मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

एअरबस ते एसटी via पार


 

सायंकाळी नेहमीप्रमाणे पारावर कंपू गप्पा मारायला जमला होता. वर्षानुवर्षे ही रामगावची परंपरा होती. अचानक दूरवरून भाऊराव तावातावाने पाराच्या दिशेनं येताना दिसले.

नाना - "अरे हा का आज वैतागलेला दिसतोय ?"

तात्या - " ह्याला काय वैतागायला कारण लागतं होय ? बहुदा शेजाऱ्याने ह्याच्या पोरानं उडविलेला फुगा बेचकीनं फोडलेला असावा"

आधीच वैतागलेल्या भाऊरावांच्या कानावर तात्यांचे हे वाक्य ओझरते पडले. बसता बसता तात्याला एक धक्का देण्याची संधी भाऊरावाने सोडली नाही. 

आप्पा - "भाऊ, झालं तरी काय इतकं वैतागायला?"

भाऊ - "काय सांगु आप्पा, पोरगी म्हणते की मी आता कॉलेजात जाणार नाही!"

आप्पा - "अन ते का म्हणून ?"

भाऊ - " ते आपले टाटा आणि एअर इंडिया मिळून ४७० विमानं घेणार आहेत ना, म्हणून"  हे सांगताना भाऊंच्या कपाळावरील आठ्या स्पष्ट दिसत होत्या. 

गुरुजी - "म्हणजे सारिकाला एक विमान वगैरे देणार की काय, टाटा ?"

हे बोलणारे गुरुजी होते म्हणून वाचले, दुसरं कोणी असतं तर भाऊंचा सर्व राग त्याच्यावर निघाला असता. 

भाऊ - "नाही हो! तिला एअर होस्टेस होण्याची स्वप्नं पडू लागली आहेत. जगातील प्रत्येक शहरात थेट विमानसेवा सुरु करणार एअर इंडिया. म्हणजे आपली नक्कीच हवाई सुंदरी म्हणून वर्णी लागेल असा तिला आत्मविश्वास वाटू लागला आहे. काल कोण्या मैत्रिणीशी बोलत होती फोनवर. अमुकतमुक शहरांतील फोटो इंस्टावर टाकला तर किमान पाचशे लाईक मिळतील असं म्हणत होती!

बाजूला बसलेल्या खट्याळ टिनूला फुटलेल्या हास्यरसाच्या उकळ्या तो मोठ्या प्रयत्नानं दाबून ठेवत होता. मोठ्या गांभीर्याचा आव आणत तो म्हणाला, "भाऊ, बघा आपली कोकणात मोठी जमीन आहे. टाटांना सांगा इतकी ४७० विमानं ठेवायला नवीन विमानतळ तर लागणारच की नाही. तुमचीच जमीन देऊन टाका त्यांना विमानतळासाठी! मुलगी एअर होस्टेस, जमिनीवर विमानतळ! तुम्ही अगदी सेटल होऊन जाल बघा !"

टिनूच्या ह्या बोलण्यानं मात्र कंपू अगदी गंभीर झाला. त्याच्या बोलण्यात तथ्य आहे असंच सर्वांना वाटू लागलं. त्याच वेळी कधी नव्हे त्या सगुणाबाई पारासमोरून चालल्या होत्या. सर्व कंपूला एकत्र आणि तेही गंभीर पाहून त्यांना आपलं कुतूहल आवरता आलं नाही.  

सगुणाबाई - "रामराम ! आज सर्वजण कोणत्या विषयावर चर्चा करताहेत? " 

तात्यांनी त्यांना थोडक्यात सर्व चर्चेचा तपशील सांगितला. अचानक सगुणाबाईंच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. 

सगुणाबाई - "कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात असं काही आम्ही होऊ देणार नाहीत. आम्ही आंदोलन उभारू !"

"आंदोलन" शब्द ऐकताच तात्यांचे कान टवकारले.  आंदोलनासाठी लागणारी माणसे आम्ही सवलतीच्या दरात पुरवू असं हळूच त्यांनी सगुणाबाईंच्या कानात सांगितलं. सगुणाबाई अजूनच रागावल्या. त्यांचा रागावलेला चेहरा पाहताच त्यांना शांत करण्यासाठी विमानतळ जरी झालं तरी त्याच्या धावपट्टीवर आपण रविवारी सकाळी लहान मुलांच्या खेळांचं आयोजन करू असे तात्यांनी म्हणताच त्यांचा राग काहीसा निवळला. 

गावात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा सदानंद उर्फ सँडी इतका वेळ शांत बसून हे ऐकत होता. अचानक तो उभा राहिला. 

सँडी - "Guys, Please listen to me! I have brilliant idea" 

आपण guys म्हटल्यावर सर्वजण आजुबाजूला गाई आल्या की काय ह्याचा शोध घेऊ लागले आहेत हे सँडीला समजलं. त्यामुळं तो लगेचच जमिनीवर आला. 

सँडी - " मोठ्या लोकांनो !" 

"ह्याच्या वडिलांना ह्याला मराठी शाळेत टाकायला सांगितलं होतं मी" तात्या आप्पांच्या कानांत पुटपुटले. त्यांच्याकडं दुर्लक्ष करत सँडी बोलत राहिला. 

सँडी - "नवीन एअरपोर्ट बांधला की तिथं येणाऱ्या ट्रॅव्हलर्ससाठी  कॅब्स लागणार. म्हणजे इथं मला एक मोठी business opportunity दिसते आहे." 

कॅब्स म्हणजे अनेक कोबी असावेत अशी समजुत केलेल्या आप्पांना पुढील वाक्य कळेनासं झालं. त्यानंतर सँडी पुर्ण सुटला होता. 

"आपल्यापैकी काही जणांनी मिळून नवीन aggregator cab कंपनी उभारूयात! म्हणजे पंचकोनातील युवकांना जॉब्स मिळतील !" 

भाऊ (रागावून) - "पंचकोनातील नाही पंचक्रोशीतील !"

सँडी - "हा हा तेच ते ! तर सर्वांना जॉब्स मिळतील. गावातील महिला भाकऱ्या, ठेचा बनवतील. तो आपण विमानात authentic इंडियन ब्रेकफास्ट म्हणून विकूयात ! "

सर्वजण अवाक होऊन सँडीचे बोलणं ऐकत होते. त्यामुळं स्वतःवर अजून खुश होत सँडी पुढे म्हणाला. "माझ्याकडं अजून काही जबरदस्त आयडिया आहेत. भारतीय लोकांना matching कलर्सचे आकर्षण आहे. त्यामुळं आपण टाटांना I mean एअरबस कंपनीला वेगवेगळ्या रंगांत विमानं रंगवायला सांगू. "

भाऊ - "तो वांगी रंग नक्की कोणता ते टाटांना नीट सांगा. त्या दिवशी वेगवेगळ्या दहा रंगांच्या वांग्याचा फोटो व्हाट्सअँपवर आला होता! त्यावरून घरी मोठी वादावादी झाली होती"

भाऊंच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत सँडी बोलतच राहिला. ज्या रंगांचे विमान विमानतळावर उतरणार त्याच रंगांच्या टॅक्सी प्रवाशांना प्रवासासाठी द्यायच्या. अशा प्रकारचे ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी नवीन वेबसाईट करायची वगैरे वगैरे ! कंपू  अगदी भारावून गेला होता. अजून बराच काळ खरंतर ही मैफिल चालली असती. पण दोन तास उशीर झालेली बोरीगाववरुन आलेली एसटी सर्व कंपूला धुलीस्नान करून जोरात पुढे निघून गेली. त्या एसटीला, चालकाला शेलक्या शब्दांत आहेर देत कंपू आपापल्या घरी परतला. 

४७० विमानं येतील तेव्हा येतील पण तुमची  सध्या गाठ माझ्याशीच आहे ह्याची एसटीने त्यांना आठवण करून दिली होती. 


(तळटीप - ह्या पोस्टची संकल्पना एका व्हाट्सअँप ग्रुपवरील चर्चेतून मिळाली आहे. ह्या पोस्टमधील पात्रांचा आणि प्रत्यक्ष जीवनातील काहीही संबंध नाही. जर का असा संबंध तुम्हांला जाणवला तर तो निव्वळ योगायोग समजावा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...