brilliant idea" 

आपण guys म्हटल्यावर सर्वजण आजुबाजूला गाई आल्या की काय ह्याचा शोध घेऊ लागले आहेत हे सँडीला समजलं. त्यामुळं तो लगेचच जमिनीवर आला. 

सँडी - " मोठ्या लोकांनो !" 

"ह्याच्या वडिलांना ह्याला मराठी शाळेत टाकायला सांगितलं होतं मी" तात्या आप्पांच्या कानांत पुटपुटले. त्यांच्याकडं दुर्लक्ष करत सँडी बोलत राहिला. 

सँडी - "नवीन एअरपोर्ट बांधला की तिथं येणाऱ्या ट्रॅव्हलर्ससाठी  कॅब्स लागणार. म्हणजे इथं मला एक मोठी business opportunity दिसते आहे." 

कॅब्स म्हणजे अनेक कोबी असावेत अशी समजुत केलेल्या आप्पांना पुढील वाक्य कळेनासं झालं. त्यानंतर सँडी पुर्ण सुटला होता. 

"आपल्यापैकी काही जणांनी मिळून नवीन aggregator cab कंपनी उभारूयात! म्हणजे पंचकोनातील युवकांना जॉब्स मिळतील !" 

भाऊ (रागावून) - "पंचकोनातील नाही पंचक्रोशीतील !"

सँडी - "हा हा तेच ते ! तर सर्वांना जॉब्स मिळतील. गावातील महिला भाकऱ्या, ठेचा बनवतील. तो आपण विमानात authentic इंडियन ब्रेकफास्ट म्हणून विकूयात ! "

सर्वजण अवाक होऊन सँडीचे बोलणं ऐकत होते. त्यामुळं स्वतःवर अजून खुश होत सँडी पुढे म्हणाला. "माझ्याकडं अजून काही जबरदस्त आयडिया आहेत. भारतीय लोकांना matching कलर्सचे आकर्षण आहे. त्यामुळं आपण टाटांना I mean एअरबस कंपनीला वेगवेगळ्या रंगांत विमानं रंगवायला सांगू. "

भाऊ - "तो वांगी रंग नक्की कोणता ते टाटांना नीट सांगा. त्या दिवशी वेगवेगळ्या दहा रंगांच्या वांग्याचा फोटो व्हाट्सअँपवर आला होता! त्यावरून घरी मोठी वादावादी झाली होती"

भाऊंच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत सँडी बोलतच राहिला. ज्या रंगांचे विमान विमानतळावर उतरणार त्याच रंगांच्या टॅक्सी प्रवाशांना प्रवासासाठी द्यायच्या. अशा प्रकारचे ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी नवीन वेबसाईट करायची वगैरे वगैरे ! कंपू  अगदी भारावून गेला होता. अजून बराच काळ खरंतर ही मैफिल चालली असती. पण दोन तास उशीर झालेली बोरीगाववरुन आलेली एसटी सर्व कंपूला धुलीस्नान करून जोरात पुढे निघून गेली. त्या एसटीला, चालकाला शेलक्या शब्दांत आहेर देत कंपू आपापल्या घरी परतला. 

४७० विमानं येतील तेव्हा येतील पण तुमची  सध्या गाठ माझ्याशीच आहे ह्याची एसटीने त्यांना आठवण करून दिली होती. 


(तळटीप - ह्या पोस्टची संकल्पना एका व्हाट्सअँप ग्रुपवरील चर्चेतून मिळाली आहे. ह्या पोस्टमधील पात्रांचा आणि प्रत्यक्ष जीवनातील काहीही संबंध नाही. जर का असा संबंध तुम्हांला जाणवला तर तो निव्वळ योगायोग समजावा )

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

मनोगत


शुभ दुपार,  मित्रमैत्रिणींनो, 
 
आज तीन वर्षांच्या कालावधीनंतर आपण भेटत आहोत.  ह्या टप्प्यावर आयुष्याकडं कसं पाहावं यासंबंधी माझे विचार  तुमच्या समोर मांडत आहे. 

बालपणी आपण सगळ्यांनीच आयुष्याकडं कुतूहलानं, उत्साहानं  पाहिलं. त्यानंतर तारूण्यात अगदी नाट्यमयरित्या म्हणायचं झालं तर अगदी गगनाला गवसणी घालण्याइतपत स्वप्नं पाहिली नसली तरी काहीतरी लक्षणीय करावं अशी सुप्त इच्छा मनात बाळगली असेल. नशिबानं बऱ्याच काही गोष्टी मनासारख्या घडल्या असतील, काही निसटल्या असतील. आता ह्या क्षणी व्यावसायिक क्षेत्रात अजूनही बरंच काही करण्यासारखं असेलही. पण ते साध्य करण्यासाठी आयुष्यातील इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत एका विशिष्ट मर्यादेपलीकडं तडजोड करण्याची आपली तयारी नाही. त्यामुळं ह्या क्षणी  तटस्थेनं जीवनाकडे, स्वतःकडे पाहणं हा समाधानी जीवनाचा मूलमंत्र आहे. त्यासाठी विरक्ती यायला हवी, जे सध्या तरी कठीण आहे :). तटस्थता, विरक्ती ही मार्गदर्शक तत्त्वं आपल्या अधिकृत भूमिकांसाठी असली तरी काही वेळा त्यातूनही मुक्त होऊन जगायला हवं. खेळकरपणा, मस्तीखोरपणा सारं काही अधूनमधून तरी नक्की हवा. त्यासाठी काही सोशल ग्रुप असणे, मित्र मंडळी नातेवाईकांच्या नियमित भेटी होणे आवश्यक आहे. 

सत्तरीनंतर वैद्यकीय उपचारांचा अतिरेक नको असला तरी त्याशिवाय पर्याय नाही. नैसर्गिकरित्या आयुष्य जगण्याची सवय केली तर  शरीर आपल्याला चांगली साथ देईल. आयुष्यातील शिस्त ह्या टप्प्यावर खूप महत्त्वाची आहे. चवीसाठी मटण खावं, त्याची चव मला अप्रतिम वाटते ! मला स्वतः ला खाटखूट नावाचा मासा आवडतो. तो ही खावा! पण यावर मर्यादा येतील का या विचाराने कधी तरी उगाच अस्वस्थ होतो.

 स्वतःकडं तटस्थ मनोवृत्तीद्वारे पाहता यायला हवं. म्हणजे नक्की काय? आपण बराच वेळ कामाच्या ठिकाणी असतो. कार्यालयीन कामात कधी तरी आपल्या मर्यादा उघड होण्याची शक्यता असते. Which is absolutely ok. त्यातून शिकावं पुढं जावं. स्वतःच्या मर्यादा उघड होण्याचे प्रसंग येऊ शकतात, त्यांना स्वीकारायला हवे, हा व्यावसायिक जीवनाचा महत्वाचा धडा आहे, हे मी माझ्या वरिष्ठांकडून शिकलो. ह्यात माझ्या बॉसचे श्रेय मोठं आहे. Aditya, Don't take it personally! हे त्याचं आवडतं वाक्य! आयुष्याच्या सुरुवातीला घरी, शाळेत बरंचसं कौतुक होत राहिल्यानं जीवनातील परखडपणापासून मी काहीसा अनभिज्ञ, बायकोच्या शब्दात "लाडावलेला" होतो. 

आपल्याकडं तटस्थेनं पाहणं मला काहीसं सोपं गेलं ह्या मागं अजून एक मजेशीर कारण आहे. दोन तीन वर्षांपासून पृथ्वीवरील मनुष्यजीवन हा सर्वशक्तिमानाचा  AI / ML प्रयोग आहे असे मला वाटू लागले आहे. त्यानं मनुष्याला घडवलं, मनुष्याने संगणकाला घडवलं, त्याच्यात आता बुद्धीचा समावेश करणार. मग परमेश्वर थेट संगणकाशी संपर्क साधून मनुष्याला अद्दल घडविणार असले काहीबाही विचार माझ्या मनात येत राहतात. त्यामुळं आदित्याच्या बाबतीत जे काही घडतेय त्याकडं खूप गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही कारण माणूस हे सर्वशक्तिमान देवाचे एक मॉडेल आहे, माणसाला जे काही वाटतं, तो जे काही करतो त्यावर देवाचे नियंत्रण आहे याची खात्री वाटू लागली आहे!  

माझा बॉस गेल्या आठवड्यात IIT मध्ये एका प्रदर्शनात मार्गदर्शनासाठी गेला होता. तिथं बहुसंख्य मुलांशी संवाद करताना त्यांनी स्टार्टअप सुरु करणे हे आपलं ध्येय असल्याचं सांगितलं. बॉसने त्यांना एका सत्याची जाणीव करून दिली. एका यशस्वी स्टार्टअप मागे किमान दहा अयशस्वी स्टार्टअपस असतात.  त्या मुलांना ते कितपत रुचलं हे माहिती नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनं ही गोष्ट मला विश्लेषणासहीत सांगितली. माझ्यासोबत राहून तोही आता तत्वज्ञानी बनला आहे. "आपल्या आजोबांच्या पिढीचे ध्येय  survival हे होते. वडिलांच्या पिढीनं स्थैर्याला प्राधान्य दिलं. आपण काही प्रमाणात चंगळवादाकडं झुकलो. पुढील पिढीला instant gratification ची आस आहे. क्षणार्धात प्रसिद्ध होणं हे त्यांना महत्वाचं वाटतं" तो म्हणाला. काही प्रमाणात मी त्याच्याशी सहमत झालो. पण मी नवीन पिढीचे  इतक्या साचेबद्ध स्वरूपात वर्गीकरण करणार नाही. माझा मुलगा मला ज्या प्रमाणात फंडे देतो त्यावरून मला पुढील पिढीविषयी खूपच आशा वाटते. मी उत्तम शिक्षक आहे ही माझी भ्रामक समजूत "हल्लीच्या काळात शिक्षकानं खेळीमेळीने शिकवायला हवं " ह्या एका वाक्यात दूर केली. आजची ही पिढी पुढील दहा वर्षात आपल्यासारखीच होईल ह्याविषयी मी अगदी शाश्वत आहे. 

लहानपणीचे आदर्श मनात बाळगून हल्लीच्या काळात सर्व काही चुकीचं घडतंय असं आपल्याला वाटतं पण ते खूपदा चुकीचे असू शकते. आमच्या महामंडळाचे उदाहरण देतो. माझ्या मनात स्वातंत्र्यदिनी पेटी वाजविणाऱ्या म्हात्रे गुरुजींची प्रतिमा कायम होती. मधली कित्येक वर्षे मी महामंडळात गेलो नव्हतो. त्यामुळं बऱ्याच वर्षांनी मी जेव्हा महामंडळात गेलो तेव्हा बाजीपूरमधील म्हात्रे गुरुजींना शोधत राहिलो. आणि ते न सापडल्यानं उदास बनलो. अचानक पल्लवी दिसली. ती अगदी उत्साहानं सर्व समारंभांत भाग घेत होती. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काळानुसार परिस्थितीत बदल होतो. त्या बदलासह आपल्याला प्रवास सुरु ठेवता यायला हवा. जुन्या आदर्श प्रतिमेला मनात कायम ठेवावं पण नव्या प्रतीमेसाठी  सुद्धा जागा करून द्यावी.  चांगुलपणाचा धागा समाजात पुढं सतत जात राहतो. तो शोधण्याची दृष्टी असायला हवी. आणि त्यात आपल्या परीनं भर घालता यायला हवी. शेवटी काही झालं तरी हे interactive AI/ML Model आहे 

"व्यक्त होणं महत्वाचं आहे ह्याची जाणीव झालेली व्यक्ती ! "- माझ्या एका गटातील एका व्यक्तीचं हे status आहे. विचार करण्यासारखं आहे. व्यक्त होणं ही बऱ्याच जणांची गरज आहे. त्या सर्वांचीच ती गरज पूर्ण होते, असं नाही. आपल्याकडे परिचयातील, ऑफिसातील बरेच जण व्यक्त होण्यासाठी येतात. कार्यालयीन समस्या, काहीजण घरगुती समस्या आपल्या बरोबर शेयर करतात.  पण ह्यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे आपल्यात हा गुण आहे हे  सुरवातीला लक्षात येत नाही पण आपण इतरांना अशीही मदत करू शकतो. नुसते त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्यानेही त्या माणसाला बरे वाटते. आयुष्यातील ह्या टप्प्यावर आपल्याला आपल्यातील सुप्त गुणांचा शोध घेता यायला हवा. अधिक समाजपयोगी बनायला हवे. त्यासाठी विश्वासू मित्रांचे वर्तुळ असावं. राकेश आणि आजचे आयोजक  यात आदर्श आहेत. त्यांनी आज पुढाकार घेऊन अनेकांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. 

मी कधीतरी कामानिमित्त अमेरिकेत  जातो. तिथं ठरलेलं एक हॉटेल आहे तिथंच राहतो. तिथं स्वागतकक्षावर एक म्हातारे गृहस्थ आहेत. त्यांनी वयाची ऐंशी पार केली असावी! आपलं काम अगदी चोख करतात. परतताना विमान थोडं उशिरा असेल तर चेक आऊटच्या वेळी  वाढीव दोन तीन तास असंच राहा असं सांगतात, स्वतः ची काळजी घे असंही आवर्जून सांगतात. बर्फ पडत असला किंवा वारे सुटले की काळजी घे असं सांगतात. मलाच नव्हे तर बऱ्याच जणांना त्यांचा हा चांगला अनुभव येतो. असे काही अनुभवले की चांगुलपणावर हे जग सुरळीतपणे सुरू आहे असा आपला विश्वास बसतो. 

मी बऱ्यापैकी कर्मठ आहे असं प्राजक्ता म्हणते. त्यानंतर आता काही बहिणी सुद्धा म्हणतात.  ऑफिसातील पार्ट्यांत नवीन पिढीतील काही लोक सुरेख नाचतात. मग मलाही नाचण्याचा आग्रह केला जातो. मला केवळ वसईतील ख्रिश्चन लग्नांतील वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवर एक हात वर करून नाचता येते. नीट नाचता येत नाही या गोष्टींचा माझ्या मनात बरेच दिवस न्यूनगंड होता. पण गेल्या वर्षी एका पार्टीत मी तिशीतील एका मुलाजवळ जाऊन बसलो आणि त्याला विचारलं अरे बाबा तू इथं का बसला आहेस. नाचत का नाहीस? तो म्हणाला - हा सगळा थिल्लरपणा आहे, मला पटत नाही. मी अत्यंत खुश झालो, आपण एकटेच नाही आहोत ही भावना सुखावणारी होती. पण खूप लोकात नाचणे मला खरच मनापासून आवडत नाही हे स्वीकारायला हवे असे माझ्या मनात आले. Accept the moment the way it is! हे या टप्प्यावर तरी शिकायला हवं.

मला नक्की काय म्हणायचं आहे? आयुष्य काही प्रमाणात सुंदर आहे. हे सौंदर्य आपसूकपणे आपल्या वाट्याला येणारं नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. भोवताली चांगुलपणा आहे, परंपरागत चाललेल्या चालीरीती आहेत अगदी आकाशवाणीवरील मंगलप्रभात सुद्धा आहे. पण पूर्वी हे सर्व काही उघडपणे समोर होतं, आज त्याचा काहीसा शोध घ्यावा लागतो. आणि ह्या सर्व प्रक्रियेत आपल्या सारख्या बालमित्रांची साथसंगत असली की एका विश्वासानं ह्या शोधात सामील होता येतं !!

आपण सर्व जीवनातील बहुविध अनुभवांना सामोरे गेलो आहोत. आपल्या सर्वांची मनोगतं ऐकणं खूप आवडेल. त्यामुळे सर्वांनी व्यक्त व्हावं हीच विनंती !
धन्यवाद 
आदित्य !!

रविवार, १ जानेवारी, २०२३

न चल अकेला !




कोणी काही म्हणो माणुस एकटाच असतो. म्हणावं तर लहानपणीचा काळ ह्याला अपवाद असतो. आईवडिलांच्या मायेच्या ऊबेत जीवनाचा उषःकाल व्यतीत केलेल्या बालकास नंतर मात्र परखड वास्तवास सामोरे जावं लागतं. 

काहीजणांना हे वास्तव सहन करण्याची क्षमता उपजत प्राप्त झालेली असते. त्यांचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं. आयुष्यात यश / अपयशाला सामोरे जावं लागणं, सुखद / दुःखद घटनांना तोंड द्यावं लागणं ह्या सर्वांना ह्या व्यक्ती फारशा न डगमगता सामोऱ्या जातात. मनाचा खंबीरपणा ही एक देणगी अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांना लाभली असते असं आपण म्हणू शकतो. लोकांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणं, लोक आपल्याविषयी काय म्हणतील ह्याविषयी विचार करण्यात फारसा वेळ न दवडणे अशा व्यक्तिवैशिष्ट्यामुळं ही माणसं आपल्याला हव्या त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. 

दुसऱ्या प्रकारची व्यक्तिमत्वं एका वेगळ्याच संघर्षाला तोंड देत असतात. लोकांनी आपल्याला स्वीकारावं, हे स्वीकारलं आहे ह्याची वेळोवेळी दृश्य स्वरूपात दखल घ्यावी अशी ह्यांची सुप्त अपेक्षा असते. वाढत्या वयानुसार ही अपेक्षा उघडपणे व्यक्त न करता आल्यानं  ह्या व्यक्तींचा काहीसा कोंडमारा होत राहतो. ह्यांच्या नशिबानं जर ह्यांना असा साथीदार अथवा सुहृद मिळाला जो ह्यांच्या ह्या दखलीकरणाच्या  अपेक्षेच्या भावनेला उमजू शकेल तर त्यांचं आयुष्य सुखकारक होऊ शकते. 

पण सर्वचजण असे सुदैवी नसतात. आयुष्यातील वयानुसार आलेल्या जबाबदाऱ्या पार पडत राहणं हेच ह्यांच्या नशिबात असतं. आता जग इतकं भावनाशून्य होत चाललं आहे की आपल्या भोवताली असणाऱ्या अशा व्यक्तींची आपल्याला बऱ्याच वेळा जाणीव सुद्धा होत नाही. लौकिकार्थानं ह्या व्यक्तींचं आयुष्य एक सरळ रेषेत व्यवस्थित चाललेलं असतं. पण कौतुकाच्या एका किमान अपेक्षेपासून ह्या व्यक्ती वंचित राहतात.  अशा व्यक्ती ओळखाव्या कशा? बोलण्यात उत्साह नसणं, आपल्या आवडीनिवडीविषयी फारसा चोखंदळपणा न दाखविणे, समारंभात केवळ एक उपचार म्हणून उपस्थित असणं वगैरे वगैरे! 

ही पोस्ट आटोपशीर आहे. उद्देश्य एकच ! भोवताली असलं व्यक्तिमत्व आहे का ह्याचा शोध घ्या आणि त्यांची वेळोवेळी दखल घ्या. जगाचं झपाट्यानं अलिप्तीकरण होत आहे. माणसं एकटी पडत चालली आहेत. त्यांना परत उमेद देण्यासाठी तुमचा एक दूरध्वनी , एक भेट पुरेशी आहे. कोणी काही म्हणेल ह्याचा विचार न करता अशा लोकांनां स्वतःहून भेटा, त्यांच्याशी बोला. 

ही पोस्ट माझ्या शाळेच्या मित्रांना समर्पित जे आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून आपल्या मित्रांना भेट देत आहेत. मी काहीसा ह्या बाबतीत दोषी आहे. माझे लिखाण आणि माझे आचरण ह्यात काहीशी विसंगती आहे. योग्य वेळी ही विसंगती दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन.   

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

आदित्यास पत्र


प्रिय आदित्य,

तुला नितांत गरज असलेल्या वार्षिक सुट्टीचा आजचा पहिला दिवस. ह्या वर्षातील घडामोडींचा आढावा घेत पुढील आयुष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टीना एका आखीव स्वरूपात मांडण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे अशी समजूत करून घेत मी पुढील मुद्दे मांडत आहे. 

  1. सकाळच्या वेळी तू अधिक कार्यक्षम असतोस. लवकर शुचिर्भूत होऊन आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर तू अधिक वेळ घालवावा. महत्त्वाच्या गोष्टी ह्या संकल्पनेत कार्यालयीन कामाव्यतिरिक्त आई, भावंडं, पत्नी, मुलगा आणि नातेवाईक  ह्यांच्याशी सुसंवाद साधणे हे सुद्धा अपेक्षित आहे ह्याची तुला जाणीव असावी हे अपेक्षा. 
  2. तुझा मेंदू आणि मन सदैव उल्हसित, टवटवीत ठेवावास. हे दोघे तुझ्या शरीरात वास्तव्य करतात. त्यामुळं तुझ्या शरीराची काळजी घेणं हे ओघानं आलंच. वरणभात, भाजी हा आहार शरीराला सम्यक स्थितीत ठेवण्यासाठी उत्तम. झोपायला जाण्याच्या तुझ्या वेळेत दिवसेंदिवस उशीर होत आता ही वेळ रात्री अकरा वाजता (आणि पलीकडे) झाली आहे. ह्यावर वेळीच उपाययोजना करत, ही वेळ किमान साडेदहा वाजेपर्यंत आणावी. 
  3. दररोज किमान तीस मिनिटं चाल. तुला जाणवलं असेलच की चालण्यानं मेंदूला प्राणवायूचा पुरवठा होऊन चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आणि तू अधिक कार्यक्षम होतोस. 
  4. ह्या वर्षात काही प्रसंगी तू चिडलास, भविष्यात सुद्धा हे असेच घडत राहील. तुझ्या मनाचा तोल जाण्याची घटना घडत असताना त्याची जाणीव व्हायला हवी जेणेकरून आपल्याकडून दुखावल्या जाणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यांचं दुखावलं जाणं आटोक्यात ठेवता येऊ शकते. शांत झाल्यावर त्या लोकांशी जाऊन बोलणं महत्त्वाचं !
  5. आयुष्यात महत्त्वाच्या असे नातेवाईक आणि मित्र ह्यांना पारखण्यात आणि त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवण्यात तू यश मिळवलेस. आयुष्यात एका विशिष्ट टप्प्यानंतर पैशाव्यतिरिक्त इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणून आयुष्यात ह्या लोकांना अग्रिम स्थान देणं तू चालू ठेवावंस. दुसऱ्या बाजूनं विचार करता तुझ्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येत राहतील ज्यांच्याशी तुझं मनापासून कधीच जुळू शकणार नाही. तरीही त्यांच्याशी पूर्णपणे फारकत न घेता किमान पातळीवर संपर्क कायम ठेवता येणं तुला जमायला हवं 
  6. वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या बाबतीत तुझ्याकडून काडीचीही आशा बाळगणं चुकीचं ठरेल. त्यामुळं ह्याबाबतीत वाईट वाटणं सोडून दे ! आयुष्यात सर्वानांच सर्व गोष्टी जमत नाहीत
  7. घरी कागदपत्रांचे व्यवस्थित नियोजन करणे तुला अजिबात जमत नाही. किमान सर्वात महत्वांच्या अशा कागदपत्रांची यादी करुन ती कागदपत्रं सांभाळून ठेव जेणेकरून प्रत्येकवेळी त्यांचा शोध घेण्यातील तुझा वेळ वाचेल. 
  8. सत्तरी - ऐंशीतील मोजक्या जुन्या गाण्याव्यतिरिक्त जगात अजूनही चांगलं संगीत आहे ह्याची जाणीव ठेव. तरीही हीच गाणी ऐकण्याचा अट्टाहास असेल तर कानात हेडफोन घालून ऐक. 
  9. रात्रीच्या जेवणाची वेळ आठच्या आत ठेवण्यात तुला बऱ्यापैकी यश मिळालं आहे. ही सवय कायम ठेव. रात्रीच्या जेवणाची वेळ दहाच्या पलीकडे गेल्यास हे जेवण टाळणं उत्तम 
  10. घरी गाणी म्हणण्याच्या तुला मिळालेल्या परवानगीचा दुरुपयोग करू नकोस. कदाचित ती रद्द होऊ शकते. 
  11. आपल्या पूर्वापार आवडीकडं, मुळांकडे जाण्यासाठी ह्या सुट्टीचा वापर कर. रात्रीच्या आकाशाकडं पाहत ह्या ताऱ्याकडून निघालेल्या प्रकाशानं पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खरोखरच काही वर्षे घेतली असतील का हा विचार तुझ्या मनात येऊन कित्येक वर्षे झाली. 
  12. वाडीत जा, तिथल्या झाडांशेजारी बस. झाडांभोवताली फिरणाऱ्या मुंग्या, कीटक, फुलपाखरं ह्यांचं निरीक्षण कर. जग वैविध्यपूर्ण आहे. दररोज तुला जो काही जगाचा मर्यादित नजारा दिसतो तो नजारा म्हणजेच संपूर्ण जग आहे अशी चुकीची समजूत करुन घेऊ नकोस. 
  13. मराठी / हिंदी मालिका अधुनमधून पाहत जा. जरी ह्या मालिका मूर्खपणाची हद्द गाठत असल्या तरी ह्या मालिका म्हणजे जीव की प्राण असणाऱ्या हजारो लोकांमध्ये आपण राहत आहोत ह्याचं भान तुला असणं आवश्यक आहे. 
  14. भोवतालच्या वयस्क लोकांशी बोलत जा. त्यांच्याकडं असणाऱ्या ज्ञानाच्या खजिन्याचा तुला खूप फायदा होऊ शकतो. त्यासाठी त्यांच्याशी तुला संवाद साधता यायला हवा, त्यांना बोलतं करता यायला हवं. जगात गोष्टी झपाट्यानं बदलत आहेत असं जरी आपल्याला वाटत असलं मूळ प्राथमिक गोष्टी, शहाणपणा कायमच राहत असतो. 
  15. तुझ्या मुलाचं नीट निरीक्षण कर, त्याचं बोलणं मन लावून ऐक. "मला तुला शहाणपणाचे दोन शब्द ऐकवू देत" ह्या कायमच्या मनोवृत्तीतून बाहेर ये! नवीन पिढीकडे पाहण्यासाठी, त्यांना समजावून घेण्यासाठी सोहम महत्त्वाची संधी आहे हे ध्यानात ठेव 
  16. वरील मुद्दा खरा असला तरीही जगाला तुझ्या ब्लॉगपोस्ट्सची गरज आहे ज्याद्वारे तू जुन्या चालीरीतींचे, संस्कृतीचे, मूल्यांचे  गुणगान गात असतोस. त्यामुळं तुझं लिहिणं चालू ठेव 
  17. वर्षभरात तीसहुन अधिक दिवस असे होते ज्यादिवशी एका दिवसात तू पंचवीसपेक्षा जास्त बुद्धिबळाचे ऑनलाईन सामने खेळलास. आता तुझ्यात लक्षणीय सुधारणा होण्याची तिळमात्र शक्यता नाही आणि तू एखादी स्थानिक स्पर्धा सुद्धा जिंकू शकत नाहीस. त्यामुळं ह्याबाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवलेलंस बरं !
  18. २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून फारशा अपेक्षा ठेऊ नकोस. त्यांच्या खराब कामगिरीनंतर त्या कामगिरीचे विश्लेषण करण्याचा विचारसुद्धा मनात आणू देऊ नकोस. चुकूनमाकून त्यांनी तुला खोटं ठरविले तर ही पोस्ट एडिट करून "मी चुकलो" असे वाक्य टाक.    
  19. पुढील पंधरा दिवसांत सर्व गॅझेटपासून सातत्यानं किमान दोन तास दूर राहण्याचा प्रयत्न कर 

 हे वर्ष तू बऱ्यापैकी चांगलं निभावलंस. तुझ्या भूमिकेत एक वर्ष निभावण्यासाठी दररोज नेकीचे प्रयत्न करावे लागतात, ते तू केलेस. त्याबाबत सार्थ अभिमान ठेव. "आपल्या मूळ रूपापासून फारशी फारकत घेऊ नकोस" शेवटी तेच महत्त्वाचं आहे. 

तुझा विश्वासू,
आदित्य 

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

दिवाळी




सणांना तोटा नसलेल्या भारतदेशात दिवाळी सणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.  मनात दडून बसलेल्या बालपणीच्या दिवाळीच्या मनोहर आठवणी, त्यावेळी चिंताविरहित भावनेत अनुभवलेले आनंदाचे, कौतुकाचे क्षण आपण कितीही मोठे होत गेलो तरी दर दिवाळीला मनःपटलावर नव्यानं उमटत राहतात. मग सुरु होते ती आजच्या काळात त्या आठवणींना शोधण्याची, पुन्हा अनुभवण्याची धडपड!

दिवाळी खरंतर तीन-चार दिवसांची. पण ह्या तीन - चार दिवसांनी उत्साहानं आयुष्य जगण्याची उमेद वर्षभर पुरणारी. आपल्यापासून कायम दूर निघून गेलेल्या प्रियजनांच्या आठवणी दररोज तर येत असतातच पण दिवाळीच्या दिवसांत त्यांची उणीव प्रकर्षानं जाणवते. त्यांना बरं वाटलं असतं अशा पद्धतीनं दिवाळी साजरी करणं हेच आपल्या हाती असतं. 

ह्या वर्षी बरेचजण दिवाळीनिमित्त भेटायला आले. जुन्या आठवणी निघाल्या. खरंतर आयुष्याच्या एका टप्प्यानंतर आपण स्वतंत्ररित्या आपल्या पद्धतीनं आयुष्य जगायला शिकलो असतो. परंतु आधीच्या पिढीचं भोवताली असणं खूप आश्वासक असतं. अगदी कसोटीच्या प्रसंगी त्यांचा सल्ला अगदी सुखावह असतो. त्यांच्या निघून जाण्यानं प्रचंड एकाकी वाटत राहतं. आपल्यापरीनं आयुष्यात गुंतून घेत ह्या एकाकीपणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्या हाती असतं. 

ह्या वयात वरच्या पिढीचं छप्पर असणं खूप आधार देणार असतं हे बोलणारा सुजित भेटला. अभ्यंगस्नानासाठी सकाळी लवकर उठणं नक्कीच महत्वाचं पण साडेतीन म्हणजे जास्तीच लवकर होते अशी काहीशी हळुवार तक्रार प्रज्ञाताईनं केली.  गावातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना भेटायला निघालेला राकेश तासभर गप्पा मारत बसला. कधीही हक्कानं गप्पा मारायला येऊ शकतो अशा घरांपैकी तुमचं हे घर हे त्याचं वाक्य लक्षात राहिलं. पूर्वी गावागावांत आदरानं ज्यांच्याकडं पाहिलं जायची अशी काही घरं असायची. परंपरा, शिष्टाचार कसे पाळावेत हे ज्यांच्याकडून शिकावं अशी ही घरं असायची. काळाच्या ओघात ही घरं, त्यातील आदरणीय माणसं विखुरली गेली आणि संस्कार ज्यांच्याकडून शिकावेत अशा संस्था नाहीशा झाल्या.    

सण हा समूहानं साजरा करण्याचा प्रसंग. सणाच्या आठवणी कुटुंब, घर, गांव, मित्रमंडळी ह्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या असतात. ज्यांनी हे अनुभवलं आहे ती सारी माणसं आयुष्यभर ह्या आठवणींसोबत जगत राहतात. सणांचं खरं सणपण अनुभवण्यासाठी जुन्या परंपरा, आठवणींना शक्य तितका उजाळा देत ते कुटुंबासमवेत घरी  साजरे करणं हेच इष्ट होय. रस्त्यातील ट्रॅफिक जॅममध्ये स्वतःला कोंडून घेत बऱ्याच कालावधीनंतर रिसॉर्टवर पोहोचुन साजरी केली गेलेली दिवाळी आता मूळ धरु पाहतेय! बघुयात काय होतंय ते ! 

बलिप्रतिप्रदेच्या दिवशी भल्या पहाटे घरातील कचरा घराबाहेर काढून थोड्याफार थंडीत आंघॊळ केल्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळात लिहलेली ही पोस्ट ! बळी तो कान पिळी! 

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

Pushing ourselves to the brink! (कडेलोटाच्या दिशेनं )


संदेशभाऊ वर्तक ह्यांना शनिवारी सायंकाळी बोरिवली ते नायगांव हे तीस किलोमीटर अंतर कारने कापण्यासाठी तीन तास लागले. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अचानक पावसानं इन्फिनिटी मॉलच्या बाजुच्या रस्त्यावर मी कारमध्ये एकाच ठिकाणी दहा मिनिटं अडकून होतो. मालाड ते बोरिवली ह्या टप्प्यात मेट्रोच्या कामामुळं मेट्रोच्या बरोबर खालच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला अत्यंत खडबडीतपणा आला आहे आणि दुसऱ्या कडेला वाहनं अनधिकृतरित्या पार्क करुन ठेवलेली असतात. त्यामुळं बऱ्याच वेळा कृत्रिमरीत्या वाहतुक कोंडी होत राहते. नागरिक मग उलट्या दिशेनं वाहनं चालविणे, सिग्नल तोडणे असले प्रकार करत राहतात. 

प्रचंड वेगानं अजूनही वाढत असलेल्या मुंबई महानगराच्या पाणी, वीज पुरवठ्याच्या गरजा त्याच प्रमाणात वाढत चालल्या आहेत. संबंधित यंत्रणा अजुन तरी ह्या गरजा पुर्ण करण्यात यशस्वी होत असली तरी ही यंत्रणा अत्यंत तणावाखाली असल्याचं वेळोवेळी जाणवत राहतं. सध्यातरी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरमिश्रित कौतुकाची भावना असली तरीही भविष्यात कुठंवर ते वाढत्या शहराच्या गरजांना तोंड देऊ शकतील ह्याविषयी चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 

मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या परिसंस्थेवर सुद्धा ताण पडत राहतो. इतकं सारं असलं तरीही विनु म्हणत असल्याप्रमाणं मुंबईतील परिसंस्था बिनबोभाट सुरु ठेवण्याकडं अधिकृत यंत्रणेची महत्तम शक्ती खर्च पडत असते. मुंबईत तुमच्याकडं पैसा असेल तर सर्व काही मिळू शकते. गावात तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरीही तुम्हांला सुद्धा वीजपुरवठा खंडित होणं, अनियमित पाणीपुरवठा वगैरे प्रकारांना तोंड द्यावं लागतं. ह्या सर्व प्रकारांमुळं गांव सोडून मुंबईकडं / परदेशात धाव घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळं मुंबई आणि महानगरांवर अधिक ताण पडत राहतो. 

आमच्या एका घरातून एका दिवसात बाहेर पडणारा कचरा पाहून चिंता वाटू लागते. तीच गोष्ट ई-कचऱ्याच्या बाबतीत! भ्रमणध्वनी, संगणक ही सारी मंडळी मोजक्या वर्षांत एकतर कालबाह्य किंवा नादुरुस्त होतात. लगेचच आपण नवीन घेण्याच्या मागे धाव घेतो. तीच गोष्ट थोड्याफार फरकानं टीव्ही, कार ह्यांच्या बाबतीत. दहा वर्षात ह्या गोष्टी बदलाव्या लागण्याची शक्यता अधिक असते. ऍमेझॉन, झोमॅटो, स्विगी आपल्यासाठी सोयीचे, पण एका शर्टांसोबत, एका मसाला डोश्यासोबत त्यांनी आपल्या घरात आणून टाकलेलं प्लॅस्टिक, आवरणाचा कचरा भयंकर असतो. आपल्यापैकी मोजके लोक प्लॅस्टिक रिसायकल करतात. झोमॅटो, स्वीगीने आपल्या शरीरात आणलेल्या जास्तीच्या कॅलरी जाळण्यासाठी आपल्यातील काहीतरी जिममध्ये जातात, काही जात नाहीत. दोन्ही वर्गातील काही लोकांना विविध आरोग्य समस्येनं ग्रासण्याचं प्रमाण वाढत चाललंय. मोठाली इस्पितळं, आरोग्यविमा ह्या संस्था आता तिथं होणाऱ्या अविश्वसनीय खर्चामुळं आता आश्वासक ऐवजी भितीदायक वाटू लागल्या आहेत. 

आपल्या पुढील पिढ्यांसाठी आपण पृथ्वी कोणत्या स्थितीत सोडणार आहोत हा प्रश्न मनाला भेडसावत राहतो.  गावांमध्ये  उपलब्ध असणाऱ्या उपजीविकेच्या पर्यायांची  कमतरता किंबहुना असे पर्याय निर्माण करण्यात एक राष्ट म्हणून आपल्याला आलेलं अपयश हे महत्वाचं कारण ज्यामुळं सर्वांना शहराकडं धाव घ्यायची आहे. शहरात, परदेशात एकदा मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर सुरु होते ती प्रतिष्ठेची शर्यत! तुमचं घर, नोकरी, कार, तुमच्या सहलींची ठिकाणं, तुमच्या मुलांचा शैक्षणिक प्रवास / यश  ह्यावरुन तुमचं मूल्यमापन करण्यात रस असणारी मंडळी !  तुम्हांला सामाजिक वर्तुळाचा भाग बनून राहायचं असेल तर ह्या मंडळींशी पडणारी तुमची गाठ अनिवार्य आहे.  सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातील मुखपृष्ठाला ज्यावेळी जाहिरातीची पहिली दोन तीन पानं मागच्या क्रमांकावर ढकलतात त्यावेळी समाजाच्या प्राधान्यक्रमाची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. मान्यवर व्यक्ती तंबाखूच्या जाहिराती करतात त्यावेळी भोवताली खरोखरच चिंतादायक परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याची खात्री पटते.  

हे कसं थांबविता येईल ह्याचा आता आपण विचार केला नाही तर पुढील काही वर्षांत परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की हल्ली कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. त्यामुळं आपण आपला विचार करावा. ठेवले ईश्वरे तैसेची राहावे ! ह्या उक्तीला अनुसरुन वागण्याचा जमेल तितका प्रयत्न करावा. प्रगती करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा पण एका मर्यादेपलीकडं स्वतःला खेचू नये. महानगराच्या बाहेर सुद्धा अनेक मंडळी आनंदात राहतात. ती कशी काय आनंदात राहू शकतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. थोड्याच वेळात आपण आपल्याभोवती निर्माण केलेल्या गैरसमजुतींचे जाळं दूर करण्यात नक्कीच यश मिळेल ! 

Happy Sunday! 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...